(घोषित दि. 24.03.2014 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.गोविंद उफाड हे शासकीय सेवेत तलाठी या पदावर कार्यरत होते. दूदैवाने दिनांक 30.04.2011 रोजी झालेल्या अपघातात मृत्यू पावले. संबंधित पोलीसांनी सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा केला, साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
तक्रारदारांचे पती आदर्श तलाठी पतसंस्थेचे खातेदार असून पतसंस्थेने खातेदारा करिता गैरअर्जदार विमा कंपनीकडून रक्कम रुपये 1,00,000/- एवढया रकमेची जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा पॉलीसी घेतली होती. तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला. परंतू अद्याप पर्यंत विमा लाभ रक्कम दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी विमा प्रस्ताव दाखल केला नाही. तसेच तक्रारदारांना बालाजी सहकारी पतसंस्था परतूर यांनी जनता अपघात पॉलीसी अंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- विमा लाभ रक्कम अदा केली आहे. त्यामुळे दुस-या पतसंस्थेकडून विमा लाभ रक्कम देता येणे शक्य नाही.
तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदार यांचे लेखी निवेदन यांचा सखोल अभ्यास केला. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार, गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विद्वान वकील श्री. आर.यु.बनछोड यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.गोविंद उफाड दिनांक 30.04.2011 रोजी झालेल्या अपघातात मृत्यू पावल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार दिसुन येते.
तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे खातेदार असून त्यांनी खातेदारांकरीता गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- ची विमा पॉलीसी घेतली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांना दूस-या पतसंस्थेकडून सदर योजने अंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- विमा लाभ रक्कम मिळाली आहे. त्यामुळे तक्रारदारांना सदर पतसंस्थेकडून विमा लाभ रक्कम देणे शक्य नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदार, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे खातेदार आहेत. गैरअर्जदार 2 यांनी गैरअर्जदार 1 यांचेकडून खातेदारांकरीता जनता अपघात योजने अंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- ची विमा पॉलीसी घेतली आहे. सदर अपघात विमा पॉलीसी च्या कालावधीत झाला आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांना विमा रक्कम न देवून त्रुटीची सेवा दिल्याचे दिसून येते असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांना दूस-या पतसंस्थेकडून सदर योजने अंतर्गत लाभ मिळाला असला तरी प्रस्तूतची विमा पॉलीसी भिन्न असून प्रिमियमचा भरणा केलेला असल्यामुळे तक्रादारांना सदर योजने अंतर्गत विमा लाभ रक्क्म देणे गैरअर्जदार यांना बंधनकारक आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदार सदर योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम मिळण्यास पात्र असूनही गैरअर्जदार यांनी विमा रक्कम अदा न करुन त्रुटीची सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना मानसिक त्रास रुपये 2,500/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- देणे न्यायोचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 आदेश देण्यात येतो की, त्यांनी मानसिक त्रास रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसात द्यावे.
- वरील आदेश क्रमांक 1 व 2 मधील रकमा विहीत मुदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत द्याव्यात.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.