जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 695/2010. तक्रार दाखल दिनांक : 21/12/2010. तक्रार आदेश दिनांक : 23/03/2011. वैशाली वासुदेव वसेकर, वय 40 वर्षे, व्यवसाय : घरकाम व शेती, रा. मु.पो. अरण, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. तहसीलदार, माढा, ता. माढा, जि. सोलापूर. 2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., मंडलीय कार्यालय क्र.2, 8, हिंदुस्थान कॉलनी, अजनी चौक, नागपूर – 440 015. (नोटीस/समन्स डिव्हीजनल मॅनेजर यांचे बजावावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्यांचे पतीचे नांवे पॉलिसी नं.181200/48/2008/91 अन्वये विमा उतरविण्यात आला आहे. दि.29/5/2008 रोजी तक्रारदार यांचे पती विद्युत पंप चालू करीत असताना विद्युत शॉक बसल्यामुळे मृत्यू झाला आहे. सदर घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येऊन अपघाताबाबत घटनास्थळ पंचनामा व इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला. तसेच त्यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा दावा व कागदपत्रे दाखल करुन विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली असता, दि.11/6/2009 च्या पत्राद्वारे तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू ह्दयविकारामुळे व नैसर्गिक मृत्यू असल्यामुळे विमा रक्कम नाकारली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाली आहे. त्यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विमा कंपनीने तक्रारदार यांना दि.11/6/2009 रोजी पाठविलेल्या पत्राचे अवलोकन करता खालीलप्रमाणे नमूद कारण देऊन विमा दावा अस्वीकृत केल्याचे व तो बंद केल्याचे निदर्शनास येते. क्र.3 :- पॉलिसी कव्हरेजमधून वगळलेल्या मृत्यूचे कारण जसे ‘हार्ट अटक’ नैसर्गिक मृत्यू असल्यामुळे या पॉलिसी अंतर्गत फकत अपघातामुळे होणारे मृत्यूच फक्त कव्हर असल्यामुळे ‘नैसर्गिक मृत्यू’ पॉलिसी कव्हरेजमधून वगळलेले आहेत. 5. निर्विवादपणे, विमा कंपनीने तक्रारदार यांचा वरील नमूद एकमेव कारणास्तव विमा क्लेम नाकारलेला आहे. त्यामुळे इतर प्रश्नास आम्ही स्पर्श करु इच्छित नाही. तक्रारदार यांच्या कथनानुसार मयत वासुदेव यांना दि.29/5/2008 रोजी विद्युत पंप चालू करताना शॉक बसलेला आहे. पोस्टमार्टेमचे अवलोकन करता, मयत वासुदेव यांच्या मेंदुस इजा झाल्यामुळे व रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. अशा परिस्थितीमध्ये मयत वासुदेव यांचा मृत्यू नैसर्गिक कसा ठरतो ? हे सिध्द करण्याचा कोणताही प्रयत्न विमा कंपनीने केला नाही. सर्वमान्य व प्रस्थापित न्यायिक तत्वानुसार विमा कंपनीने ज्या कारणास्तव विमा दावा नाकारला आहे, ते कारणे पुराव्याद्वारे सिध्द करण्याची जबाबदारी निर्विवादपणे विमा कंपनीवर आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये विमा कंपनीने मयत वासुदेव यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सिध्द केलेले नाही. तसेच त्यांनी मंचासमोर येऊन तक्रारदार यांच्या तक्रारीस म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, या अनुमानास आम्ही येत आहोत. तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार विमा रक्कम रु.1,00,000/- विमा नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लक्ष फक्त) दि.11/6/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.2 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. वर नमूद रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास विरुध्द पक्ष क्र.2 विमा कंपनीने त्यानंतर संपूर्ण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |