तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1} सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/445/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/206/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
2} तक्रारदारांनी जाबदेणार बँक यांचेकडून Executive Visa Card मार्च 1999 मध्ये घेतले होते. या बँकेची सर्व्हींस आणि क्रेडीट कार्डची उपयुक्तता असल्याने जाबदेणारांचे क्रेडीट कार्ड पुढे चालू ठेवले. तक्रारदार हे देशात व देशाबाहेर अनेक वेळा जात होते त्यामुळे तक्रारदारांना या कार्डचा उपयोग अनेक वेळा होत होता. या क्रेडीट कार्डचा उपयोग केल्यामुळे तक्रारदारास जास्त ‘Reward Point” जे तक्रारदारास मिळत होते. या क्रेडीट कार्डची उपयुक्तता लक्षात घेऊन तक्रारदारांनी जाबदेणार बँकेकडे Visa Credit Card वरुन Gold Credit Card घेतले. स्टॅन्डर्ड चार्टन्ड गोल्ड कार्ड हे एअर सहाराशी संलग्न (tie-up) केले होते. यामुळे एअर सहाराचे फ्री एअर तिकीट त्यांना, त्यांच्या जोडीदारास व मुलास मिळणार होते. त्यांच्या हयाच गोल्ड कार्डमध्ये कॉसमॉंसची स्किम होती. त्याचेही फायदे तक्रारदारास मिळणार होते. हे कार्ड वापरल्यानंतर तक्रारदारास पॉईंन्ट नुसार पॉईन्टचे त्यांच्या डोमॅस्टीक किंवा इन्टरनॅशनल प्रवासा मधील माईल्समध्ये किंवा रुपयांमध्ये परिवर्तन होणार होते. या दोन्ही सुविधा या कॉसमॉस स्किम द्वारे तक्रारदारास मिळणार होत्या. Visa Credit Card वरुन गोल्ड कार्ड मध्ये परिवर्तन केल्यानंतर बदल करते वेळेस जाबदेणारांचे प्रतिनिधींनी तक्रारदारास असे सांगितले की, त्यांच्या पूर्वीच्या Visa Card मध्ये जमा झालेले पॉईन्ट या नवीन कार्डमध्ये समाविष्ट होतील. अशा सर्व सोई सांगितल्यामुळे तक्रारदारांनी त्यांचे Visa Card बदलून नवीन गोल्ड कार्ड एप्रिल 2004 मध्ये स्विकारले.
3} तक्रारदारांस डिसेंबर 2004 मध्ये इंडिया बाहेर जायचे असल्यामुळे त्यांच्या गोल्ड कार्ड मध्ये किती reward points जमा झाले हे पाहण्याची त्यांना उत्सुकता होती. म्हणून त्यांनी जाबदेणार यांना फोन लावला असता जाबदेणार बँकेने या बाबतीत एअर सहाराशी संपर्क साधावा असे तक्रारदारांस सांगितले. म्हणून तक्रारदारानी एअर सहाराशी संपर्क साधला असता ही स्किम बँकेने तुम्हाला दिली असल्याने बँकेकडे संपर्क साधावा असे सांगितले. वास्तविक त्यांचे पॉईन्ट किती झाले हे पहायचे होते. परंतू जाबदेणार यांनी त्यांना पॉईन्ट्स किती झाले हे सांगितले नाही. जाबदेणार यांनी अशा प्रकारे सेवेत त्रुटी ठेवल्याने तक्रारदारांनी कार्ड रद्य करण्याचे ठरवले आणि तसे 8 डिसेंबर 2004 रोजीच्या पत्राने जाबदेणारांस कळविले.
4} तक्रारदारांचे पुढे असेही म्हणणे आहे की, जाबदेणार यांनी 5 डिसेंबर 2004, 5 जानेवारी 2005, 5 फेब्रुवारी 2005, पर्यन्तच त्यांच्या स्टेटमेंट मध्ये पॉईन्ट्स आणि माईल्स् हे जमा झाल्या बद्यलचे नमूद केले होते. 5 मार्च 2005, 5 एप्रिल 2005, 5 ऑगस्ट 2005, 5 सप्टेंबर 2005 आणि 5 ऑक्टोंबर 2005 या स्टेटमेंटमध्ये किती पॉईन्ट आणि माईल्स् जमा झाल्याचे नमूद केले नाही. यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार यांना अनेक वेळा पत्र लिहीले. त्याचे उत्तर जाबदेणार यांनी दिले, परंतु रिवॉर्ड पॉईन्ट किती झाले याचा हिशोब अद्यापपर्यन्त दिलेला नाही. मार्च 2005 मध्ये तक्रारदारास स्टेटमेंट प्राप्त झाले त्यात तक्रारदारांकडून जाबदेणारास रु. 6,898.70/- पैसे येणे असल्याचे कळविले. तक्रारदारास हे स्टेटमेंट मान्य नव्हते तरीही रु. 6,898.70/- ही रक्कम भरली आणि 4 एप्रिल 2005 रोजी बँकेला लिगल नोटीस पाठविली. त्यामध्ये त्यांचे पॉईन्ट ट्रान्सफर का केले नाही. अॅन्यूअल फी ची मागणी केली. जे रिवॉर्ड पॉईन्ट्स मिळाले होते त्यावर व्याज दयावे अशा प्रकारची मागणी होती. 9 मे 2005 रोजी बँकेने त्याचे उत्तर दिले. परंतु कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. जानेवारी 2005 च्या स्टेटमेंटमध्ये जाबदेणार यांनी परत त्यांचे पॉईन्ट जमा झाल्याचे नमूद केले आहे. परंतु त्या पॉईन्टच्या रिडम्शन बद्यल काहीही नमूद केलेले नाही. तक्रारदारास जाबदेणार यांनी अॅन्यूअल फी म्हणून रु. 3,000/- भरण्यास जबरदस्ती केली. वास्तविक पाहता जून्या क्रेडीट कार्ड मधून नवीन क्रेडीट कार्ड मध्ये जे पॉईन्ट जमा होत असूनही त्यांनी अॅन्यूअल फी तक्रारदारांकडून आकारली. त्यामुळे क्रेडीट कार्डमध्ये बदल करताना जाबदेणार यांनी जे आश्वासन दिली होती ते संपूर्ण चुकीची आहेत असे तक्रारदारांनी नमूद केले आहे. अनेक वेळा विचारणा करुनही पॉईन्ट किती झाले याची माहिती दिली नाही म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे.
5} तक्रारदार जाबदेणार यांचेकडून त्यांच्या क्रेडीट कार्डवर जे पॉईन्ट्स जमा झाले ते पैशात रुपांतर करुन ती रक्कम दयावी व 12 % व्याज आकारावे. रु 1,000/- अॅन्यूअल फी घेतलेली ती परत करावी. मानसिक त्रासापोटी रु 10,000/- व रु 5,000/- तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
6} तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
7} जाबदेणार क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने दिनांक 25/10/2010 रोजी त्यांच्याविरुद्ध एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत केला.
8} तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांचेकडून Visa Card घेतले होते. त्यातील सोई सुविधा आवडल्या असल्यामुळे जाबदेणार यांच्या म्हणण्यावरुन त्यांनी गोल्ड कार्ड घेतले. गोल्ड कार्ड मधील सर्व सुविधा त्यांना मान्य होत्या. गोल्ड कार्ड एअर सहाराशी संलग्न केलेले होते. एअर सहाराशी संलग्न केलेल्या कार्डमध्ये कॉसमॉसच्या योजनेची सोय केलेली होती. त्यातही सुविधा दिलेल्या होत्या त्या सुविधा तक्रारदारास प्राप्त झाल्या नाहीत असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी स्टॅन्डर्ड चार्टन्ड एअर सहारा यांचे माहितीपत्र दाखल केले आहे. त्यात कॉसमॉसची स्किम नमूद केलेली आहे. या योजने नुसार जेव्हढे रिवॉर्ड पॉईन्ट तक्रारदार प्राप्त करतील त्यानूसार तक्रारदारास या योजने मधील सेवेचा फायदा मिळणार होता. परंतु तक्रारदारांनी जाबदेणार यांना अनेक वेळा त्यांच्या कार्ड मधील पॉईन्टची विचारणा केली असता जाबदेणार यांनी पॉईन्टची माहिती तक्रारदारास दिली नाही. त्यासाठी तक्रारदारांनी वकिला मार्फत नोटीस पाठविल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी स्टेटमेंट दाखल केले आहे. त्यात तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे अनेक स्टेटमेंटमध्ये पॉईन्ट आणि माईल्स किती जमा झाले त्याचा उल्लेख केलेला दिसून येत नाही. यावरुन जाबदेणार यांनी गोल्ड कार्ड बद्यलच्या ज्या सुविधा सांगितल्या होत्या त्या त्यांना दिलेल्या नाहीत हे दिसून येते. म्हणून शेवटी तक्रारदारानेच हे कार्ड रद्य केले. तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, जाबदेणार यांनीच हे कार्ड त्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता रद्य केले आहे. जरी दोन्ही बाजूंनी कार्ड रद्य झाले असले तरी तक्रारदारांच्या कार्डमध्ये पॉईन्ट आणि माईल्स किती जमा झाले हे सांगणे गरजेचे आहे.
परंतु जाबदेणार यांनी अनेक वेळा विचारणा करुनही सांगितले नाही. ही जाबदेणार यांची सेवेतील त्रुटी ठरते. दिनांक 9 मे 2005 रोजी स्टॅन्डर्ड चार्टन्ड बँकेने तक्रारदारांच्या वकीलांना पाठविलेले पत्र मंचात दाखल आहे. त्यामध्ये बँकेने तक्रारदारांच्या कार्डवर जुने आणि नवीन कार्डवर असे एकूण 2022 इतके पॉईन्ट जमा झाल्या बद्यल कळविले आहे. तसेच हे पॉईन्ट्स सोडवून घ्यावेत असेही त्यांनी नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीतही पॉईन्ट्स सोडवून घेण्यासाठी ( रिडम्शन) काय प्रयत्न केले या बद्यल सांगितले नाही. तरी सुध्दा हे पॉईन्ट्स जाबदेणार यांच्याकडेच आहेत. हे 2022 पॉईन्ट्स त्यांनी त्यांच्याच हिशोबा प्रमाणे ( रु. 125 = 1.5 कॉसमॉस माईल्स आणि 1 पाईन्ट = रु.125) पैशाच्या स्वरुपात तक्रारदारांस दयावेत. तक्रारदारांनी त्यांचे क्रेडीट कार्ड रद्य केले होते त्याचवेळी जाबदेणार यांनी हे पॉईन्ट्स तक्रारदारांस परत करावयास हवे होते, ते त्यांनी परत केले नाहीत. केवळ नोटीस उत्तरात पॉईन्ट्स सोडवून घ्यावेत असे नमूद केले असले तरी तक्रारदारांनी त्यासाठी कुठलाही प्रयत्न न केल्यामुळे जाबदेणार यांनी त्यांचे कर्तव्य म्हणून ते त्यांच्या पत्यावर पाठवण्यास हवे होते ते पाठवले नाही. ही रक्कम अद्यापही जाबदेणार यांचेकडेच पडून आहे. म्हणून मंच जाबदेणार यांना आदेश करते की, 2022 पॉईन्ट्सचे परिवर्तन केल्यानंतरची जी रक्कम होईल ती जानेवारी 2005 पासून 9 % व्याजदराने दयावीत, तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- दयावा. तक्रारदारांनी रु 10,000/- नुकसानभरपाई मागितली आहे. परंतु त्यासाठी त्यांनी कुठलेही स्पष्टिकरण दिलेले नाही किंवा त्यांना इतर देशात किंवा देशाअंतर्गतच जायचे होते या बद्यलचाही कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे काय नुकसान झाले हे कळून येत नाही. म्हणून मंच तक्रारदारांची नुकसानभरपाईची मागणी मान्य करीत नाही.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार बँकेने तक्रारदारास 2022 पॉईन्ट्सची रक्कम
9 % व्याजदराने जानेवारी 2005 पासून रक्कम अदा करे
पर्यन्त दयावी, तसेच रक्कम रु.2000/- तक्रारीचा खर्च
म्हणून या आदशाची प्रत मिळाल्या पासून सहा
आठवड्यांच्या आंत द्यावी.