जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 632/2010.
तक्रार दाखल दिनांक :02/12/2010.
तक्रार आदेश दिनांक : 28/01/2013. निकाल कालावधी :02 वर्षे 01 महिने 26 दिवस
श्री. अतुल सुधाकर भोसले, वय 26 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. प्लॉट नं.2, निवारा नगर, नडगिरी पेट्रोल पंपाचे समोर,
विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
(1) शिवरत्न मोटर्स, सदाशिवराम माने विद्यालय प्राथमिक
शाळेच्या बाजुला, पंढरपूर रोड, अकलूज, ता. माळशिरस.
(2) बजाज अटो फायनान्स लि., मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे-35.
(विरुध्द पक्ष यांच्या नोटीस त्यांचे व्यवस्थापकांवर बजावाव्यात.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: जी.व्ही. कटारे
विरुध्दपक्षक्र.2 यांचेतर्फेविधिज्ञ:व्ही.व्ही. नागणे
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की,
त्यांनी नोव्हेंबर 2005 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून बजाज कंपनीची डिस्कव्हर ई.एम. 125 ही दुचाकी रजि. क्र.एम.एम.13/ए.ई.8834 खरेदी केली असून त्याकरिता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून हायर-परचेस तत्वावर कर्ज घेतलेले आहे. तक्रारदार यांनी तीन वर्षाकरिता दिलेल्या कर्जाचे व विम्याचे हप्ते वेळोवेळी भरणा केले आहेत. कर्जाची परतफेड केल्यानंतर तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी आर.सी. व टी.सी. बूक व कर्ज बोजाची नोंद कमी होण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जबाबदारी परस्पर एकमेकांवर टाकत आहेत आणि तक्रारदार यांना आर.सी. व टी.सी. बूक परत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदार यांनी दि.16/7/2010 रोजी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवूनही विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे दुचाकी क्र.एम.एम.13/ए.ई.8834 चे आर.सी. व टी.सी. बूक परत करण्यासह मानसिक त्रासापोटी रु.15,000/- नुकसान भरपाई व खर्चापोटी रु.1,100/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 हे मंचासमोर विधिज्ञांमार्फत उपस्थित झाले. परंतु उचित संधी देऊनही त्यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द नो.डब्ल्यू.एस. आदेश पारीत करण्यात येऊन तक्रारीमध्ये एकतर्फी सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्यात आले.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
3.1) मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी केलेल्या बजाज कंपनीच्या डिस्कव्हर ई.एम. 125 (दुचाकी रजि. क्र.एम.एम.13/ए.ई.8834) वाहनाकरिता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून लोन अग्रीमेंट नं. 453005816 अन्वये कर्ज घेतल्याचे दाखल कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. वास्तविक पाहता, अभिलेखावर दाखल कागदपत्रांची पडताळणी व अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याचे स्पष्ट होते. कर्जाची परतफेड केल्यानंतर तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी आर.सी. व टी.सी. बूक व कर्ज बोजाची नोंद कमी होण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिलेले नाही आणि विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जबाबदारी परस्पर एकमेकांवर टाकत आर.सी. व टी.सी. बूक परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.
3.2) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करण्यापूर्वी विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसला उत्तरे दिलेली असून ती अभिलेखावर दाखल आहेत. त्यांची दखल घेतली असता, तक्रारदार यांचे कर्ज परतफेड झालेले नाही, असे कोणतेही त्यांचे म्हणणे नाही. उलटपक्षी त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांना आर.सी. व टी.सी. बूक मिळालेले नाही, अशी त्यांची तक्रार आहे. ज्याअर्थी तक्रारदार यांच्या नोटीसला उत्तर देऊन विरुध्द पक्ष हे नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचे मान्य करतात, त्याअर्थी तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, हेच यातून स्पष्ट होते. तसेच विरुध्द पक्ष हे मंचासमोर येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करीत नसल्यामुळे व तक्रारदार यांच्या तक्रारीस किंवा त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे खंडन करीत नसल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांचे स्थान ‘कर्जदार’ व विरुध्द पक्ष क्र.2 हे ‘वित्तीय संस्था’ आहेत. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांना आर.सी. व टी.सी. बूक दिल्याचे नमूद केलेले नाही किंवा तशी कागदपत्रे दाखल करण्याचाही प्रयत्न केलेला नाही. आमच्या मते, प्रचलित कर्ज पध्दतीप्रमाणे कोणतीही वित्तीय संस्था कर्जदारास वाहनाकरिता दिलेल्या कर्जाची वसुली होईपर्यंत वाहनाची मुळ कागदपत्रे स्वत:कडे सुरक्षा (सिक्युरिटी) म्हणून जतन करते. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ताब्यामध्ये तक्रारदार यांचे आर.सी. व टी.सी. बूक असावे, या निर्णयाप्रत आम्ही आलो असून विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून दुचाकीचे आर.सी. व टी.सी. बूक मिळविण्यासह मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळविण्यास पात्र आहेत, या मतास आम्ही आलो असून शेवटी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार अशंत: मान्य करण्यात आली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांना दुचाकी रजि. क्र.एम.एम.13/ए.ई.8834 चे मुळ आर.सी. व टी.सी. बूक द्यावे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावयाची आहे.
4. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/28113)