- आदेश- नि. 1 वर -
( दि. 04-07-2018)
द्वारा : मा. श्री. विजयकुमार आ. जाधव, अध्यक्ष.
1) सामनेवाला यांनी विकसीत केलेल्या 'सत्यविनायक रेसिडेन्सी' या इमारतीमधील 'ए' विंग मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. 101 एकूण क्षेत्र 825 चौ.फू.(76.67चौ.मी.) ही निवासी सदनिका दि.26-11-2014 रोजीच्या दुय्यम निबंधक, लांजा यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत क्र.1325/2014 ने नोंदवून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेली आहे. सदर 'सत्यविनायक रेसिडेन्सी' या इमारतीची नोंदणीकृत सोसायटी करुन जागेचे कन्व्हेयन्स डीड सोसायटीचे नांवे करुन दयावे तसेच'सत्यविनायक रेसिडेन्सी' या इमारतीमधील रहिवाश्यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- देणेचे सामनेवाला यांना आदेश दयावेत या करिता प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी मंचाकडे दाखल केलेली आहे.
2) नि. 40 वर तक्रारदार व सामनेवाला यांनी संयुक्त तडजोड पुरशीस दाखल केली आहे. तक्रारदार व सामनेवाला मंचासमोर हजर. प्रस्तुत तक्रारीमधील काही मुद्दयांची पुर्तता सामनेवाला यांनी करुन दिली आहे व काही मुद्दयांची पुर्तता आजपासून 2 महिन्यात म्हणजेच दि. 4-09-2018 रोजीपर्यंत करुन देण्याचे सामनेवालाने मान्य केले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार राहत असलेल्या इमारतीमधील सदनिकाधारकांचे 'सहकारी संस्था' नोंदणीकृत करुन दिलेली आहे. नोंदणीकृत संस्थचे नावे इमारतीखालील प्लॉटचे क्षेत्राची मालकी वर्ग करणेसाठी "कन्वेनियन्स डीड" नोंदणी करुन देण्याचे सामनेवाला मान्य करीत असून त्याची नोंदणी प्रक्रिया दि. 4-09-2018 रोजीपर्यंत पूर्ण करावयाची आहे व त्यासाठी लागणारा खर्च तक्रारदाराच्या स्थापन झालेल्या सहकारी संस्थने करावयाचा आहे.
3) त्याचप्रमाणे तक्रारदार राहत असलेल्या इमारतीच्या दक्षिण बाजूकडील कंपाऊंड वॉल दि. 4-09-2018 रोजीपर्यंत योग्य उंचीचे दगडी बांधकामात करुन देण्याचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. सदर पुरशीसमधील मान्य केलेनुसार पुर्तता सामनेवाला यांनी केली नाही तर सामनेवाला विरुध्द दरखास्त अर्ज दाखल करण्याचा अधिकार तक्रारदार यांना राहवयाचा आहे. सदर पुरशीसवर तक्रारदार व सामनेवाला यांच्या सहया असून त्यांचे विधीज्ञांचे देखील सहया आहेत. सदरची संयुक्त तडजोड पुरसीस या मंचाने पडताळून,पाहून मान्य केली आहे. सदर पुरशीसनुसार तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये तडजोड झालेने प्रस्तुतचा तक्रार अर्ज क्र.43/2015 निकाली करणेत येतो. सबब, आदेश खालीलप्रमाणे.
- आ दे श -
1) तक्रार अर्ज नं.43/2015 निकाली करणेत येतो.
2) तक्रारदार व सामनेवाला 1 व 2 यांचेमधील दि.04-07-2018 रोजीची नि. 40 वरील संयुक्त तडजोड पुरशीस ही या आदेशाचा एक भाग समजणेत यावी.
3) प्रकरण दप्तरी दाखल.
4) उभय पक्षकांराना सदरच्या आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.