अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/145/2009
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 31/08/2009
तक्रार निकाल दिनांक : 10/10/2011
श्री. श्रीनिवास गोपाळ उपाध्ये, ..)
1011/1, मित्रमंडळ को.ऑप्.हौसींग सोसायटी, ..)
शिवाजीनगर, पुणे – 411 06. ..)... तक्रारदार
विरुध्द
प्रिमीयर लिमीटेड, ..)
मुंबई-पुणे रोड, चिंचवड, ..)
पुणे – 411 019. ..)
श्री. मैत्रय व्ही. जोशी, ..)
चेअरमन आणि एम्.डी. ..)
प्रिमीयर लिमीटेड, ..)
58, नरीमन भवन, ..)
नरीमन पॉईंट, ..)
मुंबई – 400 021. ..)... जाबदार
****************************************************************
तक्रारदारांतर्फे :- अड. श्री. हेमराज सावंत
जाबदारांतर्फे :- अड. गिरीश जगनाडे
****************************************************************
द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत
(1) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार कंपनीने आपली बुकींगची रक्कम परत केली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(2) तक्रारदार श्री. श्रीनिवास उपाध्ये यांनी जाबदार प्रिमीयर लिमीटेड यांचेकडून दि.22/1/1994 रोजी प्रिमीयर 138 डी कार विकत घेणेसाठी बुकींग अमाऊंट म्हणून रककम रु.20,000/- मात्र भरले होते. यानंतर तक्रारदारांना गाडीची गरज असल्यामुळे त्यांनी जाबदारांशी संपर्क साधला असता त्यांना गाडी देण्यात आली नाही. यानंतर दि.27/1/2009 रोजी तक्रारदारांनी आपली बुकींगची रक्कम परत मिळणेसाटी सर्व आवश्यक कागदपत्रांसह जाबदारांकडे अर्ज केला. मात्र हा अर्ज मिळाल्यानंतर कंपनीने रक्कम देण्याची आपली जबाबदारी नाकारली. सबब आपली बुकींगची रक्कम व्याज व इतर अनुषंगिक रकमांसह मिळणेसाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 4 अन्वये एकूण 4 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(3) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्या नोटीसीची बजावणी झाल्यानंतर त्यांनी विधीज्ञांमार्फत आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये जाबदारांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारलेल्या असून मंचाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्राबाबत आक्षेप उपस्थित केला आहे. सदरहू तक्रार अर्ज अत्यंत विलंबाने दाखल केलेला असून तो मुदतबाहय आहे असाही जाबदारांचा आक्षेप आहे. तक्रारदारांनी दि.22/1/1994 रोजी बुकींगची रक्कम भरल्यानंतर दि.6/1/1997 रोजी त्यांना कार देण्यात आल्याचे पत्र पाठविले होते. मात्र तक्रारदारांनी जाबदारांची ही ऑफर नाकारली किंवा स्विकारली नाही. कारचे बुकींग रद्य न करता 12 वर्षांच्या विलंबानंतर दि.27/1/2009 रोजी तक्रारदारांनी बुकींगची रक्कम परत मागणारे पत्र जाबदारांना पाठविले. अशाप्रकारे एवढया विलंबाने केलेली ही मागणी मुदतबाहय असल्याने तसेच जाबदारांच्या विरुध्द सदोष सेवेची कोणतीही तक्रार नसल्याने सदरहू तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी जाबदारांनी विनंती केली आहे. जाबदारांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ प्राधिकृत अधिका-याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 15 अन्वये संबंधित कराराच्या अटी व शर्ती मंचापुढे दाखल केल्या आहेत.
(4) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांचे म्हणणे दाखल झाल्यानंतर त्यांनी निशाणी 17 अन्वये आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला. दरम्यानच्या काळामध्ये उभय पक्षकारांच्या दरम्यान तडजोडीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांच्या दरम्यान तडजोड न झाल्यामुळे तक्रारदारांतर्फे अड. श्री. सावंत व जाबदारांतर्फे अड. श्री. जगनाडे यांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
(5) प्रस्तूत प्रकरणातील तक्रार अर्ज, म्हणणे दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांचा युक्तिवाद यांचा साकल्याने विचार करता खालील मुद्ये (points for consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. मंचाचे मुद्ये व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे :-
मुद्या क्र. 1 :- सदरहू तक्रार अर्ज मंचाच्या भौगोलिक
अधिकारक्षेत्राच्या अधीन आहे का ? ... नाही.
मुद्या क्र.2 :- सदरहू तक्रार अर्ज मुदतबाहय आहे का ? ... होय.
मुद्या क्र. 3 :- जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली
ही बाब सिध्द होते का ? ... नाही.
मुद्या क्र. 4 :- काय आदेश ? ... तक्रार अर्ज नामंजूर
करण्यात येत आहे.
मुद्या क्र. 1 (i) :- प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांनी ज्या कराराच्या आधारे हा अर्ज दाखल केला आहे त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये उभय पक्षकारांच्या दरम्यान वाद उद्भवल्यास मुंबई येथील न्यायालयास प्रकरण चालविण्याचे अधिकार राहील असा उल्लेख असल्याने पुणे न्यायमंचामध्ये दाखल करण्यात आलेला हा अर्ज बेकायदेशीर ठरतो असे जाबदारांचे म्हणणे आहे. जाबदारांचा हा आक्षेप तक्रारदारांनी अमान्य केलेला असून जाबदारांची एक शाखा पुणे येथे कार्यरत आहे याचा विचार करता, त्यांच्या या आक्षेपात तथ्य नाही असे नमुद केले आहे. दाखल पुराव्याच्या आधारे जाबदारांच्या आक्षेपात तथ्य आहे अथवा नाही याबाबत मंचाचे विवेचन पुढीलप्रमाणे :-
(ii) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांच्या आक्षेपाच्या अनुषंगे तक्रारदारांच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता, सदरहू अर्ज मंचाच्या भौगोलिक क्षेत्राच्या अधिन कसा आहे याबाबत त्यांनी काहीही निवेदन केलेले आढळून येत नाही. जाबदारांचे म्हणणे दाखल झाल्यानंतर तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तर दाखल केलेले नसल्यामुळे या मुद्याबाबत तक्रारदारांतर्फे काहीही लेखी स्पष्टीकरण मंचापुढे सादर करण्यात आलेले नाही. तक्रारदारांनी हजर केलेल्या निशाणी 4-3 व 4-4 कागदपत्रांवरील रक्कम भरलेल्या पावतीचे व बुकींग फॉर्मचे अवलोकन केले असता यामध्ये जाबदारांचा पत्ता अंधेरी, मुंबई येथील नमुद केलेला आढळतो. अर्थातच यावरुन तक्रारदारांनी बुकींगची रक्कम मुंबई येथे अदा केली व त्यामुळे पक्षकारांच्या दरम्यान करार मुंबई येथे झाला होता ही बाब सिध्द होते. यानंतर तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील पत्त्याचे अवलोकन केले असता त्यांचा पत्ता पुणे येथील असल्याचे लक्षात येते. अशा परिस्थितीत तक्रारदार स्वत: पुणे येथे राहत असल्यामुळे त्यांनी पुणे मंचापुढे हा अर्ज दाखल केलेला आहे ही बाब सकृतदर्शनी लक्षात येते त्यातूनही ज्या करारावर विसंबून तक्रारदार मंचाकडे दाद मागत आहेत तो करारही मुंबई येथे झालेला आढळून येतो. तक्रारीस अंशत: तरी कारण पुणे येथे घडलेले असल्याशिवाय केवळ जाबदारांचे एक कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे म्हणून पुणे येथे तक्रार दाखल करण्याची तक्रारदारांची कृती अयोग्य व बेकायदेशीर ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
(iii) वर नमुद विवेचनावरुन तक्रारदारांचा संपूर्ण व्यवहार मुंबई येथे झालेला होता व केवळ तक्रारदार पुणे येथे असल्यामुळे त्यांनी पुणे येथे अर्ज दाखल केलेला आहे ही बाब सिध्द होते. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू तक्रार अर्ज पुणे मंचाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्राच्या अधीन नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब त्याप्रमाणे मुद्या क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्या क्र. 2 व 3 (i):- हे दोन्ही मुद्ये एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे एकत्रित विवेचन करण्यात आले आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांनी 12 वर्षांच्या विलंबाने बुकींगच्या रकमेची मागणी केलेली असल्यामुळे हा अर्ज मुदतबाहय ठरतो असा आक्षेप जाबदारांनी उपस्थित केला आहे तर तक्रारदारांनी हा आक्षेप तोंडी युक्तिवादाच्या दरम्यान अमान्य केला आहे. दाखल पुराव्याच्या आधारे जाबदारांचा हा आक्षेप कायदेशीर आहे का याबाबत मंचाचे विवेचन पुढीलप्रमाणे :-
(ii) र्निविवादपणे तक्रारदारांनी दि.22/1/1994 रोजी जाबदारांकडे रक्कम रु.20,000/- भरल्यानंतर ही रक्कम परत मिळणेसाठी सर्वात प्रथम मागणी दि.27/1/2009 रोजी केलेली आहे, या आशयाचा उल्लेख तक्रारदारांच्या स्वत:च्या तक्रार अर्जामध्ये आढळतो. तक्रारदारांनी दि.22/1/1994 रोजी रक्कम अदा केल्यानंतर दि.6/1/1997 रोजी त्यांना जाबदारांनी गाडी देऊ केली होती मात्र जाबदारांची ही ऑफर तक्रारदारांनी मान्य किंवा अमान्य केली नाही. उभय पक्षकारांच्या दरम्यान झालेल्या करारातील अट क्र.29 प्रमाणे जर गाडीचे बुकींग रद्य केले तर रक्कम भरल्याची पावती व प्रायॉरिटी कार्ड सही करुन तक्रारदारांनी जाबदारांकडे देणे आवश्यक होते. अशाप्रकारे दि.6/1/1997 रोजी कार देण्यात आली असतानासुध्दा जाबदारांच्या या ऑफर बाबत तक्रारदारांनी त्यांना काहीही का कळविले नाही याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आढळून येत नाही. दि.6/1/1997 रोजी तक्रारदारांना जाबदारांनी कारची ऑफर दिली होती ही बाब तक्रारदारांनी नाकारलेली नाही. सन 1997 मध्ये कार देऊ केल्यानंतर एका विशिष्ट कालावधीमध्ये तक्रारदारांनी जाबदारांकडे सर्व कागदपत्रांसह आपली रक्कम मागणारा अर्ज करणे आवश्यक होते. मात्र सन 1994 मध्ये भरलेल्या बुकींगची रक्कम तक्रारदारांनी सन 2009 मध्ये सर्वात प्रथम जाबदारांकडे मागितली (emphasis supplied). अर्थात अशाप्रकारे एवढया मोठया विलंबाने तक्रारदारांनी जाबदारांकडे रकमेची मागणी का केली याचे संयुक्तिक व समाधानकारक स्पष्टीकरण त्यांच्या अर्जामध्ये नसल्याने त्यांनी केलेली मागणी मुदतबाहय ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 प्रमाणे तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षांच्या आत तक्रारदारांनी तक्रार अर्ज दाखल करण्याचे कायदेशीर बंधन त्यांचेवर आहे. या प्रकरणाची पाहणी केली असता जाबदारांनी काही सदोष सेवा दिली अशी तक्रारदारांची तक्रार नसल्याचे लक्षात येते. अशा परिस्थितीत गाडी देऊ केल्याचे पत्र सन 1997 मध्ये पाठविल्यानंतरच तक्रारीसाठी त्यांच्या विलंबाचा कालावधी सुरु होतो असा मंचाचा निष्कर्ष आहे. वर नमुद विवेचनावरुन दाखल केलेला हा अर्ज मुदतबाहय ठरतो तसेच जाबदारांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही ही बाब सिध्द होते. सबब त्याप्रमाणे मुद्या क्र. 2 चे उत्तर होकारार्थी व मुद्या क्र. 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्या क्र. 4 :- वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनावरुन सदरहू अर्ज मंचाच्या भौगोलिक क्षेत्राच्या अधीन नाही तसेच तो मुदतबाहय आहे ही बाब सिध्द होते. सबब सदरहू तक्रार अर्ज नामंजूर करुन प्रस्तूत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना
नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –10/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |