द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// नि का ल प त्र //
प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांकडे दिलेला मोबाईल त्यांनी आपल्याला दुरुस्त करुन दिला नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्री. राजेंद्र पांडे यांनी जाबदार प्लॅनेट एम यांचेकडून दिनांक 19/01/2009 रोजी रक्कम रु 14,205/- मात्रला मोबाईलचा हॅन्डसेट विकत घेतला होता. या मोबाईलची वॉरन्टी दोन वर्षे कालावधीची असून वॉरन्टींच्या दरम्यान या हॅन्डसेटमध्ये दोष उद्भभवल्यामुळे त्यांनी जाबदारांकडे हा मोबाईल दुरुस्तीस दिला. मोबाईल दुरुस्त करुन घरी आले नंतर या हॅन्डसेटमध्ये पुन्हा दोष निर्माण झाल्यामुळे दिनांक 27/11/2010 रोजी तक्रारदारांनी हा हॅन्डसेट पुन्हा जाबदारांकडे दुरुस्तीसाठी दिला. हा हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिल्यानंतर हॅन्डसेट पाण्यामध्ये भीजलेला आहे दुरुस्त होऊ शकत नाही असे जाबदारांनी सांगीतले. मात्र मोबाईल पाण्यात भीजलेला असल्याची ही वस्तुस्थिती तक्रारदारांनी अमान्य केली आहे. जाबदारांच्या सांगण्यावरुन दिनांक 31/12/2010 तक्रारदारांनी वादग्रस्त हॅन्डसेट प्लॅनेट एम च्या नावांने पुन्हा दुरुस्तीसाठी जमा केला. हा हॅन्डसेट परत मिळण्यासाठी तक्रारदारांनी जाबदारांकडे वारंवार संपर्क साधला असता हया हॅन्डसेटचे सुटे भाग मिळत नसल्यामुळे मोबाईल काही काळानंतर मिळेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. वारंवार संपर्क करुन सुध्दा आपल्याला हॅन्डसेट न मिळाल्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांच्या विमाननगर व कँम्प च्या व्यवस्थापकांना पत्र पाठवून मोबाईल दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. मात्र जाबदारांकडून तक्रारदारांना सकारात्मक प्रतीसाद मिळाला नाही. जाबदारांचे प्रतिनिधी श्री प्रविण गुप्ता यांनी तक्रारदारांशी चुकीच्या पध्दतीने वर्तणूक केल्यामुळे तक्रारदारांनी त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सहा महिन्याचा कालावधी उलटून अद्दापही आपल्याला हॅन्डसेट दुरुस्त करुन मिळाला नसल्यामुळे आपल्याला हॅन्डसेटची किंमत परत देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी – 4 अन्वये एकुण सहा कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्या नोटीसीची बजावणी झाल्याची पोहच पावती निशाणी 6 व 7 अन्वये या कामी दाखल आहे. नोटीस प्राप्त होऊन सुध्दा जाबदार मंचापुढे हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द निशाणी – 1 वर एकतर्फा आदेश पारित करण्यात आला व यानंतर तक्रारदारांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगे निशाणी – 4 अन्वये दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादग्रस्त हॅन्डसेट ची वॉरन्टी दिनांक 19/01/2011 पर्यन्त अस्तित्वात असल्याचे सिध्द होते. तक्रारदारांनी दिनांक 31/12/2010 रोजी आपला वादग्रस्त हॅन्डसेट दुरुस्तीस दिला होता ही बाब निशाणी – 4/3 अन्वये दाखल जॉबशीट वरुन सिध्द होते. या दोन्ही कागदपत्रांचे एकत्रित अवलोकन केले असता वॉरन्टीच्या दरम्यान तक्रारदारांनी त्यांचा हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिला होता ही वस्तुस्थिती असल्याचे सिध्द होते. आपण दुरुस्तीसाठी दिलेला हॅन्डसेट आपल्याला अद्दयापही दुरुस्त करुन परत मिळालेला नाही हे वस्तुस्थितीबाबत तक्रारदारांनी शपथेवर केलेले निवेदन जाबदारांनी हजर राहून नाकारलेले नाही. किंबहूना हा तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी तक्रारदारांनी जाबदारांना एक नोटीस पाठवून वादग्रस्त मोबाईल दुरुस्त करुन दयावा अन्यथा तक्रार दाखल करित आहोत असे कळविल्याचे आढळून येते. ही नोटीस जाबदारांना प्राप्त झाल्याची पोहच पावती तक्रारदारांनी निशाणी – 4/5 अन्वये मंचापुढे दाखल केली आहे. या नोटिसीला सुध्दा जाबदारांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही. वॉरन्टीच्या दरम्यान हॅन्डसेटमध्ये उद्भभवलेले दोष दुर न करण्याची तसेच हॅन्डसेट परत न करण्याची जाबदारांची कृती त्यांचे सेवेमध्ये दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांनी विनंती केल्याप्रमाणे त्यांच्या हॅन्डसेटची किंमत त्यांना परत करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. मात्र तक्रारदारांनी वादग्रस्त हॅन्डसेट दिड वर्षे कालावधिकरिता वापरला आहे या वस्तुस्थितीचा विचार करता हॅन्डसेटच्या किंमतीमधून 15 % अवमुल्यान वजा करुन उर्वरित रक्कम रु 14205 वजा रु. 2131 = 12074 तक्रारदारांनी हॅन्डसेट दुरुस्तीला टाकला त्या तारखे पासून म्हणजे दिनांक 31/12/2010 पासून 9 % व्याजासह परत करण्याचे आदेश करण्यात येत आहेत. हॅन्डसेट मागण्यासाठी आपण जाबदारांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली हे तक्रारदारांनी वस्तुस्थिती बाबत शपथेवर केलेले निवेदन जाबदारांनी हजर होऊन नाकारलेले नाही. या संदर्भांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत तक्रारदारांनी दाखल केली आहे. सबब या वस्तुस्थितीचा विचार करुन तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई व सदरहू अर्जाचा खर्च म्हणून एकत्रितपणे रु 5,000/- मात्र मंजूर करण्यात येत आहेत.
वर नमूद निष्कर्षाचे आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत.
सबब आदेश की,
// आदेश //
1. तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2. यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु 12,074/- ( रु बारा हजार चौ-याहत्तर) मात्र दिनांक 31/12/2010 पासून संपूर्ण रक्कम फिटे
पर्यन्त 9 % व्याजासह अदा करावी.
3. यातील जाबदारांनी तक्रारदारांना शारीरिक व मानसिक
नुकसानभरपाई व सदरहू अर्जाचा खर्च म्हणून एकत्रितपणे
रु 5,000/- ( रु पाच हजार) मात्र अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळाले पासून तिस दिवसांचे न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
5. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात