मा.अध्यक्षपद रिक्त.
तक्रारदार गैरहजर.
तक्रारदारांच्या वकीलांचा दाखल सुनावणीकामी युक्तीवाद ऐकण्यात आलेला असून, प्रकरण आज रोजी दाखल आदेशाकामी नेमण्यात आले आहे.
प्रस्तुतची तक्रार एकुण 10 तक्रारदारांनी संयुक्तिकरित्या दाखल केली असून, तक्रारदरांच्या कथनानुसार, तक्रारदारांनी नोंदणीकृत स्वतंत्र करारनाम्यांनुसार सामनेवाले क्र.1-मे.साईबाबा कन्स्ट्रक्शन कं. यांचेकडून त्यांच्या बिल्डींग क्र.11, अशोक नगर कॉम्प्लेक्स, बाळकुम, ठाणे येथे 10 शॉप खरेदी केले. सामनेवाले क्र.2-अशोकनगर बाळकुम बिल्डींग क्र.11 को.ऑ.हौसिंग सोसायटी लि., म्हणजेच नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहे. डी सी रुल्सनुसार व संस्थेच्या उपविधीनुसार सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने, तक्रारदारांनी प्रस्तुतची ग्राहक तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांनी सदरील शॉप खरेदी करतांना स्वतंत्र नोंदणीकृत करारनाम्यांनुसार खालीलप्रमाणे रक्कम सामनेवाले क्र.1 यांना अदा केलेली आहे.
अ.क्र. | तक्रारदारांचे नांव | शॉप क्रमांक | करारानाम्यानुसार सामनेवाले क्र.1 यांना अदा केलेली रक्कम रुपये |
1. | श्री.संदीप डी पाटील | 10 | 40,00,000/- |
2. | श्री.शेखर के भोसले | 9 | करारनाम्याची प्रत दाखल केली नाही. |
3. | श्री.रामजी आर यादव | 6 | 20,25,000/- |
4. | श्री.जोगींदर यादव | 12 | 53,00,000/- |
5. | श्री.जेताराम चौधरी | 11 | 48,50,000/- |
6. | श्री.सचिन के पाखिडे | 7 | 23,00,000/- |
7. | श्री.राजेश कमलापथी | 3 | 31,88,300/- |
8. | श्री.शशिकांता सत्पथी | 2 | 26,88,000/- |
9. | श्री.बाबुलाल एस प्रजापती | 8 | 17,00,000/- |
10. | युनिसन टेक्प्लास एलएलपी द्वारा श्री.संजय शेंडे, पार्टनर | 1 | 35,73,940/- |
तक्रारदारांच्या कथनानुसार, वर नमुद तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांना त्यांच्या शॉपची करारनाम्यानुसार एकुण रक्कम अदा केलेली आहे व त्यांना सदरील शॉपचा ताबाही मिळालेला आहे. तसेच तक्रारदारांनी पार्कींगच्या सुविधेसाठी कोणतीही अतिरीक्त रक्कम सामनेवाले क्र.1 अथवा सामनेवाले क्र.2 यांना अदा केलेली नाही. तक्रारदारांना पार्कीग उपलब्ध करुन देणे, हा सोयीसुविधेचा भाग असल्याने, सामनेवाले क्र.1 यांनी सदरची सुविधा शॉपचा ताबा देतांना किंवा सामनेवाले क्र.2 यांनी संस्था नोंदणीकृत झालेनंतर उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. परंतू, तक्रारदारांना पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात न आल्याने, तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 च्या तरतुदीखाली संयुक्तिकरित्या सामनेवालेविरुध्द दाखल केली आहे.
ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 च्या कलम 34 (1) मधील तरतुदीनुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आर्थिक कार्यक्षेत्र निश्चित करतांना संबंधित वस्तु किंवा सेवा घेतांना त्याकरीता अदा केलेली रक्कम विचारात घेणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणी पार्कींगच्या सुविधेसाठी तक्रारदारांनी अतिरीक्त रक्कम अदा केलेली नाही. परंतू, पार्कींगची सुविधा केवळ तक्रारदारांनी संबंधित शॉप खरेदी केल्यामुळे त्यांना प्राप्त होणार आहे. अशा परिस्थितीत, ग्राहक संरक्षण अधिनियमातील वर नमुद तरतुदीनुसार, तक्रारदारांनी खरेदी केलेल्या शॉपसाठी त्यांनी सामनेवाले क्र.1 यांना शॉपच्या खरेदीपोटी अदा केलेली संपुर्ण रक्कम या आयोगाचे आर्थिक कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे.
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करतांना संबंधित शॉप खरेदीबाबतच्या करारनाम्यांच्या प्रती दाखल केल्या नव्हत्या. आयोगाच्या दि.27/01/2021 च्या आदेशानुसार तक्रारदारांतर्फे सदरील करारनाम्यांच्या प्रती (श्री.शेखर भोसले वगळून) अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या आहेत. तक्रारदारांच्या कथनानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या शॉपची संपुर्ण रक्कम सामनेवाले यांना अदा केलेली आहे. ग्राहक संरक्षण अधिनियमातील वर नमुद तरतुद लक्षात घेता, तक्रारदारांनी सामनेवाले यांना अदा केलेली एकत्रित रक्कम ही रुपये एक कोटीपेक्षा म्हणजेच या आयोगाच्या आर्थिक कार्यक्षेत्रापेक्षा अधिक आहे.
सबब, आर्थिक कार्यक्षेत्राअभावी प्रस्तुतची ग्राहक तक्रार चालविण्याचा या आयोगास अधिकार नसल्याने, प्रस्तुतची ग्राहक तक्रार क्र.36/2021 दाखल न करता, तक्रारदारांना याच कारणास्तव योग्य त्या न्यायासनासमोर नवीन तक्रार / तक्रारी दाखल करण्याची मुभा देऊन, दाखल टप्प्यावर खारीज करण्यात येते.
खर्चाबद्दल आदेश नाहित.
आदेशाची साक्षांकित प्रत तक्रारदारांना विनामुल्य व विनाविलंब पाठविण्यात यावी.
प्रकरण समाप्त.