(घोषित दि. 25.04.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे सिरसवाडी ता.जि.जालना येथील रहिवासी असून शेती करतात. त्यांची गट क्रमांक 4 मौजे सिरसवाडी येथील सुमारे 2 एकर शेजजमिन आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ही कपाशी उत्पादक कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या कपाशी बियाणास जादू व कावेरी अशी नावे दिली आहेत व शेतक-यांनी या वाणाची लागवड केल्यास त्यांना प्रति एकरी 18 ते 20 क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळेल अशी जाहिरात केली. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 06.07.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले जादु बियाणे लॉट क्रमांक 15268 व कावेरी बियाणे लॉट क्रमांक 16124 अशी बियाणे रुपये 1800/- एवढया किंमतीला खरेदी केली व दिनांक 08.07.2012 रोजी त्यांची लागवड टाचण पध्दतीने शेतात केली.
परंतु जादु बियाणे सदोष असल्यामुळे त्याची वाढ 4 सें.मी. एवढीच झाली म्हणून तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कळवले. परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 यांनी शेतावर येवून पाहणी केली नाही. शेवटी दिनांक 06.09.2012 रोजी तक्रारदारांनी कृषी विकास अधिकारी, जि.जालना यांचेकडे तक्रार केली. सदर तक्रारीवरुन दिनांक 23.10.2012 रोजी तपासणी समितीतील सर्व सदस्यांनी शेतावर येवून पिकाची पाहणी केली व पंचनामा केला. सदर पंचनाम्यात बियाणे सदोष आहे व उगवण शक्ती कमी आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
तक्रारदार पुढे म्हणतात की वरील बियाणे इतरही अनेक शेतक-यांनी लावले व त्यांना देखील नुकसान सोसावे लागले. तक्रारदारांनी बियाणाच्या किंमतीचा खर्च, खत, मशागत इत्यादि चा खर्च केला. परंतु त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे एकूण रुपये 80,000/- इतके नुकसान झाले आहे व त्यांना शरिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. म्हणून प्रस्तुत तक्रारीव्दारे ते गैरअर्जदार यांचेकडून रुपये 1,10,900/- एवढया रकमेची व्याजासहित मागणी करत आहे. त्यांनी आपल्या जबाबासोबत तपासणी समितीचा पंचनामा, तक्रारदारांच्या शेताचा 7/12 चा उतारा, तक्रारदारांनी कृषी अधिका-यांकडे केलेली तक्रार, तपासणी समितीचा अहवाल, तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस, इत्यादि कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रमांक 1 त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या निर्देशाप्रमाणे बियाणे पेरले व योग्य ती काळजी घेतली याचा कोणताही पुरावा मंचा समोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदार 1 हे केवळ गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेल्या बियाणांची सिलबंद स्वरुपात विक्री करतात. बियाणाच्या गुणवत्तेबाबतची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 यांची आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांना विनाकारण त्रास देण्यासाठी तक्रारदारांनी त्यांचे विरुध्द तक्रार केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी प्रस्तुत बियाणे बिपीन अॅग्रो ट्रेडर्स व श्री.अॅग्रो ट्रेडर्स, जालना यांचेकडून खरेदी केले आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार त्यांचे विरुध्द खारिज करण्यात यावी. त्यांनी आपल्या जबाबासोबत बियाणे खरेदी केल्याबाबतच्या पावत्या दाखल केल्या आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांचा लेखी जबाब आल्यानंतर तक्रारदारांनी विपीन अॅग्रो ट्रेडर्स, जालना व श्री.अॅग्रो ट्रेडर्स, जालना यांना प्रतिपक्ष करण्याबाबत अर्ज दिला. तो मंजूर करण्यात आला.
प्रतिपक्ष क्रमांक 3 यांनी लेखी उत्तर दिले. त्यात ते सांगतात की, जादू लॉट मधील बियाणे त्यांनी नंदा सिड्स येवला यांचेकडून दिनांक 04.06.2012 रोजी खरेदी केलेले होते. बियाणे बाजारात विक्रीला येण्यापूर्वी अनेक चाचणी घेण्यात येतात व नंतरच त्यांना शासकीय कार्यालयातून प्रमाणपत्र मिळते व विक्री परवाना मिळतो. पिकाच्या उत्तम वाढीसाठी जमिनीची प्रत, पाणी, खताची उपलब्धता, हवामान, मशागत व पेरणीची पध्दत, कीटक नाशके इत्यादि अनेक घटक आवश्यक असतात.
गैरअर्जदार क्रमांक 3 हे बियाणाचे उत्पादक नाहीत. गैरअर्जदार यांनी इतरही अनेक शेतक-यांना या वाणाची विक्री केली. परंतु त्यांची तक्रार नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पंचनाम्यावरुन असे दिसते की, कोणत्याही कंपनीच्या बीटी वाणाच्या चारही दिशेला नॉन बिटी वाण लावावा लागतो अन्यथा कीडीचा प्रार्दुभाव होतो. त्याचे पालन तक्रारदारांनी केलेले नाही. तक्रारदारांची जमीन कोरडवाहू होती. पंचनाम्यानुसार अर्जदाराची बियाणाच्या उगवण शक्ती बाबत तक्रार दिसत नाही. म्हणजेच पंचनाम्यातील सर्व महत्वाच्या बाबी तक्रारदारांच्या विरुध्द आहेत. तक्रारदारांनी योग्य प्रमाणात खते व कीटक नाशके वापरली यांचा कोणताही पुरावा मंचा समोर नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्या जबाबानुसार ते गैरअर्जदार क्रमांक 2 यानी उत्पादित केलेल्या बियाणाची सीलबंद स्वरुपात विक्री करतात. बियाणाच्या गुणवत्तेची सर्व जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 यांची आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी जादू बियाणे (लॉट क्रमांक 15268) हे न्यू गणपती सेवा केंद्र दाभाडी यांचेकडून खरेदी केले आहे व त्याची तक्रारदारांना विक्री केली आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 4 यांना बदनाम करण्याच्या हेतूने ही खोटी तक्रार दाखल केली. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खारिज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी जबाबानुसार त्यांची कंपनी कपाशी बियाणाचे उत्पादन करते. त्यांनी उत्पादित केलेले वरील बॅचचे बियाणे सरकार मान्य प्रयोग शाळेत तपासणी व चाचणी केल्यानंतरच विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. तक्रारदारांनी गैरअर्जदारांनी उत्पादित केलेली व सीलबंद पाकीटातील बियाणाची लागवड केली यांचा कोणताही पुरावा आणलेला नाही. शेती उत्पादनावर व पीक वाढीवर मातीचा दर्जा, उपलब्ध हवामान, पर्जन्य मान, मशागत, पिकांना देण्यात येणारी खते व फवारणी केलेली कीटक नाशके इत्यादि घटकांचा परिणाम होतो. त्याबाबत योग्य ती काळजी घेतल्याचा पुरावा तक्रारदारांनी दिलेला नाही. प्रस्तुतच्या बियाणाची विक्री जालना जिल्हयातील इतर अनेक गावातील शेतक-यांना करण्यात आली. परंतु त्याबाबत कोणत्याही शेतक-यांची तक्रार नाही.
तपासणी समितीच्या अहवाल पंचनाम्यानुसार सदर पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडीचा प्रार्दुभाव झाल्याचे नमूद केले आहे. त्यात सदोष बियाणाचा उल्लेख नाही व केवळ उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे असेही नमूद केले आहे. तक्रारदारांनी जाणूनबुजून खोटी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे त्यांची तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी.
तक्रारदारांतर्फे विव्दान वकील श्री.व्ही.जी.चिटणीस व गैरअर्जदार 1 व 4 यांचे तर्फे विव्दान वकील श्री.आर.एच.गोलेच्छा, गैरअर्जदार 2 यांचे तर्फे विव्दान वकील श्री.आर.सी.साबू व गैरअर्जदार 3 यांचे तर्फे विव्दान वकील श्री.एस.जी.राठी यांचा युक्तीवाद एैकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले जादू हे कपाशी बियाणे (लॉट क्रमांक 15268) व कावेरी हे कपाशी बियाणे (लॉट क्रमांक 16124) गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून खरेदी केले होते.
तक्रारदारांनी दाखल केलेला तपासणी समितीचा पंचनाम्याचा व अहवालाचा अभ्यास केला असता त्यातील कलम 10 मध्ये पीक तक्रार उगवण शक्ती बाबत आहे का ? याचे उत्तर नाही असे लिहीलेले दिसते. तसेच कलम 12 (4) मध्ये कमी उत्पादनाच्या कारणात कीडीचा प्रार्दुभाव व असमाधानकारक पाऊस असे नमूद केले आहे. समितीच्या निरीक्षण व निष्कर्ष यात प्लॉटच्या चार दिशेस Non-BT कपाशीची लागवड केलेली नाही. तसेच पिकावर फुलकिडे, पांढरी माशी, मावा तुडतुडे अशा रस पिणा-या किडींचा प्रार्दुभाव आढळून आला व त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे असे लिहीले आहे.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या तपासणी समितीचा पंचनामा अथवा अहवाल यात कोठेही झाडाची उंची कमी राहण्याचे व उत्पादनात घट येण्याचे कारण सदोष बियाणे असल्याचे अथवा बियाणाची उगवण शक्ती कमी असल्याचे म्हटलेले नाही. अशा परिस्थितीत उपलब्ध पुराव्यावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना विक्री केलेले कपाशीचे बियाणे सदोष होते ही गोष्ट तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहे व खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.