उपस्थित : तक्रारदार : स्वत:
जाबदार क्र. 1 : एकतर्फा
जाबदार क्र. 2 : स्वत:
*****************************************************************
द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// निकालपत्र //
(1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी आपण गुंतवलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(2) तक्रारदार श्री. विठ्ठल एकबोटे हे जाबदार क्र. 2 डॉ. संजय वायदंडे यांचेकडे मुलीच्या उपचारासाठी जात होते. जाबदार क्र. 2 हे व्यवसायाने फिजीओथेरपीस्ट असून तक्रारदार त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी त्यांचेकडे जात होते. जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 मायट्रेंडस मार्केटींग इंडिया प्रा. लि. (ज्यांचा उल्लेख यापुढे कंपनी असा केला जाईल) यांचेकडे एजंट असून कंपनीने जाहीर केलेल्या योजनेची त्यांनी तक्रारदारांना माहिती दिली. कंपनीने जाहीर केलेल्या योजने अंतर्गत तक्रारदारांनी दि. 5/10/2008 रोजी रक्कम रु.1,73,415/- मात्र कंपनीच्या वनगोल्ड लॅण्ड या योजनेमध्ये गुंतविले. ही रक्कम मिळाल्याची पावती कंपनीने तक्रारदारांना दिली. रक्कम मिळाल्यानंतर कंपनीने तक्रारदारांना दि. 25/11/2008, दि.17/02/2009 व दि. 11/4/2009 रोजी गुंतविलेल्या रकमेवरील अंशत: परतावा अदा केला. मात्र दि. 23/4/2009 रोजी दिलेले व्हाऊचर अपुरा निधी या शे-यासह बँकेने परत केले. यानंतर कंपनीकडून कोणतीही रक्कम प्राप्त न झाल्याने तक्रारदारांनी त्यांच्या उपलब्ध पत्त्यांवरती त्यांना नोटीसेस पाठविल्या.
(3) कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांचेशी संपर्क साधला असता कंपनी आश्वासनांची पूर्तता करेल तसेच उस्मानाबाद जिल्हयामधील जमिन तुमच्या नावावर करेल असे जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना सांगितले. जाबदार क्र. 2 यांच्या आश्वसानांवर विसंबून तक्रारदारांनी काही कालावधीकरिता वाट पाहिली. मात्र तक्रारदारांना देण्यात येणारी जमिन कंपनीने अन्य व्यक्तिस विकल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाली आहे असे तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपली रक्कम परत मिळणेसाठी कंपनी व जाबदार क्र. 2 यांचेशी संपर्क साधला. कंपनीच्या वतीने जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.50,000/- अदा केले. मात्र अद्दापही उर्वरित रक्कम आपल्याला परत मिळाली नाही याचा विचार करता आपली रक्कम व्याज व इतर अनुषंगिक रकमांसह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. ही रक्कम देण्यासाठी कंपनी व जाबदार क्र. 2 यांना एकत्रितपणे जबाबदार धरण्यात यावे अशीही तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(4) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व संबंधित कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(5) प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 1 कंपनीवरती तक्रारदारांनी जाहीर नोटीसी अन्वये बजावणी केल्याचा पुरावा निशाणी 29 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. नोटीसीची बजावणी होऊनही कंपनीतर्फे कोणीही मंचापुढे हजर न राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आले.
(6) प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 2 त्यांचेविरुध्द झालेला नो से आदेश रद्द करुन घेऊन आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारलेल्या असून तक्रारदारांनी त्यांची रक्कम कंपनीमध्ये गुंतवलेली होती याचा विचार करता हा अर्ज आपल्याविरुध्द नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार हे सुशिक्षीत असून कराराच्या अटी व शर्तींचे वाचन करुन त्यांनी करारावर सहया केल्या आहेत याचा विचार करता त्यांना आपल्याविरुध्द तक्रार करण्याचा अधिकार नाही असे या जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी गुंतविलेली रक्कम कंपनीने स्विकारलेली आहे याचा विचार करता हा तक्रार अर्ज आपल्याविरुध्द नामंजूर करण्यास पात्र ठरतो असे या जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांप्रमाणेच आपली व आपल्या पत्नीची सुध्दा कंपनीकडून फसवणूक झालेली असून तक्रारदारांच्या दबावामुळे आपण त्यांना रु.50,000/- मात्र अदा केले असे या जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या तक्रारीशी आपला कोणताही संबंध येत नाही याचा विचार करता हा अर्ज आपल्याविरुध्द नामंजूर करण्यात यावा व तक्रारदारांना आपण अदा केलेली रक्कम रु.50,000/- व्याजासह आपल्याला देवविण्यात यावी अशी या जाबदारांनी विनंती केली आहे. या जाबदारांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ व निशाणी 24 अन्वये एकूण 3 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली.
(7) प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 2 यांचे म्हणणे दाखल झाल्यानंतर तक्रारदारांनी निशाणी 25 अन्वये आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 26 अन्वये आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला. यानंतर उभय पक्षकारांचा स्वत:चा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(8) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यांनी कंपनीने जाहीर केलेल्या योजनेमध्ये रक्कम रु.1,73,415/- मात्र गुंतविले होते ही बाब सिध्द होते. या रकमेवरती कबुल केल्याप्रमाणे तीनवेळा कंपनीने तक्रारदारांना परताव्याची काही रक्कम अदा केली. मात्र यानंतर तक्रारदारांनी वारंवार संपर्क साधूनही कंपनीने तक्रारदारांना रक्कम अदा केली नाही किंवा कबुल केल्याप्रमाणे जमिनीचे खरेदीखतही करुन दिलेले नाही. यानंतर गुंतविलेली रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदारांनी कंपनीकडे वारंवार संपर्क साधला. मात्र कंपनीने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. कंपनीने आपली फसवणूक केली आहे याचा विचार करता आपण गुंतवलेली रक्कम कंपनी व जाबदार क्र. 2 यांचेकडून देवविण्यात यावी अशी तक्रारदारांची मागणी आहे. तक्रारदारांच्या या मागणीच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता ज्या योजनेअंतर्गत तक्रारदारांनी रक्कम गुंतविली होती ती योजना कंपनीने जाहीर केलेली असून तक्रारदारांनी रक्कमही कंपनीला अदा केली होती ही बाब सिध्द होते. सर्व कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन केले असता जाबदार क्र. 2 हे कंपनीचे एजंट म्हणून काम करत होते ही बाब लक्षात येते. तक्रारदारांचे करारात्मक संबंध कंपनीशी प्रस्थापित होत असून त्यांना जमिन नावावर करुन देण्याचे अथवा अन्य मार्गाने परतावा देण्याचे आश्वासन कंपनीने दिलेले होते. कंपनीने दिलेल्या आश्वासनांची जर त्यांनी पूर्तता केलेली नसेल तर तक्रारदार फक्त कंपनीविरुध्द तक्रार करु शकतात असा मंचाचा निष्कर्ष आहे. यासाठी एजंटला जबाबदार धरणे बेकायदेशीर ठरेल असे मंचाचे मत आहे. कंपनीने तक्रारदारांची फसवूणक केलेली आहे ही बाब या प्रकरणामध्ये निर्विवादपणे सिध्द झालेली असल्यामुळे तक्रारदारांची रक्कम व्याजासह परत करण्याचे कंपनीला निर्देश देण्यात येत आहेत. मात्र जाबदार क्र. 2 यांची भूमिका एजंटपुरती मर्यादित असल्यामुळे अंतिम आदेशातून त्यांना वगळण्यात येत आहे.
(9) तक्रारदारांनी कंपनीकडे रु.1,73,415/- मात्र गुंतविलेले असून या रकमेपैकी रक्कम रु.50,000/- मात्र जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदारांना अदा केले असल्यामुळे ही रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम आपल्याला देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांच्या या विनंतीप्रमाणे रु.1,73,415/- - रु.50,000/- = रु.1,23415/- एवढी रक्कम येते याचा विचार करता ही रक्कम तक्रारदारांना 15% व्याजासह अदा करण्याचे कंपनीला निर्देश देण्यात येत आहेत. तक्रारदारांना दि.17/2/2009 रोजी काही कालावधीची रक्कम मिळालेली असून दि.11/4/2009 ला दिलेला चेक न वटता परत आला आहे याचा विचार करता दि. 11/4/2009 पासून व्याज देण्याचे कंपनीला निर्देश देण्यात येत आहेत. कंपनीने तक्रारदारांची ज्या प्रकारची फसवणूक केली आहे तिचा विचार करता तक्रारदारांना दंडात्मक व्याज मंजूर करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या सदोष सेवेमुळे तक्रारदारांना जो शारीरिक व मानसिक त्रास झाला तसेच सदरहू तक्रार अर्ज दाखल करावयाला लागला याचा विचार करता तक्रारदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासासाठी रक्कम रु.5,000/- व सदरहू तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मात्र मंजूर करण्यात येत आहेत.
(10) वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत
आहे.
2. यातील जाबदार क्र. 1 कंपनीने तक्रारदारांना
रक्कम रु. 1,23415/- अक्षरी मात्र दि.
11/4/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत
15% व्याजासह अदा करावेत.
3. यातील बिल्डरने तक्रारदारांना शारीरिक व
मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून
रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून
रु.2,000/- मात्र आत अदा करावेत.
4. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी
जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून
तीस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या
तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
5. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना
नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.