तक्रारदारांतर्फे - अड.श्री. दलाल
जाबदार क्र. 1 तर्फे - अड.श्रीमती. शशिकला वागदरीकर
जाबदार क्र. 2 एकतर्फा
जाबदार क्र. 3 - अड.श्री. विकास जोशी
// निकाल //
पारीत दिनांकः 21/03/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख,अध्यक्ष )
तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 1 या कंपनीची कार जाबदार क्र. 3 यांचेकडून दि.13/12/2010 रोजी खरेदी केली. जाबदार क्र. 3 हे जाबदार क्र. 1 कार कंपनीचे डिलर आहेत. तक्रारदारांनी त्यानंतर फर्स्ट सर्व्हिसींग जाबदारांकडून करुन घेतली. दि.23/5/2011 रोजी तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य कारमधून त्यांच्या गावी जाता असताना सासवड रोड, दिवेघाट येथे त्यांच्या गाडीचे बॉनेटमधून धुर आणि जाळ येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांच्या कारचे दार आपोआप बंद झाले आणि ते उघडत नव्हते. तक्रारदारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बराच प्रयत्न केला तरी कारचे दार उघडत नव्हते. हा रस्ता निर्जन असल्यामुळे कोणाचीही त्यांना मदत होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकारामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भिती बसली. अर्ध्या तासाने दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर दार उघडले. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदारांच्या सर्व्हिस सेंटरमधील प्रतिनिधीला त्या ठिकाणी बोलावले. त्यांनी गाडी टो करुन सर्व्हिस सेंटरमध्ये नेली. अशाप्रकारे अपघात झाला असल्यामुळे तक्रारदारांना त्या गाडीची भिती बसली. तक्रारदार आणि त्यांच्या जिवास भिती आहे. म्हणून प्रत्येक वेळी गाडी चालविताना त्यांना अपघाताची आठवण होऊन गाडी चालविण्याची भिती वाटते. भविष्यात असा प्रकार होणार नाही याची खात्री जाबदारांनी दिली नाही त्यामुळे तक्रारदार जाबदार क्र. 2 यांच्याकडे ही गाडी बदलून मागतात. त्यावर जाबदार क्र. 2 चे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी त्यांचा लाईफ इन्श्युरन्स काढावा. तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 उत्पादकीय कंपनी यांना फोन करुन गाडी बदलून देण्यास सांगितले. त्या जाबदारांनी गाडी बदलून दिली नाही. तक्रारदारांनी दि.18/6/2011 रोजी गाडी बदलून मिळण्यासाठी जाबदार क्र. 2 यांना पत्र पाठविले असता दि.22/6/2011 रोजीच्या ईमेलने ते त्यांनी नाकारले. त्यानंतर तक्रारदार जाबदार क्र. 2 यांच्याकडे गाडीची स्थिती बघण्यासाठी गेले असता त्यांना गाडीची स्थिती अतिशय वाईट असल्याचे जाणवले. जाबदार यांनी गाडी बदलून दिली नसल्यामुळे तक्रारदारास शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. जाबदारांनी उत्पादकीय दोष असलेली गाडी तक्रारदारांना दिलेली असल्यामुळे गाडी बदलून नवीन गाडी मिळावी, तसेच तक्रारदार मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून व तक्रार अर्जाच्या खर्चासाठी रक्कम रु.2,00,000/- आणि इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये कुठलाही करार झालेला नव्हता. जाबदार क्र. 1 व डिलर यांचेमध्ये प्रिन्सीपल टू प्रिन्सीपल हे तत्व लागू आहे त्यामुळे जाबदार क्र. 1 यांच्यावर कुठलीही जबाबदारी येत नाही. तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांच्याकडे गाडी दुरुस्तीसाठी ठेवली, ती अदयापपर्यंत नेली नाही आणि कुठलाही उत्पादकीय दोष नसतानाही त्याबद्दल नवीन गाडी मागतात. जाबदार क्र. 1 हे उत्पादकीय दोष असेल त्यासाठी जबाबदार ठरतात परंतु प्रस्तुतच्या कारमध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नाही. तक्रारदारांच्या चुकीच्या ड्रायव्हींगमुळे हा प्रश्न उद्भवला म्हणून त्यासाठी जाबदार दोषी ठरत नाहीत. तक्रारदारांनी ही गाडी 11,252 किलोमीटर्स आठ महिन्यामध्ये चालविली यावरुन गाडीमध्ये कुठलाही दोष नाही हे सिध्द होते. ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 26 नुसार प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात. इतर सर्व तक्रारी अमान्य करत तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात.
जाबदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र. 2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस त्यांना मिळूनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणेही सादर केले नाही त्यामुळे मंचाने दि.11/10/2011 रोजी त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला.
4. जाबदार क्र. 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रार मुदतीत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तलेरा फोर्ड या नावाने कुठलीही फर्म नाही, त्यामुळे मिस जॉईंडर ऑफ पार्टीज या एकमेव कारणासाठी तक्रार नामंजूर करावी. जाबदार क्र. 3 हे उत्पादक नसून ते डिलर / रिटेलर आहेत. त्यामुळे गाडीमधील दोषाबद्दल ते जबाबदार ठरत नाहीत. तक्रारदारांनी दि.15/3/2011 रोजी जाबदारांकडून गाडीची फर्स्ट सर्व्हिसींग करुन घेतली. त्यावेळी त्यांनी गाडीमध्ये कुठलाही दोष असल्याचे सांगितले नव्हते. त्यांनी गाडीमधील दोषाबाबत कुठलाही संपर्क साधलेला नव्हता. गाडीचा ताबा घेताना तक्रारदारांना आवश्यक ते समाधान होते. तक्रारदार त्यांच्या गाडीमध्ये ऑईल लिकेज होत असल्याची तक्रार जाबदारांकडे केली होती असे म्हणतात ते जाबदार नाकारतात. ऑईल लिकेजचा त्यांनी कधीच उल्लेख केला नाही आणि ऑईल लिकेजची दुरुस्तीही केली नाही. दि.23/5/2011 रोजी झालेल्या अपघाताबद्दल जाबदारांना कुठलीही माहिती नाही. त्यावेळेस तक्रारदारांनी जाबदारांबरोबर कुठलाही संपर्क साधला नव्हता. जाबदारांच्या म्हणण्यानुसार कारच्या ओनर्स मॅन्युअलमध्ये वॉरंटी आणि सर्व्हिस गाईडनुसार मेकॅनिकल फेल्युअर झाले असल्यास ते तक्रारदारांच्या चुकीच्या ड्रायव्हींगमुळे झाले असे समजण्यात येते, त्यासाठी कुठलाही क्लेम दाखल करता येत नाही असे त्यात नमुद केले आहे. त्यामुळे प्रस्तुतच्या तक्रारीबद्दल तक्रारदार कुठलाही क्लेम दाखल करुन शकत नाहीत. जाबदारांनी तक्रारदारास व्यवस्थित सर्व्हिस दिलेली आहे त्यामुळे सेवेमध्ये कुठलीही त्रुटी राहिलेली नाही. जाबदार पुढे असे म्हणतात की, तक्रारदार ही कार व्यावसायिक कारणासाठी वापरत आहेत त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक ठरत नाहीत. इतर सर्व तक्रारी अमान्य करत तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात.
जाबदारांनी शपथपत्र दाखल केले आहे.
5. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांतर्फे अॅड.श्री. दलाल व जाबदार क्र. 3 तर्फे अॅड.श्री. जोशी यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
6. तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 यांनी उत्पादित केलेली कार जाबदार क्र. 3 डिलर यांचेमार्फत दि.13/12/2010 रोजी खरेदी केली होती. गाडीची एक सर्व्हिसींग झाल्यानंतर दि. 23/5/2011 रोजी त्यांच्या गाडीतील बॉनेटमधून अचानक धुर आणि जाळ येत असल्यामुळे गाडीचे दरवाजे आपोआप बंद झाले त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांना अर्धा तास गाडीतून बाहेर पडता आले नाही. अशाप्रकारे गाडीमध्ये दोष असल्यामुळे तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांना बोलावले. जाबदार क्र. 2 यांनी गाडी टो करुन त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये ठेवली. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, आता त्या गाडीमुळे पुन्हा तसे होऊ नये त्याकरिता जाबदारांकडून ते गाडी बदलून मागतात. जाबदारांच्या म्हणण्यानुसार ती गाडी 11,252 किलामीटर चालविली आहे व दि.13/12/2010 ते दि.23/05/2011 पर्यंत गाडीमध्ये कुठलाही प्रश्न / दोष निर्माण झालेला नव्हता, तोपर्यंत तक्रारदारांकडून कुठलीही तक्रार आलेली नव्हती. दि. 24/5/2011 रोजीच्या रिपेअर ऑर्डरमध्ये जाबदारांनी त्यांच्या इंजिनिअरकडून गाडीमध्ये काय झाले याबद्दलची माहिती घेतलेली आहे त्यामध्ये “Injector Nozzle broken. Also Oil Diesel Mixing, Piston Got melted” अशाप्रकारची माहिती नमुद केलेली आहे. या पार्टसची दुरुस्ती करुन काही पार्टस टाकून गाडीची दुरुस्ती होऊ शकते ही काही फार मोठी दुरुस्ती नाही, ज्यावरुन तक्रारदार गाडी बदलून मागतात आणि ही दुरुस्ती जाबदार करुन देण्यास तयार आहेत. त्यांनी एस्टिमेट दिले आहे. त्याची दुरुस्ती तक्रारदारांनी करुन घ्यावयास हवी होती व त्यानंतर गाडीमध्ये तोच दोष आढळल्यास अशी मागणी करणे संयुक्तिक ठरले असते. तसे न करता गाडी एकवेळ नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी जाबदार यांच्याकडे टाकली, दुरुस्तीही करुन न घेता ती तेथेच ठेवली व नवीन गाडीची मागणी केली ही तक्रारदाराची चुक आहे. गाडीमध्ये उत्पादकीय दोष आहे हे सांगण्याची जबाबदारी तक्रारदारांवर येऊनही त्यासाठी तक्रारदारांनी कुठलाही स्वतंत्र पुरावा दिलेला नाही आणि तसेच सिध्दही केलेले नाही.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1 तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 खर्चाबद्दल काही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती सर्व पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.