जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक :2/2010
तक्रार दाखल दिनांक:2/01/2010
तक्रार आदेश दिनांक 20/02/2015
निकाल कालावधी 05वर्षे01म18दि
श्री.दावूद महिबुब शेख
वय 59 वर्षे, धंदा- शेती,
रा.मु.पो.कर्देहळ्ळी ता.द.सोलापूर जि.सोलापूर ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मा.कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि.,ग्रामीण-2,सोलापूर
बिजली भवन,1ला मजला,ब्लॉक नं.3,जुनी मिल कपौंड आगार,
सोलापूर.
2) मा.उप अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.,
वळसंग ता.द.सोलापूर जि. सोलापूर ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.बी.डी.मनसावले
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.उ.कि.केकडे
निकालपत्र
(पारीत दिनांक:-20/02/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
1. अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) त.क्र.2/2010
2. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,अर्जदार यांनी मौजे कर्देहळ्ळी येथील त्यांचे शेतीला पाणी देण्यासाठी विरुध्दपक्षाकडून विज कनेक्शन घेतले आहे. सदरचे विज कनेक्शन अर्जदाराचे मयत वडील महिबुब मासूम शेख यांचे नांवे आहे. त्याचा विद्युत ग्राहक क्रमांक 331820083047 असा आहे.वडीलाचे मृत्यूनंतर अर्जदार हे वारस आहेत. वेळोवेळी विज बिल तक्रारदार यांनी भरलेले आहे. थकबाकीचे विज बिल दि.28/02/2004 रोजीचे कृषी संजीवनी या योजनेत पूर्णपणे भरलेले आहे. तक्रारदार सन-2005 मध्ये सेशन कोर्ट केसमध्ये आठ महिने तुरुंगात होता त्या कालावधीत विजेचा वापर झाला नाही. विरुध्दपक्ष यांनी मीटर रिडींगप्रमाणे विज बिल दिलेले नाही व दि.30/09/2009 रोजीचे रु.26,000/- चे विज बिल चुकीचे पाठविले आहे. अर्जदार यांनी दि.11/12/2007 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे जावून मीटर बसविणे संबंधी विनंती केली व मीटर ट्रान्सफरसाठी 3020/- रुपये भरलेले आहेत. दि.28/12/2009 रोजी गावांत ज्यांचे वीज थकलेले आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची दवंडी दिलेली आहे. लोडशेडींगमुळे 40-50 हजाराचे नुकसान होऊन शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून विरुध्दपक्ष यांनी दि.30/09/2009 रोजीचे दिलेले चुकीचे बिल रद्द करण्यात यावे, विरुध्दपक्ष यांना मीटर रिडींगप्रमाणे वीज बिल देण्याचा हूकूम व्हावा, मानसिक त्रासापोटी रु.40,000/- मिळावेत. तक्रारीचा खर्च, वकील फी इ.करीता रु.5,000/- मिळावेत याकरीता विरुध्दपक्ष यांचेविरुध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
3. अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पुष्ठयर्थ निशाणी 5 कडे 4 कागदपत्रे हजर केलेली आहेत.
4. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार नं.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली. त्याप्रमाणे गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी निशाणी 13 नुसार आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले आहे की, अर्जदार हे सन 1999 पासून आजपावेतो सदरचे विज कनेक्शन वापरत आहेत, अर्जदारांनी त्यांचे वडीलांचे निधनानंतर विज कनेक्शन स्वत:चे नांवे ट्रान्सफर करुन घेतले नाही. अर्जदाराचे नांवे विज कनेक्शन नाही.कायदेशीर वारस प्रमाणेपत्र दाखल केले नाही. त्यामुळे अर्जदार विरुध्दपक्षाचा ग्राहक होऊ शकत नाही. अर्जदाराकडे 2004 अखेर बरीच थकबाकी होती. महाराष्ट्र शासनाचे कृषी संजिवनी योजने अंतर्गत अर्जदाराने लाभ घेऊन दि.31/03/2005 रोजी रु.3020/- भरले असून रु.8741.43 पैसे इतकी रक्कम वरील योजनेअंतर्गत अर्जदारास माफ केली आहे. सन 2005 पासून
(3) त.क्र.2/2010
फक्त दि.19/11/2007 रोजी रु.2500/- अर्जदाराने भरले आहेत. अर्जदार यांनी वेळेवर बिल भरलेले नाही हे सीपीएल वरुन दिसून येते. अर्जदाराचे विनंतीवरुन दि.26/12/2007 रोजी अर्जदाराचे मिटर बदललेले असून त्याचा डाटा संगणकामध्ये न भरल्याने सरासरीचे बिले दिलेली आहेत. ज्यावेळी रिडींग उपलब्ध झाले त्यावेळी मागील बिलांची वजावट करुन रिडींगप्रमाणे बिले दिलेली आहेत. दि.30/09/2009 चे रु.26000/- बिल रिडींगप्रामणे बरोबर दिलेले आहे.अर्जदार यांनी दि.11/12/2007 रोजी विरुध्दपक्षाकडे मिटर ट्रान्सफरकरीता रु.3020/- भरलेले नाहीत.अर्जदाराचा विज पुरवठा कधीही खंडीत केलेला नाही. दि.28/12/2009 रोजी थकीत बिलाबाबत दवंडी पिटविली नाही.विजेच्या वापराप्रमाणे व रिडींगप्रमाणेच अर्जदार यांना योग्य व बरोबर बिल दिलेले आहे. अर्जदाराचा 2005 पासून वाद चालू आहे, अर्जदाराची तक्रार मुदतीत नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यास पात्र आहे. दि.30/09/2009 चे विज बिज अर्जदाराचे वापराप्रमाणे व रिडींगप्रमाणेच दिलेले आहे. विरुध्दपक्षाने अर्जदारास कोणत्याही प्रकारे मानसिक,शारीरीक दिलेला नाही, सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी ठेवलेली नाही. म्हणून मानसिक त्रासापोटी रु.40,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- देणेचा प्रश्नच येत नाही.सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासहीत रद्द करण्यात यावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केलेली आहे.
5. गैरअर्जदार यांनी लेखी जबाब पुष्ठयर्थ निशाणी 15 कडे 2 कागदपत्रे हजर केलेली आहेत.
6. अर्जदाराची तक्रार, त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र व त्यासोबतची कागदपत्रे, गैरअर्जदार यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करिता ठेवण्यात आले.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी युक्तीवाद व उभयतांच्या
वकीलांच्या तोंडी युक्तीवाद व कागदपत्रे यावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
कारणे व निष्कर्ष
8. तक्रारकर्ता यांचे वडीलांचे नांवे 331820083047 हे विज कनेक्शन होते व त्यांचे मृत्यूनंतर सदर वीज कनेक्शन वारस म्हणून तक्रारकर्ता हे वापरतात. त्यामुळे तक्रारकर्ता हे बेनिफिशअरी ग्राहक ठरतात. परंतू सदर तक्रारकर्ता यांचे व पूर्वहक्कदार हे 1999 साली
(4) त.क्र.2/2010
मयत झाले आहे. तेव्हापासून सदर कनेक्शन आपले नांवावर करुन घेणेची कोणतीही तरतूद तक्रारकर्ता यांनी केलेली दिसून येत नाही. तक्रारकर्ता यांचे मते त्यांनी रु.3020/- ही रक्कम सदर मीटर त्यांचे नांवे ट्रान्सफर करुन घेणेसाठी आले होते. परंतू नि.5/1 वरील बिल व उपलब्ध कागदपत्राचे आधारावरुन सदर रु.3020/- हे तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांनी कृषी विजबिल अंतर्गत दिलेल्या तरतूदीचे फायद्यापोटी सदर रु.3020/- तक्रारकर्ता यांनी जमा केले आहे. त्यामुळे मीटर ट्रान्सफर करणेसाठी रु.3020/- भरले होते हे तक्रारकर्ताचे कथन चुकीचे ठरते.
9. तक्रारकर्ता यांचे मते 2005 साली तो 8महिने जेलमध्ये होता त्यामुळे त्याचा वीज वापर झाला नाही. मात्र व्यक्ती जेलमध्ये असली तरी त्यांचे मीटरचा वापर हा नियमीत चालू असतो ही बाब महत्वाची आहे. विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेला नि.15/2 वरील सी.पी.एल. ची बारकाईने अवलोकन करता तक्रारकर्ता यांनी शेवटचे बील हे 19/11/2007 रोजी भरले आहे हे दिसून येते. त्यामुळे तेथून पुढे तक्रारकर्ता यांनी केव्हाही बिल भरलेले दिसून येत नाही. त्यामुळे 19/11/2007 पासून वीज वापराचे बिलाची थकबाकी ही पुढील बिलात येत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी उत्पन्न केलेली सप्टेंबर 2009 चे रु.26,000/- चे बिलाचा वाद हा पोकळ व तथ्यहिन ठरतो. कारण एकदमच सप्टेंबर 2009 मध्ये रु.26,000/- चे बिल आलेले नसून त्यामध्ये मागील थकबाकी जी दि.19/11/2007 पासून थकीत आहे ती समाविष्ट आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी सप्टेंबर 2009 मघ्ये 26,000/- चे अवास्तव बिल दिले हे तक्रारकर्ता यांचे कथन पूर्णच चुकीचे आहे.
10. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करता विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.26,000/- वाढीव बिल दिले ही बाब तक्रारकर्ता हे पुराव्यानिशी सिध्द करु शकले नाही. त्यामुळे त्यांची तक्रार रद्द करणेस पात्र आहे या निर्णयाप्रत हे मंच आले आहे. त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे.
-: आ दे श :-
1. तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करणेत येते.
2. उभय पक्षकारांनी आपापला खर्च स्वत: सोसावा.
(5) त.क्र.2/2010
3. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यांत.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंलि026021500