द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत // नि का ल प त्र // 1. प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी चुकीचा वैद्यकीय अहवाल दिला म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार बजरंग पोळ यांनी जाबदार नं 1 डॉ. अष्टुरकर व जाबदार नं 2 डॉ. सातव यांच्या पॅथोलॉजी लॅबमध्ये त्यांचे टिश्यु तपासणीसाठी दिले होते. या टिश्युचे मायक्रोस्कोपी एक्झामीनेशन करुन जाबदारांनी दिनांक 02/12/2002 रोजी आपला अहवाल दिला. या अहवालामध्ये तक्रारदारांना थायरॉइड लंगस् व जी आय टी याचा प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर असल्याची शक्यता त्यांनी या अहवालामध्ये नमूद केली. या नंतर तक्रारदारांनी डॉ. बापट व डॉ. अनिता बोर्जेस यांचे कडून पुन्हा हीच तपासणी करुन घेतली. या दोन्ही डॉक्टरांनी दिलेल्या अहवालामध्ये तक्रारदारांना अशा प्रकारचा कॅन्सर नसल्याचे त्यांनी नमूद केले. जाबदारांनी त्यांच्या पॅथॉलॉजी अहवालामध्ये निष्कर्ष नमूद केले होते ते पूर्णपणे चुकीचे असल्यामुळे आपल्याला निष्कारण पुढील तपासण्या करुन घ्याव्या लागल्या तसेच दरम्यानच्या कालावधीत आपण प्रचंड मानसिक दडपणात राहीलो अशी तक्रारदारांची तक्रार आहे. जाबदारांच्या चुकीमुळे आपल्याला ज्या पुढील अनावश्यक तपासण्या करुन घ्याव्या लागल्या त्याच्या झालेल्या खर्चाची भरपाई तसेच झालेला मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारदारांनी सदरहू प्रकरण दाखल करण्यापूर्वी जाबदारांना नोटीस पाठविली होती. मात्र जाबदारांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे वर नमूद रक्कम जाबदारांकडून मिळावी या मागणीसाठी तक्रारदारांनी सदरहू अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी आपले तक्रारीच्या पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी – 5 अन्वये एकुण 12 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत. 2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्या नोटीसीची बजावणी झाले नंतर त्यांनी वकीलांमार्फत आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपण तक्रारदारांना अशा आशयाचा अहवाल दिला होता ही बाब जरी जाबदारांना मान्य असली तरी त्यांनी तक्रारदारांच्या अन्य तक्रारी पुर्णपणे नाकारल्या आहेत. तक्रारदार मूलता: डॉ देशपांडे यांचेकडे उपचार घेत होते याचा विचार करता डॉ देशपांडे यांना या कामी पक्षकार न करता दाखल केलेल्या या अर्जास नॉन जॉन्डर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाचा बाध येतो असे जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी जाबदारांना कोणताही मोबदला दिलेला नसल्यामुळे तक्रारदार या जाबदारांचे ग्राहक होऊ शकत नाही असा एक आक्षेप या जाबदारांनी उपस्थित केला आहे. आपल्याला अवगत परिक्षणावरुन आपण अहवाल दिलेला असून याच्या पलीकडे आपला तक्रारदारांच्या तक्रारींशी काही संबंध नाही तसेच हा अहवाल स्वीकारावा किंवा नाही याचे बंधन तक्रारदारांवरती नाही असेही जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी स्वत: तब्बेतीच्या काळजीपोटी अन्य डॉक्टरांकडून तपासण्या करुन घेतल्या असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून यासाठी जाबदारांकडून रक्कम मागण्याची तक्रारदारांची कृती त्यांचा हेतू स्पष्ट करते असे जाबदारांचे म्हणणे आहे. जाबदारांचा कोणताही दोष नसताना केवळ त्यांचेकडून पैसे मिळण्याच्या हेतूने तक्रारदारांनी हा अर्ज दाखल केला असल्यामुळे तो खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी जाबदारांनी विनंती केली आहे. जाबदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी – 16 अन्वये दोन कागदपत्रे मंचापुढे दाखल केले आहेत. 3. जाबदारांचे म्हणणे दाखल झाले नंतर तक्रारदारांनी निशाणी – 18 अन्वये आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र तसेच कालांतराने जाबदारांनी निशाणी – 19 अन्वये एकुण चार कागदपत्रे मंचापुढे दाखल केली व या नंतर उभयपक्षकारांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले. प्रस्तुत प्रकरणातील अर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभयपक्षकारांचा युक्तिवाद याचा साकल्याने विचार करता खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात मुद्दे उत्तरे 1. सदरहू तक्रार अर्जास नॉन जॉंन्डर :
ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाचा बाध : आहे काय ? : नाही.
2. तक्रारदार ग्राहक म्हणून सदरहू : अर्ज दाखल करु शकतात काय ? : होय. 3. जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा : दिली ही बाब सिध्द होते काय ? : होय. 4. तक्रार अर्ज मंजुर होण्यास पात्र : ठरतो काय ? : होय. 5. काय आदेश : अंतिम आदेशाप्रमाणे. विवेचन:
मुद्दा क्रमांक 1 व 2 : प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज व जाबदारांचे म्हणणे याचे एकत्रित अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार डॉ.देशपांडे यांचे कडून उपचार घेत होते याचा विचार करता तक्रारदारांनी डॉ देशपांडे यांना सुध्दा या कामी पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक होते व यामुळे या अर्जाला नॉन जॉंन्डर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाचा बाध येतो असा आक्षेप जाबदारांनी उपस्थित केला आहे. तक्रारदारांना अर्थांत हा आक्षेप अमान्य आहे. जाबदारांच्या या आक्षेपात तथ्य आहे का या बाबत मंचाचे विवेंचन पुढील प्रमाणे ii) तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता जाबदारांनी जो चुकीचा अहवाल दिला त्यामुळे त्यांना झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्यांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केल्याचे आढळून येते. तक्रारदार डॉ. देशपांडे यांचे उपचार घेत होते. ही जरी वस्तुस्थिती असली तरी जाबदारांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये डॉ देशपांडे यांचा कोणताही सहभाग नव्हता. तक्रारदारांच्या संदर्भांतील वादग्रस्त अहवालावर फक्त या दोन्ही जाबदारांच्या सहया आहेत. या तक्रारीस कारण ज्या अहवालामुळे घडले त्या अहवालाशी डॉ. देशपांडे यांचा काहीही संबंध नसल्यामुळे डॉ. देशपांडे या कामी आवश्यक पक्षकार नाहीत असा मंचाचा निष्कर्ष आहे.
या नमूद निष्कर्षा वरुन डॉ देशपांडे या कामी आवश्यक पक्षकारनसल्याने सदरहू अर्जास नॉन जॉन्डर आफॅ नेसेसरी पार्टी या तत्वाचा बाध येत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब त्या प्रमाणे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले आहेत. मुद्दा क्रमांक 2: प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी आपल्याला कोणतीही रक्कम अदा केलेली नसल्यामुळे ते आपले ग्राहक होऊ शकत नाही असा जाबदारांचा आक्षेप आहे. जाबदारांचा हा आक्षेप तक्रारदारांनी अमान्य केला आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती वरुन जाबदारांच्या आक्षेपात तथ्य आहे किंवा नाही या बाबत मंचाचे विवेंचन पुढील प्रमाणे -
तक्रारदार डॉ देशपांडे यांचेकडे उपचार घेत होते व त्यांनी तक्रारदारांचे टिश्युज काढून घेऊन ते जाबदारांकडे परस्पर तपासणीसाठी पाठवून दिले होते ही या प्रकरणातील वस्तुस्थिती आहे. डॉ देशपांडे यांनी तक्रारदारांचे प्रकरण जाबदारांकडे पाठविले होते याला जाबदारांनीच दाखल केलेल्या डॉ. देशपांडेंच्या पत्राचा आधार मिळतो. डॉ. देशपांडे यांनी परस्पर हा अहवाल जाबदारांकडून मागीतला असल्यामुळे निश्चितपणे डॉ. देशपांडे यांनी जाबदारांना रक्कम अदा केली असणार. जाबदार हे एक खाजगी पॅथॉलॉजी लॅब चालवत असून त्यांच्या अहवालामध्ये सुध्दा त्यांची धर्मदायी संस्था असल्याचा उल्लेख आढळत नाही. तक्रारदारांना हा अहवाल आपण विना मोबदला दिला असे ही त्यांचे म्हणणे नाही. केवळ या प्रकरणामध्ये डॉ देशपांडे यांच्या माध्यमातून जाबदारांना रक्कम अदा केल्यामुळे तक्रारदारांकडे या रकमेची पावती नाही या वस्तुस्थितीचा गैरफायदा घेण्याच्या हेतूने जाबदारांनी हा मुद्दा उपस्थित केला असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. एकुणच या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता तक्रारदारांनी जाबदारांना डॉ देशपांडेंच्या माध्यमातून मोबदला अदा केला आहे याचा विचार करता ते “ग्राहक” म्हणून सदरहू अर्ज दाखल करु शकतात असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब त्याप्रमाणे मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 3: प्रस्तुत प्रकरणातील अर्जाचे अवलोकन केले असता तक्रारदारांना प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर असल्याची शक्यता जाबदारांनी अहवालामध्ये वर्तवली आहे तर अशा प्रकारे त्यांना कॅन्सर नाही अशा आशयाचा अहवाल अन्य दोन डॉक्टरांनी दिला होता असे तक्रारदारांनी अर्जात नमूद केलेले आढळते. तक्रारदारांच्या या तक्रारींच्या अनुषंगे जाबदारांचे म्हणणे पाहीले असता तक्रारदारांना असा चुकीचा अहवाल का दिला गेला याचे समाधानकारक स्पष्टीकरण अथवा कारण त्यांनी दिलेले आढळून येत नाही. आपल्याला अवगत असलेल्या परिक्षणातून आपण अहवाल दिला आहे फक्त एवढाच उल्लेख जाबदारांनी आपल्या म्हणण्यात केला आहे. युक्तिवादाचे दरम्यान जाबदारांनी या संदर्भातील काही वैद्यकिय पुराव्याच्या आधारे स्वत: युक्तिवाद केला. मात्र या आशयाचा कोणताही उल्लेख त्यांच्या म्हणण्यामध्ये आढळत नाही. म्हणणे दाखल झाल्यानंतर विलंबाने जाबदारांनी काही मेडीकल लिटरेचर संदर्भातील कागदपत्रे मंचापुढे दाखल केली. परंतु म्हणण्यामध्ये या संदर्भातील कोणतेही निवेदन न करता फक्त अशा प्रकारची कागदपत्रे हजर करुन जाबदारांची कायदेशिर जबाबदारी संपत नाही असे मंचाचे मत आहे. जाबदारांनी हजर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगे त्यांचे नेमके काय बचावाचे मुद्दे आहे असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या म्हणण्यामध्ये करावयास हवा होता. मात्र असा कोणताही उल्लेख म्हणण्यात न करता दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांचा जाबदारांना काही उपयोग होणार नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. 4) आपण अहवाल दिल्यानंतर त्यांच्याशी काही संबंध राहत नाही तसेच हा अहवाल स्वीकारण्याचा किंवा नाही याचे बंधन तक्रारदारावर नाही असे एक अनाकालीन विधान जाबदारांच्या म्हणण्यामध्ये आढळते. तक्रारदारांच्या टिश्युची पाहणी करुन त्या संदर्भांत जाबदारांनी दिलेल्या अहवालातील निष्कर्षांशी त्यांचा संबंध नाही हे जाबदारांचे म्हणणे अयोग्य असून मान्य करणे अशक्य आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांना जाबदारांकडून दिनांक 2/12/09 रोजी अशा आशयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साधारण: 13 ते 14 दिवसाच्या अंतराने केलेली तपासणी मध्ये या अहवालाच्या विरुध्द निष्कर्ष अन्य डॉक्टरांनी कसा काढला या संदर्भांतील कोणतेही स्पष्टिकरण जाबदारांच्या म्हणण्यामध्ये आढळत नाही. तक्रारदारांना कॅन्सर असण्याची शक्यता आहे असा गंभीर निष्कर्ष काढताना जाबदारांनी जास्त जबाबदारीने वागणे आवश्यक होते. एवढया मोठया आजाराचे निदान झाले नंतर संबंधीत व्यक्तिवर या वस्तुस्थितीचा परिणाम होऊ शकतो याचा विचार करुन जाबदारांनी जर पुन्हा एकदा या निष्कर्षाची खात्री केली असती तर या अर्जाचा प्रसंग उद्भभवला नसता असे मंचाचे मत आहे. जाबदारांनी दिलेला अहवाला नंतर 15 दिवसां मध्येचे जाबदारांचे निष्कर्ष चुकीचे ठरणारे अहवाल प्राप्त झाले आहेत, याचा विचार करता जाबदारांनी दिलेला अहवाल चुकीचा होता असा निष्कर्ष काढणे क्रमप्राप्त ठरते. अशा प्रकारे चुकीचा अहवाल देणे ही बाब जाबदारांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष असल्यामुळे मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 4 व 5: हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे एकत्रित विवेंचन करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे आपण जाबदारांच्या अहवालाची खात्री अन्य दोन डॉक्टरांकडे तपासणी करुन घेतली व यासाठी आपल्याला एकुण रक्कम रु 5,950/- एवढा खर्च आला असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी ही रक्कम डॉक्टरांना अदा केली होती याच्या पुष्ठयर्थ त्यांनी रक्कम अदा केल्याच्या पावत्या मंचापुढे हजर केल्या ओहत. जाबदारांच्या चुकीच्या अहवालामुळे या सर्व तपासण्या करुन घेणे तक्रारदारांना आवश्यक झाले होते याचा विचार करता या तपासणीची रक्कम तसेच वकीलांच्या नोटीसीची रक्कम रु. 1,000/- परत करण्याचे जाबदारांना निर्देश देणे योग्य व न्याय ठरेल असे मंचाचे मत आहे. तसेच जाबदारांच्या सदोष सेवेमुळे आपल्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु 25,000/- आपल्याला मंजुर करण्यात यावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारां सारख्या जेष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तिला कॅन्सर सारख्या रोगाचे निदान झालयावर जो मानसिक त्रास झाला असेल त्याचा विचार करता तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु. 25,000/-व सदरहू तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रु. 3,000/- मंजूर करणे योग्य व न्याय ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब वर नमूद केल्याप्रमाणे जाबदारांनी तक्रारदारांना एकत्रितपणे रक्कम रु 34,950/- अदा करण्याचे त्यांना निर्देश देण्यात येत आहेत. वर नमूद सर्व विवेचन व निष्कर्षा वरुन तक्रारअर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 4 चे उत्तर होकारार्थि देऊन प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. सबब मंचाचा आदेश की, // आदेश // 1. तक्रार अर्ज मंजुर करण्यात येत आहे. 2. यातील जाबदारांनी तक्रारदारास रक्कम रु 34,950/- ( चौतीस हजार नऊशे पन्नास ) मात्र निकालपत्राची प्रत मिळाले पासून तिस दिवसांचे आत अदा करावेत. अन्यथा त्यांना या रकमेवर निकाल तारखे पासून संपूर्ण रक्कम फिटे पर्यन्त 12 % दराने व्याजही अदा करावेत लागेल. 3. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. 4. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |