(घोषित दि. 24.01.2014 द्वारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने पत्नीच्या मृत्यूनंतर शासनाच्या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विहीत मुदतीत गैरअर्जदार यांच्याकडे दावा दाखल केला. परंतु अद्याप पर्यंत त्यांना विमा रक्कम न मिळाल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अर्जदाराची पत्नी छायाबाई दत्तात्रय ढवळे यांचा दिनांक 12.04.2012 रोजी बैलगाडी मधून पडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने दिनांक 28.06.2012 व 04.03.2013 रोजी तहसील कार्यालया मार्फत व वकीला मार्फत गैरअर्जदार विमा कंपनीकडे योग्य कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतु गैरअर्जदार यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता असतानाही विमा रक्कम अद्यापपर्यंत न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने विमा रक्कम व्याजासह देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वकीला मार्फत पाठविलेली नोटीस, क्लेम फॉर्म, घटनास्थळ पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, सातबाराचा उतारा, फेरफार वाटणी पत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने संबंधित विभागाकडे विमा प्रस्ताव दाखल केलेलाच नाही. अर्जदाराने म्हटल्या प्रमाणे जाफ्राबाद तहसिल कार्यालयात विमा प्रस्ताव दाखल झालेला नाही. सदरील प्रस्ताव योग्य त्या ठिकाणी दाखल करुन नंतरच त्यांच्याकडे यायला हवा. अर्जदाराने योग्य प्रकारे विमा प्रस्ताव दाखल करुन त्यांच्याकडे पाठविलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही मंचात हजर झाले नाही. म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे दिसून येते की,
अर्जदार दत्तात्रय दौलतराव ढवळे यांच्या पत्नी छायाबाई दत्तात्रय ढवळे यांचा दिनांक 12.04.2012 रोजी बैलगाडीवरुन पडून अपघाती मृत्यू झाला आहे. सदरील घटनेची नोंद जाफ्राबाद पोलीस स्टेशन, जिल्हा जालना येथे घेण्यात आलेली दिसून येते. अर्जदाराने घटनास्थळ पंचनामा, जवाब, एम.एल.सी इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केलेली आहेत. (नि.क्रं.4/18, 4/19, 4/20, 4/21)
महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या विमा रकमेसाठी अर्जदाराने दिनांक 28.06.2012 रोजी क्लेम फॉर्म तहसिल कार्यालय, जाफ्राबाद येथे दाखल केला असल्याचे म्हटले आहे. परंतु तहसिल कार्यालयात क्लेम फॉर्म दाखल केला असल्याचा कोणताही पुरावा मंचात दाखल केलला नाही.
गैरअर्जदार यांनी सदरील प्रस्ताव त्यांच्याकडे योग्य पध्दतीने आला नसल्याचे म्हटले आहे. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेमध्ये शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यामध्ये शासन, विमा सल्लागार कंपनी व विमा कंपनी यामध्ये हा त्रिपक्षीय करार असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने विहीत नमुन्यामध्ये अर्ज, क्षेत्रिय कृषी पर्यवेक्षक यांचे मार्फत सादर करुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून रितसर पोहोच घ्यावी व त्यानंतर सदरील प्रस्ताव विमा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांसह पाठवावा व विमा सल्लागार कंपनीने परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवावयाचा आहे. अर्जदाराने या विहीत पध्दतीने विमा प्रस्ताव न पाठवता तो थेट विमा कंपनीकडे पाठविलेला दिसून येतो.
अर्जदाराने 7/12 चा उतारा, 6-क, 6-ड, प्रतिज्ञापत्र हे मूळ प्रतीत व उर्वरीत कागदपत्रे साक्षांकित करुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे 15 दिवसात विमा प्रस्ताव सादर करावा व कृषी अधिकारी कार्यालयाने तो 30 दिवसात विमा सल्लागार कंपनी मार्फत विमा कंपनीकडे पाठवून द्यावा. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने 30 दिवसात त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा.
आदेश
- अर्जदाराने 15 दिवसात योग्य त्या कागदपत्रासह विमा प्रस्ताव कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा व कृषी अधिकारी कार्यालयाने विमा सल्लागार कंपनी मार्फत विमा कंपनीकडे 30 दिवसात पाठवावा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने 30 दिवसात गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.
- खर्चाबाबत आदेश नाही.