जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 3/2010. तक्रार दाखल दिनांक : 02/01/2010. तक्रार आदेश दिनांक : 10/01/2011. 'प्रसाद एजन्सीज, मोडनिंब' तर्फे प्रोप्रायटर :- सुरेश भगवान रेपाळ, वय 51 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. मु.पो. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा मोडनिंब, मु.पो. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर. (तर्फे शाखा व्यवस्थापक यांना नोटीस काढण्यात यावी.) 2. न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, हुतात्मा स्मृति मंदिर कॉम्प्लेक्स, पार्क चौक, सोलापूर. (नोटीस विभागीय व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : ए.बी. अंदोरे विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.एन. देशपांडे विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.आर. राव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, 'प्रसाद एजन्सीज, मोडनिंब' नांवे त्यांचा विविध प्रकारच्या उत्पादनाचे वितरणाचा ठोक व्यापार आहे. विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षिप्त रुपामध्ये 'युनियन बँक') यांच्याकडे त्यांचे रु.1,00,000/- रकमेचे ब-याच वर्षापासून कॅशक्रेडीट खाते आहे. युनियन बँकेने विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचा व दुकानाचा प्रतिवर्ष विमा उतरविण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. दि.27/12/2008 रोजी पहाटे 3.00 वाजता त्यांच्या दुकानाशेजारील सुधाकर गारमेंट दुकानास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली आणि त्यामुळे तक्रारदार यांचेही दुकान जळाले. सदर आगीमुळे त्यांच्या दुकानातील कोलगेट पेस्ट, पावडर, ब्रश ई रु.90,000/-, डिटर्जंट पावडर पोती व साबण रु.25,000/-, तसेच बॅटरी सेल व चहाच्या पिशव्या रु.20,000/-, फर्निचर रु.12,000/- चे नुकसान झालेले आहे. सदर घटनेचा मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी युनियन बँकेस विमा दाव्याबाबत विचारणा केली असता, युनियन बँकेने त्यांच्या दुकानाचा विमा कंपनकडे विमा उतरविला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन मानसिक व शारीरिक त्रासासह विम्याची रक्कम याप्रमाणे एकूण रु.2,00,000/- मिळावेत आणि तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी त्यांनी विनंती केली आहे. 2. युनियन बँकेने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या दुकानाचा विमा उतरविण्याची किंवा पॉलिसी नियमीत ठेवण्याची त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. दुकानास विमा संरक्षण देण्याची पूर्णत: जबाबदारी तक्रारदार यांच्यावर आहे. त्याप्रमाणे कार्यवाही केली नसल्यास युनियन बँक जबाबदार नाही. हायपोथिकेशन अग्रीमेंटमध्ये गहाण मालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी कर्जदारावर असल्याचे नमूद केले आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दुर्घटनेच्या वेळी पॉलिसी अस्तित्वात नव्हती आणि तक्रारदार यांचे त्यांच्याशी ग्राहकत्वाचे नाते नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या दुकानाचा त्यांच्याकडे विमा उतरविलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विमा पॉलिसीचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि नुकसान भरपाई देण्यात ते जबाबदार नाहीत. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? नाही. 2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? नाहीत. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी त्यांच्या 'प्रसाद एजन्सीज, मोडनिंब' व्यवसायाकरिता युनियन बँकेकडून कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांचे दुकान आगीमध्ये जळाल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, युनियन बँकेने दुकानाचा विमा न उतरविल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी तक्रारदार यांची विनंती आहे. 6. तक्रारदार यांनी त्यांच्या व्यवसायाकरिता युनियन बँकेकडून कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. युनियन बँकेने तक्रारदार यांच्याशी झालेले हायपोथिकेशन अग्रीमेंट रेकॉर्डवर दाखल केलेले आहे. त्यातील क्लॉज क्र.6 असा आहे की, That all the hypothecated goods, the subject of this Agreement, shall be insured by the Borrower against fire and theft or any other risk as may be necessary and required by the Bank in its discretion in the joint names of the Borrower and the Bank with some insurance company/companies approved by the Bank to the extent of at least 10% in excess of the invoice value or the market value whichever is less of the hypothecated goods and that the Cover Note/s or the Insurance Policy/policies, certificate/s shall be delivered to the Bank. ..... 7. वरील नमूद अटीचे अवलोकन करता, गहाण मालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी तक्रारदार यांच्यावर टाकण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे वेळोवेळी विमा उतरविणे तक्रारदार यांच्यावर बंधनकारक होते. तक्रारदार यांनी गहाण मालाचा विमा उतरवला नसल्यास युनियन बँक त्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार कर्जदार व त्यांचे संयुक्त नांवे विमा उतरवेल. परंतु तक्रारदार यांनी युनियन बँकेस विमा उतरविल्याविषयी काही कळविल्याचे रेकॉर्डवर दिसून येत नाही. वरील विवेचनावरुन बँकेच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र नाहीत, या मतास आम्ही आलो आहोत. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येत आहे. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/11111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |