तक्रारदारांतर्फे - अॅड.श्रीमती. माधवी मोडे
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 14/03/2013
(द्वारा- श्रीमती. सुजाता पाटणकर, सदस्य )
तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 चे शाखाव्यवस्थापक आहेत. जाबदार क्र. 1 वस्तू घरापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये व्यवहार झाला त्यावेळेस जाबदार क्र. 1 हे सदर शाखेमध्ये व्यवस्थापक होते म्हणून तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 यांना पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. सन 2007 मध्ये फलॅट नं.24, इंद्रप्रस्थ सोसायटी, टिंगरे मराठी शाळेच्या मागे, धानोरी, पुणे या पत्त्यावर तक्रारदार राहत होते. त्यानंतर तक्रारदार हे हैद्राबाद येथे स्थलांतरित झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांचेकडे दि.13/10/2007 रोजी त्यांचे सामान हैद्राबाद येथे पोहोच करण्याबाबत पुणे येथे आरक्षण केले आणि त्याप्रमाणे जाबदार क्र. 1 यांनी त्यांना तशी पावती दिली. त्यामध्ये एक बजाज पल्सर मोटर सायकल 150 सी.सी., डिप परपल कलर, रजिस्टर नंबर APO 9AR 9137, एक ग्रे कलरचे दोन दारांचे स्टील कपाट, घडी करता येणारी प्लास्टीकची खुर्ची आणि तीन ड्रॉवर असलेले एक लाकडी टेबल या सामानाचा समावेश होता. सदरचे सामान हैद्राबाद येथील पत्त्यावर पोहोचविण्यासाठी जाबदार क्र. 1 यांनी दि. 13/10/2007 रोजी रक्कम रु.1,000/- घेतले. सदरचे सामान दि.16/10/2007 रोजी पोहोचविले जाईल त्यावेळी उर्वरित रक्कम रु.2,500/- सामान हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर दयावी असे जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारांना सांगितले व ते तक्रारदारांनी मान्य केले. ठरल्याप्रमाणे दि.13/10/2007 रोजी तक्रारदारांचे सामान फलॅट नं. 24, इंद्रप्रस्थ सोसायटी, टिंगरे मराठी शाळेच्या मागे, धानोरी, पुणे येथून उचलण्यात आले परंतु आजअखेर सदरचे सामान तक्रारदार यांचेपर्यंत पोहोचले नाही. त्याबाबत तक्रारदारांनी विचारणा केली असता जाबदार क्र. 2 चे व्यवस्थापक यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. सदरचे सामान मिळण्याकरिता तक्रारदारांनी खूप प्रयत्न केले. तसेच दि.23/1/2007, दि.7/12/2007 या तारखांना जाबदार यांना पत्रे पाठविली. परंतु जाबदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांचे कार्यालयाला भेट देऊन विचारणा केली असता जाबदार क्र. 2 यांनी थोडयाच दिवसात तुमचे सामान पोहोच होईल असे आश्वासन दिले. परंतु त्यानंतरही तक्रारदार यांचे सामान जाबदार यांचेकडून पोहोच न झाल्यामुळे तक्रारदार यांनी दि.3/10/2008 रोजी वकीलांमार्फत हैद्राबाद येथील मुख्य शाखेला नोटीस पाठविली. परंतु सदरची नोटीस “नोटीस घेण्यास नकार” अशा शे-यासह परत आलेली आहे. जाबदारांचे हैद्राबाद येथील मुख्य कार्यालय कायमपणे बंद झाल्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळण्यासाठी प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. वास्तविक पाहता, तक्रारदारांच्या सामानाची योग्य ती काळजी घेणे जाबदारांचे कर्तव्य होते परंतु जाबदारांनी त्यांच्या सेवेतील कमतरता दाखविल्यामुळे तक्रारदारांना आर्थिक, मानसिक त्रास तसेच त्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी मोटरसायकलची रक्कम रु.54,290/-, कपाटाची किंमत रु.4,000/-, खुर्चीची किंमत रु. 300/-, लाकडी टेबलाची किंमत रु.1,000/-, मोटरसायकल पोहोच न झाल्यामुळे रक्कम रु.70,000/-, नुकसानभरपाई आणि मानसिक त्रास आणि गैरसोयीबद्दल रक्कम रु.50,000/-, अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.1,84,590/- 18 टक्के व्याजासह जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना मिळावी आणि इतर न्यायाचे हुकूम व्हावेत अशी मागणी तक्रारदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये केलेली आहे.
तक्रारदारांनी तक्रार अर्जावरच शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) जाबदारांना मंचातर्फे नोटीस पाठविली असता, जाबदार क्र. 1 ची नोटीस “Not Claimed Returned to Sender” या पोस्टाच्या शेर्यासह परत आली. जाबदार क्र. 2 ला पाठविण्यात आलेल्या नोटीसीची पोहोचपावती मंचास प्राप्त झालेली आहे. सबब जाबदारांना नोटीस बजावणी होऊनही ते मंचासमोर गैरहजर राहिल्यामुळे मे. मंचाने त्यांच्याविरुद्ध दि.25/10/2010 रोजी ‘एकतर्फा आदेश’ पारीत केला आहे.
3) दि.12/3/2013 रोजी तक्रारदारांनी मा. सर्वोच्च न्यायालय यांचे निकालपत्र आणि कागदपदत्रे दाखल करण्याच्या परवानगीसह कागदयादीने कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, दाखल कागदपत्रे व तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तिवाद, मा. सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र यांचे अवलोकन केले असता मंचाच्या विचारार्थ पुढील मुद्दे (points for consideration) उपस्थित होतात. मंचाचे मुद्दे व त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे :-
मुद्दे उत्तरे
मुद्दा क्र. 1 जाबदारांनी तक्रारदारांना सेवा
देण्यामध्ये कमतरता ठेवली आहे का ? .. होय.
मुद्दा क्र. 2 तक्रारदार हे जाबदारांकडून नुकसान-
भरपाई पोटी रक्कम मिळण्यास पात्र
आहेत का ? .. होय.
मुद्दा क्र. 3 काय आदेश ? … अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा :-
5) पुणे येथून हैद्राबाद येथे सामान पोहोचविण्याचे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ठरलेबाबतची जाबदार यांनी दिलेली पावती तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. तक्रारदार यांच्या अर्जातील कथन जाबदार यांनी या मे. मंचासमोर हजर राहून या तक्रार अर्जाचे कामी नाकारलेले नाही अगर त्यांचे म्हणणे त्यांनी या कामी दाखल केलेले नाही त्यामुळे तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथन अबाधित राहिलेले आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्ज, शपथपत्र व तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार करता, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवाद आहे.
6) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रार अर्जात कथन केल्याप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ठरल्याप्रमाणे तक्रारदारांचे सामान पुणे येथून हैद्राबाद येथे पोहोचविण्यासाठी त्यांनी जाबदार यांना रक्कम रु.1,000/- दिलेले होते. सदर कथनाच्या पृष्टयर्थ जाबदारांनी तक्रारदारांना दिलेल्या पावतीची झेरॉक्स प्रत या तक्रार अर्जाचे कामी तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी 7 येथे दाखल केली आहे. तसेच तक्रारदारांनी निशाणी 10 येथे जाबदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या वस्तूंचा सविस्तर तपशिल दर्शविणारे विहीत नमुन्यातील जाबदारांचे अधिकृत कागदपत्र दाखल केलेले आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, जाबदारांनी तक्रारदारांचे सामान म्हणजेच एक कपाट, एक प्लास्टीक खुर्ची, एक लाकडी टेबल आणि एक बजाज पल्सर मोटर सायकल हे सामान पुणे येथून हैद्राबाद येथे पोहोचविण्याचे मान्य केलेले होते त्याकरिता तक्रारदारांनी जाबदारांना रक्कम रु.1,000/- दिले असल्याचे सदर कागदपत्रावरुन स्पष्ट झालेले आहे. उर्वरित रक्कम म्हणजेच रक्कम रु.2,500/- तक्रारदारांनी जाबदारांना दि.16/10/2007 रोजी म्हणजे त्यांचे सामान हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर देण्याचे होते. तक्रारदारांचे सामान दि.16/10/2007 रोजी व त्यानंतरही तक्रारदार यांचेकडे पोहोच झाले नसल्याने तक्रारदारांनी दि.23/1/2007 तसेच दि.7/12/2007 रोजी पत्र पाठवून जाबदारांना कळविल्याचे निशाणी 2, निशाणी 3 च्या पत्रांवरुन स्पष्ट होत आहे. सदर सामान परत मिळणेसाठी तक्रारदारांनी दि.22/2/2008 रोजी निगडी पोलीस स्टेशन पुणे येथे जाबदारांविरुध्द तक्रार अर्ज दिलेला होता. तो निशाणी 4 येथे दाखल आहे. वारंवार प्रयत्न करुनही जाबदार यांनी तक्रारदारांचे सामान परत दिले नाही म्हणून तक्रारदारांनी दि.3/10/2008 रोजी अॅड.श्री. रेड्डी यांचेमार्फत जाबदारांना नोटीस पाठविलेली आहे. सदरची नोटीस निशाणी – 5 येथे सदर अर्जाचे कामी दाखल आहे. सदर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी त्यांचे सामान जाबदारांकडून मिळणेसाठी जाबदारांशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे व त्याद्वारे सामानाची मागणीही जाबदारांकडे केलेली आहे तसेच नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. परंतु सदर सामानाबाबत जाबदारांनी तक्रारदारांना काहीही कळविले नाही अगर सदर सामानाबाबत काहीही माहिती दिली नाही. तसेच तक्रारदारांचे एक कपाट, एक प्लास्टीक खुर्ची, एक लाकडी टेबल आणि एक बजाज पल्सर मोटरसायकल हे सामानही ठरल्या ठिकाणी पोहोच केले नाही. जाबदारांनी तक्रारदारांकडून सामान पोहोच करण्याकरिता रक्कम रु.1,000/- घेतलेले आहेत याचा विचार होता, जाबदारांनी तक्रारदारांचे सामान पोहोचविण्यासाठी मोबदला घेऊनही तक्रारदारांचे सामान तक्रारदारांकडे पोहोचविले नाही म्हणजेच जाबदारांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
7) दि.12/3/2013 रोजी तक्रारदारांनी चौधरी आणि कंपनी (Hyd) प्रायव्हेट लिमीटेड ऑटोमोबाईल डिलर्स यांचा दि.12/7/2003 रोजीचा इनव्हॉईस क्र. 01304 म्हणजेच मोटरसायकल खरेदीबाबतची पावती दाखल केलेली आहे. सदर पावतीप्रमाणे तक्रारदारांच्या वाहनाची किंमत रक्कम रु.48,290.00 अशी असल्याचे दिसून येत आहे. सदरची मोटरसायकल तक्रारदारांनी सन 2003 मध्ये खरेदी केली असल्याचे दिसून येत आहे. आणि सदरची गाडी सन 2007 मध्ये जाबदारांचेमार्फत पाठविण्यासाठी जाबदारांकडे दिलेली होती. परंतु ती ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांना प्राप्त झाली नसल्यामुळे तक्रारदार हे सदर मोटरसायकलची किंमत निशाणी 28 व निशाणी 29 प्रमाणे रक्कम रु.48,290.00 + रक्कम रु.1,120/- अशी एकूण रक्कम रु.49,410/- जाबदारांकडून वसुल करुन मिळण्याची मागणी करत आहेत. परंतु तक्रारदारांनी त्यांचे वाहन सन 2003 मध्ये खरेदी केले असले तरी सन 2007 पर्यंत त्याचा वापर केलेला आहे म्हणजेच सदर वाहनाचा घसारा (depreciation value) वजा जाता उर्वरित रक्कम तक्रारदार हे जाबदार यांचेकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच सदर रकमेवर दि.3/10/2008 पासून म्हणजेच जाबदारांना वकीलांमार्फत नोटीस दिले तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत 9 टक्के व्याजासह होणारी एकूण रक्कम वसुल करुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
8) तक्रारदारांनी त्यांच्या अर्जातील कलम 4 मध्ये एकूण रक्कम रु.1,84,590/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारदार यांनी सदरची तक्रार सन 2009 मध्ये दाखल केलेली आहे. त्यावेळेस त्यांच्या सामानाची किंमत तक्रारदारांनी त्यांच्या तक्रार अर्जात मागणी केल्याप्रमाणे होती असे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी त्यांच्या मोटरसायकलची किंमत दर्शविणारा कागदोपत्री पुरावाच मे. मंचात दाखल केलेला आहे. तक्रारदारांचे इतर वस्तु / सामानाबाबत त्यांनी पुराव्याच्या वेळी तसा कोणताही पुरावा शपथपत्र त्यांच्या अर्जातील मागणीच्या पृष्टयर्थ दाखल केलेला नाही, याचा विचार होता, तक्रारदारांच्या या मागणीचा विचार करता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
9) वास्तविक पाहता तक्रारदारांनी त्यांचे सामान पुणे येथून हैद्राबाद येथे पाठविण्याकरिता मोबदला म्हणून जाबदारांना रक्कम दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जाबदारांनी तक्रारदारांचे सामान पुणे येथून उचलले आहे परंतु प्रत्यक्षात ठरल्याप्रमाणे सदरचे सामान जाबदारांनी तक्रारदारांना हैद्राबाद येथे पोहोचविलेले नाही, ही बाब सिध्द झालेली आहे. सदरचे सामान जाबदारांकडून मिळविण्यासाठी तक्रारदारांनी पत्राद्वारे, नोटीसीद्वारे जाबदारांकडे वारंवार मागणी केल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट झालेले आहे. परंतु आजअखेर जाबदारांनी तक्रारदारांचे सामान दिलेले नाही अगर त्याबाबत कोणताही खुलासा या मे. मंचामध्ये हजर राहून केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे सामान जाबदारांनी न पोहोचविल्यामुळे तक्रारदारांची झालेली गैरसोय, झालेला मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- तक्रारदार हे जाबदारांकडून वसुल करणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदारांकडून तक्रारदार यांना सामान मिळाले नाही तसेच त्याबाबत वारंवार मागणी करुनही जाबदारांनी तक्रारदारांना कळविलेले नाही त्यामुळे सदरच्या सामानाच्या वसुलीसाठी व झालेल्या आर्थिक, मानसिक त्रासापोटी तक्रारदारांना सदर जाबदार यांचेविरुध्द या मे. मंचामध्ये तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे व त्याअनुषंगाने खर्चही करावा लागला आहे त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांकडून अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी सदर अर्जाचे कामी M/s. Transport Coporation Of India Ltd. V/s. M/s. Veljan Hydrair Ltd. S.C. Appeal (Civil) 3096 of 2005 (Date of Judgment 22/2/2007) दाखल केलेले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवाडयामध्ये असा आदेश दिला की, कन्साईनमेंटची संपूर्ण किंमत जाबदारांनी तक्रारदारास दयावी. यामधून फ्रेट चार्जेस वजा होता कामा नये कारण कन्साईनमेंटची डिलीव्हरी न मिळाल्यामुळे फ्रेट चार्जेस देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
प्रस्तुतच्या तक्रारीतसुध्दा जाबदारांनी तक्रारदारांची मोटरसायकल व इतर साहित्याची डिलीव्हरी दिली नाही, त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रस्तुतच्या प्रकरणास तंतोतंत लागू होतो. या निकालपत्रातील निष्कर्षाच्या आधारे आणि वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालीप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
// आदेश //
1 तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात
येत आहे.
2 जाबदारांनी तक्रारदारांना बजाज पल्सर मोटर सायकलच्या मुळ किंमतीमधून म्हणजेच रक्कम रु.49,410/- मधून घसारा वजा जाता नियमाप्रमाणे होणारी रक्कम मोटरसायकलच्या किंमतीपोटी दयावी व सदर रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने दि.3/10/2008 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत व्याजासह होणारी एकूण रक्कम दयावी.
3. जाबदार यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रु. दहा हजार मात्र) दयावी. तसेच अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.,3000/- (रक्कम रु. तीन हजार मात्र) दयावेत.
4. वर कलम 1 ते 3 च्या आदेशाची पूर्तता जाबदारांनी हा आदेश प्राप्त झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांचे आत करावयाची आहे.
5. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.