द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत
// निकालपत्र //
(1) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने आपण गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(2) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार श्री. दत्तात्रय हरिचंद्र दळवी यांनी जाबदार शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था (ज्यांचा उल्लेख यापुढे “पतसंस्था” असा केला जाईल) यांचेकडे एकूण 4 ठेवपावतीं अन्वये रक्कम गुंतविलेली होती तसेच बचतखात्या अन्वये रक्कम ठेवली होती. या ठेव पावतींची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी ठेवपावती व बचतखात्याची रक्कम मिळणेसाठी पतसंस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदारांची रक्कम परत केली नाही. अशाप्रकारे आपली रक्कम परत न देऊन जाबदारांनी आपल्याला सदोष सेवा दिली आहे याचा विचार करता आपल्या ठेवपावतीची रकम व बचत खात्याची रक्कम व्याज व इतर अनुषंगिक रकमांसह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 6 अन्वये एकूण 7 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(3) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 1,2,5,7,8,10 ते 12 यांचेवरती मंचाच्या नोटीशीची बजावणी होऊनसुध्दा त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले नाही. सबब त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारित करण्यात आला.
(4) प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र 3,4,6,9,13 ते 15 यांचे मार्फत आपले पत्रासह म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपले म्हणणे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये या जाबदारांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारल्या असून तक्रारदारांची रक्कम देण्याची जबाबदारी नाकारली आहे. पतसंस्थेने घेतलेल्या कोणत्याही निर्णयात आपण सहभाग घेतला नसल्यामुळे तसेच आपण बैठकीस हजर नसल्यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेल्या अर्जाशी आपला संबंध येत नाही असे या जाबदारांचे म्हणणे आहे. सदर संस्था ही प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळे तक्रारदारांनी आपल्या विरुध्द दाखल केलेला हा अर्ज बेकायदेशिर ठरतो असे या जाबदारांचे म्हणणे आहे. पंतसंस्थेचा कारभार व व्यवस्थापक हेच पाहत होते. तसेच सर्वर व्यवहारात फक्त हया दोघांच्याच सहया असल्यामुळे सदरहू अर्ज आपले विरुध्द रद्य होणेस पात्र ठरतो असे या जाबदारांचे म्हणणे आहे. वर नमूद मुद्दयांव्यतिरिक्त अन्य बचावाचे मुद्ये उपस्थित करुन हा अर्ज आपले विरुध्द नामंजूर करण्यात यावा अशी या जाबदारांनी विनंती केली आहे.
(5) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता त्यांनी ठेव पावती व बचतखात्यावरील रक्कम पतसंस्थेने परत केलेली नाही हे तक्रारदारांनी वस्तुस्थितीबाबत केलेले निवेदन जाबदारांनी हजर होऊन नाकारलेले नाही किंवा या ठेव पावतीची रक्कम तक्रारदारांना अदा केल्याचा पुरावा मंचापुढे दाखल केलेला नाही. अशाप्रकारे ठेवीची रक्कम व बचतखात्यावरील रक्कम परत न करण्याची पतसंस्थेची कृती त्यांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. तक्रारदारांनी या कामी संपूर्ण संचालक मंडळाला जरी जाबदार म्हणून सामिल केले असले तरीही सन्मा. उच्च न्यायालय,मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांच्या सौ. वर्षा रविंद्र ईसाई विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी व इतर, रिट पिटिशन क्रमांक – 5223/2009, या प्रकरणातील दिनांक 22/12/2010 च्या न्यायिनर्णयाच्या आधारे अंतिम आदेश संचालकां विरुध्द न करता फक्त पतसंस्थे विरुध्द करण्यात येत आहेत.
(6) प्रस्तूत प्रकरणातील पतसंस्थने आपल्याला आपल्या पावतीवर सरसकट व्याज अदा केलेले आहे अशा आशयाचे निवेदन तक्रारदारांनी निशाणी 18 अन्वये मंचापुढे दाखल केले आहे. ठेवपावतीची रक्कम व बचत खात्यावरील रक्कम परत न करणे ही सदोष सेवा ठरते असा मंचाचा निष्कर्ष असल्याने व व्याजाची रक्कम विशिष्ठ तारखेपर्यंन्त अदा केलेली नसल्यामुळे ठेवपावतीची रक्कम ठेवपावतीच्या तारखे पासून पावतीत नमूद व्याजासह परत करण्याचे आदेश करण्यात येत आहेत. तसेच बचतखात्याची रक्कम शेवटची रक्कम भरले तारखे पासून 7 % व्याजासह परत करण्याचे आदेश करण्यात येत आहे. मात्र पतसंस्थेने तक्रारदारांना व्याज अदा केलेले असल्यामुळे मंचाच्या आदेशाप्रमाणे देय होणा-या रकमेतून पूर्वी अदा केलेले व्याज वजा करण्याची पतसंस्थेला मुभा देण्यात येत आहे.
वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेंचनांच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील
प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की –
// आदेश //
(1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
(2) यातील जाबदारांनी तक्रारदारांना पावती क्र. 01136 अन्वये देय होणारी रक्कम रु. 40,000/- (अक्षरी रक्कम रु.चाळीस हजार मात्र) दि.20/09/2005 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यत 11 % व्याजासह अदा करावेत.
(3) यातील जाबदारांनी तक्रारदारांना पावती क्र. 002173 अन्वये देय होणारी रक्कम रु. 40,000/- (अक्षरी रक्कम रु.चाळीस हजार मात्र) दि.20/09/2001 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यत 16 % व्याजासह अदा करावेत.
(4) यातील जाबदारांनी तक्रारदारांना पावती क्र. 002174 अन्वये देय होणारी रक्कम रु. 40,000/- (अक्षरी रक्कम रु.चाळीस हजार मात्र) दि.20/09/2001 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यत 16 % व्याजासह अदा करावेत.
(5) यातील जाबदारांनी तक्रारदारांना पावती क्र. 002175 अन्वये देय होणारी रक्कम रु. 40,000/- (अक्षरी रक्कम रु.चाळीस हजार मात्र) दि.20/09/2001 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यत 16 % व्याजासह अदा करावेत.
(6) यातील जाबदारांनी तक्रारदारांना बचतखाते पासबुक क्र. 929 अन्वये देय होणारी रक्कम रु.238/- (अक्षरी रक्कम रु. दोनशे अडतीस मात्र) दि.27/11/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 7 % व्याजासह अदा करावेत.
(7) कलम 2 ते 5 मध्ये नमूद पावतीच्या देय रकमेतून पूर्वी अदा केलेली व्याजाची रक्कम वजा करण्याची जाबदारांना मुभा राहील.
(8) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु.3,000/- तक्रार अर्जाच्या खर्चापोटी अदा करावेत.
(9) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी पतसंस्था अथवा त्यांचेतर्फे अधिकृत प्रतिनिधींनी करण्याची आहे.
(10) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
(11) निकालपत्राच्या प्रती सर्व पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.