(मंचाचा निर्णय : श्रीमती मंजुश्री खनके - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 20/03/2014)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे...
2. तक्रारकर्ता हा विद्यार्थी असुन विरुध्द पक्ष ही शैक्षणिक संस्था आहे आणि ती MBA सारखे अभ्यासक्रम चालविते. सदर अभ्यासक्रम AICTE & UGC अंतर्गत विद्यापीठात नोंदणीकृत असल्याचे विरुध्द पक्षातर्फे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने त्यांच्या संस्थेत MBA चा 2 व 4 वर्षांचा अभ्यासक्रम होता. विरुध्द पक्षातर्फे तक्रारकर्त्यास त्यांच्या संस्थेच्या अभ्यासक्रमासंबंधी वैशिष्टये खालिल प्रमाणे सांगण्यांत आले होते.
1) विद्यार्थ्यांना 100% नोकरीचे आश्वासन.
2) आठवडयातून एकदा फॅक्टरी किंवा कंपनीमध्ये मोफत भेट.
3) संस्थेकडून मोफत MDP कार्यक्रम.
4) सुलभ हप्तेवारीने फी घेणे.
5) शैक्षणिक कर्ज घेण्यांस मदत.
6) संस्थेमार्फत कंपनींना मोफत भेटी, ट्रेनिंग देणे, मोफत बससेवा, ए.सी. क्लासरुम, अद्यावत संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा आणि वाचनालय इत्यादी.
3. वरील सर्व वैशिष्टयांना बळी पडून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष संस्थेत प्रवेश घेण्याचे ठरविले. त्यानुसार MBA आणि 2 वर्षांचा अभ्यासक्रम म्हणजेच सन 2011 ते 2013 साठी रु.30,000/- प्रतिवर्ष याप्रमाणे सांगण्यात आली. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने फी चा भरणा केला आणि विरुध्द पक्षांच्या संस्थेत प्रवेश घेतला. पहिले सत्र ऑक्टोबर-2011 पर्यंत होते. परंतु ते काही तांत्रीक अडचणींमुळे फेब्रुवारी-2012 पर्यंत वाढविण्यांत आले. आणि दुसरे सत्र 21, सप्टेंबर-2012 पर्यंत होते परंतु त्याची परिक्षा जून-जुलै-2012 महिन्यात घेण्यांत आली. तक्रारकर्ता याबाबत ठळकपणे नमुद करतो की, दुस-या सत्राची परिक्षा होईस्तोवर संस्थंने त्याला पहिल्या सत्राची गुणपत्रिका दिलेली नव्हती आणि दुस-या सत्राची गुणपत्रिका आजपर्यंत तक्रारकर्त्याला देण्यांत आलेली नाही.
4. तक्रारकर्ता पुढे नमुद करतो की, संस्थेने दिलेल्या वैशिष्टयांनुसार त्यांचे प्राध्यापक उच्च विद्या विभूषीत व अनुभवी आहेत असे सांगण्यांत आले होते. परंतु प्रत्यक्षात अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर तक्रारकर्त्यास असे दिसुन आले की, तेथील प्राध्यापकवर्ग उच्च शिक्षीतही नाही आणि अनुभवी देखिल नाही. तसेच विरुद पक्ष संस्थेकडून वारंवार प्राध्यापक बदलविल्या जात होते आणि त्यामुळे तक्रारकर्त्यास तो करीत असलेला अभ्यासक्रमाचे ज्ञान मिळत नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्यास वाटत होते की, या संस्थेच्या अभ्यासक्रमाचा आपणास पुढे काहीही उपयोग होऊ शकत नाही. तसेच विरुध्द पक्ष संस्थेकडून परिक्षेतील अभ्यासक्रम तसेच दिलेल्या वैशिष्टयांमध्ये सुध्दा बदल होत होता आणि त्यामुळे दुस-या सत्राचा अभ्यास जो 5 ते 6 महिने करावयास पाहिजे होता तो अभ्यासक्रम फक्त 1 महिन्यात पूर्ण करण्यांत आला आणि त्यामुळे तक्रारकर्त्यास त्या अभ्यासक्रमाचे पाहिजे तसे ज्ञान मिळू शकले नाही व विषयही समजू शकले नाही. तक्रारकर्ता पुढे असेही नमुद करतो की, पहिल्या सत्रातील परिक्षा पुन्हा घेण्यांत आली आणि दुस-या सत्रातही परिक्षेचे फक्त 2 दिवस अगोदर कळविण्यांत आले की, परिक्षेचा फॉरमेट Objective Format प्रमाणे राहील. त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तक्रारकर्ता अभ्यास करु शकला नाही. तसेच परिक्षा झाल्यानंतर 10 दिवसांत निकाल लागेल असे विरुध्द पक्ष संस्थेकडून सांगण्यांत आले परंतु प्रत्यक्षात निकाल 1 महिन्यानंतरही लागला नाही आणि त्याची गुणपत्रिकासुध्दा तक्रारकर्त्यास देण्यांत आली नाही.
5. आणि म्हणून तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष संस्थेने विद्यार्थ्यांना वेगवेगळया वैशिष्टयांचे आमिष दाखवुन प्रवेश घ्यावयास लावले व सांगितल्याप्रमाणे सेवा दिली नाही तसेच विरुध्द पक्षास सिक्कीम विद्यापीठाचा नोंदणी क्रमांक सुध्दा मिळालेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेचे प्रवेशपत्र सुध्दा मिळू शकले नाही. अश्या प्रकारे विरुध्द पक्ष संस्थेने विद्यार्थ्यांना खुपमोठा धोका दिलेला आहे आणि त्यासाठी सिक्कीम विद्यापीठाचे नावाचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे वर्गातील 22 विद्यार्थ्यांपैकी 10-11 विद्यार्थीच फक्त संस्थेत राहीले. तसेच पहिल्या सत्राची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना न देता दुस-या सत्राची फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास देऊ लागले.
6. यापुढे तक्रारकर्त्याचे कथन असे की, विरुद पक्ष संस्थेने दुस-या सत्राकरीता मासिक फी नियमीतपणे भरण्याचा तगादा लावणे सुरु केले. तसेच फी महिन्याच्या 10 तारखेपर्यंतच भरण्यांत यावी असे विरुध्द पक्ष संस्थेकडून सांगण्यात आले. जर 10 तारखेपर्यंत फीचा भरणा नाही केला तर प्रत्येक विद्यार्थाकडून रु.50,/- प्रतिदिवस
याप्रमाणे दंड घेतल्या जाईल असे सांगितले. या पुढेही विरुध्द पक्षाने ज्या विद्यार्थांनी शेडयुलप्रमाणे फीचा भरणा केलेला नाही त्यांचेकडून व्याजादाखल रु.2,000/- वसुल केले आणि म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षांच्या आर्थीक तणावामुळे तसेच विद्यापीठास मान्यता नसल्यामुळे आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शोषण केल्यामुळे प्रस्तुतचा अभ्यासक्रम पुर्ण करु शकले नाही. म्हणून नाईलाजाने भरणा केलेली रक्क्म रु.14,200/- परत मिळावी तसेच आर्थीक, शारीरिक, मानसिक त्रासासाठी योग्य ती भरपाई मिळावी यासाठी मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
7. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविण्यांत आली. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना पाठविण्यांत आलेला नोटीस ‘ घेण्यांस नकार’, या शे-यासह परत आली आणि म्हणून ती त्यांना प्राप्त झाली झाल्याचे समजण्यांत आले. तसेच विरुध्द पक्ष प्रकरणात गैरहजर राहील्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.07.11.2013 रोजी पारित करण्यांत आला. तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा दि.20.01.2014 रोजी पुरसीस दाखल करुन दाखल तक्रारीलाच युक्तिवाद समजण्यांत यावा असे मंचास कळविले होते, परंतु दि. 06.03.2014 रोजी तक्रारकर्त्याचे वकीलांचे विनंतीवरुन तोंडी युक्तिवाद ऐकला.
8. तक्रारकर्त्याची तक्रार व त्यासोबत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर तक्रारीच्या निर्णयासाठी खालील मुद्ये विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलेब केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
4. मुद्दा क्र.1 नुसार असे दिसुन येते की, विरुध्द पक्ष हे मुळातच विद्यापीठाशी संलग्नीत नोंदणीकृत संस्था नाही तसेच विरुध्द पक्ष संस्थेस सरकारी मान्यताही नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष संस्थेने जाहीरातीत दिलेल्या वस्तुस्थितीस बळी पडून सदर संस्थेत प्रवेश घेतला, त्यावेळी तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष संस्थेच्या शैक्षणीक पात्रतेचा अनुभव नव्हता, परंतु संपूर्ण 1 वर्षांची फी घेऊन पहिल्या सत्राची गुणपत्रीका तक्रारकर्त्यास न मिळाल्यामुळे चौकशीअंती तक्रारकर्त्यास सदरची संस्था बोगस असल्याबद्दल माहिती मिळाली व आपली फसवणूक झाल्याचे दिसुन आले. यावरुन विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे दिसुन येते. तसेच सांगितलेल्या वैशिष्टयानुसार सोयी उपलब्ध करुन दिल्या नाहीत त्यामुळे विरुध्द पक्षांचे सेवेतील त्रुटीही दिसुन येते.
5. मुद्दा क्र.2 प्रमाणे असे दिसुन येते की, विद्यार्थ्यांचे जिवणात शिक्षणाला अतिशय महत्व असते परंतु विरुध्द पक्ष संस्थेने तक्रारकर्त्याची फसवणूक केल्यामुळे विद्यार्थी म्हणून तक्रारकर्त्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. तसेच भरणा केलेली फी सुध्दा वाया गेली आणि परिक्षा देऊनही गुणपत्रिका मिळाली नाही, म्हणून तक्रारकर्ता हा तक्रारीतील प्रार्थनेनुसार फी परत मिळण्यांस तसेच आर्थीक मानसिक, शारीरिक त्रासासाठी भरपाई मिळण्यांस पात्र आहे. परंतु सदर विद्यापीठाचा दर्जा किंवा शैक्षणिकस्तर काय व कशा प्रकारचा होता हे विरुध्द पक्षाने हजर होऊन स्पष्ट केले नसल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ही शपथपत्रेवर दाखल केलेली असल्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे आहे असे ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे मागणी प्रमाणे तक्रारकर्ता निकालपत्रिका मिळण्यांस पात्र आहे असे मंचास वाटत नाही. म्हणून तक्रारकर्त्याची निकालपत्रिका प्राप्त करण्याची मागणी ग्राह्य धरता येत नाही.
करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे...
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास अभ्यासक्रमापोटी त्यांचेकडे भरणा केलेली रक्कम रु.14,200/- दि.10.02.2012 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
4. विरुध्द पक्षाने आदेशाचे पालन आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.