तक्रारदारांतर्फे - अॅड. श्री. सुमेध कुलकर्णी
// निकाल //
पारीत दिनांकः-18/04/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदार यांची कन्सट्रक्शन कंपनी आहे. जाबदार क्र. 1 हे सिरॅमीक टाईल्सचे उत्पादक आणि पुरवठादार करणारे आहेत. जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 यांचे डिलर आहेत. तक्रारदारांनी म्हाडा, निगडी आणि पिंपरी-चिंचवड येथील महानगरपालिकेच्या बांधकामासाठी टेंडर भरलेले होते, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले. त्या बांधकामासाठी म्हणून तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 व 2 यांच्याकडे सिरॅमिक टाईल्सची मागणी केली होती. ही मागणी त्यांनी जाबदार क्र. 2 यांचेकडे दोन लॉटमध्ये केलेली होती. पहिल्या लॉटमधील रक्कम रु.12,25,223/- तक्रारदारांनी जाबदारांना दिले. या लॉटमधील टाईल्स तक्रारदार कंपनीने काही प्रमाणात वापरल्या. त्यानंतर त्यांना असे आढळून आले की, या टाईल्स तुटतात आणि वापरण्यायोग्य नाहीत म्हणून त्यांनी जाबदेणार क्र. 1 चे प्रतिनिधी श्री. धर्मेंद्र यांना कळविले. जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदारांच्या बांधकामाच्या ठिकाणी येऊन टाईल्सची पाहणी केली, त्यांनासुध्दा टाईल्स तुटलेल्या आणि वापरण्यायोग्य नाहीत असे आढळून आले. त्यांनी त्याचवेळेस तक्रारदारांना योग्य ती कारवाई करु असे आश्वासन दिले. तरीसुध्दा त्यांनी कुठलेही आश्वासन पाळले नाही, तक्रारदारांनी अनेकवेळा फोन केला त्यानंतर दि.2/11/2009 रोजी, दि.3/11/2009 रोजी, दि.24/12/2009 रोजी, दि.25/12/2009 रोजी आणि दि. 31/12/2009 रोजी जाबदेणार क्र. 1 यांना पत्र पाठविले आणि सदोष टाईल्स बदलून देण्याविषयी कळविले असता, जाबदेणारांनी कुठलीही कारवाई केली नाही किंवा डिफेक्टीव्ह टाईल्स बदलून दिल्या नाहीत. तक्रारदार पुढे असे म्हणतात की, या सदोष टाईल्समुळे तक्रारदारास व्यवसायात मोठे नुकसान झाले आणि तसेच मार्केटमध्ये त्यांचे नावही खराब झाले, जे की पैशाच्या कुठल्याही स्वरुपात भरुन येणार नाही. म्हणून तक्रारदारांनी दि.16/02/2010 रोजी जाबदेणार क्र. 1 व जाबदेणार क्र. 2 यांना लिगल नोटीस पाठविली. त्यांना नोटीस मिळून त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु.4,24,658/- मागतात. त्याचे डिटेल्स तक्रारदारांनी तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 11 मध्ये दिलेले आहेत.
तक्रारदार जाबदेणारांकडून टाईल्समुळे हेअरक्रॅक झाला त्याबद्दल रक्कम रु.44,520/-, बसविण्याची मजूरी रक्कम रु.2,03,520/-, टाईल्स नसल्यामुळे मजूरीची रक्कम रु. 48,236/-, मटेरियल कमी पुरवठा केल्याबद्दल रक्कम रु.13,342/-, डिफेक्टीव्ह टाईल्समुळे व्यवसायात झालेले नुकसान यासाठी रक्कम रु.1,00,000/-, अॅडव्होकेट फी रक्कम रु.15,000/- असे एकूण रककम रु.4,24,658/- आणि इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र, आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत. म्हणून मंचाने दि.17/1/2011 रोजी त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केले.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. मंचास ही तक्रार व्यावसायिक कारणासाठी वाटते. कारण तक्रारदार ही बांधकाम कंपनी असून त्यांना पिंपरी-चिंचवड आणि निगडी यांना बांधकामाचे टेंडर प्राप्त झाले होते. त्यानुसार त्यांनी जाबदेणार क्र. 1 यांचेकडून सिरॅमीक टाईलस खरेदी करण्याचा करार केला होता. त्या टाईल्स सदोष निघाल्या म्हणून त्यांनी सदरील तक्रार केली आहे. तक्रारीमधील क्लॉज नं. 7 यामध्ये तक्रारदार स्वत:, जाबदेणारांनी त्यांना सदोष टाईल्स्ा दिल्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान झाले आणि त्यांचे मार्केटमधील नाव बदनाम झाले असे म्हणतात. तक्रारदार स्वत: व्यावसायिक बांधकाम करणारे आहेत आणि व्यवसायाचे नुकसान झाले असे म्हणतात, या दोन्ही कारणांवरुन आणि ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1) (डी) नुसार तक्रारदार ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1 तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 खर्चाबाबत काही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.