तक्रारदारांतर्फे :- अॅड श्री. हैदर
जाबदेणार क्र. 1 ते 3 तर्फे :- अॅड.श्री. दुर्वे
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 26/8/2014
(द्वारा- अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे :-
तक्रारदारास फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे त्यांनी जाबदेणार क्र. 1 यांचेकडून कॅमेरा मॉडेल डी 800 निकॉन डी एस एल आर, डी 800 बॉडी (8020383) हा कॅमेरा दि. 27/10/2012 रोजी रक्कम रु. 1,49,000/- ला खरेदी केला. जाबदेणार क्र. 1 हे जाबदेणार क्र. 3 यांचे अधिकृत वितरक आहेत. जाबदेणार क्र. 2 हे सर्व्हीस सेंटर आहे. त्यांनी दोन वर्षाची वॉरंटी दिली होती. त्यानंतर दि.13/12/2012 रोजी त्याच दुकानातून निकॉन लेन्स AFS NIKKOR 85 MM 1.8 G S/N 232634 रक्कम रु.27,157/- ला खरेदी केली यासाठी सर्व्हीस वॉरंटी दोन वर्षांची देण्यात आली. तक्रारदारांनी हा कॅमेरा घेतला त्याचे कारण जाबदेणार कंपनी ही नामांकीत आणि दर्जेदार कंपनी आहे. तक्रारदारांनी हा कॅमेरा जाबदेणारांकडून पूर्वी घेतलेल्या कॅमे-याच्या बदल्यात घेतला. पूर्वी घेतलेला कॅमेरा हा सदोष होता म्हणून हा बदलून घेतला. हा कॅमेरा खरेदी केल्यानंतर तक्रारदारांनी वापरावयास सुरुवात केली. वापरताना त्यांच्या असे लक्षात आले की, कॅमेरा क्लीक केल्यानंतर त्यामधील ऑटो फोकस हे फंक्शन व्यवस्थित कार्य करत नव्हते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदेणार क्र. 1 यांचेकडे त्यांचा कॅमेरा घेऊन गेले. जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदारास सर्व्हीस सेंटरशी संपर्क साधावा असे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी त्यांच्या कॅमे-यामधील तक्रारी जाबदेणार क्र. 2 सर्व्हीस सेंटर मुंबई यांना ई-मेलने दि. 30/1/2013 रोजी कळविल्या. त्यावर जाबदेणारांनी तक्रारदारास ते स्वत: मुंबईत कॅमेरा घेऊन आल्यास एका दिवसांत कॅमे-यातील तक्रारी दूर करु असे सांगितले, त्यामुळे तक्रारदार तेथील इंजिनियर श्री. दिपक व-हाडी यांना ऑटो फोकसमधील तक्रारी केवळ काढलेल्या फोटोग्राफ्सवरुन दाखवून दिल्या. र्इ-मेलवरुन पूर्वीच हे फोटोग्राफ्स जाबदेणार क्र. 2 यांना पाठवून दिले होते. त्यानंतर जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदाराचा कॅमेरा दुरुस्तीसाठी ठेवून घेतला आणि तक्रारदारास तीन तासानंतर येण्यास सांगितले. त्यानंतर इंजिनियर श्री. दिपक व-हाडी यांनी तक्रारदारास त्यांचा कॅमेरा परत दिला आणि देतेवेळेस त्यांना असे सांगितले की, कॅमे-यामध्ये कुठलाही दोष नाही, तर तक्रारदारच कॅमेरा हाताळण्यात तज्ञ नाही. तसेच तक्रारदारांनी कॅमेरा व्यवस्थितरित्या हाताळला नाही. जाबदेणारांनी तक्रारदाराच्या कॅमे-यामध्ये काही समस्या होत्या हे नाकारले. जाबदेणार क्र. 2 यांनी असा अहवाल दिला तरी तक्रारदाराच्या कॅमे-यामध्ये समस्या होत्याच. या बद्दल तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांना सांगितले असता तो कॅमेरा त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी ठेवून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे तक्रारदारांनी कॅमेरा दुरुस्तीसाठी ठेवून दिला. त्यानंतर दोन दिवसांनी तेथील इंजिनियर यांनी तक्रारदारास त्यांच्या कॅमे-यातील दोष दूर झालेले आहेत असे सांगून त्यांना कॅमेरा परत दिला. अशाप्रकारे जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदारास कॅमे-यातील समस्या दूर केल्या नाहीत. कॅमे-यात दोष होताच म्हणून तक्रारदारांनी फोटोग्राफीमधील तज्ञांना म्हणजेच श्री. कनिष्क इंगळे पब्लिसिटी फोटोग्राफर, (आशुतोष गोवारीकर आणि संजय लिला भन्साळी) पूजा गुप्ते फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर, आदित्य केळगावकर फॉर्मर असिस्टंट मल्टीपल अॅवॉर्ड विनिंग सिनेमॅटोग्राफर आणि श्री. किरण देवहंस जोधा अकबरचे सिनेमॅटोग्राफर आहेत, या सर्वांनी तक्रारदाराचा कॅमेरा तपासून त्यातील पिक्चर्स हे सुस्पष्ट नाहीत म्हणजेच कॅम-यामध्ये दोष असल्याचे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी त्यांचा कॅमेरा प्राईम फोकस इंडिया यांचेकडून तपासून घेतला. प्राईम फोकस इंडिया हे कॅमे-याची व्यावसायिकरित्या चाचणी करतात. या कॅमे-यातील आलेले फोटोग्राफ्स हे शार्प नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशारितीने जाबदेणार क्र. 2 सर्व्हीस सेंटर हे तक्रारदाराच्या कॅमे-यातील दोष दूर करण्यास अपयशी ठरले, सेवेत त्रुटी ठेवल्याचे सिध्द होते. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांना दि. 16/4/2013 रोजीच ई-मेल पाठवून या सर्व टेस्ट केल्याबद्दल कळविले. जाबदेणारांनी तक्रारदारास दि. 17/4/2013 रोजी मेल पाठवून गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तक्रारदाराचा कॅमेरा पुणे येथील ए.आर.एस. येथे दुरुस्तीसाठी ठेवावा असे कळविले. तसेच जाबदेणार क्र. 2 हे त्यांचा कॅमेरा पुन्हा एकदा तपासून घेतील असे सांगितले. तक्रारदारांना याबाबत जाबदेणार क्र. 2 यांचेकडून स्पष्टीकरण मागितले असता त्यांना जाबदेणार क्र. 2 यांचेकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तक्रारदारांनी तो कॅमेरा जाबदेणार क्र. 2 यांचेकडे दि. 19/4/2013 रोजी ठेवला. त्यानंतर जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांच्याशी कुठलाही संपर्क साधला नाही. तक्रारदारांनी दि. 27/4/2013 रोजी मेल केला. त्या मेलला उत्तर म्हणून दि. 29/4/2013 रोजी जाबदेणारांनी पूर्वीचीच अॅडजस्टमेंट केली. त्यावर तक्रारदारांनी जाबदेणारास सांगितले की, पूर्वीच अशाप्रकारची दुरुस्ती केलेली होती. त्यानंतर जाबदेणारांनी तक्रारदारास दि. 10/5/2013 रोजी ई-मेल द्वारे कॅमे-यामधून काढलेले तीन इमेजेस पाठविले आणि ते इमेजेस पाहून तक्रारदारांनी कॅमेरा दुरुस्त झाला की नाही हे सांगावे असे विचारले. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, ईमेल वरुन फोटोग्राफ्स पाठवून कॅमेरा दुरुस्त झाल्याचे समजत नाही त्याप्रमाणे जाबदेणारांना कळविले त्यानंतर जाबदेणारांनी कॅमेरा पुन्हा पुणे येथे पाठवून दिला जेणेकरुन त्या कॅमे-याच्या संपूर्ण चाचण्या घेण्यात येतील. दि. 18/5/2013 रोजी निकॉन सर्व्हीस सेंटरमध्ये कॅमे-याच्या चाचण्या घेतल्या. त्यावेळेस जाबदेणारांचे कोणतेही व्यावसायिक सहकारी नव्हते. तक्रारदारांनीच त्यांच्यासोबत एक फोटोग्राफर श्रीमती. तृप्ती जगताप यांना घेऊन स्वत:च त्याची तपासणी केली असता कॅमे-यातील समस्या दूर झाल्या नाहीत असे त्यांना दिसून आले. त्यावेळेस काढलेले फोटोग्राफ्स जाबदेणार क्र.2 यांना दाखविण्यात आले त्या फोटोग्राफ्सवरुन जाबदेणार क्र. 2 यांनी पुन्हा एकदा मुंबई येथे कॅमेरा दुरुस्तीसाठी पाठवून दिला. दि. 27/5/2013 रोजी मुंबई येथून त्यांना कॅमेरा दुरुस्त झाल्याचा मेल आला आणि पुन्हा एकदा फोटोग्राफ्स त्यांना पाठविण्यात आले. जाबदेणारांनी तक्रारदाराच्या समोरच त्याची चाचणी करावी म्हणून पुन्हा एकदा मुंबई येथे दि. 8/7/2013 रोजी तक्रारदार त्यांचे मित्र श्री. आदित्य केळगावकर सिनेमाटोग्राफर यांना घेऊन गेले त्यांच्या समोर आणि जाबदेणारांचे प्रतिनिधी श्री. नवीन कृष्णन आणि दिपक व-हाडी यांच्यासमोर चाचण्या घेण्यात आल्या. परंतु त्यावेळी काहीही निष्पन्न झाले नाही आणि टेक्निकल सपोर्ट हेड श्री. नवीन कृष्णन यांनी तक्रारदारास आलेले फोटोग्राफस हे शार्प नाहीत असा निर्वाळा दिला होता तसेच या कॅमे-याला दुरुस्त करण्यासाठी त्यांना काही मर्यादा आहेत (product limitation) दुरुस्ती होऊ शकत नाही असा निर्वाळा दिला होता परंतु असे लेखी लिहून देण्यास मात्र नकार दिला. त्यावेळेस तक्रारदारांनी श्री.व-हाडी यांना कॅमेरा आणि लेन्सची रक्कम परत मिळावी अशी मागणी केली त्यास जाबदेणारांनी नकार दिला. कॅमेराच सदोष असल्यामुळे लेन्सची खरेदी करुन काहीच उपयोग नव्हता. म्हणून जाबदेणार क्र. 1 यांनी रक्कम रु. 1,76,157/- आणि लेन्सची रककम परत करावी अशी मागणी केली, त्यास नकार दिला म्हणून सदरील तक्रार.
तक्रारदार, जाबदेणारांकडून जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे आणि त्यांनी कराराचा भंग केला आहे म्हणून घोषित करावे. जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास रु. 1,49,000/- (कॅमे-याची किंमत) अधिक लेन्सची किंमत रु. 27,157/- अशी एकूण किंमत रु.1,76,157/- आणि मानसिक त्रासापोटी म्हणून रु.25,000/- मागतात आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत आणि तज्ञाचे शपथपत्र दाखल केले आहे.
2. जाबदेणार यांनी त्यांच्या लेखी जबाबाद्धारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारास त्यांनी एकदा कॅमेरा बदलून दिला होता. म्हणजेच जाबदेणारांनी तत्पर सेवा दिली होती हे दिसून येते. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे त्यांच्या कॅमे-याची ऑटो फोकसिंगची समस्या असल्यामुळे कॅमेरा जाबदेणारांकडे दुरुस्तीसाठी टाकला होता. दुरुस्ती केल्यानंतर सुध्दा तक्रारदाराचे समाधान झाले नाही म्हणून तो पुन्हा एकदा मुंबई येथे पाठविण्यात आला. मुंबई येथून दुरुस्त करुन दिला. मुंबई येथे आणि त्यानंतर पुण्यात तक्रारदारांनी त्यांच्या सोबत आलेले मित्रासमोर दुरुस्ती करुन देण्यात आली. परंतु तक्रारदाराचे समाधान झाले नाही वास्तविक पाहता जाबदेणारांनी तक्रारदाराचा कॅमेरा पूर्ण दुरुस्त करुन दिला. त्यानंतरच जाबदेणारांनी कॅमे-यातील ऑटो फोकसिंगची समस्या दूर झाल्यामुळे परत केला होता तरीसुध्दा कॅमे-यामध्ये दोष आहे म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारांकडे कॅमेरा ठेवला प्रत्येकवेळी जाबदेणारांनी मुंबईत असो अथवा पुण्यात वेळोवेळी, त्वरित सेवा दिलेली होती व त्यानुसार कॅमेरा दुरुस्तही करुन दिला तरीसुध्दा तक्रारदारांनी कॅम-यामध्ये दोष आहे असे सांगून ही तक्रार दाखल केली आहे. यामुळे तक्रारदारांनीच जाबदेणारांची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे असे जाबदेणार म्हणतात. तक्रारदारांनी त्यांच्या कॅमे-यामध्ये दोष असल्याबद्दल कुठल्याही तज्ञाचा अहवाल दाखल केला नाही, पुरावा दाखल केला नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. इतर सर्व आरोप अमान्य करत तक्रारदारास कुठलेही नुकसान झाले नाही असे म्हणत जाबदेणार तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात.
जाबदेणारांनी शपथपत्र कागदपत्रे, शॉपचे बिल दाखल केले आहे.
3. तक्रारदारांनी त्यांचे शपथपत्र, फोटोग्राफ्स (इमेजेस) आणि श्री. कनिष्क इंगळे प्रोफेशनल फोटोग्राफर, श्री. आदित्य केळगावकर प्रोफेशन सिनेमाटोग्राफर यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
4. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 1 यांच्याकडून निकॉनचा कॅमेरा दि. 3/12/2012 रोजी खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी लेन्स सुध्दा खरेदी केली होती. त्यास दोन वर्षांची वॉरंटी दिली होती, असे असतानाही कॅमेरा वापरतेवेळी तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, कॅमेरा ऑटो फोकसिंग इमेजस (प्रतिमा) (फोटोग्राफ्स) या शार्प येत नव्हत्या मात्र मॅन्यूअली केल्यानंतर त्या व्यवस्थित येत होत्या. यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 1 यांचेकडे कॅमेरा दुरुस्तीसाठी टाकला, त्यानंतर जाबदेणार क्र. 1 यांनी जाबदेणार क्र. 2 यांचेकडे ऑटो सर्व्हीस सेंटरकडे दुरुस्तीसाठी दिला. दुरुस्त करुन आणल्यानंतर त्यामध्ये काही फरक झाला नाही. तक्रारदारांनी फोटोग्राफर्स, सिनेमॅटोग्राफर, व्यावसायिक फोटोग्राफर यांच्यासोबत जाऊन कॅमे-याची पाहणी केली होती, त्यानुसार त्यांनी कॅमे-याविषयी शपथपत्र दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑटोमॅटीक फोकसिंगने काढलेले फोटोग्राफ्स त्यातील प्रतिमा या समाधानकाक शार्प येत नव्हत्या. परंतु मॅन्यूअली काढलेले फोटोग्राफ्स (इमेज) या शार्प प्रतिमा येत होत्या. त्या दोघांचेही असेच म्हणणे आहे. तक्रारदारांनी मॅन्यूअली आणि ऑटो फोकस द्वारे काढलेले दोन फोटोग्राफ्स (इमेजेस) दाखल केले आहेत. त्यामधूनही मॅन्यूअली काढलेल्या प्रतिमा सुस्पष्ट शार्प असल्याचे दिसून येते व ऑटो फोकसद्धारे काढलेल्या प्रतिमा शार्प नसल्याचे दिसून येतात. अशा प्रकारे तक्रारदारांनी त्यांची तक्रार पुराव्यासहित सिध्द केली आहे. मात्र जाबदेणारांनी जबाबाशिवाय काहीही दाखल केले नाही. यासाठी एखादया तज्ञाचा रिपोर्ट दाखल केला नाही. त्यामुळे जाबदेणार क्र. 1 2 3 यांना असा आदेश देण्यात येतो की कॅमे-याची व लेन्सची किंमत रु. 1,76,157/- तक्रारदारास परत करावेत आणि रक्कम प्राप्त होताच तक्रारादारांनी त्यांचा कॅमेरा लेन्ससहित जाबदेणार क्र. 1 यांना परत करावा. तक्रारदारांनी किंमती कॅमेरा घेतला होता, कॅमे-यामध्ये समस्या होत्या, त्या जाबदेणारांनी दुरुस्त केल्या नाहीत त्यामुळे तक्रारदाराची फोटोग्राफी बंद झाली. त्यामुळे साहजिकच तक्रारदारास मानसिक, शारीरिक आर्थिक त्रास सहन करावा लागला असेलच म्हणून नुकसानभरपाईपोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- दयावा असा मंच जाबदेणा-यास आदेश देतो.
4. वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे कॅमे-याची व लेन्सची एकूण किंमत
रु.1,76,157/- ( रक्कम रु. एक लाख ष्याहत्तर हजार एकशे सत्तावन्न फक्त) तक्रारदारास परत
करावेत. त्यानंतर रक्कम प्राप्त होताच
तक्रारदारांनी त्यांचा कॅमेरा व लेन्स जाबदेणार क्र.
1 यांना परत करावा.
3. जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व
संयुक्तपणे तक्रारदारास नुकसानभरपाई म्हणून रक्कम
रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च
रु.2,000/- (रु. दोन हजार फक्त) दयावा.
4. वर नमुद (2) व (3) ची पूर्तता जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
6. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.