द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// नि का ल प त्र //
(1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी ट्रॅक्टरच्या अनुषंगे त्रूटीयुक्त सेवा दिली म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्रीमती कुसूम काटे यांनी जाबदार क्र 2 महिंद्रा अण्ड महिंद्रा लि. ( ज्यांचा उल्लेख यापुढे “कंपनी” असा केला ) यांनी उत्पादित केलेला ट्रॅक्टर दिनांक 30/04/2009 रोजी जाबदार क्र 1 मे किरण अटोलाईन्स ( ज्यांचा उल्लेख यापुढे “डिलर” असा केला जाईल) यांचेकडून रक्कम रु 5,30,000/- मात्रला खरेदी केला होता. वादग्रस्त ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टर देत असलेल्या अव्हरेज पेक्षा कमी अव्हरेज देते व त्याला जास्ती डिझेल लागते अशी तक्रारदारांची तक्रार आहे. ही तक्रार तक्रारदारांनी वॉरन्टीच्या दरम्यान सुध्दा केली होती. मात्र तरी सुध्दा कंपनी अथवा डिलरने समाधानकारक उपाययोजना केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. या नंतर तक्रारदारांनी या संदर्भात विधिज्ञां मार्फत नोटिस पाठवून आपल्या तक्रारीचे निवारण करुन देण्याची विनंती कंपनी व डीलरला केली. ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरची टेस्ट घेतल्या नंतर कंपनीच्या तज्ञ इंजिनिअरने इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे असे तोंडी मान्य केले होते. मात्र तरी सुध्दा डीलर व कंपनीने आपल्या तक्रारीचे निवारण न करुन दिल्यामुळे आपण सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे असे तक्रारदारांनी नमूद केले आहे. ट्रॅक्टरचे डिझेल कन्झमप्शन ( diesel consumption) व्यवस्थित नसल्याने आपण जादा डिझेलसाठी खर्च केलेली रक्कम व्याज व इतर अनुषंगीक रकमांसह देवविण्यात यावी तसेच सदरहू ट्रॅक्टर आपल्याला बदलून दयावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 5 अन्वये एकुण 26 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(2) प्रस्तुत प्रकरीणातील कंपनीवरती मंचाच्या नोटिसीची बजावणी झाल्या नंतर विधिज्ञां मार्फत त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये कंपनीने तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारलेल्या असून सदरहू तक्रारदार ग्राहक म्हणून हा अर्ज दाखल करु शकत नाहीत असा आक्षेप उपस्थित केला आहे. कंपनीने तक्रारदारांना डीझेल कन्झमप्शनच्या अनुषंगे कोणतेही आश्वासन दिलेले नसून ट्रॅक्टरला नेमके किती डिझेल लागले पाहीजे या मुद्यांबाबत तक्रारदारांनी तक्रार अर्जामध्ये कोणतेही ठोस विधान केलेले नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी ट्रॅक्टर विकत घेतल्या पासून 6 महीने 10 दिवसा नंतर जास्ती डिझेल वापरा बाबत तक्रार केली होती. मात्र त्यांच्या या तक्रारीचे निवारण करुन देण्यात आले होते असे कंपनीचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी ट्रॅक्टरच्या अनुषंगे केलेल्या सर्व तक्रारींची आपण तातडीने दखल घेतलेली असून ट्रॅक्टरला नेमके किती डिझेल लागावे ही गोष्ट विविध घटकांवर अवलंबून असते असे कंपनीचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या ट्रॅक्टरची तक्रारींच्या दृष्टिने पाहणी केली असता तक्रारदारांचा ड्रायव्हर हा अकुशल असल्यामुळे त्याला जास्ती डिझेल लागले ही बाब लक्षात आली. अशा परिस्थितीत या संदर्भांतील तक्रारदारांची कंपनी विरुध्दची तक्रार चुकीची ठरते असे त्यांचे म्हणणे आहे. एकुणच या प्रकरणामध्ये कंपनीने तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही ही बाब सिध्द होत असल्यामुळे सदरहू तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी त्यांनी विनंती केली आहे. कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ प्राधिकृत अधिका-याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे
(3) कंपनीचे म्हणणे दाखल झाले नंतर तक्रारदारांनी निशाणी 16 अन्वये पुराव्याचे प्रतिज्ञापत्र मंचापुढे दाखल केले. या नंतर डिलरने त्यांच्या विरुध्द झालेला नो से आदेश रद्य करुन घेऊन आपले म्हणणे विधिज्ञां मार्फत मंचापुढे दाखल केले. डिलरच्या म्हणण्याचे अवलोकन केले असता त्यांनी कंपनीने त्यांच्या म्हणण्यामध्ये जे मुद्ये उपस्थित केले आहे तेच बचावाचे मुद्ये म्हणण्यामध्ये नमूद केलेले आढळून येतात. डिलरने परिच्छेद क्र 2 मध्ये नमूद बचावाचे मुद्ये उपस्थित करुन आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ प्राधिकृत अधिका-याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 21 अन्वये एकुण 10 कागदपत्रे मंचापुढे दाखल केले आहेत.
(4) डिलरचे म्हणणे दाखल झाले नंतर तक्रारदारांनी निशाणी 24 व 25 अन्वये त्यांच्या ड्रायव्हरचे प्रतिज्ञापत्र तर निशाणी 26 अन्वये आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला या नंतर विलंबाने तक्रारदारांनी निशाणी 29 अन्वये तज्ञांचा अहवाल मंचापुढे दाखल केला. कंपनीने निशाणी 30 अन्वये तज्ञांचा अहवाल मागवण्यात यावा अशा आशयाचा दाखल केलेला अर्ज आदेशात नमूद कारणास्तव नामंजूर करण्यात आला. यानंतर तक्रारदारां तर्फे अड श्री साळूंखे व जाबदारां तर्फे अड श्री. दुशिंग यांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(5) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, म्हणणे दाखल कागदपत्रे व उभयपक्षकारांचा युक्तिवाद याचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील मुद्ये मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. मंचाचे मुद्ये व त्यांची उत्तरे पुढील प्रमाणे :
मुद्ये उत्तरे
मुद्या क्र . 1:- तक्रारदार “ग्राहक” म्हणून सदरहू तक्रार होय
अर्ज दाखल करु शकतात का ?
मुद्या क्र . 2:- डिलर व कंपनीने त्रूटीयुक्त सेवा दिली ही बाब नाही
सिध्द होते का ?
मुद्या क्र . 3:- तक्रारअर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो का ? नाही
मुद्या क्र . 4 काय आदेश : तक्रारअर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
मुद्या क्रमांक 1: प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार ड्रायव्हरच्या सहाय्याने ट्रॅक्टरचा वापर करीत आहे याचा विचर करता त्यांनी हा ट्रॅक्टर व्यावसायिक हेतूने घेतला आहे ही बाब सिध्द होते. सबब त्या ग्राहक म्हणून सदरहू तक्रारअर्ज दाखल करु शकत नाहीत असा एक आक्षेप डिलर व कंपनीने घेतला आहे. या आक्षेपाच्या अनुषंगे तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता तक्रारदार हया एक महीला आहेत ही बाब लक्षात येते. अर्थात अशा परिस्थितीत तक्रारदारांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून त्याचा वापर करण्याऐवजी ड्रायव्हर ठेवून वादग्रस्त ट्रॅक्टरचा वापर करणे साहजिक ठरते. अशा परिस्थितीत केवळ तक्रारदार स्वत: ट्रॅक्टर वापरत नसून त्यांनी ड्रायव्हरची नेमणूक केली आहे म्हणून त्या “ग्राहक” ठरत नाहीत हा डिलर व कंपनीचा आक्षेप अयोग्य ठरतो असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब डिलर व कंपनीचा वर नमूद आक्षेप अमान्य करण्यात येत आहे.
वर नमूद विवेचनावरुन तक्रारदार “ग्राहक” म्हणून सदरहू तक्रारअर्ज दाखल करु शकतात ही बाब सिध्द होते. सबब त्याप्रमाणे मुद्या क्र 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्या क्रमांक 2 व 3 (i): हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी संलग्न असल्यामुळे त्यांचे एकत्रित विवेचन करण्यात येत आहे. प्रस्तुत प्रकणातील तक्रारदारांच्या तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता वादग्रस्त डिझेल इतर ट्रॅक्टरपेक्षा कमी अव्हरेज देतो व त्यामुळे त्याला जास्ती डिझेल लागते ही तक्रारदारांची मुख्य तक्रार असल्याचे लक्षात येते. तक्रारदारांची ही तक्रार डिलर व कंपनीने नाकारलेली असून सरासरी बाबत अथवा डिझेलच्या वापरा बाबत आपण कोणतेही आश्वासन दिलेले नाही तसेच वाहनाच्या डिझेलचा वापर अनेक घटकांवर अवलंबून असतो असे त्यांनी नमूद केलेले आढळते. डिलर व कंपनीच्या वर नमूद आक्षेपाच्या अनुषंगे तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता अन्य कंपनीचे ट्रॅक्टर्स नेमके किती अवरेज देतात किंवा महिंद्रा कंपनीचे अन्य ट्रॅक्टर्स किती अव्हरेज देतात तसेच वादग्रस्त ट्रॅक्टर नेमके किती अव्हरेज देते याचा तपशिल तक्रारअर्जामध्ये आढळून येत नाही. ट्रॅक्टर खरेदी करताना कंपनीने एक विशिष्ट अवरेज कबुल केले होते असेही तक्रारदारांचे म्हणणे नाही. वादग्रस्त टॅक्टरला इतर ट्रॅक्टर्सच्या तुलनेमध्ये जास्ती डिझेल लागते अशी तक्रार करताना दोन्ही ट्रॅक्टर्सचा डिझेलच्या तुलनात्मक वापराचा तपशिल व त्यांचे पुष्टयर्थ पुरावा तक्रारदारांनी दाखल करणे आवश्यक होते. मात्र तक्रारदारांनी अशा आशयाचे निवेदन तक्रारअर्जामध्ये केलेले नाही तसेच या स्वरुपाचा पुरावा मंचापुढे दाखल केलेला नाही.
(ii) ट्रॅक्टरला जास्ती डिझेल लागण्यासाठी ड्रायव्हरच्या कौशल्या बरोबरच अन्य बाबी सुध्दा कारणीभूत ठरतात असे डिलर व कंपनीचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी निशाणी 5/4 अन्वये दाखल केलेल्या डेमॉनस्ट्रेशन रिपोर्टचे अवलोकन केले असता त्यामध्ये डिलरच्या ड्राव्हरने गाडी चालविली असता प्रती एकर 16 लीटर डिझेल लागलेले आढळते तर तक्रारदारांच्या ड्रायव्हरने ट्रॅक्टर चालविले असता 32 लीटर डिझेल लागले ही बाब लक्षात येते. या नंतर दिनांक 20/10/2010 रोजी डिलरच्या उपस्थितीत पुन्हा अशा प्रकारची चाचणी घेतली असता तक्रारदारांच्या ड्राव्हरला सुध्दा प्रती एकर फक्त 14.884 एवढे डिझेल लागलेले आढळते. डेमॉनस्ट्रेशन रिपोर्टमधील या तपशिलावरुन गाडी चालविण्याच्या पध्दतीवरती सुध्दा डिझेलचा वापर अवलंबून असतो ही बाब सिध्द होते. या अहवालामध्ये नमूद वस्तुस्थितीच्या आधारे डिलर व कंपनीने सुध्दा आपल्या म्हणण्यामध्ये ड्रायव्हरच्या अकुशलतेमुळे जास्ती डिझेल लागते असा आक्षेप घेतला आहे. डिलर व कंपनीच्या या आक्षेपाला तक्रारदारांनी स्वत: दाखल केलेल्या पुराव्याचा आधार मिळतो.
(iii) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ संबंधीत ड्रायव्हरचे, अन्य एका ड्रायव्हरचे प्रतिज्ञापत्र तसेच सपकळ ट्रॅक्टरच्या प्रोप्रायटरचा अहवाल दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी निशाणी 29 अन्वये दाखल केलेल्या सपकळ ट्रॅक्टरच्या प्रोप्रायट श्रीयुत राऊत यांच्या अहवालाचे अवलोकन केले असता त्यांनी वादग्रस्त ट्रॅक्टरला किती डिझेल लागते तसेच सर्वसामान्य प्रमाणे इतर महेंद्र ट्रॅक्टरला एकरी 10 ते 12 लिटर डिझेल लागते असा यामध्ये उल्लेख केलेला आढळून येतो. तक्रारदारांनी स्वत:च्या तक्रारअर्जामध्ये अशा आशयाचा उल्लेख आढळून येत नाही. तक्रारदारांनी मुलता: तक्रारअर्जामध्ये निवेदन करुन त्याच्या पुष्टयर्थ पुरावा दाखल करणे आवश्यक असते. तक्रारदारांच्या तक्रारअर्जामध्ये ज्या आशयाचे निवेदनच नाही त्याच्या पुष्टयर्थ दाखल केलेल्या पुराव्याचा तक्रारदारांना काहीही उपयोग होणार नाही असे मंचाचे मत आहे.
(iv) तक्रारदारांच्या विनंती कलमाचे अवलोकन केले असता त्यांनी ट्रॅक्टर बदलून मिळावा अशी मागणी केलेली आढळते. अशा प्रकारे ट्रॅक्टर बदलून मागताना ट्रॅक्टरमध्ये उत्पादन दोष आहे अथवा असा काही अन्य दोष आहे जो दुरुस्त करणे अशक्य आहे असे निवेदन व त्या आशयाचा पुरावा तक्रारदारांनी दाखल करणे आवश्यक असते. मात्र तक्रारदारांच्या तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता उत्पादन दोषाविषयी स्पष्ट शब्दात तक्रार न करता त्यांनी ट्रॅक्टर बदलून मिळावा अशी विनंती कलमामध्ये फक्त मागणी केलेली आढळते. तक्रारदारांनी सपकळ ट्रॅक्टरच्या प्रोप्रायटरचा एक अहवाल व अन्य दोन ड्रायव्हर्सची प्रतिज्ञापत्रे मंचापुढे दाखल केली आहेत. मात्र ट्रॅक्टर बदलून देण्याचा आदेश करण्यासाठी तज्ञ अहवाल म्हणून प्रतिज्ञापत्राचा पुराव्याकामी विचार करणे अयोग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या मागण्यांचे स्वरुप पाहीले असता त्यांनी डिझेलची रक्कम परत मिळावी व ट्रॅक्टर बदलून मिळावा अशा मागण्या केलेल्या आढळतात. ट्रॅक्टर बदलून मिळण्यासाठी ज्या प्रकारचा पुरावा दाखल करणे आवश्यक आहे तो तक्रारदारांनी दाखल केलेला आढळून येत नाही. आयटीआयचा कोर्स केलेल्या व्यक्तिचा अहवाल तज्ञांचा अहवाल म्हणून ग्राहय धरुन ट्रॅक्टर परत करण्याचा आदेश करणे अयोग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब या अहवालाच्या आधारे तक्रारदाराची मागणी मंजूर करणे शक्य नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. तर वादग्रस्त ट्रॅक्टरला जास्ती डिझेल लागते ही बाब तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत.
(v) तक्रारदारांच्या तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता कंपनीने नेमके किती अव्हरेज कबुल केले होते व त्यांना नेमके किती अव्हरेज मिळते आहे तसेच अन्य कंपनीच्या ट्रॅक्टरचे अव्हरेज किती आहे याचा तपशील व पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला आढळून येत नाही. किंबहूना तक्रारदारांनी निशाणी 5/4 अन्वये दाखल केलेल्या अहवालावरुन कंपनीच्या ड्रायव्हरपेक्षा तक्रारदारांच्या ड्रायव्हरला जवळजवळ दुप्पट डिझेल लागले ही बाब सिध्द होते. डिझेलच्या इंजिनमध्ये काही बिघाड आहे व त्यामुळे त्यांचे डिझलच्या वापराचे प्रमाण जास्ती आहे अशा आशयाचा तज्ञांचा अहवाल तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. ट्रॅक्टर बदलून मिळावा अशी मागणी करताना ट्रॅक्टरमध्ये दुरुस्तीच्या पलीकडे दोष आहे ही बाब ठोस व सबळ पुराव्याच्या आधारे सिध्द करण्याची प्राथमिक जबाबदारी तक्रारदारांची असते. मात्र या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी ही जबाबदारी पार पाडलेली नाही. अर्थात अशा परिस्थितीत वादग्रस्त ट्रॅक्टर कमी सरासरी देत असून त्याला जास्ती डिझेल लागते असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. ट्रॅक्टर बदलून मिळण्याच्या मागणी बरोबरच जादा डिझेलच्या खर्चासाठी प्रती वर्षी रु 50,000/- या प्रमाणे तक्रारदारांनी मागणी केलेली आढळते. मात्र जादा डिझेल म्हणजे नेमके किती डिझेल याचा तपशिल तसेच डिझेलच्या खर्चासाठी मागितलेल्या रकमेच्या पुष्ठयर्थ तक्रारदारांनी काहीही पुरावा दाखल केलेला नाही. त्यातूनही सदोष ट्रॅक्टरमुळे डिझेल जास्ती लागते ही बाब तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारदारांची ही मागणी मंजूर करणे शक्य नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. एकुणच या प्रकरणामध्ये तक्रारदाराचा तक्रारअर्ज व दाखल पुरावे यांचे अवलोकन केले असता ट्रॅक्टर बदलून दयावा अथवा जादा डिझेलची रक्कम तक्रारदारांना परत करण्याचे निर्देश दयावे अशा प्रकारचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही ही बाब सिध्द होते. सबब तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर होण्यास पात्र ठरतो असा मंचाचा निष्कर्ष आहे.
(vi) वर नमूद विवेचनावरुन डिलर व कंपनीने तक्रारदारांना सदोष सेवा दिली नाही. तसेच तक्रारअर्ज मंजूर होण्यास पात्र ठरत नाही ही बाब सिध्द होते. सबब त्याप्रमाणे मुद्या क्रमांक 2 व 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्या क्रमांक 4 : वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब आदेश की,
// आदेश //
(1) तक्रारअर्ज नामजूर करण्यात येत आहे
(2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
(3) निकालपत्राची प्रत उभयपक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.