जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ८७/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०३/०५/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/०७/२०१३
उत्तम आनंदा देवरे
उ.व. ४० वर्षे, धंदा- शेती
मु.पो. फोफरे,
ता. साक्री, जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१) मोन्सान्टो इंडिया प्रा.लि.,
अहूरा सेंटर, ५ वा गाळा, महाकाली लेणी रोड,
अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३.
२) चेअरमन, अमोदे परिसर तेलबिया उत्पादक सहकारी संस्था
लि., अमोदे, मेनरोड, बाबूराव वैदय मार्केट
शिरपूर, जि. धुळे. ................. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एम.एच. पाटील)
(सामनेवाला नं.१ तर्फे – अॅड.जे.यु. कोठारी)
(सामनेवाला नं.२ तर्फे – अॅड.एस.सी. वैदय)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
सामनेवाला नं.१ व २ यांनी तक्रारदार यांना सदोष बियाण्याची विक्री केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे फोफरे, ता.साक्री जि.धुळे येथील रहिवासी असुन त्यांची हटृी बु. ता.साक्री जि.धुळे शिवारात गट नं.१९/५ब अशी शेती आहे. तक्रारदारने सामनेवाला नं. २ यांच्या दुकानातून सामनेवाला नं.१ कंपनीचे कपाशी बियाणे मोन्सान्टो पॅकींग ४५० ग्रॅम नग १० भाव प्रती रू.७५०/- प्रमाणे एकूण रू.७५००/- रूपयांना दि.२७/०५/२००९ रोजी पावती क्र.१५५३ अन्वये विकत घेतले. सामनेवाला नं.१ यांनी दिलेल्या पॅकींगवरील सूचनेप्रमाणे तक्रारदारने लागवड केली. परंतु बियाणे खराब असल्याकारणाने उगवण व उत्पादन शक्ती कमी म्हणजे ६०% वर झालेली आहे.
२. याबाबत सामनेवाला यांचेकडे तक्रारदार याने वेळोवेळी तोंडी तक्रार केली असता, सामनेवाला नं.२ यांचे दुकानातील संबंधीत व्यक्ती व कंपनीचे सक्षम अधिकारी श्री.सोनवणे यांनी शेतावर येवून पाहणी केली व पंचनामा केलेला आहे. तसेच तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदारने नोटीस पाठवून नुकसान भरपाई देणेची मागणी करूनही सामनेवाला यांनी आजपावतो नुकसान भरपाई दिलेली नाही. सामनेवाला नं.१ यांनी अजंदे बु. होळनांथे ता.शिरपूर येथील शेतकरी जमादार सरोल राजेंद्र यांना नुकसान भरपाई दिल्याचे समजते. सबब सामनेवाला यांच्याकडून तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रू.२,००,०००/- बियाण्याचा खर्च रू.१५००/- नोटीस खर्च रू.२०००/- तसेच संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे. १८% प्रमाणे व्याज व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
३. तक्रादार यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.५ सोबत नि.५/१ नोटीस, नि.५/२ वर नोटिस उत्तर, नि.५/३ वर नोटीस पोहच पावती, नि.५/४ वर परत आलेले पाकिट, नि.५/५ वर ७/१२ उतारा, नि.५/६ वर खाते उतारा, नि.५/७ वर बियाणे खरेदी पावती, नि.५/८ तक्रार अर्ज, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
४. सामनेवाला नं.१ यांनी नि.१० वर आपले लेखी म्हणणे दाखल करून तक्रारीतील कथन नाकारलेले आहे. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक नाही. सामनेवाला नं.२ हे कंपनीचे अधिकृत विक्रेते नाहीत. नुकसान भरपाई संबंधित वाद मिटविण्याचा अधिकार हा केवळ दिवाणी न्यायालयालाच आहे. तक्रारदारने कंपीनीने उत्पादित केलेले कपासी बियाणे सामनेवाला नं.२ यांचे कडून दि.२७/०४/२००९ रोजी घेतल्याचे नाकबूल आहे. कंपनीचे प्रतिनिधीने तक्रारदारचे शेतावर जावून पंचनामा केला व तक्रारदार सह १२ शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले ही बाब नाकबुल आहे. अजंदे बु. होळनांथे ता.शिरपूर येथील शेतकरी जमादार सरोल राजेंद्र यांना नुकसान भरपाई दिल्याची बाब नाकबूल आहे. तक्रारदारने होणा-या उत्पन्नाबाबत विपरीत विधाने करून आकडे नमुद केलेले आहे.
५. सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, कोणताही कायदेशीर सक्षम पुरावा दाखल न करता सदरचे प्रकरणे न्यायमंचात दाखल केलेले आहे. पिकाची काळजी घेतली व पिक आले नाही किंवा अपेक्षीत उत्पन्न प्राप्त झाले नाही. याबाबत कायदेशीर पुरावा दाखल नाही. कापसाचे लागवडी नंतर जवळपास २३ महिन्यानंतर सदर तक्रार पुराव्याशिवाय दाखल केली असल्याने रद्द होण्यास पात्र आहे. कथीत नुकसानीबाबत त्याचप्रमाणे बियाणे पेरणी केल्याबाबत, बियाणे सदोष असल्याबाबत सक्षम पुरावा दाखल नाही. कंपनी बियाणे बाजारात विक्रीकरिता आणण्यापूर्वी त्याबाबत योग्य ती काळजी घेते व बियाण्यांचे परीक्षण केल्यानंतरच सदरचे बियाणे विक्री करिता बाजारात आणण्यात येते. त्यामुळे कंपनीने उत्पादित केलेल्या सदरचे बियाण्यात कोणताही दोष नाही. तक्रारदारने पिकाचे योग्य व्यवस्थापन केले असते तर तक्रारदार याला भरपूर पिक आले असते. सदरचे बियाणे दोषपूर्ण असल्याबाबतचा कोणताही प्रयोग शाळेचा अहवाल दाखल केलेला नाही. तसेच ज्या वाणाचे बियाणे हे दोषपूर्ण आहे असे नमुद केले गेले आहे. त्या वाणाचे त्या लॉटमधील बियाण्याचे सॅम्पल प्रयोगशाळेत तपासणीसाठी तक्रारदाराकडून पाठविण्यांत आलेले नाही. जोपर्यंत तक्रारदार उत्पादित केलेले सदरचे बियाणे हे दोषपूर्ण आहे हे सिध्द करीत नाही. तोपर्यंत कंपनी तक्रारदारला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत.
६. सामनेवाला कंपनीने कोणत्याही बियाण्याचे वाण हे खुल्या बाजारात विक्रीस आणण्यापूर्वी, सिड अॅक्ट १९६६ व सिडस नियम १९६६ प्रमाणे भारत सरकार यांनी जारि केलेल्या नियमाप्रमाणे त्या बियाण्याचे वाणाचे परीक्षण करून व सदरचे वाण हे उत्तम प्रतीचे असल्याबाबतची खात्री करूनच बाजारात विक्री करण्यांकरिता उपलब्ध करून देते. सदरची तक्रार ही बियाणे संदर्भातील असल्याने सदर वादास सिडस अॅक्ट १९६६ च्या तरतुदी लागू होतात. सदरचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असल्याने विद्यमान न्यायमंचाचे अधिकार कक्षेबाहेरील बाब आहे. सदरची नुकसानी झाल्याबाबत तक्रारदारने कोणताही पुरावा, न्यायमंचात दाखल केलेला नाही. तसेच बियाण्याच्या दोषाबाबत आवश्यक ती पाहणी, चौकशी झालेली नसल्याने कोणताही पुरावा न्यायमंचासमोर नाही. सबब तक्रारदारने सामनेवाला कंपनी विरूध्द खोटी तक्रार दाखल केली असल्याने सामनेवाला कंपनी यांना तक्रारदार यांचे कडुन नुकसानभरपाई. म्हणून रू.५,०००/- मिळावे. तसेच सदरची तक्रार रद्द करण्यात यावी. असे नमूद केले आहे.
७. सामनेवाला नं.२ यांनी आपला लेखी खुलासा नि.८ वर दाखल केला आहे. त्यांत त्यांनी सदर तक्रार दाखल करणेस कायदयाने कुठलेही कारण घडलेले नाही. सामनेवाला नं.१ हा उत्पादक असुन सामनेवाला नं.२ केवळ सिलबंद मालाची विक्री करणारा विक्रेता आहे. तक्रारदारने कधीही सामनेवाला नं.२ यांचेकडे तक्रार केलेली नाही. तक्रारदार व अन्य १२ लोकांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्याचे कारण नाही. बियाणे खराब असल्याबाबत आमची काहीही एक जबाबदारी नाही. आम्ही केवळ सिलबंद पाकिट विक्री केलेले होते. पाकीटवर कंपनीमार्फत सूचना लिहिलेल्या असतात. सिलबंद पाकीटाच्या आतील मालाच्या गुणवत्तेशी सामनेवाला नं.२ यांचा काहीएक संबंध येत नाही. तक्रारदार यांनी कंपनीकडे व सक्षम अधिका-याकडे कुठलीही तक्रार केलेली नाही. कंपनीच्या पाहणीत तक्रारदारचे शेतातील पिक अतिशय उत्कृष्ट असल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यास नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नाही. पिक निघून गेल्यानंतर मुदृाम उशिराने पुरावे नष्ट करून तक्रारदारने सदरचा अर्ज केलेला आहे. कृषी अधिकारी यांनी शेताची पाहणी केल्याबाबतचा तक्रारदारकडे काहीएक पुरावा नाही.
८ सामनेवाला नं.२ यांचे पुढे असे म्हणणे आहे की, शेतात येणारे उत्पन्न हे निसर्गाचे हवामान, योग्य मशागत, फवारणी, खते, पाणी यांचे योग्य संतुलन राखल्यास चांगले येते. तक्रारदारने याबाबत कुठलीही शाबीती दिलेली नाही. त्याने त्याची मशागत, मेहनत व मजुरी वगैरेचा नुकसानीचा तपशिलाबाबत कुठलाही पुरावा दिलेला नाही. तक्रारदारने पिकाचे नियोजनात चूक केल्याचे दिसून येते. तक्रारदारचा तक्रारी अर्ज बेकायदेशीर आहे. अनेक शेतक-यांनी सदर वाण वापरले असून अतिशय चांगले असल्याचे कबुल केलेले आहे व अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळविलेले आहे. स्वतःचे आर्थिक फायदयासाठी ब्लॅकमेल करून सदर खोटा व बनावट, बेकायदेशीर अर्ज तक्रारदारने दाखल केलेला आहे. कपाशी लागवडी नंतर योग्य मुदतीत तक्रार व पिक परिस्थितीचा पंचनामा नसल्याने सर्व पूर्व नियोजित असल्याचे दिसुन येते. कपाशीची उगवण शक्ती चांगली नाही. बियाणे उगवले नाही. अशी कुठलीही तक्रार तक्रारदार याची नाही. बियाणे उत्पादन झाल्यानंतर शासनामार्फत सक्षम प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल आल्याशिवाय विक्रीस उपलब्ध होत नाही. असे असतांना सामनेवाला नं.२ याला सदर तक्रारीत समाविष्ट करणे ही बाब सामनेवाला नं.२ ची इज्जत, अब्रु, नावलौकीक धोक्यात आणावा, त्यास हानी पोहोचावी या अप्रामाणिक हेतूने केलेली आहे. सबब तक्रारदारचा अर्ज रद्द होणेस पात्र आहे. त्यामुळे सदर अर्ज खर्चासह रद्द करावा व सामनेवाला नं.२ याला अर्जाचा खर्च व मानसिक त्रासापोटी रू.२५,०००/- देण्याचा आदेश व्हावा. असे नमूद केले आहे.
९. तक्रारदार यांची तक्रार, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांचा खुलासा व प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तसेच दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आमही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
३. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५/७ वर बियाणे खरेदीची पावती दाखल केलेली आहे. सदर पावती सामनेवाला नं.२ यांची असून त्यावर सामनेवाला नं.१ कंपनीचे नाव नमुद आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाला नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत असे आम्हांस वाटते म्हणून मुददा क्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाला नं.१ कंपनीचे कपाशी बियाणे मोन्सान्टो पॅकींग ४५० ग्रॅम नग १० पेरणीसाठी विकत घेतले होते. परंतु मशागत करून व आवश्यक ती काळजी घेवूनही सदर बियाणे खराब असल्याने उगवण व उत्पादन क्षमता कमी झाली आहे. तक्रारदारने सामनेवाला यांनी सदोष बियाणे विकले आहे हे सिध्द करण्यासाठी कुठलाही कागदोपत्री पुरावा तक्रारीसोबत दाखल केलेला नाही. तसेच जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीच्या पंचनाम्याची प्रत ही तक्रारीसोबत दाखल केलेली नाही. सदर बियाण्याची उगवण कमी कोणत्या कारणास्तव झाली आहे याचा उल्लेखही तक्रारीत नमूद नाही. तक्रारीत कंपनीचे अधिकारी श्री.सोनवणे यांनी पाहणी केलेली आहे व पंचनामा केलेला आहे, असे नमुद आहे. परंतु श्री. सोनवणे यांच्या साक्षीची प्रत तक्रारीसोबत दाखल नाही. बियाणांची पुन्हा तपासणी होवून मिळणेबाबत तक्रारदार याने सदर बियाणे प्रयोग शाळेतून तपासणी करून मिळावेत यासाठी अर्जही केलेला नाही.
१२. याउलट सामनेवाला नं.१ कंपनी यांनी आपल्या खुलाशात बियाणे बाजारात
विक्रीकरिता आणण्यापूर्वी सिड अॅक्ट १९६६ व सिडस नियम १९६६ नुसार भारत सरकारने जारि केलेल्या नियमाप्रमाणे बियाण्याचे वाणाचे परिक्षण करून व सदर वाण हे उत्तम प्रतीचे असल्याबाबतची खात्री करूनच बाजारात विक्री करिता उपलब्ध करून दिले जाते असे नमूद केले आहे. तसेच सामनेवाला नं.२ यांनी आपल्या खुलाश्यामध्ये तक्रारदारने कंपनीकडे व सक्षम अधिका-यांकडे कुठलीही तक्रार केलेली नाही. तक्रारदारला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आलेले आहे. तसेच कंपनीच्या पाहणीत तक्रारदारचे शेतातील पिक अतिशय उत्कृष्ट असल्याचे निदर्शनास आले असल्याचे नमूद केले आहे.
१३. या सर्व बाबी पाहता तक्रारदारने बियाण्याची उगवण कमी होण्यात बियाण्याचा काही दोष होता का ? याबद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी उत्पादित केलेले बियाणे सदोष होते असा निष्कर्ष काढता येत नाही. तसेच तक्रारदारने मशागतीचे वेळी पिक नियोजन व संरक्षणासाठी कोणत्या खतांचा वापर केला, किटकनाशके कोणती वापरली, याबाबतही कोणताही पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. तसेच शेतात येणारे उत्पन्न हे जमिनीची प्रतवारी, दिली जाणारी खतमात्रा, अंतर्गत मशागत, निसर्गाचे हवामान, फवारणी, पाणी, किड नियंत्रण, यांचे योग्य संतुलन राखल्यास चांगले येते असे आम्हांस वाटते.
१४. तसेच बियाणे सदोष आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी ही तक्रारदारची आहे, हे मा.राष्ट्रीय आयोग व मा. राज्य आयोग यांनी अनेक निवाडयांत स्पष्ट केलेले आहे.
या संदर्भात आम्ही पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांच्या न्यायनिवाडयांचा आधार घेत आहोत.
१) २(२००५) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान ९४ सोनेकिरण ग्लॅडिओली ग्रोवर्स विरूध्द बाबुराम.
यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की,
Seeds- Sub – Standard -Absence of clear finding regarding quality of seeds supplied – No inference can be drawn against petitioner–Non-
standard quality of seed not proved – Complaint dismissed.
२) ४(२००७)सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान १९२ कंझुमर प्रोटेक्शन सोसायटी विरूध्द नॅशनल सिडस कॉर्पोरेशन या मधील निवाडयाचा आधार घेत आहोत.
त्यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की,
`Onus of proof lies with farmers, seeds not tested from“Seeds Testing Laboratory” Expert evidence not produced. Provision
ofsection 13 notcomplied’.
१५. वरील विवेचनावरून व सर्व कारणांचा विचार करता, तसेच प्रयोगशाळेचा अहवाल, पंचनामा नसल्यामुळे बियाणे सदोष आहेत ही बाब स्पष्टपणे शाबित होत नाही. असे आम्हांस वाटते. म्हणून मुददा क्रं.२ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१६. मुद्दा क्र.३- वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
(श्री.एस.एस. जोशी ) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.