(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे इंजिनिअर असून बांधकाम व्यवसाय करतात. सामनेवाले क्र.२ ही रेनॉल्ट इंडिया प्रा.लि. कंपनी असून नवीन वेगवेगळी वाहन तयार करण्याचा व्यवसाय आहे. सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ यांचे अधिकृत डिलर असून त्यांचे शोरूमवरील पत्यावर आहे. सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ मार्फत तया झालेली वाहन विक्री व सर्व्हीसींग दुरूस्ती करण्याचा व्यवसाय करता.
तक्रारदार यांनी स्वतःचे वापराकरीता सामनेवाले क्र.२ कंपनीद्वारे उत्पादीत वाहन रेनॉल्ट डस्टर मॉडेल सामनेवाले क्र.१ यांचेकडून सन २०१६ रोजी खरेदी केले असून त्याचा रजिस्टर नं.एचएच.१७ अे.झेड-७२५५ असून त्याचा चेजीस क्र.MEEHSRCF6F7003433 असा असून इंजिन नं. E००७८४४ असा असून सदर वाहनाचा रंग पांढरा आहे व सदरचे वाहन हे डिझेलवर चालते. तक्रारदार यांच्या वाहनाचा दिनांक २२-१०-२०१७ रोजी अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी सदर वाहन दिनांक २३-१०-२०१७ रोजी सामनेवाले क्र.१ साईदिप कार्स प्रा.लि. यांचेकडे दुरूस्तीसाठी दाखल केले. त्यावेळी सामनेवाले क्र.१ चे शोरूमचे कर्मचारी श्री.माळी व श्री.अक्षय यांनी तक्रारदाराकडून गाडीचे विम्याची सर्व कागदपत्र घेऊन जॉबकार्ड बनवुन सदर वाहन पंधरा दिवसांनी म्हणजे दिनांक ०६-११-२०१७ रोजी दुरूस्त करून प्रत्यक्ष तक्रारदाराचे ताब्यात देण्याचे कबुले केले व सामनेवाले यांचे मागणीप्रमाणे होणारे बील तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना अदा केले. दरम्यानच्या काळात तक्रारदाराचे घरी लग्नकार्य असल्याने व त्यासाठी तक्रारदारास गाडीची आवश्यकता असल्याने दिनांक ०६-११-२०१७ रोजीपासून तक्रारदार नियमित सामनेवाले क्र.१ शोरूमचे कर्मचारी यांनी देवु दिलावु करून तक्रारदारस गाडी देण्याची टाळाटाळ चालविली. त्यानंतर दिनांक २२-११-२०१७ रोजी सामनेवाले क्र.१ शोरूमकडुन तक्रारदारास डेमो किडस गाडी मौजे राहुरी बु || येथे पोहोच केली गेली. तसेच तक्रारदाराचे रेनॉल्ट डस्टर गाडीचे स्पेअर पार्ट उपलब्ध होत नसलेने गाडी दुरूस्तीस विलंब होत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हास तात्पुर्ती डेमो व्हेईकल देत आहोत. असे लेखी नमुद केलेले पत्र दिले. सदर पत्रावर तक्रारदाराने गाडीमध्ये इन्शुरन्स कव्हर नोट व आर.सी.बुक नाही व माझी डस्टर दिनांक २३-१०-२०१७ रोजी सामनेवाले क्र.१ यांचे शोरूम मध्ये आलेली आहे आणि मला दिनांक २२-११-२०१७ रोजी डेमो क्विड मिळाली असे पत्रामध्ये लेखी नमुद करून डेमो कार ताब्यात घेतली. त्यानंतर तक्रारदाराने सदर डेमो वाहन वापरले असता ते वाहन कामचलावु स्वरूपाचे असलेचे दिसून आले. आजपावेतो तक्रारदाराची डस्टर गाडी दुरूस्त होऊन तक्रारदाराचे प्रत्यक्ष कब्जात मिळालेले नाही. तक्रारदार सामनेवाले क्र.१ यांचेकडे वाहन दुरूस्त करून तक्रारदाराचे ताब्यात दिले नाही. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले यांना दि.१३-१२-२०१७ रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवूनही सामनेवाले यांनी तक्रारदाराचे वाहन दुरूस्त करून तक्रारदारास दिले नाही व अर्जास कारण घडले आहे.
तक्रारदाराची विनंती अशी आहे की, तक्रारदाराचे वाहन सामनेवाले यांनी लवकरात लवकर दुरूस्त करून तक्रारदाराचे ताब्यात द्यावे. तसेच तक्रारदार यांचे वाहन त्यांचे ताब्यात मिळणेपर्यंत दररोज रक्कम रूपये २५००/- प्रमाणे नुकसान भरपाई सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास मिळावी, तक्रारदार यांना पर्यायी भाडोत्री वाहन वापरावे लागल्यामुळे त्यांचे होणारी एकूण रक्कम रूपये १,२०,५००/- सामनेवाले यांचेडून तक्रारदारास व्याजासह मिळावी, सदर वाहन ताब्यात मिळण्यासाठी तक्रारदारास सामनेवाले क्र.१ यांच्याकडे चकरा माराव्या लागल्यामुळे प्रवास खर्चापोटी रक्कम रूपये ८०००/- सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास देण्याचा हुकुम व्हावा. सामनेवाले यांनी तक्रारदारास दिलेल्या दुषीत सेवेमुळे तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये २०,०००/- सामनेवालेकडून तक्रारदारास मिळावे, अर्जाचा खर्च रक्कम रूपये १२,५००/- सामनेवालेकडून मिळावा.
३. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ६ वर दस्तऐवज यादीसोबत तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाले क्र.१ व २ यांना नोटीस मिळाल्याची पावती, तक्रारदाराच्या वाहनाचे जॉबकार्ड, वाहनाचे इनव्हॉईस, वाहनाचे आर.सी. बुक इत्यादींचा छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. नि.१६ तक्रारदाराने एकूण ६ कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये साईराज ट्रॅव्हल ब्युरोची पावती, लग्न पत्रीका, ई-मेलची प्रत दाखल आहे. नि.१७ वर तक्रारदाराचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे.
४. तक्रारदाराची तक्रार दाखल करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाले क्र.१ हे मंचाची नोटीस मिळून हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा नि.१३ वर दाखल केला. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदाराची तक्रार खरी व बरोबर नसून सामनेवाले यांना नाकबूल आहे. सत्य परिस्थितीमध्ये असे नमूद केले की, तक्रारदार यांनी वाहनाच्या दुरूस्तीच्या बिलाचे पैसे सामनेवाले यांना अदा केले नाही. तक्रारदाराचे वाहन दुरूस्तीचे बिल एकूण ७९,७१३/- होते त्यापैकी इन्शुरन्स कंपनीकडून रूपये ७०,०००/- मिळाले व उर्वरीत रक्कम रूपये ९,७१३/- ही तक्रारदाराकडुन येणे बाकी होती व त्यांनी दिनांक ०९-०१-२०१८ रोजी सदर रक्कम अदा केली. तक्रारदाराचे हे म्हणणे खरे नाही की, त्याच्या कुटुंबामाध्ये लग्न असल्याने त्याला आवश्यकता होती, व्यावसायात आर्थिक नुकसान झाले व शारीरीक व मानसीक त्रास झाला, याबद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराच्या वाहनाचे सुटे भाग जवळपास उपलब्ध नसल्यामुळे ते, वाहन उत्पादक कंपनीच्या चेन्नई येथील गोडाऊनकडून मिळणेसाठी मागणी करण्यात आली. सदर सुटे भाग दिनांक २६-११-२१७ रोजी मिळाले व तक्रारदाराचे वाहन दिनांक ०५-१२-२०१७ रोजी दुरूस्त करण्यात आले. सदरील वाहनाचे दुरूस्तीचे बिल रूपये ७९,७१३/- हे इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक ०७-१२-२०१७ रोजी मंजूर होणेसाठी पाठविली व त्यापैकी रक्कम रूपये ७०,०००/- साठी इन्शुरन्स कंपनीने दिनांक १२-१२-२०१७ रोज मंजुरी दिली व त्याच दिवशी तक्रारदाराला वाहन घेऊन जाण्यासाठी ई-मेलद्वारे कळविले. तक्रारदाराला वाहन दुरूस्त केल्यानंतर वाहनामध्ये जास्तीची दुरूस्ती विनामुल्य करून हवी होती जी की विमा कंपनीच्या पॉलसीमध्ये समाविष्ट नव्हती. ग्राहकला अतिरीक्त सेवा द्यावी म्हणून तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे जास्तीचे काम विनामुल्य करून देण्यात आले व तक्रारदार यांना दिनांक ०३-०१-२०१८ रोजी ई-मेलद्वारे वाहन लवकरात लवकर घेऊन जावे, असे सांगितले व त्याप्रमाणे तक्रारदाराने दिनांक ०९-०१-२०१८ वाहन ताब्यात घेतले व तो समाधानी होवून त्याने तशी समाधान टिपणीमध्ये नोंद केली. तक्रारदार यांना दिलेली डेमो कार तक्रारदाराने दिनांक १४-१२-२०१७ पर्यंत जवळपास १८४४ किलोमीटर चालवली म्हणून तक्रारदाराचे हे म्हणणे खरे नाही की, त्याचा दररोज रूपये २,५००/- भाडोत्री वाहनाचा खर्च झाला. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
५. सामनेवाले क्र.१ यांनी नि.१५ वर दस्तऐवज यादीसोबत एकूण ४ कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये सामनेवाले यांनी रेनॉल्ट कंपनीला सुटे भाग मिळेणेसाठी केलेली ऑर्डर, रेलॉल्ट कंपनीचे इनव्हॉईस, वाहन दुरूस्तीबाबतचे रजिस्टर, ई-मेलद्वारे तक्रारदार, इन्शुरन्स कंपनी यांच्याशी केलेला पत्रव्यवहार दाखल आहे.
६. सामनेवाले क्र.२ यांना मंचाची नोटीस मिळुनही त हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्यात आला.
७. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यात दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ यांनी दाखल केलेली कागदपत्रे, खुलासा, लक्षात घेता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
(२) | तक्रारदार या तक्रारीत नमूद नुकसान भरपाईची मागणी व इतर खर्च सामनेवाले क्र.१ व २ कडून मिळण्यास पात्र आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
८. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ कंपनीद्वारे उत्पादीत वाहन रेनॉल्ट डस्टर मॉडेल सामनेवाले क्र.१ यांचेकडून सन २०१६ रोजी खरेदी केले. तक्रारदाराने त्याचे वाहन दिनांक २२-१०-२०१७ रोजी अपघात झाल्यामुळे दिनांक २३-१०-२०१७ रोजी सामनेवाले क्र.१ साईदिप कार्स प्रा.लि. यांच्याकडे दुरूस्तीसाठी दाखल केले. सामनेवाले क्र.१ यांच्या कर्मचा-यांनी तक्रारदाराकडुन गाडीच्या विम्याची कागदपत्रे घेऊन त्याची कार १५ दिवसांनी दुरूस्त करून वाहन प्रत्यक्ष तक्रारदाराच्या ताब्यात देण्यचे कबुल केले होते. सामनेवाले यांच्या म्हणण्याप्रमाणे येणारी बिले तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यास अदा केली. तक्रारदाराच्या घरी लग्न कार्य असल्याने व त्यासाठी तक्रारदारास वाहनाची आवश्यकता असल्याने दिनांक ०६-११-२०१७ पासून सामनेवाले क्र.१ चे शोरूमचे कर्मचारी यांनी देवु दिलावु करून तक्रारदारास वाहन देण्याची टाळाटाळ केली. यासंदर्भात सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराच्या वाहनाचे सुटे भाग उपलब्ध नसल्याने ते वाहन उत्पादक कंपनी यांच्या चेन्नई गोडाऊन येथुन मिळणेसाठी मागणी करण्यात आली. वाहन दुरूस्तीचे बिल रक्कम रूपये ७९,७१३/- इन्शुरन्स कंपनीकडे सामनेवाले क्र.१ ने दिनांक ०७-१२-२०१७ रोजी मंजुरीसाठी पाठविले त्यापैकी रक्कम रूपये ७०,०००/- साठी इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिली. ग्राहकाला अतिरीक्त सेवा द्यावी म्हणून तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे सामनेवाले यांनी जास्तीची कामे विनामुल्य करून दिली, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. परंतु दिनांक २३-१०-२०१७ रोजीपासून दिनांक ०९-०१-२०१८ रोजी पर्यंत सामनेवाले क्र.१ ने वाहन तक्रारदारास दुरूस्त करून प्रत्यक्ष ताब्यात दिले नाही व वाहनाचे सुटे भाग उपलब्ध नसल्याने ते वाहन उत्पादीत कंपनीच्या चेन्नई येथील गोडाऊन येथुन मिळण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर दिनांक ०५-१२-२०१७ रोजी वाहन दुरूस्त करण्यात आले, असे सामनेवाले क्र.१ ने नमुद केले आहे. परंतु सामनेवाले क्र.१ ने वाहन दिनांक ०५-१२-२०१७ रोजी ताब्यात दिले नाही. दरम्यानच्या काळात तक्रारदाराला भाडोत्री वाहन वापरावे लागले. यावरून सिध्द होते की, सामनेवाले क्र.२ ने उत्पादीत केलेले सामनेवाले क्र.१ कडुन तक्रारदाराने विकत घेतलेल्या वाहनाच्या दुरूस्तीप्रती सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
९. मुद्दा क्र. (२) : तक्रारदाराने तक्रारीत परिच्छेद क्रमांक ९ व ११ मध्ये सामनेवाले यांनी दुषीत सेवा देऊन तक्रारदाराची फसवणुक व अडवणुक केली असुन तक्रारदारास दिनांक ०६-११-२०१७ रोजी वाहन दुरूस्त करून दिले नाही. म्हणून तक्रारदाराचे प्रवासाचे खुप मोठे नुकसान झाले. त्यामुळे रूपये २,५००/- या दराने दुसरे वाहन भाड्याने घ्यावे लागले व वाहन भाडेपोटी रक्कम रूपये ३७,५००/- वाहन भाड्याची रक्कम इतका भुर्दंड सहन करावा लागला. त्याचप्रमाणे दिनांक ०२-१२-२०१७ ते दिनांक १२-१२-२०१७ पर्यंत या १० दिवसाच्या भाड्यापोटी रक्कम रूपये २५,०००/- अशी एकुण रक्कम रूपये ६२,५००/- वाहन भाड्यापोटी सामनेवाले यांनी दिलेल्या दुषीत सेवेमुळे द्यावे लागले. तसेच दिनांक १३-१२-२०१७ पासून ते तक्रार अर्ज दाखल करेपर्यंत दररोज रक्कम रूपये २,५००/- प्रमाणे होणारी रक्कम रूपये ५०,०००/- अशी एकुण रक्कम रूपये १,२०,५००/- तसेच सामनेवाले यांच्याकडे चकरा माराव्या लागल्यामुळे प्रवास खर्चापोटी रक्कम रूपये ८,०००/- सामनेवालेकडुन मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये २०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रूपये १२,५००/- सामनेवालकडुन मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली. तक्रारदाराने वाहन भाड्यापोटी होणा-या रकमांची बिले दाखल केलेली आहेत. सदर बिले ही साईराज ट्रॅव्हल्स ब्युरो यांची आहेत. परंतु साईराज ट्रॅव्हल ब्युरो यांच्या संचालकांचे बिलासंदर्भांत शपथपत्र दाखल नाही, साक्ष घेतलेली नाही. त्यामुळे त्या बिलांची संपुर्ण रक्कम देणे शक्य नाही. तक्रारदाराला त्याची आर्थिक नुकसान भरपाई खर्चाची संपुर्ण रक्कम देता येणार नाही. तक्रारदारास शारीरिक, मानसिक व नुकसानभरपाईपोटी तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी अंशतः रक्कम देणे उचित असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
१०. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ यांच्या विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. | तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. | सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) द्यावा. |
३. | वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
४. | या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
५. | तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |