रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 19/2012
तक्रार दाखल दिनांक :- 26/03/12
निकालपत्र दिनांक :- 24/02/2015
श्री. रुपेश बापू धावटे,
रा. मु. तळवली, पो. तळवली,
ता. रोहा, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर, (मोटर क्लेम्स विभाग),
दि. ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.,
एस. व्ही. सी. एम. आर. ओ. 2,
मेकर भवन, क्र. 1, 6 वा मजला,
मरिन लाईन्स, चर्चगेट, मुंबई
2. मॅनेजर
दि. ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.,
पेण शाखा, ता. पेण, जि. रायगड ..... सामनेवाले क्र. 1 व 2
उपस्थिती - तक्रारदारांतर्फे ॲड. भूषण जंजिरकर
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे ॲड. अमित देशमुख
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा. सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
– नि का ल प त्र –
द्वारा मा. सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
1. तक्रारदाराने सदरची तक्रार सामनेवाले क्र. 1 व 2 विमा कंपनी विरुध्द, सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे वाहन विमा रक्कम नाकारल्याने दाखल केली असून त्यांचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
2. तक्रारदाराने स्वतःचे वापराकरीता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप क्र. एम.एच. – 06 ए. एन. – 2113 ही गाडी घेतलेली आहे व गाडी सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे दि. 20/10/07 ते 19/10/08 या कालावधीकरीता सर्वसमावेशक (Comprehensive) विमा संरक्षित होती व आहे. सदर विमा पॉलिसीचा क्रमांक 124101/31/2010/2758 असा आहे. तक्रारदाराचे ओळखीचे श्री. संदीप यांनी त्यांना त्यांचे काम मुंबईला असल्याने त्यांना मुंबईला सोडण्यास सांगितले. दि. 01/11/10 रोजी तक्रारदार हे श्री. संदीप सोबत गाडी घेऊन मुंबईला गेले. दि. 02/11/10 रोजी सकाळी श्री. संदीप यांनी ते मुंबईत मंत्रालयाच्या शेजारी एल.आय.सी. बिल्डींग जवळ गाडी घेऊन उभे असताना श्री. संदीप यांनी तक्रारदारांकडे गाडीच्या चावीची मागणी केली म्हणून तक्रारदाराने ओळखीचा असल्याने श्री. संदीप यांना गाडीची चावी दिली. परंतु श्री. संदीप गाडी घेऊन गेल्यानंतर परत अलेले नसल्याने सदर वाहन चोरीला गेल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले व तक्रारदाराने दि. 03/11/10 रोजी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात संबंधित ईसम श्री. संदीप विरुध्द वाहन चोरीला गेल्याचा आरोप करुन प्रथम खबर (F.I.R.) नोंदविली. पोलिसांनी चौकशी करुनही त्यानंतर विमा संरक्षित वाहन मिळालेले नसल्याने तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 व 2 कडे गाडीची नुकसान भरपाई मिळणेबाबत दावा दाखल केला. परंतु सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दि. 05/03/11 रोजी विमा दावा गाडी ही भाडयाने वापरली असल्याने नाकारला. त्यामुळे तक्रारदाराने गाडीचा विमा दावा मिळणेकरीता, तसेच तक्रारीचा खर्च, शारिरिक व मानसिक त्रासापोटी मिळून रक्कम रु. 30,000/- मिळणेकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे.
3. तक्रारदारांनी नि. 4 वर गाडीचे टॅक्स इन्व्हॉईस, गाडीचे आर.सी. बुक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांचेकडे दिलेली पत्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारीची नोटीस सामनेवाले क्र. 1 व 2 यांना पाठविण्यात आली. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दि. 21/08/12 रोजी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दि. 05/09/14 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदाराने दि. 19/10/12 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी इनव्हेस्टीगेशन अहवालासोबत कागदपत्रे दाखल केली. तक्रारदाराने दि. 31/01/15 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केला. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी त्यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व पुरावा शपथपत्र हाच त्यांचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरशिस दिली.
4. तक्रारदारांची तक्रार, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब, पुरावा शपथपत्रे व तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या
तक्रारदाराचा वाहन चोरी विमा दावा नाकारुन सेवा सुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या
तक्रारदारांना नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ?
उत्तर - होय.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार यांची गाडी दि. 02/11/10 रोजी चोरीला गेल्यानंतर तक्रारदाराने लगेचच दि. 03/11/10 रोजी मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन तक्रार दाखल केली असून त्याचा प्रथम खबर क्र. 173/10 नुसार दाखल असून त्याची प्रत नि. 4/3 वर दाखल आहे. तसेच तक्रारदार यांनी दि. 04/11/10 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनाही गाडी चोरीला गेल्याबाबत कळविले आहे. सदर पत्र नि. 4/5 वर आहे. तक्रारदाराने दि. 03/11/10 रोजी पोलिस स्टेशनला दिलेला जबाब नि. 4/4 वर दाखल आहे. एकंदरीत वाहन चोरीला गेल्यानंतर तक्रारदाराने तात्काळ पोलिस स्टेशनला तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनाही कळविलेले आहे. तसेच सदर वाहन चोरीला गेल्याबाबत सामनेवाले क्र. 1 व 2 यांना दि. 04/011/10 रोजी कळविलेले आहे. सदर पत्र नि. 4/5 वर दाखल आहे. त्यानंतर तक्रारदाराने दि. 17/11/10 रोजी मोटर दावा प्रपत्र (Motor Claim Form) भरुन दिलेले आहे. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या इनव्हेस्टीगेशन अहवालाप्रमाणे सदर क्लेम फॉर्म असून त्यात कुठेही सदर वाहन तक्रारदार हे भाड्याने चालवित असल्याबाबत नमूद केलेले नाही. तसेच पोलिस स्टेशनच्या जबाबामध्येही तक्रारदाराने तसे नमूद केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने पूर्णपणे मुदतीत सर्व कागदपत्रे सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे क्लेम मिळणेकरीता पूर्ण करुन दिलेली आहेत. सदरचे वाहन चोरीला गेलेले आहे हे सामनेवाले क्र. 1 व 2 नाकारीत नाहीत. पोलिस स्टेशनने सदर प्रकरण “अ समरी” करणेकरीता व तपास काम बंद केल्याचे संबंधित न्यायालयाला कळविलेले आहे. त्याचा कागद नि. 4/9 वर दाखल आहे. सामनेवाले क्र. 1 व 2 हे तक्रारदारांचे वाहनाचा त्यावेळी विमा उतरविलेला होता ही बाब नाकारत नाहीत.
तक्रारदाराने दि. 04/11/10 रोजी सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे दिलेल्या अर्जात गाडी चोरीला गेली तेव्हा ते स्वतः गाडी चालवित होते असे नमूद केलेले आहे. असे असताना सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांचा क्लेम हा दि. 05/03/11 रोजी सदरचे वाहन हे जेव्हा चोरीला गेले तेव्हा तक्रारदार हे भाडयाने चालवित असल्याने नाकारलेला आहे. याकामी सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी इनव्हेस्टीगेटर नेमून प्रकरणाची चौकशी केली. इनव्हेस्टीगेटरच्या चौकशी नुसार तक्रारदाराने स्वतः जबाब दिलेला आहे की, तक्रारदार हे सदर वाहन भाडयाने वापरतात व स्वतःचा उदरनिर्वाह करतात. दि. 02/11/10 रोजी तक्रारदार कोलाडला गाडी भाडयासाठी घेऊन गेला असता त्यांना श्री. संदीप नांवाचा ईसम भेटला व त्याने रक्कम रु. 2,900/- भाडयाची रक्कम ठरवून गाडी भाडयाने ठरविली व ते दोघेही मुंबईला मंत्रालयात 9.00 वाजता पोहोचले. त्या रात्री ते गाडीत झोपले व दुस-या दिवशी तक्रारदाराने श्री. संदीप यांचेकडे भाडे मागितले व त्यासाठी ते बोरिवली येथे गेले व त्याठिकाणी चलाखीने श्री. संदीप यांनी तक्रारदारांकडे चावी मागितली व गाडी घेऊन तो तेथून पसार झाला. अशी हकीकत तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 व 2 कंपनीला सांगितली व तसा जबाब तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 व 2 कडे दिला असे सामनेवाले क्र. 1 व 2 यांचे म्हणणे आहे. परंतु सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, इनव्हेस्टीगेशनच्या अहवालासोबत असलेल्या कागदपत्रांच्या पान क्र. 35 वर जबाब दिसतो. परंतु तो जबाब तक्रारदारांचा आहे हे सिध्द होत नाही. त्या जबाबावर कोठेही तक्रारदाराची सही नाही. त्यातील अक्षर तक्रारदाराचेच आहे हेही सामनेवाले क्र. 1 व 2 यांचे म्हणणे नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी सदर जबाब ग्राह्य धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे या जबाबावरुन तक्रारदार हा घटनेच्या वेळी गाडी भाडे तत्वावर घेऊन गेलेला होता असे म्हणता येणार नाही. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी सदर इनव्हेस्टीगेशनच्या वेळी तक्रारदार हा भाडे तत्वावर गाडी चालवित होता हे शाबित करणेकरीता तक्रारदारांचा चुलत भाऊ श्री. संदेश धावटे यांचा जबाब घेतलेला आहे. सदर श्री. संदेश धावटे यांनी दिलेला जबाब किती तारखेला दिलेला आहे त्याची तारीख नमूद नाही व त्याखालील सही ही त्यांचीच आहे व तो जबाब त्यांचाच आहे हे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी पुराव्यानिशी शाबित करणे गरजेचे होते व त्याकरीता त्यांचे पुराव्याचे शपथपत्र सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल करणे आवश्यक होते त्यामुळे केवळ याच जबाबावर विसंबून तक्रारदार हा चोरीच्या वेळी वाहन भाड्याने चालवित होता असे म्हणणे योग्य होणार नाही. तसेच सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी इनव्हेस्टीगेशन अहवालाप्रमाणे Our Observations या सदरात लिहिताना त्यांनी कोलाड स्टँडला श्री. प्रफुल्ल धावटे, श्री. संदेश धावटे, श्री. अजय तेलंग, श्री. अनंत तेलंग व श्री. संदीप धावटे यांचेकडे चौकशी केली त्यावेळी त्यांनी तक्रारदार हे सदर वाहन भाड्याने चालवित होता असे सांगितले असे अहवालात नमूद केले आहे. परंतु त्यांचा जबाब इनव्हेस्टीगेशनच्या वेळी सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी घेतलेला नाही किंवा याकामी त्यांचे साथीदार म्हणून शपथपत्रही दिलेले नाही. त्यामुळे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी इनव्हेस्टीगेटर नेमून तक्रारदार हे त्यावेळी गाडी भाडेतत्वावर घेऊन गेले होते व त्यामुळे त्यांचा विमा दावा नाकारलेला आहे हे चुकीचे आहे. याकामी सामनेवाले क्र. 1 व 2 हे, चोरी झाली त्यावेळेस तक्रारदार हे भाडेतत्वावर गाडी चालवित होते हे शाबित करु शकलेले नाहीत. (त्यामुळे तक्रारदारांचा पूर्ण विमा दावा मंजूर करणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.) तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 व 2 सोबत केलेल्या वाहन विम्याच्या अटी व शर्तींचा भंग केलेला नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. याठिकाणी मा. सर्वोच्च न्यायालयाने अमलेंदू साहू विरुध्द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, मार्च (2010) (2) सीपीसी 374 (SC) या प्रकरणात दि. 23/03/10 रोजी पारीत केलेला निर्णय लागू होत नाही असे मंचाचे मत आहे. कारण तक्रारदार यांनी विमा अटी व शर्तींचा कोणताही भंग केलेला नाही. त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाने वर नमूद न्याय निर्णयात नमूद केल्याप्रमाणे विमा संरक्षण करतेवेळी 75% रक्कम सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी देणे योग्य नाही. याउलट, सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी विमा संरक्षित संपूर्ण रक्कम तक्रारदारांस द्यावी या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. विमा कंपनी यांनी रुटीन कोर्स मध्ये अशाप्रकारे रक्कम काहीतरी कारणे नमूद करुन विमा दावा नाकारणे हे योग्य नाही त्यामुळे तक्रारदार यांनी विमा पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केलेला नसताना केवळ कोणत्याही व्यक्तीचा जबाब घेऊन त्याची सत्यता न पडताळणी करता तक्रारदारांचा विमा दावा नाकारला असल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना विमा रक्कम नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात त्रुटी केलेली आहे तसेच याकामी तक्रारदारांनी सदर वाहन हे महिंद्रा फायनान्स यांचेकडून कर्ज काढून घेतलेले आहे. सदरचा कागद नि. 4/12 वर दाखल आहे. सदर वाहनाचा टॅक्स इनव्हॉईस तक्रारदाराने याकामी दाखल केला असून गाडीची किंमत ही रु. 5,56,641/- आहे. सदर टॅक्स इनव्हॉईस नि. 4/1 वर दाखल आहे. तक्रारदाराने सदर गाडी दि. 24/11/07 रोजी खरेदी केलेली आहे व घटनेच्या वेळी तक्रारदारांची गाडी ही रक्कम रु. 4,10,000/- एवढया रकमेकरीता विमा संरक्षित आहे. सदरची विमा पॉलिसी सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी इनव्हेस्टीगेशन अहवालासोबत पान नं. 28 वर दाखल केलेली आहे. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी सदर पॉलिसी ही दि. 07/1/10 रोजी नूतनीकरण केलेली दिसते व ती दि. 07/01/10 ते 07/01/11 पर्यंत वैध आहे. तक्रारदाराचे वाहनाची चोरी या मुदतीत झालेली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे विमा संरक्षित सर्व रक्कम सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना देणे योग्य असल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना संपूर्ण विमा दावा रक्कम रु. 4,10,000/- ही विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 05/03/11 पासून द.सा.द.शे. 9% व्याजदराने अदा करावी, तसेच विनाकारण तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचे आर्थिक, शारिरिक व मानसिक नुकसान केलेले आहे त्यामुळे सदरची नुकसानभरपाई सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावी असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1, 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते व खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
अंतिम आदेश
1. तक्रार क्रमांक 19/2012 मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांचा वाहन चोरी विमा प्रतिपूर्ती दावा नाकारुन सेवा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना वाहन चोरी विमा दाव रक्कम रु. 4,10,000/- (रु. चार लाख दहा हजार मात्र) ही रक्कम दि. 05/03/11 पासून (From the date of repudiation of claim) ते आदेशाची पूर्तता होईपर्यंत 9% व्याजदराने या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
4. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचे खर्चापोटी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून एकत्रित रक्कम रु. 30,000/- (रु. तीस हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
5. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 24/02/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.