जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 657/2010. तक्रार दाखल दिनांक : 02/12/2010. तक्रार आदेश दिनांक :28/04/2011. श्री. रणजितसिंह बाळासाहेब जहागिरदार, वय 67 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., रा. पिलीव सेक्शन ऑफीस, पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर. (नोटीस/समन्स ज्युनियर इंजिनियर श्री.ए.एस. खामगळ यांचेवर बजावण्यात यावी.) 2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., रा. मु.पो. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर. (नोटीस/समन्स डेप्युटी एक्झीक्युटिव्ह इंजिनियर श्री. एम.एल. जाधव यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एस.डी. नरुटे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विद्युत वितरण कंपनी’) यांच्याकडून घरगुती वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 338650182791 असा आहे. त्यांना जून 2010 मध्ये थकबाकीसह रु.9,270/- चे देयक देण्यात आले असून देयक भरणा करण्याचा अंतिम दि.31/7/2010 असताना दि.30/7/2010 रोजीच त्यांचा वीज पुरवठा खंडीत करुन मीटर काढण्यात आले. वीज पुरवठा खंडीत करण्यापूर्वी त्यांना पूर्व नोटीस देण्यात आली नाही आणि सदर कार्यवाही करताना त्यांच्याशी अरेरावी करण्यात आलेली आहे. दि.16/8/2010 रोजी त्यांच्या अनुपस्थितीत वीज पुरवठा पूर्ववत चालू केला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन मानसिक त्रास व बदनामी केल्याबद्दल रु.5,00,000/- व्याजसह मिळावेत आणि तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विद्युत वितरण कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी थकीत वीज बिले भरण्याबाबत मोहीम चालविली होती आणि गावोगावी स्पीकरद्वारे व वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन व लाईनमनद्वारे समक्ष भेटून थकबाकी भरण्याबाबत जाहीर आवाहन केले आहे. तक्रारदार यांच्याकडून जुलै 2010 पर्यंत वीज बील येणेबाकी होते. तक्रारदार यांनी बिलाप्रमाणे वेळोवेळी रक्कम भरणा केली नाही आणि विद्युत कायदा, 2003 मधील तरतुदीनुसार वीज पुरवठा खंडीत करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करणे भाग पडले असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेतल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांचे बील थकीत असल्याबद्दल विवाद नाही. विद्युत वितरण कंपनीने तक्रारदार यांचा वीज पुरवठा दि.30/7/2010 रोजी खंडीत केल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, वीज आकार देयक भरण्याचा अंतिम दिनांक 31/7/2010 असताना विद्युत वितरण कंपनीने दि.30/7/2010 रोजीच त्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याचे व तत्पूर्वी नोटीस दिली नसल्याचे तक्रारदार यांनी नमूद करुन त्यांना सहन कराव्या लागलेल्या मानसिक त्रास व बदनामीकरिता नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे. 5. विद्युत वितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी थकीत वीज बिले भरण्याबाबत मोहीम चालविली आणि गावोगावी स्पीकरद्वारे व वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन व लाईनमनद्वारे समक्ष भेटून थकबाकी भरण्याबाबत जाहीर आवाहन केलेले होते व आहे. तक्रारदार यांच्याकडून जुलै 2010 पर्यंत वीज बील येणेबाकी असून बिलाप्रमाणे वेळोवेळी रकमेचा भरणा केला नाही आणि विद्युत कायदा, 2003 मधील तरतुदीनुसार वीज पुरवठा खंडीत करण्याचा त्यांना अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 6. आमच्या मते, विद्युत वितरण कंपनीला वीज ग्राहकांकडून थकीत वीज देयक रक्कम वसूल करण्याचा निर्विवाद कायदेशीर हक्क आहे. परंतु विद्युत वितरण कंपनीने सदर थकीत रक्कम वसुलीची कार्यवाही कायद्याने प्रस्थापित तरतुदीनुसार करणे आवश्यक असते. तसेच वीज ग्राहकानेही वीज देयकाचा नियमीतपणे भरणा करण्याचे त्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. 7. निर्विवादपणे तक्रारदार हे वीज थकबाकीदार आहेत. कायदेशीर तरतुदीनुसार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करण्यापूर्वी लेखी नोटीस देणे क्रमप्राप्त होते व आहे. असे असताना, विद्युत वितरण कंपनीने तक्रारदार यांना कोणतीही लेखी नोटीस दिली नसल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार हे थकबाकीदार असले तरी आणि थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा विद्युत वितरण कंपनीस अधिकारी असला तरी वीज पुरवठा खंडीत करण्यापूर्वी त्यांना लेखी सूचित केले नसल्याचे सिध्द होते. सध्याच्या युगामध्ये ‘वीज’ हा विषय मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्युत वितरण कंपनीने तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. तक्रारदार हे वीज थकबाकीदार असल्यामुळेच वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही केली असल्यामुळे तक्रारदार यांनी मानसिक त्रासापोटी व बदनामीपोटी मागणी केलेली नुकसान भरपाई अवास्तव वाटते. योग्य विचाराअंती आम्ही तक्रारदार हे विद्युत वितरण कंपनीकडून रु.2,000/- नुकसान भरपाईसह तक्रार खर्च मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/28411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |