Maharashtra

Additional DCF, Pune

CC/10/195

Smt. Lata Ramchandra Gawande - Complainant(s)

Versus

1. Dr. Ravindra Gowind Choudhari - Opp.Party(s)

17 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/195
 
1. Smt. Lata Ramchandra Gawande
Bhosari Alandi Road, Shastri Chowk, Pune
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Dr. Ravindra Gowind Choudhari
Kunal Icon, A/8, 501 Pimple Saudagar, Pune Notice Served on Dhanwantari Hospital Jawalkar Nagar, Sanghawi, Pune
Pune
Maharashtra
2. 2. Dr. Swati Ravindra Choudhari
As above
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

उपस्थित     :     तक्रारदारांतर्फे       :     अॅड. श्री. पाटील 


 

                  जाबदारांतर्फे         :     अॅड. श्री. शिंदे            


 

*****************************************************************


 

द्वारा: मा. अध्‍यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत


 

 


 

// निकालपत्र //


 

 


 

(1)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार डॉक्‍टरांनी सदोष सेवा दिली तसेच वैद्दकीय निष्‍काळजीपणा केला म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे.   यरबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की तक्रारदारी श्रीमती लता गवांदे यांनी जाबदार क्र. 1 डॉ रविंद्र चौधरी व जाबदार क्र 2 स्‍वाती चौधरी यांनी धन्‍वंतरी हॉस्पिटलमध्‍ये आपल्‍या मुलीला बाळंतपणासाठी दिनांक 3/09/20008 रोजी अॅडमिट केले होते.   दिनांक 3/9/2008 रोजी अॅडमिट करण्‍यापूर्वी जाबदारांनी तक्रारदारांच्‍या मुलीचा वेळोवेळी उपचार केला होता तसेच दि 30/08/08 रोजी तिची सोनोग्राफी केली होती. सोनोग्राफी रिपोर्टप्रमाणे तक्रारदारांच्‍या मुलीची व गर्भांयशयातील बाळाची स्थिती समाधानकारक असल्‍याचे जाबदारांनी तक्रारदारांना सांगितले होते. दि 3/09/2008 रोजी सकाळी 11.00 चे दरम्‍यान तक्रारदारांनी त्‍यांचे मुलीला दवाखान्‍यामध्‍ये नेल्‍यानंतर जाबदार क्र. 2 यांनी येऊन तिची पाहणी केली व परिस्थिती समाधानकारक असल्‍याचे तक्रारदारांना सांगितले होते. यानंतर वेदना सुरु होण्‍यासाठी व गर्भाशयाच्‍या पिशवीचे तोंड उघडण्‍यासाठी 12.15 चे दरम्‍यान जाबदारांनी तक्रारदारांचे मुलीला पीटोसन इंजेक्‍शन दिले यानंतर तक्रारदारांच्‍या मुलीला कळा सुरु झाल्‍यामुळे तिला डिलीव्‍हरी रुममध्‍ये नेण्‍यात आले.    या नंतर साधारण 3 च्‍या दरम्‍यान गर्भाशयातील बाळाचे ठोके कमी झाल्‍याचे जाबदारांच्‍या लक्षात आले. सबब त्‍यांनी तक्रारदारांच्‍या मुलीला Deczhona & sodabicarb  ही दोन इंजेक्‍शन्‍स दिली. यामुळे बाळाच्‍या हृदयाच्‍या ठोक्‍याची स्थिती सुधारली. मात्र ही इंजेक्‍शन्‍स दिल्‍यानंतर साधारण 3.30 च्‍या दरम्‍यान बाळाने गर्भाशयामध्‍ये शी केल्‍याचे जाबदारांच्‍या लक्षात आले. म्‍हणून त्‍यांनी पुन्‍हा वर नमुद देान्‍ही इंजेक्‍शन्‍स तक्रारदारांच्‍या मुलीला दिली. मात्र तरीसुध्‍दा तक्रारदारांच्‍या मुलीची स्थिती नाजूक होऊ लागली.   शेवटी 4.00 च्‍या दरम्‍यान जाबदार क्र. 1 यांनी वर नमुद दोन्‍ही इंजेक्‍शन्‍स तक्रारदारांच्‍या मुलीला परत एकदा दिली व तिला अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट करण्‍याबाबत तक्रारदारांना सांगितले.   या नंतर तक्रारदार त्‍यांच्‍या मुलीला वाय्.सी.एम्. हॉस्पिटलमध्‍ये एकटे घेऊन जात असताना साधारण 4.10 चे दरम्‍यान दवाखान्‍यात पोहचण्‍यापूर्वी तक्रारदारांच्‍या मुलीचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. जाबदारांकडे बाळंतपणाची संपूर्ण सोय व सुविधा नसताना   त्‍यांनी आपल्‍या मुलीला बाळंतपणसाठी दाखल करुन घेतले व अगदी शेवटच्‍या क्षणी तिला अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये नण्‍यास भाग पाडून आपल्‍याला सदोष सेवा दिली अशी तक्रारदारांची तक्रार आहे. यानंतर तक्रारदारांच्‍या जावयाने पोलीस स्‍टेशनला जाबदारांच्‍या विरुध्‍द तक्रारअर्ज दाखल केला. वारंवार प्रयत्‍न करुन पोलीस स्‍टेशनकडून त्‍यांनी ससून हॉस्पिटलच्‍या तज्ञ समितीचा अहवाल मागवला असता डॉक्‍टरांच्‍या हलगर्जीपणामुळे आपल्‍या मुलीचा मृत्‍यू झाला ही बाब तक्रारदारांच्‍या लक्षात आली. सबब नुकसानभरपाई म्‍हणून जाबदाराकडून रक्‍कम रु पाच लाख मात्र मिळावे या मागणीसह तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे.   तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पृष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 5 अन्‍वये एकूण 14 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.



 

(2)          प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्‍या नेाटीसीची बजावणी झाल्‍यानंतर विधिज्ञांमार्फत त्‍यांनी आपले म्‍हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये जाबदारांनी तक्रारदारांच्‍रूा सर्व तक्रारी नाकारलेल्‍या असून सदरहू तक्रारअर्जास मुदतीचा बाध येतो असा आक्षेप उपस्थित केला आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मुलीला आपल्‍या दवाखान्‍यामध्‍ये आणले तेव्‍हाच बाळाची स्थिती चांगली नाही व नैसर्गिकरित्‍या बाळंतपण होणे अवघड आहे असे आपण तक्रारदारांना सांगितले होते,   मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सिझेरियन करुन घेणे शक्‍य नसल्‍यामुळे नैसर्गिक बाळंतपण करण्‍यासाठी तक्रारदारांनी आग्रह धरला असे जाबदारांचे म्‍हणणे आहे.    बाळाने पेाटामध्‍ये शी केल्‍याचे लक्षात आल्‍यावर आपण तक्रारदारांच्‍या मुलीला Deczhona & sodabicarb      ही दोन इंजेक्‍शन्‍स दिली. मात्र त्‍यांच्‍या मुलीकडून नैसर्गिक बाळंपणासाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे जाबदारांचे म्‍हणणे आहे.   रुग्‍णाच्‍या नातेवाईकांना ऑपरेशन थिएटरमध्‍ये येऊन रुग्‍णावर सुरु असलेले उपचार बघण्‍याची परवानगी देण्‍यात आली होती व तेव्‍हाच रुग्‍णाने नैसर्गिक बाळंतपणासाठी प्रतिसाद न दिल्‍यास व सहकार्य न केल्‍यास बाळाच्‍या जिवीतास धोका संभवतो अशी कल्‍पना त्‍यांना देण्‍यात आली होती असे जाबदारांचे म्‍हणणे आहे.   तक्रारदारांच्‍या मुलीच्‍या गर्भाशयामध्‍ये बाळाने शी केल्‍यामुळे त्‍यांना आपण अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये रुग्‍णाला हलवण्‍यास सांगितले असे जाबदारांचे म्‍हणणे आहे. तक्रारदारांच्‍या मुलीचे बाळंतपण नैसर्गिकरित्‍या होईल असे वाटल्‍यामुळे आपण त्‍यांना अॅडमिट करुन घेतले मात्र बाळाने शी केल्‍यामुळे ही बाब शक्‍य नाही असे लक्षात आल्‍यावर आपण त्‍यांना अन्‍यत्र हलवण्‍यास सांगितले म्‍हणजे सदोष सेवा दिली अथवा वैद्दकीय हलगर्जीपणा दाखविला ही तक्रारदारांची तक्रार संपूर्णत: खोटी व चुकीची ठरते असे जाबदारांचे म्‍हणणे आहे. आपण अनेक बाळंतपणाच्‍या केसेस समर्थपणे पूर्णत्‍वास नेलेल्‍या असून केवळ आपल्‍याकडून अन्‍य मार्गाने पैसे मिळवणे शक्‍य न झाल्‍याने तक्रारदारांनी दबाव तंत्र म्‍हणून सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे असे जाबदारांचे म्‍हणणे आहे. वैद्दकीय निष्‍काळजीपणा सकारात्‍मकरित्‍या सिध्‍द होणेसाठी ज्‍या प्रकारचा हलगर्जीपणा आवश्‍यक आहे तो आपल्‍याकडून घडलेला नसल्‍यामुळे सदरहू तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी जाबदारांनी विनंती केली आहे.   ससून हॉस्पिटलच्‍या तज्ञ समितीने सुध्‍दा आपल्‍याकडून हलगर्जीपणा झालेला नाही असा अभिप्राय दिलेला असल्‍यामुळे तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर होण्‍यास पात्र ठरतो असे जाबदारांचे म्‍हणणे आहे. जाबदारांनी आपले म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 30 अन्‍वये एकूण 9 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत. 


 

 


 

(3)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांचे म्‍हणणे दाखल झालेनंतर तक्रारदारांनी निशाणी 31 व 32 अन्‍वये आपले पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 34 अन्‍वये आपला लेखी युक्तिवाद तसेच जाबदारांनी निशाणी 35 अन्‍वये आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला. तसेच तक्रारदारांनी निशाणी 36 अन्‍वये एकूण तीन ऑथॉ‍रिटीज मंचापुढे दाखल केल्‍या व यानंतर तक्रारदारांतर्फे अॅड. श्री. पाटील व जाबदारांतर्फे अॅड. श्री. शिंदे यांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्‍यात आले.


 

 


 

(4)         प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, म्‍हणणे, दाखल पुरावे, व उभय पक्षकारांचा युक्तिवाद यांचे साकल्‍याने अवलोकन केले असता पुढील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ उपस्थित होतात याचे मुद्दे व त्‍यांची उत्‍तरे पुढील प्रमाणे :



 

            मुद्दे                                             उत्‍तरे


 

 


 


  1. सदरहू तक्रारअर्ज मुदतबाहय ठरतो का ?               ...     नाही



 

2. जाबदारांनी वैद्दकीय निष्‍काळजीपणा केला  


 

      तसेच तक्रारदारांना सदोष सेवा दिली ही बाब


 

     सिध्‍द होते का ?                                   ...     होय



 

3. तक्रारअर्ज मंजूर होण्‍यास पात्र ठरतो का ?               ...     होय


 

                    


 

4. काय आदेश ?                              ...   अंतिम आदेशाप्रमाणे


 

                                                                      


 

 


 

 विवेचन:



 

मुद्दा क्र. 1:   (i) प्रस्‍तुत प्रकणातील तक्रारदारांच्‍या मुलीचा मृत्‍यू दि 3/9/2008 रोजी झालेला असताना दि 31/12/2010 रेाजी दोन वर्षांच्‍या कालावधीनंतर त्‍यांनी दाखल केलेला हा अर्ज मुदतबाहय असल्‍याने नामंजूर होण्‍यास पात्र ठरतो असा जाबदारांचा आक्षेप आहे. जाबदारांच्‍या या आक्षेपाच्‍या अनुषंगे या संदर्भातील तक्रारदारांच्‍या निवेदनाचे अवलोकन केले असता ससूनच्‍या तज्ञ समितीने दिलेल्‍या अहवालाची प्रत आपल्‍याला डिसेबर 2010 मध्‍ये मिळाल्‍यामुळे आपण त्‍यानंतर दाखल केलेला हा अर्ज मुदतबाहय ठरत नाही असे त्‍यांनी नमुद केलेले आढळते. उभयपक्षकारांच्‍या या परस्‍पर विरोधी निवेदनाच्‍या अनुषंगे सदरहू तक्रारअर्ज मुदत बाहय आहे अथवा नाही या बाबत मंचाचे विवेचन पुढील प्रमाणे :


 

 


 

       (ii) तक्रारदारांच्‍या मुलीचा मृत्‍यू निर्विवादपणे दि 3/9/2008 रेाजी झालेला आहे.   हा मृत्‍यू झाल्‍यानंतर तक्रारदारांच्‍या जावयाने व मुलाने विविध स्‍तरावर अर्ज करुन तज्ञ समितीचा अहवाल मिळावा अशी मागणी केलेली आढळते. शेवटी माहितीच्‍या अधिकाराखाली अर्ज केल्‍यानंतर दि 18/12/2010 रेाजी त्‍यांना तज्ञ समितीचा अहवाल देण्‍यात आला. दि 4/8/2010 रेाजीच्‍या या तज्ञ समितीच्‍या अहवालावर विसंबून तक्रारदारांनी हा अर्ज दि. 31/12/2010 रोजी दाखल केलेला आहे याचा विचार करीता सदरहू अर्जास मुदतीचा बाध येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. तज्ञ समितीचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारदारांनी तातडीने हा अर्ज दाखल केलेला आहे या वस्‍तुस्थितीचा विचार करीता सदरहू तक्रार अर्जास मुदतीचा बाध येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब त्‍याप्रमाणे मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे. 


 

 


 

 


 

मुद्दा क्र. 2:   (i) प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदारांचा तक्रारअर्ज व जाबदारांचे म्‍हणणे यांचे एकत्रित अवलोकन केले असता   तक्रारदारांच्‍या मुलीला जाबदारांनी आपल्‍या दवाखान्‍यामध्‍ये बाळांतपणासाठी सकाळी 11.00 वाजता दवाखान्‍यामध्‍ये अॅडमिट करुन घेतले होते. दु 3.00 वाजेपर्यंत त्‍यांनी तिच्‍यावरती औषधोपचार केला व त्‍यानंतर साधारण 4.00 च्‍या दरम्‍यान त्‍यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या मुलीला अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये हलवण्‍यास सांगितले ही या प्रकरणातील उभय पक्षकारांना मान्‍य असलेली वस्‍तुस्थिती आहे ही बाब लक्षात येते. अशा प्रकारे सर्व सुविधा उपलब्‍ध नसताना तक्रारदारांच्‍या मुलीला अॅडमिट करुन घेऊन ऐनवेळी तिला अन्‍यत्र घेऊन जाण्‍यास जाबदारांनी सांगितले व आपल्‍याला सदोष सेवा दिली तसेच हा वैद्यकीय निष्‍काळजीपणा ठरतो अशी तक्रारदारांची तक्रार आहे तर तक्रारदारांनी नैसर्गिक बाळंतपणासाठी आग्रह धरल्‍यामुळे आपण थोडया कालावधीकरिता प्रयत्‍न केले, मात्र बाळाने पोटात शी केल्‍यावर नैसर्गिकरित्‍या बाळंतपण शक्‍य नाही असे लक्षात आल्‍यावर आपण   त्‍यांना अन्‍यत्र घेऊन जाण्‍यास सांगितले यामध्‍ये आपला दोष नाही असे जाबदारांचे म्‍हणणे आहे. दाखल पुराव्‍याच्‍या आधारे तक्रारदारांची तक्रार योग्‍य आहे अथवा जाबदारांची भूमिका या बाबत मंचाचे विवेचन पुढीलप्रमाणे :


 

           


 

    (ii)    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार हे बी.ए.एम्.एस्. डॉक्‍टर असून त्‍यांचे धन्‍वंतरी नावाचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्‍ये यशस्‍वीरित्‍या झालेल्‍या बाळंतपणाचा तपशिल त्‍यांनी निशाणी 30/6 अन्‍वये मंचापुढे दाखल केला आहे. तसेच त्‍यांच्‍या दवाखान्‍यामध्‍ये त्‍यांनी विकत घेतलेल्‍या विविध उपकरणांच्‍या पावत्‍या त्‍यांनी निशाणी 30/7 ते निशाणी 30/9 अन्‍वये मंचापुढे दाखल केल्‍या आहेत. जाबदारांच्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्‍या मुलीला त्‍यांनी जेव्‍हा जाबदारांच्‍या दवाखान्‍यामध्‍ये आणले तेव्‍हाच बाळाची स्थिती सुयोग्‍य नसून नैसर्गिकरित्‍या बाळंतपण करणे शक्‍य होणार नाही असे त्‍यांच्‍या लक्षात आले होते व त्‍यांनी याची स्‍पष्‍ट कल्‍पना तक्रारदारांना दिलेली होती असे त्‍यांनी म्‍हणण्‍याच्‍या परिच्‍छेद क्र 13 मध्‍ये नमुद केलेले आढळते. याच परि‍च्‍छेदामध्‍ये आर्थिक अडचणीमुळे आपण शस्‍त्रक्रिया करुन घेण्‍यास असमर्थ आहोत तरी नैसर्गिकरित्‍या बाळंतपण करण्‍यासाठी प्रयत्‍न करावा असे तक्रारदारांनी सांगितले असेही त्‍यांनी नमुद केलेले आढळते. जाबदारांच्‍या या बचावाच्‍या मुद्दांच्‍या अनुषंगे दोन बाबीची नोंद घेण्‍याजोग्‍या आहेत एक म्‍हणजे तक्रारदारांनी जेव्‍हा त्‍यांच्‍या मुलीला दवाखान्‍यामध्‍ये आणले तेव्‍हा वैद्यकीय सल्‍ल्‍याच्‍या विरुध्‍द तक्रारदारांनी नैसर्गिक बाळंतपणासाठी आग्रह धरला असे जाबदारांचे म्‍हणणे आहे. मात्र अशा आशयाचा उल्‍लेख असलेला कोणताही केस पेपर अथवा अन्‍य तत्‍सम पुरावा जाबदारांनी दाखल केलेला आढळून येत नाही बाळाची स्थिती योग्‍य नसल्‍यामुळे शस्‍त्रक्रिया करणे आवश्‍यक आहे असा वैद्यकीय सल्‍ला दिलेला असताना जर तक्रारदारांनी नैसर्गिक बाळंतपणासाठी आग्रह धरला असेल तर एक डॉक्‍टर म्‍हणून भविष्‍यामध्‍ये याचे काय परिणाम होतील याची संपूर्ण कल्पना जाबदारांना असणे आवश्‍यक होते. मात्र वैद्यकिय सल्‍ल्‍याच्‍या विरुध्‍द तक्रारदारांनी वर्तणूक करुन सुध्‍दा जाबदारांनी अशा आशयाच्‍या कोणत्‍याही मजकूरावर तक्रारदार अथवा त्‍यांच्‍या जावयाच्‍या अथवा अन्‍य नातेवाइकांच्‍या सहया घेतलेल्‍या आढळून येत नाही. अशाप्रकारे आपण सहया घेतल्‍या असेही त्‍यांचे म्‍हणणे नाही.   दुसरी महत्‍वाची नोंद घेण्‍याजोगी व प्रकरणाच्‍या मुळाशी जाणारी बाब म्‍हणजे तक्रारदारांच्‍या जावयाने जाबदारांविरुध्‍द पोलीसांकडे तक्रार केल्‍यानंतर जाबदार क्र. 1 डॉ. रविंद्र चौधरी यांचा जबाब पोलीसांनी नोंदविलेला आढळून येतो. हा जबाब तक्रारदारांनी निशाणी 8 अन्‍वये मंचापुढे दाखल केला आहे.   हया जबाबाचे अवलोकन केले असता तक्रारदार जेव्‍हा त्‍यांच्‍या मुलीला जाबदारांच्‍या दवाखान्‍यामध्‍ये अॅडमिट करण्‍यासाठी आल्‍या तेव्‍हा रुग्‍णाचे बी.पी. व बाळाचे ठोके नॉर्मल होते व तिला डिलीव्‍हरीसाठी येणा-या कळा व्‍यवस्थित होत्‍या असे त्‍यांनी त्‍यामध्‍ये नमुद केलेले आढळते. चेकअप केल्‍यानंतर तिची कंडीशन नॉर्मल होती असेही त्‍यांनी नमुद केलेले आढळते.   जाबदार क्र. 1 यांचा पोलीसां समोरील जबाब व त्‍यांनी मंचापुढील म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेली भूमिका यामध्‍ये संपूर्णत: तफावत असून ते परस्‍पर विरोधी आहेत ही बाब लक्षात येते.   अर्थातच जाबदारांनी म्‍हण्‍यामध्‍ये घेतलेली भूमिका ही पश्‍चातबुध्‍दी असून केवळ आपली जबाबदारी नाकारण्‍याच्‍या हेतूने त्‍यांनी घेतली आहे ही बाब त्‍यांनी पोलीसांसमोर दिलेल्‍या जबाबा वरुन सिध्‍द होते. 


 

 


 

(iii)       प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदारांच्‍या मुलीला सकाळी 11.00 वाजता बाळंतपणासाठी दाखल करुन घेतल्‍यानंतर साधारण 4.00 वाजेपर्यंत जाबदारांनी तिच्‍यावर विविध उपचार केले ही या प्रकरणातील वस्‍तुस्थिती आहे. जाबदारांच्‍या दवाखान्‍यातून तक्रारदारांच्‍या मुलीला अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये नेत असताना वाटेतच तिचा मृत्‍यू झाला यावरुन तक्रारदारांच्‍या मुलीची अवस्‍था अत्‍यंत गंभीर होईपर्यंत जाबदारांनी तिच्‍यावरती उपचार केला व नंतर प्रकरण हाताबाहेर गेल्‍यानंतर तक्रारदारांच्‍या मुलीला त्‍यांनी अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यास सांगितले. तक्रारदारांच्‍या मुलीला अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍याइतपत अवधी सुध्‍दा जाबदारांनी तक्रारदारांना मिळू दिला नाही जर योग्‍य मुदतीमध्‍ये तक्रारदारांच्‍या मुलीचे प्रकरण जाबदारांनी अन्‍य हॉस्पिटलकडे वर्ग केले असते तर तक्रारदारांच्‍या मुलीचा जीव कदाचित वाचू शकला असता. तसेच एकदा बाळंतपणाची केस अॅडमिट करुन घेतल्‍यानंतर अशी काही जर गुंतागुंत निर्माण झाली तर ती गुंतागुंत जाबदारांच्‍याच दवाखान्‍यामध्‍ये दूर करण्‍याची उपाययोजना त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध असणे आवश्‍यक होते. जाबदार बी.ए.एम्.एस्. डॉक्‍टर असल्‍यामुळे त्‍यांना बाळंतपण करण्‍याची जरी परवानगी देण्‍यात आली असली तरी फक्‍त नैसर्गिक डिलीव्‍हरी अथवा सिझेरियन करण्‍यापर्यंत आपली जबाबदारी मर्यादीत आहे व गुतांगूंत झाली तर आपण अन्‍य दवाखान्‍याकडे वर्ग करु ही जाबदाराची भूमिका एक डॉक्‍टर म्‍हणून असमर्थनीय ठरते असे मंचाचे मत आहे.


 

 


 

(iv)       जाबदारांचे म्‍हणणे पाहिले असता बाळाने पोटात शी केल्‍यामुळे रुग्‍णाला अन्‍यत्र हलवणे भाग पडले असे त्‍यांनी नमुद केल्‍याचे आढळते. मात्र बाळंतपणाच्‍या प्रक्रियेमध्‍ये बाळाने पोटात शी केल्‍यानंतर सिझेरीयन करुन बाळंतपण करण्‍याचा प्रयत्‍न का केला नाही? याचे स्‍पष्‍टीकरण जाबदारांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये आढळत नाही. बाळाने पोटात शी केल्‍यावर सिझेरीयन करणे शक्‍य नसते असेही त्‍यांचे म्‍हणणे नाही. तक्रारदारांच्‍या मुलीला बाळंतपणासाठी दाखल करुन घेताना आवश्‍यकता भासल्‍यास सिझेरीयन करण्‍यासाठी आवश्‍यक तज्ञ डॉक्‍टर्स व सर्व सुविधा आपण उपलब्‍ध ठेवल्‍या होत्‍या. मात्र तक्रारदारांच्‍या मुलीच्‍या बाबतीत इतकी पराकोटीची गुंतागुंत अचानक निर्माण झाली की तज्ञ डॉक्‍टर्स उपस्थित असतानाही रुग्‍णावर पुढील उपचार करणे शक्‍य झाले नाही व त्‍यामुळे अशा पराकोटीची गुंतागुंत हाताळू शकतील अशा ठिकाणी तिला पाठविणे भाग पडले असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे नाही. बाळाने पोटात शी केल्‍यावर दोन इंजेक्‍शन्‍स दिल्‍या पलिकडे जाबदारांनी अन्‍य काही प्रयत्‍न केल्‍याचा तपशिल त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये आढळत नाही. 


 

 


 

(v)        तज्ञ समितीच्‍या अहवालाचे अवलोकन केले असता त्‍यांनी सुध्‍दा तथापी सदर प्रकारची केस दवाखान्‍यामध्‍ये पुर्णपणे बाळंतपणाची सोय नसतांना दाखल करुन घेणे चुकीचे वाटते. डॉ. रविंद्र चौधरी व डॉ. स्‍वाती चौधरी हे बी.ए.एम.एस. डॉक्‍टर असून त्‍यांचेकडे विशेष स्‍त्रीरोग व प्रसुतीशास्‍त्र विषयाची मास्‍टर पदवी नसतांना अशा गुंतागुंतीच्‍या केसेस भरती करुन घेणे तज्ञ समितीस योग्‍य वाटत नाही. सदर इमरजन्‍सी रुग्‍णास वाय.सी.एम. हॉस्‍पीटलमध्‍ये पाठविताना रुग्‍णासोबत संबंधीत डॉक्‍टर किंवा रुग्‍णालयातील इतर स्‍टाफ रुग्‍णाबरोबर गेलेला दिसून येत नाही. असा अभिप्राय नोंदविलेला आढळतो. बाळंतपणाची येणारी केस फक्‍त नैसर्गिकरित्‍या अथवा सिझेरियन या दोन पध्‍दतीने झाली तरच आपण हाताळू व अन्‍य गुंतागूतीसाठी आपण जबाबदार राहणार नाही अशी भूमिका जाबदारांना घेता येणार नाही असे मंचाचे मत आहे.   एखादया रुग्‍णामध्‍ये गुंतागुंत झाल्‍यास ती गुतागुंत योग्‍य मुदतीत (well in advance) त्‍यांच्‍या लक्षात येणे व त्‍या गूंतागूंतीवर उपाययोजना करण्‍याचे प्रयत्‍न करणे ही जाबदारांची एक डॉक्‍टर म्‍हणून जबाबदारी ठरते. बाळंतपणासारख्‍या प्रकरणामध्‍ये जिथे गर्भाशयाची पिशवी उघडयासाठी रुग्‍णाला इंजेक्‍शन देण्‍यात आले होते व त्‍याप्रमाणे त्‍यांनी पिशवीचे तोंड मोठे होऊन कळा सुरु झाल्‍यानंतर संपूर्णपणे तिच्‍या नातेवाईकांवर तिला सोपवून अन्‍य दवाखान्‍यामध्‍ये तिला पाठवून देण्‍याची जाबदारांची कृती वैद्दकीय निष्‍काळजीपणा ठरते तसेच त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी उत्‍पन्‍न करते असा मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे. 


 

 


 

(vi)          डॉक्‍टरांचा वैद्यकीय निष्‍काळजीपणा कोणत्‍या प्रकारच्‍या प्रकरणांमध्‍ये सिध्‍द होऊ शकतो व डॉक्‍टरांकडून नेमक्‍या कोणत्‍या प्रकारच्‍या व कोणत्‍या दर्जाच्‍या उपचार पध्‍दतीची अपेक्षा असते याचा सविस्‍तर उहापोह जाबदारांनी म्‍हणण्‍यामध्‍ये केलेला आढळतो. मात्र या प्रकरणातील वस्‍तुस्थितीचे अवलोकन केले असता जाबदारांनी स्‍वत:च्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये डॉक्‍टरांनी ज्‍या पध्‍दतीने जबाबदारी पार पाडणे आवश्‍यक आहे असे नमुद केले आहे त्‍याच्‍याविरुध्‍द जाबदारांची स्‍वत:ची वर्तणूक असल्‍याचे सिध्‍द होते.


 

 


 

(vii) तक्रारदारांच्‍या मुलीला एकदा बाळंतपणासाठी अॅडमिट करुन घेतल्‍यानंतर आवश्‍यकता पडल्‍यास सिझेरीयनची व्‍यवस्‍था उपलब्‍ध असणे आवश्‍यक होते. बाळाने पोटात शी केल्‍यावर ही परिस्थिती सिझेरीयन करुनसुध्‍दा आटोक्‍यामध्‍ये आणणे शक्‍य नव्‍हते असे जाबदारांचे म्‍हणणे नाही. सिझेरीयनसाठी प्रयत्‍न न करता तक्रारदारांच्‍या मुलीला अन्‍यत्र का पाठवून दिले याचे कोणतेही समाधानकारक स्‍पष्‍टीकरण जाबदारांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये आढळत नाही. तक्रारदारांच्‍या मुलीला त्‍यांनी जी दोन इंजेक्‍शन्‍स दिली अथवा पिटोसीनचे इंजेक्‍शन दिले त्‍यासंदर्भात वैद्यकीय निष्‍काळजीपण झाला नाही असे जरी तज्ञ समितीने नमुद केले असले तरीही वर नमुद सर्व वस्‍तुस्थितीच्‍या आधारे जाबदारांची त्रुटीयुक्‍त सेवा व वैद्यकीय निष्‍काळजीपणा स्‍पष्‍टपणे सिध्‍द होतो असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. किंबहुना इंजेक्‍शन देण्‍याच्‍या उपचारामध्‍ये जाबदारांकडून काही चुक झाली अशी तक्रारदारांचीही तक्रार नाही. अशापरिस्थितीत केवळ तज्ञ समितीने वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाला नाही असे मत नोंदविले म्‍हणून तक्रारदारांचा अर्ज नामंजूर करणे अयोग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे. विशेषत: तज्ञ समितीच्‍या अहवालामध्‍ये जाबदारांनी ज्‍या पध्‍दतीने हे प्रकरण हाताळले त्‍याबाबत गंभीर आक्षेप उपस्थित केलेले असताना व ही वस्‍तुस्थिती सिध्‍द होत असताना असे करणे अयोग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे.



 

(viii)                  तक्रारदारांच्‍या मुलीच्‍या पोटात बाळाने शी केल्‍यावर उद्भवलेली परिस्थिती हाताळण्‍यासाठी जाबदारांनी तज्ञ डॉक्‍टरांना बोलावले नव्‍हते. उलट गर्भाशयाच्‍या पिशवीचे तोंड उघडलेले असताना व बाळाने पोटात शी केल्‍यानंतर त्‍याच अवस्‍थेमध्‍ये जाबदारांनी तक्रारदारांच्‍या मुलीला कोणत्‍याही वैद्यकीय सहाय्याशिवाय नातेवाईकांच्‍या जबाबदारीवर अन्‍यत्र पाठवून दिले. जाबदारांची ही कृती अत्‍यंत चुकीची व सर्व परिस्‍थि‍तीमध्‍ये असमर्थनीय ठरते.


 

  


 

(ix)                   एकूणच या प्रकरणातील सर्व वस्‍तुस्थितीचे एकत्रित अवलोकन केले असता जाबदारांनी वैद्दकीय निष्‍काळजीपणा केला व तक्रारदारांना सदोष सेवा दिली ही बाब सिध्‍द होते सबब त्‍याप्रमाणे मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍ण्‍यात आले आहे


 

 


 

मुद्दा क्र. 3 :- प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांनी वैद्यकीय निष्‍काळजीणा केला व त्रुटीयुक्‍त सेवा दिली व त्‍यामुळे आपल्‍या मुलीचा मृत्‍यू झाला याचा विचार करीता आपल्‍याला रक्‍कम रु.5,00,000/-मात्र नुकसानभरपाई म्‍हणून देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. जाबदारांनी वैद्यकीय निष्‍काळजीपणा सेवा दिली व त्रुटीयुक्‍त सेवा दिली असा निष्‍कर्ष मंचाने मुद्दा क्र. 2 मध्‍ये काढला आहे. तक्रारदारांच्‍या मुलीचा मृत्‍यू झाल्‍यामुळे तक्रारदार निश्चितपणे नुकसानभरपाई मिळण्‍यास पात्र ठरतात असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाल्‍यास डॉक्‍टरांच्‍या विरुध्‍द नुकसानभरपाईचा आदेश करताना वाहन अपघात प्राधिकरणाकडे ज्‍या पध्‍दतीने नुकसानभरपाईची रक्‍कम ठरविली जाते त्‍यापध्‍दतीनेच वैद्यकीय निष्‍काळजीपणाच्‍या प्रकरणामध्‍ये नुकसानभरपाईची रक्‍कम ठ‍रविणे योग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे. ही नुकसानभरपाईची रक्‍कम कशापध्‍दतीने ठरविली जावी याचा सविस्‍तर उहापोह सन्‍मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Sarla Varma & Others V/s. Delhi Transport Corporation & Another  (संदर्भ 2009 (2) TAL 1077 S.C.) या प्रकरणामध्‍ये काढलेला आढळतो. तक्रारदारांच्‍या मुलीचे वय 25 होते व ती नोकरी करत नव्‍हती ही या प्रकरणातील वस्‍तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत तिचे महिना उत्‍पन्‍न रु.3,000/- गृहीत धरुन येणा-या वार्षिक उत्‍पन्‍नातून म्‍हणजे 12 x  3000 = रु.36,000/- मधून 1/3 ही जीवनाश्‍यक गरजा भागविण्‍यासाठी गृहीत धरुन रु.36,000/- - रु.12,000/- रु.24,000/- या रकमेस 18 चा मल्‍टीप्‍लायर लावणे योग्‍य ठरते. म्‍हणजेच


 

      दरमहा उत्‍पन्‍न रु. 3,000 x  12        =     रु.36,000/- वार्षिक उत्‍पन्‍न


 

      वार्षिक उत्‍पन्‍न रु.36,000/- -:- 1/3         जीवनावश्‍यक खर्च      = रु.12,000/-


 

 


 

      वार्षिक उत्‍पन्‍न रु.36,000/- -- जीवनावश्‍यक खर्च रु.12,000/- = रु.24,000/-                                        कुटुंबाकरिता


 

 


 

      कुटुंबासाठी रु.24,000/- x  18 Multiplier = रक्‍कम रु.4,32,000/- देय रक्‍कम  


 

     


 

सबब वर नमुद केलेप्रमाणे रु.4,32,000/- ही रक्‍कम तक्रारदार नुकसानभरपाई म्‍हणून मिळणेस पात्र ठरतात असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. वर नमुद सर्व हिशेबासाठी मंचाने वर नमुद सन्‍मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या ऑथॉरिटीचा आधार घेतला आहे. तक्रारदारांच्‍या मुलीचा मृत्‍यू दि. 3/9/2008 रोजी झाला याचा विचार करीता वर नमुद नुकसानभरपाईची रक्‍कम दि. 3/9/2008 पासून 12% व्‍याजासह अदा करण्‍याचे जाबदारांना निर्देश देणे योग्‍य व न्‍याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्‍याप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत. तसेच सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.3,000/- मात्र तक्रारदारांना   मंजूर करण्‍यात येत आहेत.


 

 


 

            वर नमुद सर्व विवेचनावरुन तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर होण्‍यास पात्र ठरतो ही बाब सिध्‍द ठरतो. सबब त्‍याप्रमाणे मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे. 


 

 


 

मुद्दा क्र. 4 :- प्रस्‍तुत प्रकरणात अंतिम आदेश करण्‍यापूर्वी एका बाबीचा उल्‍लेख करणे मंचास आवश्‍यक वाटते. प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये तक्रारदारांच्‍या मुलीचा मृत्‍यू झालेला असून तिचे लग्‍न झालेले आहे याचा विचार करीता तिचे पती आवश्‍यक पक्षकार ठरतात असे मंचाचे मत झाले. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या मयत मुलीच्‍या पतीला याकामी पक्षकार म्‍हणून सामिल करण्‍याचे तक्रारदारांना निर्देश देण्‍यात आले होते. मात्र तक्रारदारांच्‍या जावयाने त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या मृत्‍यूनंतर दुसरे लग्‍न केलेले असल्‍याने त्‍यांना या प्रकणामध्‍ये तक्रारदार म्‍हणून सामिल करणे शक्‍य नाही, सबब त्‍यांना जाबदार म्‍हणून सामिल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी असा अर्ज तक्रारदारांनी निशाणी 38 अन्‍वये मंचापुढे दाखल केला होता. मात्र ग्राहक संरक्षण कायद्दाला अपेक्षित असलेले करारात्‍मक संबंध तक्रारदार व त्‍यांच्‍या जावयामध्‍ये प्रस्‍थापित होत नाहीत याचा विचार करुन तक्रारदारांचा हा अर्ज नामंजूर करुन प्रकरण आहे त्‍या परिस्थितीमध्‍ये सुनावणीसाठी ठेवण्‍यात आले.


 

 


 

 


 

            वर नमुद सर्व निष्‍कर्ष व विवेचनाच्‍या आधारे प्रस्‍तुत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.


 

 


 

सबब मंचाचा आदेश की,



 

// आदेश //



 

 


 

      1.    तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.



 

2.    यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.4,32,000/- (रक्‍कम रु. चार लाख बत्‍तीस हजार) मात्र दि. 3/9/2008


 

      पासून संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत


 

     12% व्‍याजासह अदा करावेत. 


 

 


 

3.   यातील जाबदारांनी तक्रारदारांना सदरहू


 

     तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम  


 

     रु.3,000/- मात्र अदा करावेत.



 

 


 

      4. वर   नमूद      आदेशांची    अंमलबजावणी  


 

         जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून  


 

         तीस दिवसांचे आत   न  केलेस   तक्रारदार   


 

         त्‍यांचेविरुध्‍द  ग्राहक  संरक्षण  कायद्याच्‍या


 

         तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.


 

 


 

5.       निकालपत्राच्‍या प्रती सर्व पक्षकारांना


 

      नि:शुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.


 

 
 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.