जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 529/2010. तक्रार दाखल दिनांक : 03/09/2010. तक्रार आदेश दिनांक : 10/05/2011. श्री. गंगाधर शिवाजी माने, वय 38 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. मे. वरदायनी फायनान्स अन्ड इन्व्हेस्टमेंट कार्पोरेशन (रजि.), पंढरपूर या नांवाची भागीदारी संस्था असून तिचे मुख्य कार्यालय नवी पेठ, पंढरपूर येथे आहे. याची नोटीस भागीदार :- श्री. धनंजय पांडुरंग पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. वरीलप्रमाणे. 2. श्री. धनंजय पांडुरंग पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. 1543/1, न्यू अकबर टॉकीजचे पाठीमागे, पंढरपूर. 3. श्री दिगंबर नरहरी शिंदे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. मु.पो. बाबुळगांव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. 4. श्री. तानाजी बाबुराव पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. मु.पो. तुगद, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. 5. श्री. नितीन विठ्ठल पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. 1555, हनुमान चौक, पंढरपूर, जि. सोलापूर. 6. श्री. गणेश दत्तात्रय थिटे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. 1446, गांधी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर. 7. निस्सार अहमद महम्मद हुसेन शेख, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. 755, गोविंदपुरा, सरकारी दवाखाना, पंढरपूर, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.बी. शेंडे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एम.एन. हिंगणे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला ग्राहक विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेमध्ये खालीलप्रमाणे नमूद रक्कम ठेव स्वरुपात गुंतवणूक केली आहे. ठेव पावती क्रमांक | खाते क्रमांक | ठेवीचा दिनांक | ठेव रक्कम | ठेवीची अंतीम मुदत | मुदतीनंतर देय रक्कम | 6652 | 6251 | 25/11/07 | 17,000/- | 25/2/10 | 22,355/- | 10458 | 10152 | 11/12/08 | 22,000/- | 11/3/10 | 25,850/- | 10897 | 10591 | 7/1/09 | 18,000/- | 7/3/10 | 20,730/- | 041199 | 3501 | 12/4/07 | 20,000/- | 12/4/10 | 28,400/- |
2. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्द पक्ष हे रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे ठेव रकमेची त्यांना नितांत आवश्यकता होती. त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे चौकशी केली असता, सौ. राजश्री राजेंद्र ताड, रा भाळवणी यांनी कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., तुंगद यांच्याकडून कर्ज घेतले असून त्याकरिता तक्रारदार हे जामीनदार असल्यामुळे त्या संस्थेने सहकार न्यायालयामध्ये रक्कम जप्त करण्याविषयी अर्ज दिल्याचे सांगितले. सहकार न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नसताना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सौ. राजश्री राजेंद्र ताड यांनी कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., तुंगद, शाखा पंढरपूर यांच्याकडून घेतलेल्या कर्जाकरिता तक्रारदार हे सहकर्जदार जामीनदार आहेत. त्या पतसंस्थेने सहकार न्यायालयामध्ये रु.10,78,440/- च्या वसुलीकरिता केस नं.2147/2007 दाखल केली असून ठेवीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सहकार न्यायालयाच्या निर्णयानंतर ठेवीबाबत निर्णय घेण्याबाबत तक्रारदार यांना कळविले आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीस कारण घडलेले नाही आणि शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष संस्थेमध्ये ठेव पावतीद्वारे रक्कम गुंतवणूक केल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर वारंवार मागणी करुनही ठेव रक्कम परत करण्यात आली नसल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार सौ. राजश्री राजेंद्र ताड यांनी कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., तुंगद, शाखा पंढरपूर यांच्याकडून घेतलेल्या कर्जाकरिता तक्रारदार हे सहकर्जदार जामीनदार आहेत आणि त्या पतसंस्थेने सहकार न्यायालयामध्ये रु.10,78,440/- च्या वसुलीकरिता केस नं.2147/2007 दाखल केली असून ठेवीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 5. तक्रारदार यांना ठेव रक्कम परत केली नसल्याबद्दल विवाद नाही. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर सहकार न्यायालयामध्ये दाखल केस नं.2174/2007 मधील नि.36 व त्यावरील आदेश दाखल केला आहे. सहकार न्यायालयाने कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा सदर अर्ज नामंजूर केल्याचे निदर्शनास येते. वास्तविक पाहता, सौ. राजश्री राजेंद्र ताड यांनी कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतल्याचा आणि त्याकरिता तक्रारदार हे जामीनदार असल्यासह कर्जाकरिता पतसंस्थेकडे ठेव पावत्या तारण म्हणून ठेवल्याचे सिध्द करण्यासाठी विरुध्द पक्ष यांनी स्वतंत्र पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये 'बँकर्स लीन' तत्वानुसार कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे जामीनदार नात्याने तक्रारदार यांच्या ठेव पावत्यांची रक्कम रोखून ठेवण्याचा विरुध्द पक्ष यांना अधिकार प्राप्त होतो काय ? हा प्रश्न निर्माण होतो. 6. निर्विवादपणे, सौ. राजश्री राजेंद्र ताड यांच्या कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडील कर्जाकरिता तक्रारदार यांनी ठेव पावत्या तारण ठेवलेल्या नाहीत. आमच्या मते, कर्मयोगी सु.रा. परिचारक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस सौ. राजश्री राजेंद्र ताड यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत आणि त्या मार्गाचा अवलंब करुन कर्ज वसुली करण्यास त्यांना स्वातंत्र्य आहे. तक्रारदार यांच्या मुदत ठेवी कर्जाकरिता तारण नसल्यामुळे व त्यावर बॅकर्स लीन येत नसल्यामुळे त्या कारणास्तव विरुध्द पक्ष यांना तक्रारदार यांची ठेव रक्कम रोखून ठेवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि तसे कोणतेही कायदेशीर आदेश त्यांना प्राप्त नाहीत. असे असताना, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना ठेव रक्कम न देऊन निश्चितच सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची ठेव रक्कम सव्याज परत करावी या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. तसेच ठेव रक्कम परत न केल्यामुळे तक्रारदार हे सहन कराव्या लागलेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना ठेव पावती क्र.06652, 010458, 010897 व 04199 ची मुदतीनंतर प्राप्त होणारी एकूण ठेव रक्कम मुदत पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/7511)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |