(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार हा खंडागळे गल्ली, बेलापूर बु.ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. व त्या व्यवसायासाठी तक्रारदार यांला संपर्कासाठी मोबाईलची आवश्यकता आहे. म्हणून सामनेवाला नं.1 यांचे दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मायक्रोमॅक्स कॅनव्हास नाईट ई 471, कलर व्हाईट सिल्वर याचा M-IMEI 1: 911409300139962 & S-IMEI 291140930089967 मोबाईल हॅन्डसेट रक्कम रु.15,000/- ला खरेदी केला. सदरहू मोबाईलचा इनव्हाईस बिल नं.03400 असा आहे. सामनेवाला नं.2 ही इन्शुरन्स कंपनी आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेला मोबाईलचा सामनेवाला नं.2 यांचेकडे इन्शुरन्स उतरविला आहे, त्याचा कालावधी 1 वर्षाचा असतांना मोबाईल चोरी गेल्यास किंवा हातातुन पडल्यास किंवा हरविल्यास, जळाल्यास किंवा फिजीकल डॅमेज झाल्यास मोबाईलची संपुर्ण किमंतीची रक्कम त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला नं.2 वर राहील. त्यावर रक्कम रुपये 899/- चा विमा एक वर्षाचे मुदतीसाठी SYSKA GADGET SECURE या कंपनीचा विमा उतरविला आहे. त्याचा विमा पॉलीसी नं.88782455 असा आहे.
3. दिनांक 28.01.2016 रोजी तक्रारदार हे श्रीरामपूर येथील कोर्ट रोडने जात असतांना खिशातुन मोबाईल काढुन डायल करत असतांना, तक्रारदाराचे पाठीमागुन मोटार सायकलवर दोघे अज्ञात व्यक्तींनी तक्रारदारास हिस्का देवून मोबाईल घेवून, पळुन गेले. त्यानंतर सदरचा मोबाईल चोरी गेला. म्हणून तक्रारदाराने त्याच दिवशी श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरांनी चोरला म्हणुन फिर्याद नोंदविली. सामनेवाला नं.2 यांचे नियमाप्रमाणे तक्रारदाराने Deed of Indemnity Bond हा दिनांक 29.01.2016 रोजी केला. तसेच मोबाईल इन्शुरन्सचा चोरी गेल्याचा फॉर्म देखील सामनेवाला नं.2 यांचेकडे भरुन दिला. सामनेवाला नं.1 यांचेकडे सामनेवाला नं.2 ची पुर्तता करण्यासाठी पोलीसाकडची मोबाईल चोरी गेल्याचे अर्जाची कॉपी दिली. तसेच सामनेवाला नं.1 यांना मोबाईल चोरी गेल्याचे प्रतिज्ञापत्र दिले व सदरची संपुर्ण कागदपत्रे सामनेवाला नं.2 यांचेकडे कुरीअरने पाठविले. त्यानंतर सामनेवाला नं.1 यांचेकडे चौकशी केली असता तक्रारदाराचा अर्ज मंजुर झाल्याचे दिनांक 03.03.2016 रोजी कळविले. व तुमची रक्कम लवकरच बँकेत ऑनलाईन जमा होईल असे सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी सांगितले. परंतु दिनांक 15.11.2017 पावेतो सामनेवाला नं.1 यांनी सामनेवाला नं.2 यांचेमार्फत मिळलेल्या मोबाईलची रक्कम मिळाली नाही. म्हणुन सामनेवाले नं.1 यांना रजि.पोस्टाने दिनांक 15.11.2017 रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदारास मोबाईलची रक्कम दिली नाही. म्हणून तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद क्र.10 प्रमाणे मागणी केली केली आहे.
4. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करण्यात आली. सामनेवाला नं.1 व 2 यांना नोटीस काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. त्याप्रमाणे सामनेवाला नं.1 व 2 यांना नोटीस बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही. त्यामुळे सामनेवाला नं.1 व 2 यांचे विरुध्द निशाणी 1 वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्र तक्रारदार यांचे वकील श्री.ज-हाड यांनी केलेला युक्तीवादावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हा सामनेवाला क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे काय.? | ... होय. |
2. | तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे काय.? | ... होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
6. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 यांचे दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मायक्रोमॅक्स कॅनव्हास नाईट ई 471, कलर व्हाईट सिल्वर खरेदी केला. सदरहू मोबाईलची किंमत रक्कम रुपये 15,000/- अशी आहे. त्याबाबतचे बिल इनव्हाईस बिल नं.03400 प्रकरणात दाखल केलेले आहे. सदरहू बिलाचे अवलोकन केले असता, ते निशाणी 6 वर दखल केलेले आहे. यामध्ये तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल खरेदी केला आहे हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने सदरचा मोबाईल सामनेवाला नं.2 या विमा कंपनीचा विमा उतरविला आहे ही बाब निशाणी 6 वरील 6/1 वर असलेल्या दस्तावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.2 ः- तक्रारदाराने रक्कम रु.15,000/- चा मोबाईल सामनेवाला नं.1 यांचे दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल खरेदी केला. त्यानंतर सदरहू मोबाईल त्यांनी सामनेवाला नं.2 इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स उतरविला आहे. सदरहू इन्शुरन्सचे पॉलीसीप्रमाणे मोबाईल चोरी गेल्यास किंवा हातातुन पडल्यास किंवा हरविल्यास, जळाल्यास किंवा फिजीकल डॅमेज झाल्यास मोबाईलची संपुर्ण किमंतीची रक्कम त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला नं.2 वर राहील असे करारात नमुद आहे. याबाबतचे दस्त Deed of Indemnity Bond हा तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेले आहे. तक्रारदाराने दिनांक 28.01.2016 रोजी तक्रारदार हे श्रीरामपूर येथील कोर्ट रोडने जात असतांना खिशातुन मोबाईल काढुन डायल करत असतांना, तक्रारदाराचे पाठीमागुन मोटार सायकलवर दोघे अज्ञात व्यक्तींनी तक्रारदारास हिस्का देवून मोबाईल घेवून पळुन गेले. त्यानंतर सदरचा मोबाईल चोरी गेला म्हणून तक्रारदाराने त्याच दिवशी श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीस गेला म्हणून फिर्याद नोंदविली. व सदरची फिर्याद प्रकरणात निशाणी 6/2 ला प्रकरणात तक्रारदाराने दाखल केलेली आहे. तक्रारदाराने सदरचा मोबाईल चोरी गेल्याची फिर्याद दिनांक 28.01.2016 रोजी दिली आहे. यावरुन तक्रारदाराचा मोबाईल चोरी गेला ही बाब स्पष्ट होते. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 29.01.2016 रोजी सामनेवाला नं.2 यांचेकडे नियमाप्रामणे Deed of Indemnity Bond भरुन मोबाईल चोरी गेल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. परंतु सदरचे कागदपत्र सामनेवाला 2 यांचेकडे कुरीयरने पाठविले. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला नं.1 यांचेकडे क्लेमबाबत चौकशी केली असता तक्रारदाराचा अर्ज मंजुर झाल्याचे दिनांक 03.03.2016 रोजी कळविले. व तुमची रक्कम लवकरच बँकेत ऑनलाईन जमा होईल असे सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी सांगितले. परंतू रक्कम जमा झालेली नाही. तक्रारदाराने सदर कागदपत्रावरुन रक्कम रुपये 15,000/- चा मोबाईल सामनेवाला न.1 यांचे दुकानातून खरेदी केला हे स्पष्ट होते. सदरहू मोबाईलचा विमा सामनेवाला नं.2 यांचेकडे उतरविला होता ही बाब तक्रारदाराने दाखल केलेले दस्त निशाणी 6/5 वरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने सदरहू मोबाईलचा विमा दावा सामनेवाला नं.2 यांचेकडे पाठविला व मोबाईल चोरी गेल्याविषयी प्रतिज्ञापत्र करुन पाठविले. निशाणी 6/7 वर तक्रारदाराने कुरीयरने विमा दावा पाठविल्याचे पावती दाखल केली आहे. यावरुन तक्रारदाराने विमा दावा सामनेवाला नं.2 यांचेकडे पाठविला होता. परंतू सामनेवालाने त्यात तक्रारदाराचा विमा दाव्याची रक्कम दिली नाही. व तक्रारीची नोटीस प्राप्त होऊनही प्रकरणात हजर झाले नाही. तक्रारदाराची तक्रार खोडून काढण्याची संधी गमावली.
8. सामनेवाला नं.1 हा विक्रेता असून तक्रारदाराने सामनेवाला नं.1 यांचेकडून मोबाईल खरेदी केला. मोबाईलमध्ये कोणताही दोष नसल्यामुळे सामनेवाला नं.1 यांना जबाबदार धरता येणार नाही. मात्र सामनेवाला नं.2 ही विमा कंपनी असल्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात येते. सदरची तक्रार ही सामनेवाला नं.1 यांचे विरुध्द खारीज करण्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. तक्रारदार यांना त्यांचा विमा दावा हा विनाकारण सामनेवाला नं.2 यांनी नामंजुर केला व तक्रारदाराला मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारदार यांना निश्चीतच शारीरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब या खर्चापोटी तक्रारदार काही रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सामनेवाला नं.1 यांनी त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द झाले आहे. तक्रादाराने पुराव्यानिशी तक्रार सिध्द केली आहे. सबब सदरची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
11. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराला मोबाईलची किंमत रक्कम रु.15,000/- [रक्कम रुपये पंधरा हजार फक्त] या निकालाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्कम मुदतीत न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्के दराने संपुर्ण रक्कम फिटेपावेतो व्याज द्यावे.
3) सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- [रक्कम रुपये तीन हजार फक्त] व या तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/- [रक्कम रुपये दोन हजार फक्त] तक्रारदारास द्यावा.
4) वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.2 यांनी या आदेशापासून 30 दिवसाचे आत करावी.
5) सामनेवाला नं.1 यांचे विरुध्द कोणताही आदेश पारीत नाही.
6) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क दयावी.
7) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदारास परत करावी.