तक्रारदार - अॅड.श्री. दिंडोरे
जाबदारांतर्फे - अॅड.श्री. परदेशी
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 31/12/2013
(द्वारा- अंजली देशमुख, अध्यक्ष
तक्रारदार ही एक भागीदारी संस्था असून, त्या संस्थेमध्ये दुध जमा करणे, चिलींग, प्रोसेसिंग ऑफ मिल्क आणि त्याचे अनेक पदार्थ प्रोडक्टस तयार करणे ही कामे चालत होती. तक्रारदारांचे जाबदेणारांकडे अॅग्रीकल्चरल कॅश-क्रेडिट खाते होते. तक्रारदाराची आणखीन एक शाखा खेड राजगुरुनगर येथे आहे. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारास सन 2007 मध्ये रक्कम रु. 9,00,000/- ची कॅश क्रेडिटची सुविधा (facility) मंजूर केली होती. तक्रारदारांनी या कॅश क्रेडिट अकौंटबद्दल व्यवस्थित काळजी घेतली होती. कधीही ओव्हरड्रयू / एक्सीडेड किंवा जास्तीची रक्कम काढण्यात आली नव्हती. तक्रारदारांनी त्यांची कॅश क्रेडिट फॅसिलिटी रिन्यू करण्यासाठी जाबदारांनी डिसेंबर 2010 मध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना दिली. सर्व काही सुरळीतपणे चालू असताना जाबदार क्र. 2 यांनी दि. 11/4/2011 रोजी तक्रारदारास कोणतीही पूर्वसुचना न देता, कुठलेही कारण नसताना त्यांचे दोन चेक अनादरित केले. याबाबतची चौकशी केली असता, जाबदार क्र. 2 यांनी व्यवस्थित माहिती सांगण्यास नकार दिला. त्यांना मंजूर रक्कम रु.9,00,000/- काढण्याची मर्यादा होती. चुकीच्या व बेकायदेशीर आधारावर जाबदारांनी रक्कम रु. 50,000/- आणि रु. 53,476/- चे दोन चेक डिसऑनर केले. ही जाबदारांची कृती म्हणजे त्यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे आहे. जाबदारांनी याबाबीत तक्रारदारांना कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही म्हणून तक्रारदारांनी दि. 5/5/2011 रोजी स्पष्टीकरण मागितले असता जाबदार क. 2 यांनी दि. 3/6/2011 रोजी खोटी कारणे सांगून त्यांनी केलेली कृती कशी योग्य आहे असे त्यात नमुद केले आहे. जाबदारांनी अचानकपणे त्यांच्या कॅश क्रेडिट अकौंटमध्ये रक्कम देणे स्टॉप केल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. त्यांना अनेक दुध पुरवठा करणा-यांना रक्कम देण्यासाठी व इतर व्यावसायिक कारणांसाठी आर्थिक गरजांसाठी इतर ठिकाणाहून पैशाची सोय करावी लागत असल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. म्हणून सदरील तक्रार.
तक्रारदार जाबदारांकडून, तक्रार दाखल करेपर्यंत जाबदारांमुळे दुध कलेक्शन मध्ये कमतरता व ग्राहक संख्या घटल्यामुळे तसेच प्रतिलिटर दुध चिलींगची रक्कम वाढल्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम रु. 1,05,820/- तसेच प्रतिलिटर दुध दळणवळणाचा खर्च वाढल्यापोटी (Transportation) नुकसानभरपाईची रक्कम रु.28,377/-, दुध विक्रीसाठी उपलब्ध करावयास झालेली नुकसानभरपाईची रक्कम रु.14,953/-, बाजारातील पत गेल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाची नुकसानभरपाईची रक्कम रु.5,00,000/- अशी एकूण रक्कम रु.6,49,150/- मिळावी अशी मागणी करतात. तसेच कॅश क्रेडिट फॅसिलिटी जाबदारांकडून बंद झाल्यामुळे ती पुन्हा चालू होईपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम तसेच सर्व नुकसानभरपाईची रक्कम 18% व्याजाने मिळावेत अशी मागणी तक्रारदार करतात.
तक्रारदार, जाबदारांकडून त्यांची कॅश क्रेडिट फॅसिलीटी लगेचच चालू करुन दयावी आणि रक्कम रु. 6,49,150/- इतक्या रकमेची नुकसानभरपाई व्यवसायाचे नुकसान व लॉस ऑफ बिजनेस त्यांची समाजात गेलेली पत आणि मानसिक त्रासासाठी मागतात. तसेच कॅश क्रेडिट फॅसिलिटी बंद झाल्यामुळे ती पुन्हा चालू होईपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम तसेच ही रक्कम 18 टक्के व्याजदराने मागतात व इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी श्रीमती. स्नेहा संजय पाटील यांचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार ही भागीदारी संस्था असून त्या संस्थेतील कामकाजासाठी म्हणून त्यांनी जाबदार क्र. 2 यांचेकडून कॅश क्रेडिट फॅसिलिटी घेतली होती ती व्यावसायिक कारणासाठी आहे. तक्रारदार हे दुध कलेक्शन, चिलींग, प्रोसेसिंग ऑफ मिल्क, प्रिपरेशन ऑफ मिल्क प्रॉडक्टसचा व्यवसाय खेड राजगुरुनगर येथे करतात. तसेच मुळ फॅक्टरी कोल्हापूर येथे आहे त्यामुळे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी ते हा व्यवसाय करत नाहीत तक्रारीमध्ये कुठेही स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी असा उल्लेख केला नाही म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ते ग्राहक ठरत नाहीत म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात.
तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे ती फक्त एक भागीदार यांच्या सहीने केलेली आहे. त्यामुळे अशी तक्रार चालू शकत नाही. तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 यांच्याकडे त्यांच्या खेड राजगुरुनगर येथील प्लॅंटसाठी कॅश क्रेडिट फॅसिलिटी मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या कर्ज अर्जामध्ये त्यांनी या संस्थेचे भागीदार म्हणून फक्त श्रीमती. स्नेहा संजय पाटील आणि श्री. मनोहर तुकाराम देसाई या दोघांचीच भागीदार म्हणून नावे नमुद केली होती. परंतु जाबदारांनी जेव्हा भागीदारी संस्थेच्या सन 2007-08 2008-09 2009-10 मार्च 2011 च्या ऑडीट रिपोर्टसची पाहणी केली तेव्हा त्यांना असे आढळून आले की कर्ज अर्जात नमुद केल्याव्यतिरिक्त या भागीदारी संस्थेचे आणखी वेगळे भागीदार आहेत तसेच त्या ऑडीट रिपोर्टसमध्ये स्टॉक आणि डेटर्सची लिस्ट कर्ज अर्जामध्ये आणि रिन्यूएशनच्या अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे नव्हती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स आणि बँकींग नॉर्मस नुसार अशा परिस्थितीत काही सुरक्षितता प्रिकॉशन घेणे आवश्यक असल्यामुळे जाबदार क्र. 1 यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारास याबद्दलचे स्पष्टीकरण मागवले. परंतु श्री. संजय पाटील तक्रारदारांचे अधिकृत प्रतिनिधी किंवा इतर कर्मचा-यांनी तसेच इतर भागीदारांनी ही बाब कुठेही गंभीरपणे घेतली नाही आणि त्याचे स्पष्टीकरण जाबदारांना दिले नाही. तक्रारदारांनी दि. 5/5/2011 रोजी जाबदारास पत्र पाठविले त्याचे उत्तर आणि स्पष्टीकरण जाबदारांनी दि. 3/6/2011 रोजीच्या पत्रानुसार दिले आणि त्यामध्ये त्यांनी तक्रारदारास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते तरीसुध्दा तक्रारदारांनी कुठलीही माहिती स्पष्टीकरण जाबदारांना दिले नाही. म्हणून ही तक्रार गुंतागुंतीची आहे, समरी ट्रायलनुसार ती निकाली लागू शकणार नाही म्हणून ती सिव्हील कोटोकडे पाठवावी अशी विनंती जाबदार करतात. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदाराची तक्रार खर्चासहित नामंजूर करावी तसेच बनावट तक्रार दाखल केली म्हणून जाबदारांना झालेल्या नाहक त्रासापोटी रक्कम रु. 5,00,000/- ची नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदारांकडून मिळावी अशी मागणी जाबदार करतात. जाबदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार ही एक फर्म असून त्याची मुख्य फॅक्टरी कोल्हापूर येथे आणि दुसरी फॅक्टरी खेड राजगुरुनगर येथे आहे आणि त्यांचा व्यवसाय हा दुध जमा करणे, चिलींग, प्रोसेसिंग ऑफ मिल्क आणि त्यापासून अनेक पदार्थ प्रोडक्टस तयार करणे इ. आहे आणि त्यांचे कॅश क्रेडिट अकौंट जाबदार क्र. 2 यांच्याकडे आहे. जाबदारांनी तक्रारदाराचे दोन चेक्स अनादरित केले म्हणून झालेल्या नुकसानीसाठी त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या एक नाहीतर दोन मिल्क प्रोडक्टसच्या फॅक्टरी आहेत व त्यासाठीच त्यांनी जाबदार बँकेची सेवा घेतल्याचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायदयानुसार, व्यावसायिक कारणाकरिता घेतलेल्या सेवेसाठी तक्रारदार हे ग्राहक ठरत नाहीत, या कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. तसेच दुसरे कारण असे की, तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 यांच्याकडून अर्थसहाय्य (कॅशक्रेडिट) घेतले होते त्या अर्जामध्ये त्यांनी संस्थेचे अनेक भागीदार असूनसुध्दा दोनच भागीदार दाखविले तसेच स्टॉक आणि डेटर्सची लिस्ट जाबदार बँकेस दिली नाही त्यामुळे अर्थातच आर.बी.आय्. च्या गाईडलाईननुसार आणि बँकींग नॉर्मनुसार बँकेच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी तक्रारदाराचे दोन चेक्स अनादरित (dishonor) केले आणि तक्रारदाराकडून माहिती मागविली. परंतु तक्रारदारांनी ही माहिती त्यांना दिली नाही आणि मंचात ही तक्रार दाखल केली हे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. जाबदारांनी आर. बी.आय्.च्या गाईडलाइननुसार व बँकेच्या सुरक्षिततेसाठी अशाप्रकारची पाऊले उचलली त्यामध्ये जाबदारांची कुठलीही सेवेतील त्रुटी दिसून येत नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत काही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.