रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 8/2009 तक्रार दाखल दि. 13/1/09 निकालपत्र दिनांक – 07/05/09 श्री. सूर्यकांत विश्वनाथ जंगम, रा. कुंभरोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा. ..... तक्रारदार विरुध्द
1. असिस्टंट पोस्ट मास्तर जनरल, (सेव्हींग्ज इन्क्वायरी) मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001.
2. अधिक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, पनवेल, जि. रायगड. 410206. ..... सामनेवाले उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य
तक्रारदारांतर्फे – अँड. अल्पा नागे. विरुध्दपक्षातर्फे – अँड. विलास नाईक -: नि का ल प त्र :- द्वारा मा.सदस्य, श्री.भास्कर कानिटकर. तक्रारदारांनी ही तक्रार यातील सामनेवाले क्र. 1, 2 चे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत दाखल केली असून त्यांच्या तक्रारीचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे. 2. तक्रारदार हे रयत शिक्षण संस्था या संस्थेत शिक्षक म्हणून काम करीत होते. त्यांनी पोस्टल प्रॉव्हिडंट फंड खाते विन्हेरे (बीपीओ) ता. महाड येथे 1967 साली उघडले होते. ते खाते नंतर वशेणी ता. उरण येथे ट्रान्सफर करण्यात आले. 1969 मध्ये बढकस कमिशन अमलात आल्यामुळे माध्यमिक शिक्षकांना पेन्शन लागू करण्यात आले त्यामुळे पोस्टल प्रॉविडंट योजना बंद करण्यात आली. परंतु तक्रारदारांना 1967 ते 1969 या कालावधी मध्ये जमा असलेला प्रॉव्हिडंट स्वतःचा हिस्सा व संस्थेचा हिस्सा पोस्टल फंडस खाते नंबर 2428172 मध्ये जमा करण्यात आले. अशा त-हेने सावाले 2 च्या विभागामध्ये तो वर्ग करण्यात आला आहे. सन 1967 ते 1969 या कालावधीमध्ये मालकाचा हिस्सा जो पोस्टल प्रॉव्हिडंट फंड खात्यामध्ये जमा झाला होता ती रक्कम शिक्षण संस्थेने स्वतःकडे भरुन घेतले. तक्रारदार हे रयत शिक्षण संस्थेकडे शिक्षक म्हणून सेवेत होते. 3. तक्रारदार हे 31/3/05 रोजी निवृत्त झाले त्यावेळी अंतिम हिशोबाच्या संबंधात त्यांचा प्रॉव्हिडंट फंड सामनेवालेंनी जमा करुन घेतला असून तेव्हापासून तो त्यांच्याकडे साठून आहे. तक्रारदारांनी 24/11/99 रोजी सामनेवाले 2 बरोबर पत्रव्यवहार केला व खाते पोलादपूर येथे ट्रान्सफर करण्यास कळविले व त्यानंतर पुन्हा त्यांनी 22/6/07 रोजी सामनेवाले 2 यांस पत्र लिहून वरील रक्कम त्यांस व्याजासह देण्याबाबत पत्र पाठविले. दोन्ही पत्रे मिळाल्यानंतर सामनेवाले 1 ,2 यांनी 1/8/07 रोजी तक्रारदारांना पत्र देऊन त्यांच्याकडून माहिती मागविली व या पत्रास तक्रारदारांनी 4/9/07 व 15/11/07 रोजी सामनेवाले क्र. 2 ला माहिती दिली. परंतु सामनेवालेंनी त्यांना प्रतिसाद दिला नाही अथवा रक्कम तक्रारदारांना दिली नाही. म्हणून त्यांनी अँड. नंदकिशोर मोरे यांचेमार्फत 25/6/08 रोजी रजिस्टर नोटीस देऊन मागणी केली. त्यांस सामनेवाले 2 यांनी प्रतिसाद दिला नाही. सामनवाले 1 यांनी 10/7/08 रोजी तक्रारदारांचे वकील श्री. मोरे यांना पत्र देऊन पुढील पत्रव्यवहाराची वाट पहाण्यास कळविले व त्यानंतर पुन्हा 10/9/08 रोजी सामनेवाले 2 यांनी तक्रारदारांस पत्र देऊन खाते रिव्हयू करण्याबाबत कळविले. मुळातच सामनेवालेंनी त्यांची रक्कम न देता पुन्हा पत्र पाठवून रिव्हयू करण्याची मागणी वेळकाढूपणाचे आहे म्हणून तक्रारदारास ही तक्रार दाखल करणे भाग पडले. 4. 1999 पासून तक्रारदारांनी पत्रव्यवहार करुनही त्यांस सामनेवाले कडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यास मानसिक त्रास झाला तसेच त्यांना वकीलामार्फत नोटीस द्यावी लागली त्याचा खर्च तसेच मूळ येणे रक्कम मिळणेसाठी त्यांनी अर्ज केला आहे. 5. तक्रारदारांची विनंती अशी की, त्यांस त्याच्या प्रॉव्हिडंट खाते क्र. 6505301/2428172 मध्ये जमा असलेली रक्कम रु. 1,50,000/- व्याजासह मिळावी. त्यांस सामनेवाले बरोबर पत्रव्यवहार करावा लागला तसेच नोटीस द्यावी लागली यामुळे जो मानसिक त्रास झाला त्यापोटी नुकसान भरपाई रु. 5,000/- मिळावी असे म्हणणे आहे. याशिवाय, तक्रार दाखल करण्याचा खर्च मानसिक त्रास येण्याजाण्यापोटी करावा लागलेला खर्च या सर्वापोटी रु. 20,000/- ही मिळावेत अशी त्यांची विनंती आहे. 6. अर्जासोबत तक्रारदारांतर्फे अँड. अल्पा नागे यांचे वकीलपत्र दाखल आहे. नि. 5 वर तक्रारदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे. नि. 6 लगत तक्रारदारांतर्फे एकूण 10 कागद दाखल करण्यात आले आहेत सोबत त्याची यादी असून त्यात तक्रारदारांचे वकील नंदकिशोर मोरे यांचेतर्फे पाठविण्यात आलेली दि. 25/6/08 ची नोटीस, त्याची पोचपावती तसेच 10/7/08 रोजी पाठविण्यात आलेल्या नोटीसीला पोस्टाकडून आलेले उत्तर, 10/9/08 चे पोस्टाकडून मिळालेले उत्तर, तसेच यादीलगत इतर पत्रव्यवहाराचा समावेश आहे. 7. तक्रार दाखल झाल्यानंतर नि. 7 अन्वये सामनेवालेंना नोटीसा पाठविण्यात आल्या. त्याची पोच नि. 8 व 9 वर आहे. तक्रारदारांनी नि. 10 वर प्रतिज्ञापत्र देऊन विलंबमाफी करुन मिळावी असे म्हटले आहे. सोबत त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट जोडलेले आहे. याकामी, सामनेवाले 1 व 2 तर्फे विलास नाईक हे वकील हजर झाले. त्यांनी आपले सविस्तर म्हणणे नि. 13 वर दाखल केले आहे. नि. 14 वर त्यांनी आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दिले असून नि. 16 वर तक्रारदारांनी यादी देऊन मूळ कागदपत्रे एकूण 3 दाखल केली आहेत. सामनेवाले 1 व 2 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये अर्जदारांचा अर्ज खोटा आहे. त्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तसेच ज्या स्वरुपात दिला आहे तो योग्य नाही. तक्रारदारांनी सन 1967 ते 1969 या कालावधीत त्यांचा प्रॉविडंट फंड त्यांच्या वरील खात्यात जमा झाला होता व 1967 पासून ती रक्कम तशीच सामनेवालेकडे साचून होती हे निर्वीवादपणे सिध्द करणे आवश्यक आहे. तक्रारदारांच्या विनंत्या मान्य करता येण्यासारख्या नाहीत. त्यांनी वकीलामार्फत दिलेली नोटीस खोटी असून ती अयोग्य आहे. सामनेवाले 1 व 2 यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे तो ग्राहकांना मदत करण्याच्या उद्देशानेच केलेला आहे. सामनेवालेंचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार म्हणतात त्यानुसार त्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे खाते सामनवालेंकडे नव्हतेच. तक्रारदारांनी प्रथम 1967 मध्ये जे खाते विन्हेरे ब्रँच ऑफिस येथे उघडले ते बचत खाते होते. त्याचा क्र. 2428172 असा आहे. ते अस्त्वित्वात असून त्याला व्याज आकारले जाते. परंतु तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे 6505301 असे खाते त्यांच्या पनवेल हेड ऑफिसला नाही. 8. बचत खाते हे 1/4/80 पासून वापरात नसल्याने व त्या खात्यात सलग 3 वर्षे व्यवहार नसल्याने ते निष्क्रीय झाले आहे. ते पुनर्जीवीत केल्याशिवाय त्यात कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. तसेच खाते एका ऑफीस कडून दुस-या ऑफीसकडे ट्रान्सफर होत नाही. तक्रारदारांनी 24/11/99 रोजी जो पत्रव्यवहार केला त्यावरुन असे दिसते की, पासबुक हे पुनर्जीवीत करण्यासाठी पाठविले होते. ते पासबुक मार्च 1988 मध्ये निष्क्रीय झाले होते. त्या खात्यात मार्च 88 मध्ये 1149.71/- एवढी रक्कम जमा होती. ते खाते 4/10/2002 रोजी पुनर्जीवीत करण्यात आले. मात्र खाते ट्रान्सफर करण्यास लागणारा अर्ज (एसबी 10) तक्रारदारांनी न केल्याने ते खाते निष्क्रीय झाले व एसबी फॉर्म नसल्याने ट्रान्सफरही करता आले नाही. सामनेवालेंनी 10/9/08 रोजी पत्रव्यवहार करुन खाते ट्रान्सफर करण्यास लागणारी कागदपत्रे देण्यास त्यांना कळविले असूनही त्यास कोणतेही उत्तर दिलेले नाही अथवा त्याबाबतीतील कोणताही कागद दिलेला नाही. 9. पनवेल हेड ऑफिसला तक्रारदारांचे बचत खाते चालू असून त्यावर सन 2008 अखेरपर्यंत व्याज आकारले आहे. त्यामध्ये रु. 3023.56/- एवढी रक्कम जमा आहे. ते बंद करण्यासाठी तक्रारदारांनी नियमानुसार असलेला विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन देणे आवश्यक होते. या कारणास्तव तक्रारदारांचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा तसेच खोडसाळपणाचा अर्ज करुन त्रास दिल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचाही आदेश व्हावा. 10. तक्रारदार व सामनेवालेंची कागदपत्रे मंचाने वाचली. त्यांनी केलेले युक्तीवाद ऐकले. यावरुन या तक्रारीचा निर्णय देण्यासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 24 (अ) नुसार मुदतीत आहे काय ? उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांना सामनेवालें कडून दोषपूर्ण सेवा दिली गेली आहे काय ? उत्तर - नाही. मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करता येईल काय ? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्रमांक - 1 तक्रारदारांनी जो विलंबमाफीचा अर्ज दिलेला आहे त्यासोबत वैद्यकीय प्रमाण्पत्र दाखल केले आहे तसेच या मुद्याबाबत सामनेवालेंनी कोणतीही हरकत घेतलेली नाही. त्यामुळे आजारपणाच्या कारणामुळे झालेला विलंब माफ करावा असे मंचाचे मत आहे. त्यामुळे त्यांचा विलंबमाफीचा अर्ज माफ करुन त्यांचा अर्ज दाखल करुन घेण्यात येत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्रमांक – 2 तक्रारदारांची तक्रार मुख्यत्वे प्रॉव्हीडंट खात्याबाबत आहे. हे खाते 1967 या कालावधीतील असून त्याचा क्रमांक 6505301/2428172 असा असून त्या खात्यामध्ये जी रक्कम जमा आहे त्यासंदर्भात आहे. त्यांनी आपल्या विनंती कॉलममध्ये या खात्यातील रक्कम रु. दीड लाखाची मागणी केली आहे. सामनेवालेंनी याबाबतीतच तक्रार उपस्थित केली असून तक्रारदारांचे खाते या नंबरचे होते व त्यामध्ये रक्कम जमा आहे याची शाबिती करण्याची जबाबदारी तक्रारदारांची आहे असे म्हटले आहे परंतु तक्रारदारांनी आपले पासबुक अथवा त्यासंदर्भातील अन्य कोणतेही कागद नोटीसा व त्याबाबत झालेला पत्रव्यवहार वगळून प्रॉव्हिडंड फंडाचे खाते सामनेवाले कडे होते असे दर्शविणारा पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांचे म्हणणे नीट स्पष्टपणे सिध्द होत आहे असे दिसून येत नाही. तक्रारदारांनी अँड नंदकुमार मोरे यांचेमार्फत 25/6/08 रोजी जो पत्रव्यवहार केलेला आहे त्यामध्ये फक्त खातेनंबर आहे. सामनेवालेंची तक्रार असूनही तक्रारदारांनी प्रॉव्हिडंड फंडाचे पासबुक का दाखल केलेले नाही याचा खुलासा केलेला नाही. तक्रारदार आपल्या अर्जामध्ये 24/11/99 पासून सामनेवालेंशी पत्रव्यवहार करीत असल्याचे म्हणत आहेत. परंतु तसा पत्रव्यवहार या तक्रारीमध्ये दाखल नाही. जो काही पत्रव्यवहार आहे तो 25/6/08 पासून सुरु झालेला आहे. व त्या दिवसापासूनच्या पत्रव्यवहारास सामनेवालेंनी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी प्रथम 10/7/08 रोजी उत्तर देऊन पत्राची पोच दिली. त्यानंतर सामनेवालेंनी 10/9/08 रोजी तक्रारदारांस पत्र देऊन एस.बी. अकाऊंट नंबर 2428172 बाबत कळविले व ते अकाऊंट सायलेंट आहे ते पुन्हा Revive (जिवंत करणे) करणे आवश्यक आहे असे म्हणून त्यांनी तक्रारदारांस नियमाप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कोणत्या त-हेचे फॉर्म भरणे आवश्यक आहे ते कळविले. तक्रारदारांनी 4/9/07 रोजी एक स्मरणपत्र दिलेले आहे ते स्मरणपत्र क्र. 2 चे आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांनी 1/8/07 रोजी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड खात्यासंदर्भात काही खुलासा मागविलेला होता. त्यानुसार त्यांनी तो खुलासा केला व संबंधित पोस्ट ऑफीस कडून मला पत्र आलेले नाही असे कळविले. त्यांनी 24/11/99 नंतर एकदम 25/6/08 रोजी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी स्मरणपत्र क्र. 3 दि. 15/11/08 रोजी पाठवून मी दि. 24/11/99 रोजीच सेवानिवृत्त झाल्यामुळे अकाऊंट बदलून मिळण्यासाठी पोलादपूर येथील पोस्ट ऑफिस कडे अर्ज व पासबुक पाठविले होते व पैसे मिळण्याबाबत कळविले होते त्याबाबत कोणताही निर्णय मला मिळलेला नाही तरी ती रक्कम मला आता परत मिळावी असे स्मरणपत्र त्यांनी दिलेले आहे. तक्रारदारांनी 22/6/07 रोजी सुध्दा पहिले स्मरणपत्र दिलेले आहे व तक्रारीत नमूद केलेल्या प्रॉव्हिडंट फंड खात्यातील रक्कम मागितलेली आहे. सामनेवालेंनी पत्रव्यवहार केलेला आहे हे निश्चित. परंतु तो तक्रारदारांच्या प्रॉव्हिंडंड फंडाच्या तक्रारीबाबत आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदारांनी पोस्ट ऑफिसला विरुध्दपक्ष केलेले आहे. तक्रारदारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खालीलप्रमाणे म्हटले आहे - --- " तक्रारदार हे ता. 31/3/2005 रोजी सेवानिवृत्त आहेत. तक्रारदार यांचे रयत शिक्षण संस्थेमधील अंतिम हिशोबाच्या वेळी संस्थेमार्फत तक्रारदार यांस 1967 ते 1969 या कालावधीमध्ये मालकाचा हिस्सा जो पोस्टल प्रॉव्हिडंड खात्यामध्ये जमा झालेला होता. ती रक्कम शिक्षण संस्थेनी स्वतःकडे भरुन घेतली ". --- यावरुन रक्कम ही पोस्ट खात्याकडे तेव्हापासून नव्हती हे दिसून येते. त्यामुळे ती आता सामनेवाले यांनी देण्याचे कारण नाही असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी केलेल्या पत्राचारावरुन तक्रारदारांचे त्यांचेकडे फक्त पोस्टल बचत खाते होते. बढकस कमिशनची आलेली रक्कम ही तक्रारदारांच्या या बचत खात्यामध्ये जमा झालेली नाही. तसेच तक्रारदारांनी तशी रक्कम त्यांनी नमूद केलेल्या बचत खाते क्र. 2428172 मध्ये जमा केल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यांच्या तक्रारीमध्ये ते या खात्याचा उल्लेख पोस्टल प्रॉव्हिडंड फंड खाते असा करतात. परंतु सामनेवालेंनी त्यांचेकडे उघडल्या जाणा-या खात्यांच्या पुस्तिकांच्या प्रती अभिलेखात दाखल केल्या आहेत. त्याप्रमाणे फक्त " ब " गटात प्रॉव्हिंडंड फंड खाते, सुपर अँन्युएशन फंड खाते, ग्रॅच्युईटी फंड खाते, संचायिका खाते हे 4 प्रकार दाखविले आहेत व सर्वसाधारण जनतेसाठी फक्त पोस्टल बचत खाते असे दाखविले आहे. यावरुन तक्रारदार हे तक्रारीत नमूद करीत असलेले खाते हे त्यांचे वैयक्तिक बचत खाते असल्याचे मंचाचे मत आहे व ते खाते त्यांचे पनवेल हेडऑफिसला जिवंत असून त्यामध्ये सन 2007 – 2008 पर्यंत व्याज आकारले असून त्यात रु. 3023.56/- इतकी रक्कम जमा असल्याचे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. सदर पासबुक बंद करण्यासाठी तक्रारदारांनी सामनेवालेंच्या नियमाप्रमाणे SB 7 देऊन खाते बंद करणे आवश्यक आहे. एकंदरीत तक्रारीचा विचार करता, तक्रारदारांची तक्रार ही चुकीच्या माहितीवर करण्यात आलेली आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी केलेल्या पत्राचारावरुन सामनेवाले यांनी त्यांना योग्य प्रतिसाद दिला असल्याने सामनेवाले कडून तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिली गेली नसल्याचे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नाही असे आहे. विवेचन मुद्दा क्रमांक 3 - वरील विवेचनावरुन तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंचाला मंजूर करता येणार नाही. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की, -: अंतिम आदेश :- 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. 2. न्यायिक खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. 3. या आदेशाच्या प्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
दिनांक :- 07/05/2009. ठिकाण :- रायगड – अलिबाग. (भास्कर मो. कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |