जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
ग्राहक तक्रार क्रमांक – ८०७/२००९
तक्रार दाखल दिनांक – २२/१२/२००९
तक्रार निकाली दिनांक – २८/०३/२०१४
श्री.नवल दयाराम पाटील ----- तक्रारदार.
उ.व.५४, धंदा- व्यवसाय,
रा.प्लॉट नं.४,सुयोगनगर,
साक्रीरोड,धुळे.ता.जि.धुळे
विरुध्द
(१)मेसर्स अशोक लेलॅण्ड लि. ----- सामनेवाले.
४८०,अन्ना सलई नंदानाम,
चेन्नई-६०००३५.
(२)ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चरींग प्रा.लि.
पी-१-१२,एम.आय.डी.सी.अंबड,
नासिक,ता.जि.नासिक.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर.लोहार)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.ए.एम.देसर्डा)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – प्रतिनिधी)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी वाहनाचे इंजिन सामनेवाले यांचेकडून बदलवून मिळावे या मागणीसाठी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदर तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.३ यांचे मार्फत सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेले सुपर २२१४-२७ एस या मॉडेलचे ट्रेलर हे दि.१३-०९-२००८ रोजी रक्कम रु.१२,३५,३६९/- या रकमेस खरेदी केले आहे. त्याचा नंबर एम.एच.१८-एम-९३०६ असा आहे. सदर वाहन खरेदी केल्यानंतर तक्रारदारांचे असे लक्षात आले की, सदर वाहनास इंजिन ऑईल खुपच जास्त लागते. एक हजार किलोमिटर रनींग झाल्यावर एक लिटर इंजिन ऑईल लागते. त्याच प्रमाणे स्टेअरींग सुध्दा पुर्णपणे फिरत नव्हते. त्यामुळे दि.०५-११-२००८ रोजी वाहन हे सामनेवाले क्र.२ यांना दाखविले. त्यावेळी वाहनाचे इंजिन व स्टेअरींग तपासणी केली व स्टेअरींग बॉक्स नवा न टाकता वाहन दुरुस्त करुन दिले व वाहनाला इंजिन ऑईल लागणार नाही असे सांगितले गेले. परंतु त्या नंतर सदर वाहनास ऑईल जास्त लागत असल्याने दि.१३-०२-२००९, दि.२५-०४-२००९ व दि.०८-०६-२००९ अशा वेगवेगळया तारखेस ते पुन्हा दुरुस्त करुन घेतले. तरीही वाहनाच्या इंजिनातील दोष नाहीसा होत नव्हता. सदर दोष हा वॉरंटी कालावधीत असल्यामुळे तक्रारदारांनी नवीन इंजिन बदलून देण्याची मागणी केली. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी दोषयुक्त वाहन दिल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे, दुरुस्ती करुन घ्यावी लागली आहे व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्याकामी रु.१,५३,४५०/- मिळावेत व ते देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी सदर वाहनाचे इंजिन बदलून द्यावे व वर नमूद रक्कम रु.१,५३,४५०/-, मानसिक त्रासापोटी रु.५०,०००/- व्याजासह मिळावे तसेच अर्जाचा खर्च मिळावा.
तक्रारदार यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.३ वर शपथपत्र तसेच नि.नं.५ वरील दस्तऐवज यादी सोबत वाहन खरेदीची इनव्हाईस, पावती इ. एकूण तीन कागदपत्रे छायांकीत स्वरुपात आणि नि.नं.३५ वरील दस्तऐवज यादी सोबत एकूण चार बीले छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(३) सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचा खुलासा नि.नं.२३ वर दाखल केला असून. त्यात त्यांनी सदर तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेले वाहन हे सामनेवाले क्र.२ नाशिक यांचेकडून तक्रारदारांनी खरेदी केलेले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी या मंचापुढे तक्रार दाखल केली असून, या मंचास अधिकारक्षेत्र नाही. त्यामुळे सदर अर्ज रद्द करण्यास पात्र आहे. सामनेवाले यांनी प्रमाणबध्द अशी तपासणी करुन उत्पादीत केलेले वाहन प्रमाणीत केल्यानंतर वितरकांमार्फत वाहन रस्त्यावर चालवून नेऊन पोहचविण्यात येते. सदर प्रक्रिया पूर्ण करुनच सामनेवाले हे वाहन पाठवितात. त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता. सदर वाहनाचे इंजिन हे दोषयुक्त नव्हते व नाही. तक्रारदारांच्या निष्काळजीपणामुळे व चुकीमुळे तसेच त्यांनी अनधिकृत मॅकॅनिककडून त्याची खोलखाल केल्यामुळे त्यात दोष निर्माण झाला असावा. त्यास सामनेवाले जबाबदार नसून तक्रारदार हा स्वत:च जबाबदार आहे. तक्रारदार यांनी सदर वाहनाबाबत तक्रारी केल्या त्यावेळी विना मोबदला दुरुस्ती करुन सेवा दिलेली आहे. सामनेवालेंनी कोणताही सेवेत कसूर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना मागणी मागण्याचा अधिकार नाही. सबब सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.४९ वर शपथपत्र दाखल केले आहे.
(४) सामनेवाले क्र.२ यांनी त्यांच्या प्रतिनिधी मार्फत नि.नं. ९ वर त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.२ यांचा नाशिक येथे व्यवसाय आहे व तक्रारदार यांनी नाशिक येथून वाहन खरेदी केले आहे. त्यामुळे तक्रारीस कारण हे नाशिक येथे घडले असल्याने सदर मंचास ही तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. सामनेवाले क्र.२ हे कंपनीचे वितरक आहेत. त्यांनी बुकींग प्रमाणे वाहन दिलेले आहे. सदर वाहन हे सामनेवाले क्र.१ कंपनी यांनी उत्पादीत केलेले आहे. त्यामुळे त्यास, सामनेवाले क्र.२ हे जबाबदार नाहीत. सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारांना आवश्यक ती सर्व सेवा पुरविली असून सेवेत कमतरता केलेली नाही. त्यामुळे सदर तक्रार अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.२ यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.१० वर शपथपत्र तसेच नि.नं.५१ सोबत एकूण पाच जॉब कार्ड्स, दाखल केले आहेत.
(५) तक्रारदारांनी, सामनेवाले क्र.३ यांचे विरुध्द अर्ज चालविणे नाही अशी पुरसीस दिली आहे. त्यावर दि.२०-५-२०१० रोजी मंचाचा आदेश होऊन सामनेवाले क्र.३ यांचे नांव प्रकरणातून वगळण्यात आले आहे.
(६) तक्रारदारांची तक्रार, प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तिवाद व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांचा खुलासा, प्रतिज्ञापत्र व दाखल कागदपत्रे पाहता तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्यामार्फत सामनेवाले क्र.१ या कंपनीने उत्पादीत केलेले वाहन, सुपर २२१४ – २७ एस या मॉडेलचे ट्रेलर दि. ०५-०९-२००८ रोजी खरेदी केले आहे. त्याची पावती नि.नं.५/१ वर दाखल आहे. ते सामनेवाले यांनी मान्य केलेले आहे. या पावतीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवालेंचे “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) सामनेवाले यांनी सदर तक्रार चालविण्याचे या न्यायमंचास अधिकार क्षेत्र नाही असा बचाव घेतलेला आहे. परंतु या कामी सामनेवाले यांचे धुळे येथे सर्व्हीस सेंटर नसले तरी, सदर वाहन दुरुस्ती करण्याकामी अधिकृत दुरुस्तीकेंद्र उपलब्ध करुन दिलेले आहे, व त्या ठिकाणी तक्रारदारांनी वाहन दुरुस्त करुन घेतलेले आहे. याचा विचार होता या मंचास सदर तक्रार अर्ज चालविण्याचे अधिकार क्षेत्र आहे असे आमचे मत आहे.
(९) तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सदर वाहन खरेदी केले तेव्हा सदर वाहनाचे इंजिनास ऑईल खुप जास्त लागत होते. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी इंजिनमध्ये दुरुस्ती करुन दिली आहे. परंतु त्या नंतरही वाहनाचे इंजिनास जास्त ऑईल लागत आहे. सदर दोष हा वॉरंटी कालावधीत असल्यामुळे तक्रारदारांनी नवीन इंजिन बसूवन देण्याची विनंती केली, परंतु सामनेवालेंनी ते बदलून दिलेले नाही. या बाबत सामनेवालेंनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या करुन दिलेल्या आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे वाहन हे अनधिकृत मॅकॅनिक कडून दुरुस्त करुन घेतल्यामुळे त्यात दोष निर्माण झाला असावा.
सदर तक्रार पाहता वाहन हे खरेदी केल्यानंतर लागलीच त्यामध्ये दोष निर्माण झालेला आहे हे स्पष्ट होते. त्याच बरोबर सदर दोषाचे निराकरण हे सामनेवाले यांनी करुन दिलेले आहे हे तक्रारदारांनी मान्य केलेले आहे. त्या बाबतचे जॉब कार्ड हे नि.नं.५१ सोबत दाखल केलेले आहे. या जॉबकार्डचा विचार करता सदर वाहनास इंजिनमध्ये दोष निर्माण झालेला आहे व त्याकामी सामनेवाले यांनी दुरुस्ती करुन दिलेली आहे व त्यावर तक्रारदारांचे समाधान झालेले आहे म्हणून स्वाक्षरी आहे असे स्पष्ट होते.
तसेच सदर वाहन हे वॉरंटी कालावधीत असून त्यामध्ये दोष निर्माण झाल्यानंतर तो सामनेवालेंनी दुरु करुन दिलेला आहे. परंतु तक्रारदारांनी सदर वाहन वॉरंटी कालावधीत असतांना देखील इतर खासगी मॅकॅनिक कडून दुरुस्त करुन घेतले ही बाब योग्य नाही. कारण वाहन वॉरंटी कालावधीत असल्याने कंपनीच्या सर्व्हीस सेंटरमधून त्यातील दुरुस्ती करुन घेणे आवश्यक आहे. त्यात कोणता दोष आहे व तो दुरुस्त करण्यास कंपनी जबाबदार असते. त्यामुळे इतरत्र कोणत्याही खासगी मॅकॅनिककडून वाहन दुरुस्ती करुन घेणे योग्य नाही असे आमचे मत आहे.
(१०) सदर वाहनात खरेदी केल्यानंतर लागलीच दोष निर्माण होत होता. यावरुन सदर वाहनाचे इंजिनमध्ये दोष आहे हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. तक्रारदार यांनी सदर वाहनाचे पूर्ण इंजिन बदलवून मिळणेकामी मागणी केली आहे. या मागणी प्रमाणे इंजिनात उत्पादीत दोष आहे हे शाबीत करण्याकरिता त्या बाबतचा पुरावा येणे आवश्यक आहे. त्या कामी इंजिनची सखोल माहिती असलेल्या तज्ज्ञ इंजिनिअरच्या अहवालाची आवश्यकता आहे. सदर पुरावा या अर्जात दाखल झाल्याशिवाय पूर्ण इंजिन बदलून देणे हे न्यायाचे होणार नाही. परंतु तक्रारदार यांनी सदर अहवाल पुराव्याकामी दाखल करण्याकरिता कोणताही प्रयत्न किंवा अर्ज दिलेला नाही. तसेच मंचाच्या वतीने तक्रारदार यांना तोंडी विचारणा केली असता त्यावेळी तक्रारदार यांनी त्यास नकार देऊन केवळ इंजिन बदलवून देऊन व नुकसान भरपाईच्या खर्चाच्या रकमेची मागणी केली आहे. त्यावेळी त्यांनी तज्ज्ञ व्यक्तिचा पुरावा येण्यासंबंधी पुरावा नाकारला आहे. तसेच तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये वाहनाची तपासणी होऊन त्यामधील दोष निराकरण करण्याकरिता मंचाच्या वतीने समझोता वजा प्रयत्न करण्यात आले. पण त्यात तक्रारदार यांच्याकडून पुरेसे सहकार्य मिळाले नाही. यावरुन सामनेवाले हे सदैव सेवा देण्यास तयार आहेत हे स्पष्ट होत आहे.
(११) तसेच सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्या बचावाचे पुष्टयर्थ गौतम कामेश्वर आलोक या अधिकृत प्रतिनिधीचे शपथपत्र नि.नं.४९ वर दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये सामनेवाले यांनी पुराव्याकामी असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी मार्गदर्शक पुस्तीका विचारात न घेता, सदर वाहनाचा वापर केला आहे. तसेच वाहनाने केव्हा किती किलोमिटर अंतरानंतर कोणते इंजिन ऑईल वापरावे त्या संबंधिच्या सूचनाही तक्रारदाराने दुर्लक्षीत केल्या आहेत. तसेच अधिकृत वितरका व्यतिरिक्त दुस-या कोणत्याही खासगी मॅकॅनिकल कडून इंजिन खोलून दुरुस्तीचे काम करुन घेतले आहे. सामनेवाले क्र.२ यांनी आवश्यक ती सर्व सेवा देवून समाधानपुर्वक आवश्यक ती दुरुस्ती करुन दिलेली आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी सत्यतेसाठी तज्ज्ञ मॅकॅनिकल इंजिनिअरचा पुरावा दाखल केलेला नाही. त्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सामनेवालेंचे अधिकृत तज्ज्ञ मॅकेनिकल इंजिनीअर यांचेकडून तक्रारदारांचे वाहन तपासणीस देण्याचे व खरोखर इंजिनमध्ये किंवा इतर भागात दोष असल्यास, सदर दोष दूरु करुन देण्यास सामनेवालेंनी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ तर्फे देण्यात आलेल्या प्रस्तावास नकार दिलेला आहे. त्यावरुन तक्रारदार यांची तक्रार निरर्थक असल्याचे दिसते, असे नमूद केले आहे.
या शपथपत्रावरुन असे दिसते की, सामनेवाले हे सदैव तक्रारदार यांना सेवा देण्यास तयार आहेत. परंतु तक्रारदार हे सदर वाहन सामनेवाले यांच्याकडून दुरुस्त करुन घेण्यास तयार नाहीत. तसेच मंचामार्फत तज्ज्ञ अहवालाबाबत विचारणा केल्यानंतर तक्रारदार यांनी त्या मागणीस नकार दिलेला आहे. याचा विचार होता, तक्रारदार यांची सदर इंजिन हे दुरुस्त करुन मिळण्याची इच्छा नाही. त्यांना सदर इंजिन हे केवळ बदलवून हवे आहे. इंजिन बदलवून देणे याचा अर्थ वाहन बदलवून देणे असा आहे, व ते पुराव्याशिवाय शक्य नाही. याचा विचार करता तक्रारदारांची मागणी योग्य व रास्त नाही असे या मंचाचे मत आहे.
(१२) वरील विवेचनाचा विचार करता, सदर वाहनात खरेदी केल्यापासून दोष निर्माण होत आहे व सामनेवालेंनी त्यात वेळोवेळी दुरुस्ती केली आहे ही बाबही सत्य आहे. याचा विचार होता सदर वाहनातील इंजिनात दोष आहे, परंतु पुराव्या अभावी त्यातील दोष शोधून काढून त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत की, सामनेवाले क्र.१ यांच्या अधिकृत प्रतिनिधी मार्फत तज्ज्ञ मॅकॅनिकल इंजिनीयर मार्फत सदर वाहनाच्या इंजिनची तपासणी करुन त्यातील दोषांचे निराकरण करुन देणे आवश्यक आहे.
(१३) तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळणेकामी वाहन दुरुस्ती बिलातील रकमेची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारदार यांनी सदर वाहन हे वॉरंटी कालावधीत असतांना देखील खासगी मॅकॅनिकलकडून दुरुस्त करुन घेतलेले आहे व त्या बाबतच्या पावत्या देखील दाखल केलेल्या आहेत. आमच्या मते वाहन हे वॉरंटी कालावधीत असल्याने ते सामनेवाले यांच्याकडूनच दुरुस्त करुन घेणे आवश्यक होते. परंतु तसे तक्रारदार यांनी केलेले नाही. त्यामुळे सामनेवाले सदर रक्कम देण्यास जबाबदार नाहीत. याचा विचार होता, तक्रारदारांच्या वाहन दुरुस्ती बिलातील रकमेची मागणी योग्य नाही.
तसेच तक्रारदार यांनी मानसिक त्रासाची मागणी केलेली आहे, ती योग्य नाही. कारण तक्रारदार यांच्या वाहनाची दुरुस्ती ही सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे वेळोवेळी करुन दिली आहे व त्या नंतरही दुरुस्ती करुन देण्यास तयार आहेत हे मान्य केले आहे. याचा विचार होता सामनेवाले यांनी सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत असे आमचे मत आहे.
(१४) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(१) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(२) तक्रारदार यांनी सदर वाहन, सुपर २२१४-२७ एस या मॉडेलचे ट्रेलर नंबर एम.एच.१८-एम-९३०६ हे सामनेवाले क्र.१ यांचे प्रतिनिधी सामनेवाले क्र.२ यांचेकडे या आदेशाचे दिनांकापासून पुढील आठ दिवसांचे आत तपासणीकामी उपलब्ध करुन द्यावे.
त्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या पंधरा दिवसांचे आत, या वाहनातील इंजिनामधील दोषाची तपासणी करुन त्याचे निराकरण करुन त्यांच्या तज्ज्ञ अहवालासह वाहन तक्रारदारास परत करावे.
सदर तपासणी प्रक्रिया, सामनेवाले क्र.१ व २ यांनी या आदेशाचे दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत पूर्ण करावी.
धुळे.
दिनांक २८/०३/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)