रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 1/2012
तक्रार दाखल दि. 06/01/2012
न्यायनिर्णय दि.- 01/01/2015
श्रीमती शारदा भार्गव दर्णे,
रा. 70, विनायक, रानवड,
केगाव, ता. उरण, जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक,
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असेट मॅनेजमेंट कं. लि.,
मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, पोस्ट बॅग नं. 18,
सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
2. श्रीमती उज्वला गजानन दर्णे,
रा. विनायक डोंगर अळी,
घर नं. 1065, उरण, ता. उरण, जि. रायगड.. ..... सामनेवाले
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. सदस्य,श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. मयेकर
सामनेवाले क्र. 1 गैरहजर.
सामनेवाले क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदाराने गुंतविलेली रक्कम विहित मुदतीत परत न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्याकडे यु.टी.आय. म्युच्युल फंड मधील युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन 1971 (ULIP) निवडून प्रति वर्ष रक्कम रु. 7,500/- दहा वर्षांसाठी घेतला होता. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दि. 18/07/2000 ते 14/07/09 पर्यंत प्रतिवर्षी नियमितपणे सामनेवाले यांच्याकडे रकमेचा भरणा केला. सामनेवाले यांचे योजनेप्रमाणे मुदतपूर्तीनंतर त्यावेळी लागू असणारे पुनर्खरेदी मूल्य व रुपये 75,000/- यांच्या एकूण रकमेवर 5% दराने बोनस देण्यात येईल असे अभिवचन दिले होते. परंतु मुदतपूर्तीनंतरही वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम अदा न केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले क्र. 1 यांनी मंचासमक्ष हजर होऊन लेखी जबाब दाखल केला आहे. परंतु सामनेवाले क्र. 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमक्ष हजर न राहिल्याने व त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. सामनेवाले क्र. 1 यांनी आपल्या लेखी जबाबात तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदारांचा वार्षिक हप्ता दि. 08/07/05 रोजी तक्रारदारांनी जमा केला असून सदर रक्कम तांत्रिक बाबीमुळे सामनेवाले यांच्या खात्यावर जमा केली गेली नाही. सबब तक्रारदारांचे केवळ 9 वार्षिक हप्ते सामनेवाले यांचेकडे जमा असून हप्ता क्र. 6 जमा होताच तक्रारदारांना एकत्रित रक्कम दिली जाईल असे कथन करुन सामनेवाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसूर केला नसून तक्रार अमान्य करण्यात यावी असे कथन केले आहे.
5. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व त्यांची वादकथने, सामनेवाले क्र. 1 यांचा लेखी जबाब, व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे विहीत मुदतीनंतरही ठेव
रक्कम अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
6. मुद्दा क्रमांक 1 व 2 - सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या खात्यावर वार्षिक हप्ता क्र. 6 जमा केला नसल्याबाबत लेखी जबाबात मान्य केले आहे. दि. 08/07/10 रोजी सामनेवाले यांचेकडे सदरील हप्ता तक्रारदार यांनी जमा केला आहे. मुदतपूर्तीनंतर तक्रारदारांनी अनेकवेळा सामनेवाले यांचेकडे जमा रक्कम कराराप्रमाणे परत मिळण्याकरीता विनंती करुनदेखील सामनेवाले यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सामनेवाले यांनी सन 2010 मधील हप्त्याच्या जमा होण्याविषयी तांत्रिक स्वरुपाची बाब प्रलंबित असल्याने तक्रारदारास मुदतपूर्तीनंतरही ठेव रक्कम देता येत नाही असे कथन केले आहे. तांत्रिक बाबींचा संबंध हा सामनेवाले यांच्या वैयक्तिक स्तरावरील असून त्यासाठी तक्रारदारांची मुदतपूर्ण ठेव रक्कम अदा न करणे ही बाब निश्चीतच सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी सदर तांत्रिक बाबी बाबत योग्य ती उपाययोजना तात्काळ करुन घेणे आवश्यक असून देखील सामनेवाले यांनी अद्याप त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तसेच सदर तांत्रिक बाबीमुळे तक्रारदार हे निश्चित मिळणा-या ठेव रकमेपासून वंचित राहिल्याची बाब सिध्द हाते. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांस मुदतठेवीची रक्कम विहीत मुदतीनंतरही परत न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. तसेच, सदर रक्कम विहित मुदतीत प्राप्त न झाल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 1/12 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना कराराप्रमाणे विहित मुदतीत ठेव रक्कम परत न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना मुदतपूर्तीचे दिवशी म्हणजेच दि. 18/07/2010 रोजी रु. 75,000/- (रु. पंच्याहत्तर हजार मात्र) वर लागू असलेली पुनर्खरेदी मूल्यानुसार देय असलेली रक्कम अधिक रुपये 75,000/- यांच्या एकूण रकमेवर 5% दराने बोनस अशी एकत्रित रक्कम या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावे.
4. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक त्रास व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रु. 30,000/- (रु. तीस हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
5. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना वरील क्र. 3 मधील आदेशाची पूर्तता विहित मुदतीत न केल्यास क्र. 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे देय एकत्रित रक्कम अदा करेपर्यंत दि. 18/07/2010 पासून द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह अदा करावी.
6. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 01/01/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.