रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 38/2012
तक्रार दाखल दि. 16/04/2012
न्यायनिर्णय दि.- 01/01/2015
श्री. स्वप्निल संदीप नागे,
रा. मु. पो. माणगांव, ता. माणगांव,
जि. रायगड. ...... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर, श्रीराम जनरल इन्शुरन्स कं.लि.,
शाखा पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड.
2. मॅनेजर, श्रीराम जनरल इन्शुरन्स कं.लि.,
इ. 8, इ.पी.आय.पी., आर.आय.आय. सी.ओ.,
सितापूर, जयपूर, राजस्थान – 302022.
3. श्रीराम जनरल इन्शुरन्स कं.लि.,
इ. 8, इ.पी.आय.पी., आर.आय.आय. सी.ओ.,
सितापूर, जयपूर, राजस्थान – 302022 ..... सामनेवाले क्र. 1 ते 3
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी, सदस्य
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. भूषण जंजिरकर
सामनेवाले क्र. 1 ते 3 तर्फे अॅड. अमित देशमुख
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांच्या कराराप्रमाणे वाहन अपघात विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणाने नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी वाहन क्र. एम.एच. – 06 ए.क्यू. 9916 या वाहनाचा विमा संरक्षण करार सामनेवाले क्र. 1 ते 3 यांच्यासमवेत दि. 18/12/10 ते 17/12/11 पर्यंत केला होता. सदर वाहन दि. 25/03/11 रोजी अपघातग्रस्त होऊन वाहनाचे नुकसान झाले. सदर अपघाताची माहिती सामनेवाले क्र. 1 ते 3 यांस दिल्यानंतर सामनेवाले यांचे तज्ञ परिक्षक यांनी वाहनाची तपासणी दि. 26/03/11 रोजी करुन दि. 31/05/11 रोजी संमतीपत्र तक्रारदार यांना पाठविले. सदर संमतीपत्रातील मजकूराप्रमाणे सामनेवाले क्र. 1 ते 3 तक्रारदारांस रक्कम रु. 20,00,000/- विमा प्रतिपूर्ती रक्कम देण्यास तयार असल्याची बाब नमूद होती. तक्रारदारांस सदर नुकसानभरपाई मान्य असल्याने सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांस सदरील रक्कम अदा करण्यास बराच कालावधी होऊनही अंतिमतः सदर रक्कम अदाही केली नाही. त्यानंतर सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास दि. 06/08/11 रोजी पत्र पाठवून अन्य तज्ञ परिक्षकाची नेमणूक करावयाची आहे असे कळविले. त्यानुसार सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी दि. 29/08/11 रोजी अन्य तज्ञ परिक्षकाची नियुक्ती करुन वाहन तपासणी अंती रक्कम रु. 7,50,000/- इतकी रक्कम मंजूर करण्यात येते असे पत्र सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास पाठविले. तसेच दि. 04/11/11 रोजी पत्र पाठवून रक्कम रु. 7,50,000/- स्विकारावे अन्यथा “नो क्लेम” या सदराखाली प्रकरण बंद करण्यात येईल असे नमूद केले. तक्रारदाराने प्रथम संमती दिल्याप्रमाणे रक्कम रु. 20,00,000/- एवढया रकमेचा विमा दावा मंजूर करुन रक्कम तात्काळ अदा करावी असे पत्र दि. 10/08/11 रोजी सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना पाठविले असता सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी दि. 09/11/11 रोजी पुन्हा पत्र पाठवून तक्रारदारांचा विमा दावा “नो क्लेम” म्हणून बंद केला आहे असे कळविले. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना मंचाने लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त होऊन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे. आपल्या जबाबात सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदाराच्या वाहनाचे प्रथम परिक्षण केलेल्या परिक्षकाच्या मताशी असहमत असल्याने पुन्हा अन्य तज्ञ परिक्षकाने वाहनाची पहाणी करुन अहवाल पाठवावा असे निश्चित झाल्याचे अन्य परिक्षकाने वाहनाची तपासणी करुन अहवाल सामनेवाले क्र. 1 ते 3 यांच्याकडे पाठविला. अन्य परिक्षकाने रक्कम रु. 7,50,000/- तक्रारदारास अदा करावे असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारास रक्कम रु. 7,50,000/- स्विकारण्यास बोलाविले असता, तक्रारदाराने संमती न दिल्याने तक्रारदारांचा क्लेम “नो क्लेम” या सदराखाली बंद करण्यात आला व तसे तक्रारदारास कळविले आहे. असे कथन सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी करुन तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले क्र. 1 ते 3 यांचा लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व उभयपक्षांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
दि. 31/05/11 रोजीच्या संमती कराराप्रमाणे वाहन दुरुस्ती विमा
रक्कम प्रतिपूर्ती दावा नाकारुन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 ते 3 वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा-
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराच्या अपघातग्रस्त वाहनाचे परिक्षण प्रथम तज्ञ परिक्षकाकडून केल्यानंतर प्राप्त अहवालाप्रमाणे रक्कम रु. 20,00,000/- तक्रारदारांना देण्यास संमतीपत्र पाठविले होते. सदर संमती पत्राच्या मजकूराचे अवलोकन केले असता, सामनेवाले क्र. 1 ते 3 तक्रारदारास विनाअट रक्कम रु. 20,00,000/- देण्यास तयार होते. परंतु सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तांत्रिक बाब उपस्थित करुन पुन्हा नव्याने वाहन परिक्षण करणेकामी अन्य तज्ञ परिक्षकाची नियुक्ती करुन त्यांनी मान्य केलेली रक्कम रु. 7,50,000/- तक्रारदारास देण्याची तयारी दर्शविली आहे. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी प्रथम रक्कम रु. 20,00,000/- मान्य करुन तद्नंतर रक्कम रु. 7,50,000/- अदा करण्याबाबत तक्रारदारांना पत्र पाठविले आहे. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास दोन पत्रांद्वारे वेगवेगळया रकमेच्या विनंत्या केलेल्या आहेत. मूलतः तक्रारदारांच्या वाहनाचे नुकसान अत्याधिक समोरील भागाकडून झाले असल्याने व प्रथम तज्ञ परिक्षणाच्या अहवालामध्ये रक्कम रु. 20,00,000/- तक्रारदारांस मान्य होती व आहे असे संमतीपत्रात नमूद आहे. सदर संमतीपत्र रद्द न करताच सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारांच्या अपरोक्ष पुन्हा वाहन तपासणी करुन रक्कम रु. 7,50,000/- एवढीच रक्कम तक्रारदारास विमा प्रतिपूर्ती रक्कम म्हणून मंजूर करणे ही बाब निश्चितच तक्रारदारास कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब असल्याचे सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास दि. 31/05/11 रोजी विमा दावा रक्कम प्रतिपूर्ती साठी रक्कम रु. 20,00,000/- देण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने संमती देखील दिली होती. सदर संमतीपत्र सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना प्राप्त असून त्याप्रमाणे सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारास रक्कम अदा करण्याची कोणतीही उपाययोजना न करता पुन्हा तक्रारदाराच्या वाहनाचे नव्याने तज्ञ परिक्षकाकडून पहाणी करुन रक्कम रु. 7,50,000/- मंजूर केल्याचे लेखी कळविले आहे. सदर रक्कम कमी करण्याचे कारण तांत्रिक स्वरुपाचे असून त्यास कोणताही कायदेशीर आधार नाही. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी प्रथम पाहणी केलेल्या तज्ञ परिक्षकाने अधिकतम नुकसानभरपाई रक्कम अदा करण्याविषयी अभिप्राय दिलेला होता असे नमूद करुन सदर अभिप्राय न्यायोचित नसल्याने पुन्हा अन्य तज्ञ परिक्षकामार्फत वाहनाची तपासणी करुन नुकसानभरपाई रक्कम निश्चित करण्यात आली असे नमूद केले आहे. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी केवळ तक्रारदारांस अदा करावयाची नुकसानभरपाई रक्कम कमी करण्याच्या हेतूने तांत्रिक मुद्दयांचा आधार घेत तक्रारदारांचा फक्त रक्कम रु. 7,50,000/- चा विमा रक्कम दावा मंजूर केला आहे. सबब, तक्रारदाराने सदरील रक्कम स्विकारण्यास नकार देऊन प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. यावरुनच तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब सिध्द होते. सबब, सामनेवाले क्र. 1 ते 3 तक्रारदारांस वैयक्तिक व संयुक्तिकपणे नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 38/2012 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस कराराप्रमाणे वाहन दुरुस्ती विमा रक्कम प्रतिपूर्ती नाकारुन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस दि. 31/05/11 रोजीच्या संमती कराराप्रमाणे वाहन दुरुस्ती विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा रक्कम रु. 20,00,000/- (रु. वीस लाख मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
4. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 01/01/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.