रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रारक्रमांक 1/2013
तक्रार दाखल दि. 13/02/2013
न्यायनिर्णय दि.- 01/01/2015
1. श्रीमती मीना यशवंत कुंड,
रा. सदनिका नं. 4, उत्कर्षा को.ऑप. हौ. सोसायटी,
दळी नगर, वेश्वी, अलिबाग,
पो. ता. अलिबाग, जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
1. तापी सहकारी पतपेढी मर्यादित, तर्फे चेअरमन,
मु. तापी भवन, गांधी चौक, मु. चोपडा,
जि. जळगांव. 425107.
2. तापी सहकारी पतपेढी मर्यादित, तर्फे शाखा व्यवस्थापक,
मु. स्टेशन रोड, डोंबिवली (पूर्व),
पो. ता. डोंबिवली, जि. ठाणे. ..... सामनेवाले
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. प्रतिक्षा वडे
सामनेवाले तर्फे प्रतिनिधी श्री. जितेंद्रसिंग पाटील
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस मुदत ठेव खात्यामधील रक्कम मुदतीनंतरही व्याजासह परत न करुन कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवालेकडे दि. 01/01/08 रोजी रक्कम रु. 1,50,000/- मुदतबंद ठेव ठेवली होती. सदर ठेवीची मुदतपूर्ती दि. 16/02/2008 होती. सदर ठेवीच्या देय तारखेनंतर सामनेवाले यांनी तक्रारदारास केवळ रु. 10,000/- एवढीच रक्कम अदा केली व उर्वरित रक्कम अदा करण्याविषयी विचारणा केली असता, सामनेवाले यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी बचत खाते, रिकरिंग खाते, मुदतबंद ठेवी इत्यादीमध्ये एकूण रक्कम रु. 1,94,777/- एवढी रक्कम सामनेवालेकडे ठेवली होती. तक्रारदार यांच्या पतीचे दि. 06/05/09 रोजी अपघाती निधन झाल्याने तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे मुदतठेव रकमांची मागणी केली असता, सदर रकमेपैकी सामनेवाले यांनी रक्कम रु. 48,625/- या रकमेचा धनादेश दि. 14/11/11 रोजी तक्रारदाराना दिला. अशाप्रकारे दि. 14/11/11 रोजी रक्कम रु. 1,45,900/- सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा केली नाही. सदर रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या संमतीशिवाय पुन्हा 37 महिन्यांकरीता मुदतठेव करुन घेतली. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 06/02/12 रोजी सामनेवाले यांस नोंदणीकृत डाकेने पत्र पाठवून तक्रारदारांस सदर रकमेची नितांत आवश्यकता असल्याने व्याजासह संपूर्ण रक्कम तक्रारदारांस अदा करावी असे निवेदन केले असता, सामनेवाले यांनी सदर रक्कम परताव्याविषयी तक्रारदारांस काहीही न कळविल्याने नाईलाजास्तव तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले यांनी मंचासमक्ष हजर होऊन लेखी जबाब दाखल केला. लेखी जबाबात सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदार यांनी स्वखुशीने मुदतबंद ठेवी पुन्हा गुंतविलेल्या असून सामनेवाले यांनी तक्रारदारास दि. 14/11/11 रोजी रक्कम रु. 48,625/- या धनादेशाद्वारे अदा केले आहेत. तसेच सामनेवाले यांनी लेखी युक्तीवादामध्ये त्यांची संस्था आर्थिक अडचणीमुळे बंद पडली असून ठेवीदारांच्या रकमा टप्प्याटप्प्याने अदा करण्याबाबत सामनेवाले यांनी उपाययोजना केली असून त्याप्रमाणे तक्रारदारास देखील ठेव रक्कम परत करण्यात येतील असे निवेदन करुन तक्रार अमान्य करण्यात यावी असे कथन केले आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, सामनेवाले यांनी दाखल केलेला लेखी जबाब, लेखी युक्तीवाद व उभयपक्षांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी कराराप्रमाणे तक्रारदाराच्या मुदतबंद ठेव रक्कम
मुदतपूर्ती नंतरही अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारास मुदतठेव रकमेपैकी अंशतः रक्कम अदा केली आहे. परंतु त्यानंतर पुन्हा गुंतविलेल्या रकमेची मुदतपूर्ती होऊनही सामनेवाले यांनी तक्रारदारास व्याजासह रक्कम अदा केली नाही. सामनेवाले यांनी संस्थेच्या आर्थिक अडचणी बाबत कथन केले असले तरी सदरील कारण न्यायेाचित नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास मुदतपूर्तीनंतर ठेव रक्कम अदा न केल्याबाबतची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द झाली आहे. तसेच सामनेवाले यांनी देखील लेखी युक्तीवादामध्ये सामनेवाले हे तक्रारदारास टप्प्याटप्प्याने रक्कम देण्यास तयार असल्याबाबत नमूद केले आहे. त्यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारास मुदतठेव रक्कम विहित मुदतीनंतर अदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याची बाब सिध्द होते. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे मुदतपूर्तीनंतर व्याजासह ठेव रक्कम अदा करण्याची कायदेशीर जबाबदारी पार न पाडून तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाबही सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले यांनी तक्रारदाराची मुदतठेवीची रक्कम मुदतपूर्ती नंतरदेखील उचित कारणाशिवाय परत केली नाही. तसेच तक्रारदारांनी मुदतपूर्ती रकमेची मागणी केली असून देखील सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम परत दिली नाही. अथवा देण्याबाबत कोणतीही निश्चित उपाययोजना केली नाही. तक्रारदार यांना विहीत कालमर्यादेत सदर रकमेची अत्यंत निकड होती. तरीदेखील सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर रक्कम अदा केली नाही ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होत आहे. सबब, सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत ही बाबही सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश:-
1. तक्रार क्र. 1/2013 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कराराप्रमाणे मुदतठेव रक्कम मुदतपूर्तीनंतरही अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कराराप्रमाणे मुदतठेव रक्कम रु. 1,45,900/- (रु. एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे मात्र) अदा करेपर्यंत झालेल्या मुदतठेवीच्या व्याजासह या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कराराप्रमाणे मुदतठेव रक्कम रु. 1,45,900/- (रु. एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे मात्र) अदा करेपर्यंत झालेल्या मुदतठेवीच्या व्याजासह वर नमूद क्र. 3 मधील विहीत कालमर्यादेत अदा न केल्यास त्यानंतर देय असणारी व्याजासह रक्कम अदा करेपर्यंत अतिरिक्त द.सा.द.शे. 9% व्याजासह अदा करावेत.
5. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक त्रास व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रु. 15,000/- (रु. पंधरा हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
6. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 01/01/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.