::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-18 फेब्रुवारी, 2017)
01. उभय तक्रारदारानीं प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली पोस्ट ऑफीस तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) व विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द सेवेत कमतरता ठेवल्या बद्दल मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती क्रं-1) श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा ही मृतक श्री गुरुचरण कारला यांची विधवा पत्नी आहे तर तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनीत अनुदीप कालरा ही त्यांची सुन आहे. श्री गुरुचरण कालरा यांचा मृत्यू दिनांक-10/04/2005 रोजी झाला. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि सेव्हींग्स बँक, जीपीओ, नागपूर कार्यालयातील अनुक्रमे पोस्ट मास्तर व असिस्टंट पोस्ट मास्तर आहेत.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, दिनांक-22/08/2003 ला श्री गुरुचरण कारला (सध्या मृतक) आणि त्यांची सुन म्हणजे तक्रारीकर्ती क्रं-2) सौ.पुनित अनुदिप कालरा हयांनी संयुक्तिकरित्या विरुध्दपक्ष पोस्ट खात्या मध्ये एम.आय.एस. (Monthly Income Scheme) योजने अंतर्गत सहा वर्षाचे कालावधी करीता एकूण रक्कम रुपये-6,00,000/- ची गुंतवणूक केली होती, त्या खात्याचा क्रं-12068 असा असून त्याची परिपक्वता देय तिथी-22.08.2009 (Maturity date) अशी आहे. या योजने अंतर्गत त्यांना प्रतीमाह रुपये-4000/- प्रमाणे व्याज मिळणार होते आणि सहा वर्षाचे कालावधी नंतर परिपक्वता तिथीला गुंतवणूक केलेली रक्कम रुपये-6,00,000/-
10% दराने बोनस यासह मिळणार होती. परंतु परिपक्वता तिथी -22.08.2009 पूर्वीच त्यातील एक खातेदार श्री गुरुचरण कालरा यांचा दिनांक-10/04/2005 रोजी मृत्यू झाला. श्री गुरुचरण कालरा यांचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा ही त्यांची कायदेशीर वारसदार आहे. दिनांक-02/11/2005 ला तक्रारदारांनी विरुध्दपक्ष पोस्ट कार्यालयाला श्री गुरुचरण कालरा यांचे मृत्यू बद्दल कळविले, त्यावरुन विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे तक्रारकर्ती क्रं-1) श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा हिचे नाव मृतक श्री गुरुचरण कालरा यांचे जागी लिहिले, त्यावेळी तिला विरुध्दपक्षा तर्फे असे सांगण्यात आले की, जर तिने एम.आय.एस. खात्यातील रक्कम काढली नाही तर योजने अंतर्गत परिपक्वता तिथी नंतर देय असलेले संपूर्ण लाभ मिळतील.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, जुन-2006 मध्ये विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे तक्रारदारांच्या नावे नविन खाते क्रं-882738 उघडून त्यामध्ये एम.आय.एस. योजने अंतर्गत प्रतीमाह रुपये-4000/- प्रमाणे व्याजाची रक्कम खात्यात जमा करणे सुरु केले व ते परिपक्वता तिथी पर्यंत जमा केले. दिनांक-27/12/2010 ला तक्रारकर्त्यांनी एम.आय.एस. खाते परिपक्व झाल्यामुळे बंद केले व विरुध्दपक्ष पोस्ट खात्याकडे एम.आय.एस. खात्यात गुंतवणूक केलेली रक्कम रुपये-6,00,000/- त्यावरील देय बोनस व व्याजासह देण्याची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे रुपये-1,06,000/- एवढया रकमेची वजावट करुन तक्रारकर्त्यांना केवळ रुपये-5,85,775/- दिलेत. विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे एम.आय.एस. योजने अंतर्गत केवळ रुपये-3,00,000/- च्या रकमेवर रुपये-30,000/- चा बोनस तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनित कालरा हिला दिला परंतु एम.आय.एस. योजने अंतर्गत उर्वरीत रक्कम रुपये-3,00,000/- वर देय बोनसची रक्कम रुपये-30,000/- दिली नाही. तसेच रुपये-3,30,000/-वर परिपक्वता दिनांक-22/08/2009 पासून ते दिनांक-27/12/010 पर्यंत एकूण 16 महिन्याची येणारी व्याजाची रक्कम रुपये-15,400/- एवढी येते, ती सुध्दा दिलेली नाही. अशाप्रकारे एम.आय.एस. योजने अंतर्गतची रक्कम रुपये-1,06,000/- अधिक बोनसची रक्कम रुपये-30,000/- आणि सोळा महिन्याचे व्याजाची रक्कम रुपये-15,400/- असे मिळून एकूण रुपये-1,51,400/- एवढी रक्कम
तक्रारदारांना द्दावयास हवी होती जी विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे न दिल्यामुळे त्यांचे सेवेत कमतरता ठेवली आहे म्हणून या तक्रारीव्दारे तक्रारदारांनी रक्कम रुपये-1,51,400/- वार्षिक 18 टक्के व्याज दराने मागितली असून झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-2,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- ची मागणी केली आहे.
03. विरुध्दपक्ष पोस्ट खात्यातर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर करण्यात आले. त्यांनी आपल्या उत्तराव्दारे तक्रार नामंजूर केली परंतु हे मान्य केले की, श्री गुरुचरण कालरा (सध्या मृतक) आणि त्यांची सुन म्हणजे तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनित कालरा यांनी संयुक्तिकपणे एम.आय.एस.योजने मध्ये एकूण रुपये-6,00,000/- एवढया रकमेची गुंतवणूक केली होती आणि त्याची परिपक्वता तिथी 22/08/2009 अशी होती. एम.आय.एस. योजने अंतर्गत त्यावर प्रतीमाह रुपये-4000/- प्रमाणे व्याज आणि परिपक्वता तिथी नंतर गुंतवणूक केलेली रक्कम 10% बोनससह देय होती परंतु त्यातील एक खातेदार श्री गुरुचरण कारला यांचा परिपक्वता तिथी पूर्वीच म्हणजेच दिनांक-10/04/2005 रोजी मृत्यू झाल्यामुळे ते एम.आय.एस. खाते हे संयुक्तिक खाते न राहता एकल खाते म्हणून मृत्यूचे दिनांका पासून नियमा नुसार ग्राहय धरल्या गेले. पोस्ट खात्याच्या नियमा नुसार एकल खात्या मध्ये गुंतवणूकीची जास्तीत जास्त मर्यादा ही रुपये-3,00,000/- एवढी असल्यामुळे त्या रकमेवर त्यातील हयात खातेदार म्हणजे तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनित कालरा ही प्रतीमाह रुपये-2000/- प्रमाणे नियमा नुसार व्याज मिळण्यास पात्र होती व आहे परंतु तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनित कालरा हिने एकल खात्या मध्ये, तक्रारकर्ती क्रं-1) श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा यांचे नाव टाकून त्याला संयुक्त खाते दर्शविले आणि त्यावर प्रतीमाह रुपये-4000/- प्रमाणे मासिक व्याजाची रक्कम ते घेत गेले. दिनांक-27/12/2010 ल तक्रारकर्त्यांनी एम.आय.एस. खाते बंद करण्याचा अर्ज दिला आणि त्यावेळी ही बाब विरुध्दपक्षचे लक्षात आली. त्यामुळे विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे दिलेली रक्कम ही नियमा नुसार योग्य असून तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. तक्रारदारांची तक्रार तसेच विरुध्दपक्ष पोस्ट खात्याचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. सुरुवातीला एम.आय.एस. खाते हे श्री गुरुचरण कालरा (सध्या मयत) आणि त्यांची सुन म्हणजे तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनीत अनुदिप कालरा यांचे नावे संयुक्तिक होते आणि सदर खात्याचे परिवक्वता दिनांकाचे पूर्वीच त्यातील एक खातेदार श्री गुरुचरण कालरा यांचा मृत्यू झाला या बद्दल वाद नाही. तसेच हे पण वादातीत नाही की, त्या संयुक्तिक खात्या मध्ये रुपये-6,00,000/- एवढया रकमेची गुंतवणूक सहा वर्षाचे कालावधी करीता करण्यात आली होती आणि सदर गुंतवणूकीवर प्रतीमाह रुपये-4000/- प्रमाणे व्याज सहा वर्षा करीता देय होते.
06. विरुध्दपक्ष पोस्ट खात्याच्या वकीलांनी “POST MANUAL VOL-I, RULE-8” यातील तरतुद आमच्या निदर्शनास आणून दिली, जी एम.आय.एस.संयुक्तिक खात्यातील एका खातेदाराचा मृत्यू झाल्या नंतर लागू होते. या नियम-08 प्रमाणे एम.आय.एस. खात्यातील संयुक्त खातेदारा पैकी जर एकाचा मृत्यू झाला तर ते संयुक्त खाते (Joint Account) न राहता हयात खातेदाराच्या नावे “एकल खाते” (Single Account) मृत्यूचे दिनांका पासून(From the death of Account holder) ग्राहय धरल्या जाते आणि संबधित पोस्ट मास्तर/सबपोस्ट मास्तर यांनी एम.आय.एस.संयुक्त खात्यातील एका खातेदाराचा मृत्यू झाल्या नंतर हयात खातेदाराला ते खाते आता संयुक्त खाते राहिलेले नसून मृत्यू दिनांका पासून ते एकल खाते झालेले आहे आणि अशाप्रकारे झालेल्या एकल खात्या मध्ये विहित रुपये-3,00,000/- रक्कमे पेक्षा जास्तीच्या जमा असलेल्या रकमेवर खातेदाराच्या मृत्यू दिनांका पासून व्याज देय होणार नसल्याने अशी जास्तीची जमा असलेली रक्कम काढून घेण्यास सुचित केले पाहिजे, अशी तरतुद आहे.
07. एम.आय.एस. योजने अंतर्गत संयुक्त खात्यातील एका खातेदाराचा मृत्यू झाल्या नंतर ते मृत्यूचे दिनांका पासून एकल खाते होते आणि अशाप्रकारे एकल खाते झालेल्या खात्यामधील जास्तीच्या रकमेवर जर अगोदर चुकीने व्याज दिल्या गेले असेल तर अशी जास्तीची दिलेली व्याजाची रक्कम परत घेतल्या जाईल किंवा परिपक्वता तिथी नंतर देय होणा-या रकमे मधून अशी जास्तीची दिलेली व्याजाची रक्कम समायोजित (Adjusted) करण्यात येईल आणि ते संयुक्तिक खाते एकल खाते म्हणून ग्राहय धरल्या जाईल .
08. या नियमा नुसार श्री गुरुचरण कारला (सध्या मृतक) आणि तक्रारकर्ती क्रं-2) सौ. पुनित कारला यांचे संयुक्त खाते हे त्यातील एक खातेदार श्री गुरुचरण कारला यांचे मृत्यू दिनांक-10/04/2005 पासून एकल खाते झालेले आहे. “POST OFFICE (MIS) RULES-1987, RULE-4” नुसार एका खातेदाराला एम.आय.एस. खात्या मध्ये रक्कम गुंतवणूकीची मर्यादा दिलेली आहे, त्यानुसार एकल खात्यामध्ये (Single Account) जास्तीत जास्त (Maximum) रुपये-3,00,000/- आणि संयुक्तिक खात्यामध्ये रुपये-6,00,000/- एवढी गुंतवणूकीची मर्यादा दिलेली आहे.
09. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, संयुक्त एम.आय.एस. खात्यातील एक खातेदार श्री गुरुचरण कालरा यांचा दिनांक-10/04/2005 रोजी मृत्यू झाल्या नंतर त्यांनी विरुध्दपक्ष पोस्ट खात्याला दिनांक-02/11/2005 रोजी म्हणजे 06 महिन्या नंतर त्यांचे मृत्यूची सुचना दिली आणि त्यानंतर विरुध्दपक्ष पोस्ट खात्याने त्यांची पत्नी म्हणजे तक्रारकर्ती क्रं-1) श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा हिचे नाव मृतक श्री गुरुचरण कालरा यांचे जागी एम.आय.एस.खात्यामध्ये नोंदविले. परंतु ही बाब विरुध्दपक्ष पोस्ट खात्या तर्फे नाकबुल करण्यात आली. तक्रारदारांनी आपल्या या म्हणण्याचे पुष्टयर्थ एम.आय.एस. खात्याच्या पासबुकाची प्रत दाखल केली आहे, त्याचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, संयुक्त खात्यातील एक खातेदार श्री गुरुचरण कालरा यांचा मृत्यू झाल्यानंतर नियमा नुसार ते खाते एकल खाते झाले होते
आणि दिनांक-02/11/2005 रोजी मृतक खातेदार श्री गुरुचरण कालरा यांचे नावाचे जागेवर तक्रारकर्ती क्रं-1) श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा यांचे नाव टाकून ते खाते संयुक्त खाते आहे दर्शविण्यात आले.
10. आमचे समोर आता प्रश्न असा आहे की, एम.आय.एस. संयुक्त खात्या मधील एका खातेदाराचा मृत्यू झाला तर त्यानंतर ते खाते हयात खातेदाराला दुस-याचे नाव टाकून संयुक्त खाते बनविता येते काय. यावर आमचे लक्ष “GOVT. OF INDIA, MINISTRY OF COMMUNICATION & I.T.DEPARTMENT OF POSTS” यांनी जारी केलेल्या दिनांक-28/01/2004 च्या परिपत्रका कडे वेधले. या परिपत्रका नुसार आमचे समोरील उपस्थित प्रश्नाचे उत्तर “ होकारार्थी ” द्दावे लागेल. परंतु त्या नंतर दिनांक-22/03/2004 च्या परिपत्रकान्वये ते दिनांक-28/01/2004 चे परिपत्रक रद्द केले. याचाच अर्थ असा आहे की, संयुक्त खात्यातील एका खातेदाराचा मृत्यू झाल्या नंतर त्याचे मृत्यूचे दिनांका पासून ते एकल खाते राहिल आणि हयात खातेदाराला अशा एकल झालेल्या खात्यामध्ये केवळ जास्तीत जास्त रुपये-3,00,000/- च्या रकमेवर देय असलेले व्याज व बोनस मिळेल. एम.आय.एस. योजने अंतर्गत असा कुठलाही नियम नाही ज्याव्दारे हयात एका खातेदाराला रुपये-3,00,000/- पेक्षा जास्त रकमेवर व्याज मिळण्याची तरतुद आहे आणि असे जास्तीचे व्याज दिल्या गेले असेल तर ते तक्रारकर्त्या कडून परत घेण्याची तरतुद केली आहे.
11. हातातील प्रकरणा मध्ये असलेल्या समान वस्तुस्थितीवर मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने “The Sub-Post Master, Kandivali East-Versus-Mrs. Geeta Yogesh Vachharajani”-Firtst Appeal No.—A/12/316, Order dated-22/04/2013 या अपिलीय प्रकरणात निवाडा दिला आहे, त्या नुसार मा.राज्य ग्राहक आयोगाने असे म्हटले आहे की, एम.आय.एस. योजने अंतर्गत जर संयुक्तीक खात्या पैकी एका खातेदाराचा मृत्यू झाला तर ते संयुक्त खाते एका खातेदाराच्या मृत्यूचे दिनांका पासून एकल खाते होते आणि हयात खातेदाराला अशा एकल झालेल्या खात्यात जास्तीत जास्त रुपये-3,00,000/- एवढया रकमेवर व्याज आणि बोनस मिळू शकते पण रुपये-3,00,000/- मर्यादे पेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा असेल
तर त्यावर हयात खातेदाराला त्या जास्त रकमेवर कुठलेही व्याज किंवा बोनस देय नाही. त्या प्रकरणात ग्राहक मंचाने तक्रार मंजूर केली होती परंतु मा.राज्य ग्राहक आयोगाने मंचाचा निर्णय चुकीचा व अयोग्य असल्याने रद्दबातल केला आणि तक्रार खारीज केली होती.
12. उपरोक्त नमुद न्यायनिवाडयाचा आधार घेतला तर असे म्हणता येईल की, सदर्हू तक्रारी मध्ये श्री गुरुचरण कालरा आणि तक्रारकर्ती क्रं-2) सौ. पुनित कालरा यांचे नावे जे संयुक्त खाते होते, त्यामधील एक खातेदार श्री गुरुचरण कालरा यांचे मृत्यू नंतर ते एकल खाते झाले आणि अशा एकल झालेल्या खात्यात हयात खातेदार म्हणजे तक्रारकर्ती क्रं-2) सौ.पुनित कालरा ही फक्त रुपये-3,00,000/- रकमेवर व्याज आणि बोनस मिळण्यास पात्र होती परंतु तिने मृतक श्री गुरुचरण कालरा यांचे मृत्यू नंतर रुपये-6,00,000/- एवढया रकमेवर व्याज घेतलेले आहे, जे नियमा नुसार चुकीचे आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष पोस्ट खात्याने खाते परिपक्व झाल्या नंतर देय असलेल्या रकमे मधून जास्तीची व्याजाची घेतलेली रक्कम वसुल केलेली आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष पोस्ट खात्याने घेणे असलेल्या रकमेची कपात करुन उर्वरीत रक्कम देण्या मध्ये काही चुक केली किंवा सेवेत कमतरता ठेवली असे म्हणता येणार नाही, सबब ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
13. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारदार क्रं-1) श्रीमती तृप्ती गुरुचरण कालरा आणि क्रं-2) सौ.पुनीत अनुदिप कालरा यांची विरुध्दपक्ष क्रं-1) डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडीया आणि सेव्हींग्स बँक, जी.पी.ओ., सिव्हील लाईन्स, नागपूर अधिक-01 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.