रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 3/2012
तक्रार दाखल दि.19/01/2012
न्यायनिर्णय दि.- 01/01/2015
1. श्री. बावतीस इतास फर्नांडीस,
2. श्रीमती एलिझाबेद बावतीस फर्नांडीस,
3. कु. इडन बावतीस फर्नांडीस.
सर्व रा. अलिबाग बाजारपेठ, अलिबाग, ..... तक्रारदार
विरुध्द
1. गायत्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
3 / बी, विंग, कामथवाडी, ठिकरुळ नाका,
अलिबाग. जि. रायगड.
2. चेअरमन, श्री. विलास जनार्दन पाटील,
3. सेक्रेटरी श्रीमती अनिता विलास पाटील,
पत्ता -3 / बी, विंग, कामथवाडी, ठिकरुळ नाका,
अलिबाग. जि. रायगड. ..... सामनेवाले
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. एस. डी. पाटील
सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश
-न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस मुदत ठेव खात्यामधील रक्कम परत न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारक्र. 1 ते 3 यांनी सामनेवाले यांचेकडे खालीलप्रमाणे मुदतठेवी ठेवल्या होत्या.
तक्रारदार क्र. 1 यांनी केलेली गुंतवणूक :-
अ.क्र. | मुदतठेव प्रमाणपत्र / खाते क्रमांक | मुदतठेव दिनांक | मूळ रक्कम रु. | मुदत संपण्याचा दिनांक | मिळणारी रक्कम रु. (11% व्याज आकारुन) |
1 | क्र. 346 | 04/05/2011 | 1,50,000/- | 04/05/2012 | 1,66,500/- |
अ.क्र. | स्वल्प बचत पासबुक / खाते क्रमांक | मुदतठेव दिनांक | मूळ रक्कम रु. | मुदत संपण्याचा दिनांक | मिळणारी रक्कम रु. (5% व्याज आकारुन) |
1 | क्र. 348 | 26/04/2011 | 81,200/- | 26/04/2012 | 85,260/- |
तक्रारदार क्र. 2 यांनी केलेली गुंतवणूक :-
अ.क्र. | मुदतठेव प्रमाणपत्र / खाते क्रमांक | मुदतठेव दिनांक | मूळ रक्कम रु. | मुदत संपण्याचा दिनांक | मिळणारी रक्कम रु. (11% व्याज आकारुन) |
1 | क्र. 365 | 03/10/2011 | 1,00,000/- | 03/10/2012 | 1,11,000/- |
अ.क्र. | स्वल्प बचत पासबुक / खाते क्रमांक | मुदतठेव दिनांक | मूळ रक्कम रु. | मुदत संपण्याचा दिनांक | मिळणारी रक्कम रु. (5% व्याज आकारुन) |
1 | क्र. 349 | 26/04/2011 | 60,900/- | 26/04/2012 | 63,945/-/- |
तक्रारदारक्र. 3 यांनी केलेली गुंतवणूक :-
अ.क्र. | स्वल्प बचत पासबुक / खाते क्रमांक | मुदतठेव दिनांक | मूळ रक्कम रु. | मुदत संपण्याचा दिनांक | मिळणारी रक्कम रु. (5% व्याज आकारुन) |
1 | क्र. 350 | 26/04/2011 | 60,900/- | 26/04/2012 | 63,945/-/- |
3. त्याप्रमाणे विहीत कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मुदतठेवी परत न दिल्याने सामनेवाले यांच्याशी तक्रारदारांनी संपर्क साधला असता, सामनेवाले यांचे कार्यालय बंद पडले असून रक्कम परत न मिळण्याचे तक्रारदारांना समजल्याने तक्रारदारांनी मुदतठेव रक्कम परत मिळणेकामी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले यांना मंचाने नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. परंतु मंचाची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले मंचासमक्ष हजर न झाल्याने व त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत. सामनेवाले क्र. 4 ते 16 यांना तक्रारीतून वगळण्यात आले आहे.
5. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व तक्रारदारांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
कराराप्रमाणे तक्रारदाराच्या मुदतठेव रक्कमा मुदतपूर्तीनंतरही परत
अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार
सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 ते 3 वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस
नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा-
6. मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांकडून मुदतठेवीची रक्कम स्वीकारतेवेळी सदर रक्कम मुदतीनंतर परत देण्याचे अभिवचन सामनेवाले यांनी तक्रारदारास दिले होते. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी जमा रक्कम तक्रारदारांस अदा करणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांस कोणतीही सूचना न देताच व्यवहार बंद केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सामनेवाले यांचे हे कृत्य निश्चीतच तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब असल्याचे सिध्द होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांस मुदतठेव रक्कम मुदतपूर्तीनंतर अदा करण्यास कोणतीही उपाययोजना न केल्याने मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे गुंतविलेली रक्कम कालांतराने आवश्यक असल्याने ती विहित कालमर्यादेनंतर प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांस कोणतीही सूचना न देताच व्यवहार बंद केल्याने तक्रारदारांना विहित कालमर्यादेनंतर सदरील रक्कम प्राप्त होऊ न शकल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सबब, सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 ते 3 यांना नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
8. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 3/2012 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 ते 3 यांना कराराप्रमाणे मुदतठेव रक्कम मुदतपूर्तीनंतरही अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 ते 3 यांना एकत्रितपणे रक्कम रु. 4,53,000/- (रु. चार लाख त्रेपन्न हजार मात्र) कराराप्रमाणे देय असलेल्या व्याज रकमेसह या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
4. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 ते 3 यांना तक्रार खर्च, मानसिक व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रु. 25,000/- (रु. पंचवीस हजार मात्र) प्रत्येकी या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
5. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 01/01/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.