रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 87/2014
तक्रार दाखल दि. 24/09/2014
न्यायनिर्णय दि.- 31/01/2015
श्री. आनंद सावळाराम दळवी,
रा. ए/30/30, देवीकृपा, सेक्टर 7,
खांदा कॉलनी, न्यू पनवेल, जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
1. मे. साई एंटरप्रायझेस कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि.,
शॉप नं. 23, पूजा कॉम्प्लेक्स,
सेक्टर 17, पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोर,
बिकानेर स्वीटसच्या जवळ, न्यू पनवेल.
2. श्री. हनुमंत नामा पाटील, डायरेक्टर,
मे. साई एंटरप्रायझेस कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि,
शॉप नं. 23, पूजा कॉम्प्लेक्स,
सेक्टर 17, पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोर,
बिकानेर स्वीटसच्या जवळ, न्यू पनवेल.
3. श्री. अनिल डी. ननावरे, डायरेक्टर,
मे. साई एंटरप्रायझेस कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि,
शॉप नं. 23, पूजा कॉम्प्लेक्स,
सेक्टर 17, पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोर,
बिकानेर स्वीटसच्या जवळ, न्यू पनवेल.
4. श्री. सुलतान एम. मुजावर, डायरेक्टर,
मे. साई एंटरप्रायझेस कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि,
शॉप नं. 23, पूजा कॉम्प्लेक्स,
सेक्टर 17, पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोर,
बिकानेर स्वीटसच्या जवळ, न्यू पनवेल. .... सामनेवाले क्र. 1 ते 4
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. श्रीमती उल्का अं. पावसकर, सदस्या
मा. श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी, सदस्य
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. आर. एस. जगताप.
सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस सदनिकेचा नोंदणीकृत करारानामा न करुन व विहीत मुदतीत ताबा न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 ते 4 यांचेकडून “साईसंकुल ”, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 500 चौ.फूट क्षेत्रफळाची सदनिका एकूण रक्कम रु. 11,25,000/- मध्ये खरेदी करण्याचा करारनामा दि. 29/08/12 रोजी केला होता. सदर करारनाम्याप्रमाणे सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांकडून एकूण रक्कम रु. 3,50,000/- दि. 17/01/12 ते 21/04/13 पर्यंत स्विकारले. तक्रारदारांनी वेळोवेळी सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा व ताबा देण्याची विनंती करुन देखील सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांस सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न करुन व ताबा न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले क्र. 1 ते 4 यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. परंतु मंचाची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले क्र. 1 ते 4 मंचासमक्ष हजर न राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व त्यांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या
तक्रारदारास कराराप्रमाणे सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न नोंदवून
देऊन व ताबा न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 ते 4 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांस
नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारासोबत दि. 29/08/12 रोजी केलेल्या करारनाम्यामध्ये सदनिका विक्री व्यवहारापोटी एकूण रक्कम रु. 3,50,000/- स्विकारल्याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल आहे. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी सदनिका विक्री करार नोंदणीकृत करण्यासाठी मोफा कायद्यातील तरतूदीनुसार कोणतीही उपाययोजना न केल्याने तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 ते 4 यांस वकीलांमार्फत दि. 10/07/14 रोजी नोटीस पाठवून सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करावा व ताबा देण्याविषयी विनंती करुन देखील सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना प्रतिउत्तर दिले नाही. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदाराकडून सदनिका व्यवहाराची रक्कम स्विकारल्यानंतर पावती अदा केली आहे. त्याप्रमाणे सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी अनोंदणीकृत करारनाम्यातील अटी व शर्तींप्रमाणे सदनिका व्यवहाराची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी तक्रारदारांस कोणताही पत्रव्यवहार केला नाही. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारास उर्वरित रक्कम मागणी करणारे पत्रही पाठविलेले नाही. तसेच तक्रारदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील त्याबाबत सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी योग्य ती कार्यवाही केल्याचे पुरावे कागदोपत्री दाखल नाहीत. सबब, सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारास सदनिका व्यवहाराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 ते 4 तक्रारदारांकडून सदनिकेची अंशतः रक्कम स्विकारुन सदनिकेचा ताबा विहीत मुदतीत न देऊन तक्रारदाराचे आर्थिक नुकसान होईल असे कृत्य केले आहे. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदाराकडून स्विकारलेली रक्कम स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरुन तक्रारदाराचे आर्थिक नुकसान केले आहे. तक्रारदारांनी सदनिकेचा करार नोंदणीकृत करण्यासाठी सामनेवाले क्र. 1 ते 4 यांना लेखी सूचना देऊनही सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही न करुन तक्रारदारास मानसिक त्रास हाईल असे कृत्य केले आहे. ही बाबही कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 87/2014 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना कराराप्रमाणे सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न करुन देऊन व सदनिकेचा ताबा विहीत मुदतीत न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना “साईसंकुल ”, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 500 चौ.फूट क्षेत्रफळाच्या सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत करुन द्यावा.
4. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1 ते 4 यांना “साईसंकुल”, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 500 चौ.फूट क्षेत्रफळाच्या सदनिकेच्या करारनाम्याप्रमाणे उर्वरित रक्कम वर नमूद क्र. 3 मधील बाबीची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांत अदा करावेत.
5. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना “साईसंकुल”, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 500 चौ.फूट क्षेत्रफळाच्या सदनिकेचा कायदेशीर ताबा सर्व सोयी सुविधांसह या आदेशप्राप्ती दिनांकापासून 60 दिवसांत द्यावा.
6. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 3 व 4 मधील आदेशाचे पालन विहित मुदतीत करणे शक्य नसल्यास तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 ते 4 यांना सदनिका विक्री व्यवहारापोटी अदा केलेली रक्कम रु. 3,50,000/- (रु. तीन लाख पन्नास हजार मात्र) दि. 21/04/2013 पासून दि. 31/01/15 पर्यंत द.सा.द.शे. 6% व्याजासह या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
7. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 6 मधील आदेशाचे पालन विहित मुदतीत करणे शक्य नसल्यास त्यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे रक्कम रु. 3,50,000/- (रु. तीन लाख पन्नास हजार मात्र) तक्रारदारांना अदा करेपर्यंत दि. 21/04/2013 पासून द.सा.द.शे. 9% व्याजासह अदा करावी.
8. सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक त्रास व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
9. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 31/01/2015.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.