तक्रारदार - अॅड.श्री. जाधव
जाबदार क्र. 1 तर्फे - अॅड.श्री.लोणकर
जाबदार क्र. 2 - लेखी कैफियत दाखल
जाबदार क्र. 3 - लेखी कैफियतदाखल
// निकालपत्र //
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 22/08/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदारांनी विलंब माफीचा अर्ज दि. 21/2/2013 रोजी तक्रारीसोबत दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराच्या पतीचे दि. 05/06/2008 रोजी अपघाती निधन झाले. ते शेतकरी होते. त्यांनी दि. 29/05/2009 रोजी विम्याचा अर्ज जाबदार ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीकडे पाठविला. अदयापपर्यंत जाबदार ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी यांनी तो मंजूर केला नाही. तक्रारदार त्यांच्या विलंब माफीच्या अर्जामध्ये तक्रार दाखल करताना काहीसा उशीर झाला आहे. हा उशीर जाणून-बुजून किंवा मुद्दाम किंवा हेतुपुरस्सर केलेला नसून जाबदार ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी यांच्या चुकीच्या सेवेमुळे व मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे झालेला आहे असे म्हणतात. तसेच विनंती कलमामध्ये (prayer clause) उशीर 2 वर्षे 8 महिने, 16 दिवस हा इतका उशीर माफ करावा असे म्हणतात.
2. जाबदार ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीने यावर त्यांचे म्हणणे दाखल केले. ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी तक्रारदाराची सर्व कथने खोटी आहेत असे म्हणतात. तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास तक्रारदारास 2 वर्षे 8 महिने 16 दिवस हा विलंब झाला म्हणतात, त्यासाठी त्यांनी कुठलेही कारण दिलेले नाही. ग्राहक संरक्षण कायदयाच्या 24 (A) कलमा नुसार हा अर्ज खर्चासहित नामंजूर करावा.
3. जाबदार कृषि अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, तालुका कृषि अधिकारी यांच्या रेकॉर्डवरुन तक्रारदाराचा क्लेम या कार्यालयाला प्राप्त न झाल्या कारणाने या दाव्याबद्दल काहीही सांगण्यास असमर्थ आहेत.
4. जाबदार कबाल इन्श्युरन्स कंपनीने त्यांचे म्हणणे दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार शेतक-याचा अपघाती मृत्यू दि.05/06/2008 रोजी झाला. त्यांचा क्लेम तहसिल भोर कार्यालयामार्फत पुणे येथे दि.22/5/2009रोजी प्राप्त झाला. त्यानंतर ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीने दि. 19/6/2009 रोजीच्या पत्राद्वारे 6/क, जुना फेरफार पत्र, वयाचा पुरावा, बँक पासबुक झेरॉक्स इत्यादीची मागणी केली. त्याची पूर्तता न झाल्यामुळे आहे त्या स्थितीत हा क्लेम ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीला दि. 29/5/2009 रोजी पाठविला असता ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीने दि.15/12/2009रोजी दावा नामंजूर केला व शेतक-याच्या वारसास कळविले आहे, ते पत्रसुध्दा त्यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत जोडलेले आहे.
5. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार आणि विलंब माफीचा अर्ज दि.21/2/2013 रोजी दाखल केल्याचे दिसून येते. विलंब माफीच्या अर्जामध्ये तक्रारदार त्यांच्या पतीचे दि.05/06/2008 रोजी अपघाती निधन झाल्याचे नमुद करतात. त्यानंतर त्यांनी दि. 29/05/2009 रोजीच जाबदार ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी यांचेकडे दावा अर्ज दाखल केल्याचे म्हणतात. परंतु अदयापही त्यांना कुठलेही मंजूरीचे पत्र आलेले नाही. 2 वर्षे 8 महिने 16 दिवस इतका विलंब झाल्याचे म्हणतात. वास्तविक त्यांनी जाबदार ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनी यांचेकडे दि.29/5/2009 रोजी दावा दाखल केला. तक्रारदारांनी कबाल इन्श्युरन्स कंपनीकडून ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीस कागदपत्रे मिळाल्याबद्दलचा पाठपुरावा कधी केला त्या तारखा मांडावयास हव्या होत्या. असे न करता, अचानक 2 वर्षे 8 महिने 16 दिवस एवढया अवधीचा विलंब माफ करावा असे म्हणतात. त्याचे कुठलेही स्पष्टीकरण, समर्पक कारण व्यवस्थितरित्या स्पष्ट केले नाही. तसेच संपूर्ण तक्रार व विलंब माफीच्या अर्जामध्ये घटना घडल्याच्या कारणाचा (cause of action) दिनांक नमुद केला नाही. कबाल इन्श्युरन्स कंपनीने त्यांच्या म्हणण्यामध्ये ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीचे क्लेम नाकारल्याचे पत्र दाखल केले आहे. यावरुन ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीने दि. 15/12/2009 रोजीच त्यांचा दावा नामंजूर केल्याचे दिसून येते. परंतु याबद्दलचा उल्लेख ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या लेखी जबाबामध्ये किंवा त्यांच्या अर्जावरील म्हणण्यामध्ये दिसून आला नाही. म्हणजे ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीसुध्दा याबद्दल अनभिज्ञ आहे. तक्रारदारांनी त्यांचा विलंब माफीचा अर्ज योग्यरितीने, योग्य त्या कारणासहित स्पष्टीकरणासहित दिलेला नाही, झालेला विलंब हा स्पष्ट केलेला नाही, ग्राहक संरक्षण कायदा कलम, 24-A नुसार तक्रारदारांचा तक्रार अर्ज दोन वर्षांच्या आतील नाही, म्हणून मंच विलंब माफीचा अर्ज नामंजूर करते. त्याचसोबत तक्रार अर्जही नामंजूर करण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1 तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज क्र. एम्.ए./13/11 नामंजूर
करण्यात येत आहे. त्याचसोबत तक्रार अर्ज क्र.एपीडीएफ/13/49
ही नामंजूर करण्यात येत आहे.
2 खर्चाबद्दल काही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.