तक्रार क्र. सी.सी./2016/283
दाखल दिनांक : 19/05/2016
निकाल दिनांक : 07/09/2017
श्री. विकास वासुदेव पाठक .. )
रा. : व्दारा- एल.आय.सी. स्टॉफ कॉर्टर, .. )
ब्लॉक नं.8/9, गणपती मंदिराजवळ,, .. )
औंध रोड, खडकी, पुणे-411 003 .. ) ... तक्रारदार
विरुद्ध
1. डॉ. चंद्रशेखर गुरुजी, .. )
रा. सरळ वास्तु, सी.जी. परिवार मुख्य सेंटर, .. )
प्लॉट नं. एल-86,टी.टी.सी. .. )
इंडस्टि्रयल एरिया, एम.आय.डी.सी. .. )
महापे, नवी मुंबई – 400 709 .. )
2. गुरुजी वास्तु कन्सलटंन्सी ऑडिटेड 13-14, .. )
रा.:फ्लम्ट नं.3, दुसरा मजला, .. )
शिवकृपा अपार्टमेंट, 45/7, .. )
शिला विहार कॉलनी, पौड फाडा, कोथरुड, .. )
पुणे – 411 0038 .. ) .... जाबदेणार
तक्रारदार स्वत: हजर
जाबदेणार क्र. 1 व 2 तर्फे अँड त्रिशला बी. येलवे हजर
************************************************************************
द्वारा मा. श्री. ओंकार पाटील, सदस्य
**( निकालपत्र) **
( 07/09/2017)
1. प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणारविरुद्ध सेवेतील त्रुटीसंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदार हे पुण्याचे रहिवासी असून जाबदेणार हे ‘सरल वास्तू’ या नावाने वास्तु सल्लागार म्हणून व्यवसाय करतात. ग्राहकांना सुखी होण्यासाठी काही वस्तू विक्री व सल्ला देण्याचा त्याचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने सुखी होण्यासाठी जाबदेणार यांना रक्कम रु.12,000/- दिले. त्याबदल्यात जाबदेणार यांनी तक्रारदारास सेवा होम, घंटा, कासव, पिरॅमिड, श्रीयंत्र, स्फटीके, होकायंत्र, किचन आरसे, लाल कलर बल्ब इ. वस्तू दिल्या. जाबदेणार यांनी सुचविल्याप्रमाणे त्यांची वस्तूंची मांडणी केली आणि सुचविल्याप्रमाणे आचरण केल्यास घरातील, घराबाहेरील वाद मिटतील, कोर्टाचे निकाल तक्रारदाराचे बाजूने लागतील, घरात सुखशांती नांदेल असे जाबदेणार यांनी तक्रारदारास आश्वासन दिले.
तक्रारदार यांनी जाबदेणार यांनी सुचविल्याप्रमाणे वस्तूंची मांडणी केली व सुचविल्याप्रमाणे क्रिया केल्या. परंतु हया वास्तुशास्त्राचा उपयोग केल्यापासून तक्रारदाराचे घरात पती-पत्नीमध्ये वादविवाद वाढले, आजार वाढले, दवाखान्याचा खर्च वाढला, न्यायालयात प्रलंबित दाव्याचे निकाल तक्रारदाराचे विरुध्द लागले. एकूण शारिरीक व मानसिक त्रासामध्ये वाढ झाली.
तक्रारदार यांनी ही बाब जाबदेणार यांचे निदर्शनास वारंवार आणली. परंतु जाबदेणार यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. जाबदेणार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे घरात सुख शांती समृध्दी मिळाली नाही. त्यामुळे जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रूटी केली असून त्यासाठी तक्रारदार यांनी मानसिक त्रासासाठी रक्कम रु.2,00,000/- शारिरीक त्रासासाठी रक्कम रु.50,000/’ आर्थिक झळ साठी रक्कम रु.1,40,000/- फायद्यांपासून वंचित राहील्यामुळे नुकसानभरपाई पोटी रक्कम रु.6,50,000/- व तक्रार खर्चासाठी रक्कम रु.7,000/- मंजूर करावे अशी मागणी केलेली आहे. यासाठी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत करारपत्र, वास्तूशास्त्र, नकाशा हमीपत्र, पावती दाखल केलेली आहे.
3. जाबदेणार क्र. 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर त्यांनी त्यांची लेखी कैफियत दाखल केली आहे. त्यांनी त्यांचे लेखी कैफियत मध्ये तक्रारीतील आरोप अमान्य केले आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार सुखी होण्यासाठी रक्कम रु.12,000/- आकारल्याचे व त्याबदल्यात 11 वस्तू दिल्याचे मान्य केलेले आहे. परंतु वास्तुमध्ये सुचविलेले बदल तक्रारदाराने केलेले नाहीत. तसेच त्यांनी वेगवेगळया जन्मतारखा दिलेल्या आहेत त्यामुळे तक्रारदारास सुख प्राप्त झाले नाही. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर जाबदेणार यांनी त्याला रक्कम रु.6,000/- चा चेक दिलेला होता. परंतु तक्रारदार यांनी ही रक्कम रोख देण्याची मागणी केली परंतु ती जाबदेणार यांनी अमान्य केली. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, दाखल केलेल्या पावत्या, पुरावे व त्यांचे वैयक्तिक कथन तसेच जाबदेणार यांनी दाखल केलेली कैफियत व त्यांच्या वकिलांचे म्हणणे विचारात घेता खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. सदरचे मुद्दे, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय? | होय |
2. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणमिमांसा :
5. तक्रारदार यांनी सुखी संसारासाठी जाबदेणार यांच्या ‘सरल वास्तु’ या वास्तुविषयक सल्ला देणा-या संस्थेकडून रक्कम रु.12,000/- मोबदला देवून 11 वस्तू घेतल्या. जाबदेणार यांनी दिलेल्या सूचनांचे यथाशक्य पालन केल्याचे तक्रारदार कथन करतात. जाबदेणार ‘सरल वास्तु’ यांनी तक्रारदारास दाराची दिशा बदलण्यास सांगितले होते. तक्रारदार हे सरकारी क्वार्टरमध्ये रहात असल्याने त्यांना हा बदल करणे अशक्य आहे. त्यांची कल्पना जाबदेणार यांना होती. वास्तुशास्त्राप्रमाणे वस्तुंचा वापर व उपासना करुन देखील तक्रारदार याना सुख प्राप्त झाली नाहीत उलट त्यांचे पती-पत्नी मध्ये वादविवाद वाढले, कोर्टकचेरीचे निकाल तक्रारदाराचे विरुध्द लागले, तक्रारदारास मानसिक व शारिरीक झाला. जाबदेणार ‘सरलवास्तु’ संस्थेने रक्कम रु.6,000/- तक्रारदारास चेकव्दारे देवू केलेले होते परंतु तक्रारदाराने चेक नाकारुन रोखीने रकमेची मागणी केली. जाबदेणार ‘सरलवास्तु’ संस्थेने ज्याअर्थी 50% रक्कम परतीची पूर्तता करण्याची तयारी दर्शविली त्याअर्थी त्यांनी सुखी संसारासाठी दिलेल्या वस्तुंचा सल्ला व यंत्रे निष्प्रभ ठरल्याचे त्यांनी मान्य केले असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.
समाजामध्ये विविध समस्यांनी ग्रासलेली मंडळी असंख्य आहेत. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अगदी सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्चभ्रु समाजातील मंडळीदेखील अगतिक होवून बाबा, बुवा, महाराज, भविष्यकथन, वास्तुसल्ला याच्या नादी लागतात. या मंडळींनी दिलेले गंडे, दोरे, वास्तुयंत्र यांनी पिडीताचा त्रास हमखास निर्विवादपणे निवारण होतो असे सिध्द करणारे कोणतेही पुरावे ही मंडळी सादर करीत नाहीत. उलट लोकांच्या अगतिकतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेत ही मंडळी त्यांचे आर्थिक, मानसिक शोषण करीत असतात असेच निदर्शनास येते.
सदर प्रकरणामध्येदेखील वास्तुशास्त्राच्या नावाखाली पिडीत व्यक्तीला चिंता निवारणाची आणि सुखप्राप्तीची आशा दाखवून आर्थिक शोषण केल्याचे निदर्शनास येते. तथाकथीत वास्तुशास्त्र हे वास्तविक ‘शास्त्र’ म्हणून निर्विवादपणे मान्यताप्राप्त असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी वास्तुशास्त्राचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण होवून कौशल्य प्राप्त केले आहे. असा कोणताही पुरावा जाबदेणार यांनी विद्यमान मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे ते अनुचित व्यापारी प्रथेचा वापर करतात असे विद्यमान मंचाचे मत आहे. जाबदेणार ‘सरल वास्तू‘ च्या बाजूने या प्रकरणात दाखल केलेला नाही. असंख्य लोकांना सुखप्राप्तीची आशा दाखवून लोकांच्या अगतिकतेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेवून समाजातील असे भोंदू बाबा, बुआ, महाराज, स्वामी, बापू यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा भोंदू व्यक्तिचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे. हे आर्थिक शोषण सुरु असते. त्यात तक्रारदारसारखे अपवादाने अत्यल्प लोक पुढे येवून तक्रार दाखल करतात. अशा अत्यल्प लोकांना 50% मोबदला परत केला तरी असे भ्रामक वास्तुशास्त्र सल्लागार आर्थिकदृष्टया फायद्यातच राहतात.
6. सदर प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून व कागदपत्रे विचारात घेता विद्यमान मंच जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी केली आहे असे जाहीर करीत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
** आदेश **
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज क्र. सीसी/2016/283
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास रक्कम रु.12,000/- या निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत अदा करावी. सदर रक्कम 45 दिवसानंतर अदा केल्यास रक्कम मिळेपर्यंत मूळ रक्कम अधिक त्यावर द.सा.द.शे. 9% व्याज अदा करावे. जाबदेणार यांनी रक्कम अदा केल्यानंतर तक्रारदाराने त्यांच्याकडे जाबदेणार यांनी दिलेल्या वस्तूंपैकी उपलब्ध वस्तू परत कराव्यात.
3. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) मानसिक, शारिरीक त्रास व खर्चापोटी द्यावेत
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 07 /09 /2017
सही/- सही/-
(ओंकार जी. पाटील) (व्ही. पी. उत्पात)
सदस्य अध्यक्ष
mag