तक्रार क्र. सीसी/2017/126
दाखल दिनांक – 11/05/2017
निकाल दिनांक – 15/12/2017
श्री. संभाजी रामचंद्र पुराणे ]
रा. : एच.ए.कॉलनी, ए-19, ]
पिंपरी, पुणे – 400 701 ] तक्रारदार
विरुध्द
1. सौ. प्राची अजय भुते ]
2. श्री. अजय गोविंद भुते ]
3. साईप्रभा गोविंद मेनन ]
कार्यालयीन पत्ता- ]
मेसर्स कल्याणी डेव्हलपर्स ]
524 सदाशिव पेठ,बिझीलॅन्ड बिल्डींग, ]
पुणे – 411 030. ]
4. श्री. सचिन मुकुंद जगताप ]
5. श्री. मधुर सुरेश भोसले ]
कार्यालयीन पत्ता - ]
पॅरामाऊंट रिअँलिटीज, ]
मॉर्डन कॉलेजसमोर, ]
शिवाजीनगर, पुणे – 411 006 ] जाबदेणार
******************************************************************************
तक्रारदार स्वत: हजर
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
******************************************************************************
द्वारा मा. श्रीमती. क्षितीजा कुलकर्णी, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 15 डिसेंबर,2017
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने बांधकाम व्यावसायिका विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] जाबदेणार यांनी मे. कल्याणी डेव्हलपर्स आणि पॅरामाऊंट रिअल्टीज अशी बांधकाम कंपनी स्थापन केली होती. त्यांनी ‘शांती होम’ नावाने रो हाऊस स्कीम करण्याचे ठरविले. जाबदेणार यांनी खेड शिवापूर परिसरात रुपये 6,50,000/- मध्ये रो हाऊस फर्निचर व इतर सुविधांसह मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याचप्रमाणे दैनिक सकाळ व महाराष्ट्र टाईम्स मध्ये याची जाहिरात केली. जाबदेणार क्र. 1 प्राची अजय भूते यांच्या मालकीची जमीन पुणे जिल्हात पुरंदर तालुक्यात वारवाडी गाव येथे गट क्र 124 मध्ये आहे. त्यांच्याकडून जाबदेणार क्र. 2 व 3 यांनी करार करुन जमीन घेतलेली आहे. जाबदेणार यांनी सदर जमीनीतील रो हाऊस विकण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली परंतू कोणतेही रो हाऊस दिले नाही. मात्र या जागेवर अर्धवट बांधकाम करुन ही जागा परस्पर विकण्याचा घाट घातला आहे. तशी जाहीर नोटीस दिनांक 31/5/2014 च्या दैनिक प्रभात मध्ये प्रसिध्द झाली आहे. तक्रारदार यांच्याकडून जाबदेणार यांनी एकूण रक्कम रुपये 4,20,000/- खाली नमूद कोष्टकानुसार घेतलेली आहे-
अ.क्र | पावती/चेक क्र. | दिनांक | रक्कम रुपये | |
1 | 610 | 13/04/2012 | 50,000/- | रोख जमा |
2 | 602 | 06/04/2012 | 60,000/- | चेक 664029 युको बँक |
3 | 1409 | 27/08/2012 | 60,000/- | चेक 231969 युको बँक |
4 | 2378 | 24/05/2013 | 1,00,000/- | रोख जमा |
5 | 2637 | 30/05/2013 | 60,000/- | चेक 231971 युको बँक |
6 | 2789 | 24/05/2014 | 70,000/- | चेक 231974 युको बँक |
7 | 2789 | 24/05/2014 | 20,000/- | रोख जमा |
| एकूण | | 4,20,000/- | |
अशा प्रकारे जाबदेणार यांनी रो-हाऊस न देऊन व रक्कमही परत न करुन न्यूनतम दर्जाची सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना शारिरीक, मानसिक त्रास झाला आहे. सदर रक्कम परत मिळावी, त्याचप्रमाणे त्या रकमेवर द.सा.द.शे 18% व्याज मिळावे, मानसिक व शारिरीक त्रासासाठी रुपये 2,00,000/- व कोर्ट खर्च रुपये 5,000/- मिळावा म्हणून ही तक्रार दाखल केली आहे.
[2] सर्व जाबदेणारांविरुद्ध जाहीर नोटीस बजावूनही गैरहजर राहिले. त्यामुळे प्रस्तूतची तक्रार जाबदेणारांविरुध्द एकतर्फा चौकशीसाठी नेमण्यात आली.
[3] तक्रारदार यांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा, लेखी आणि तोंडी कथने यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुदद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रो-हाऊस न देऊन त्याचप्रमाणे त्यांच्याकडून घेतलेली रक्कम परत न करुन निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे काय ? | होय |
2 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे- मुद्या क्र. 1 व 2
[4] प्रस्तूत प्रकरणात तक्रारदार यांनी आपल्या तक्रारी सोबत शपथपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी भरलेल्या रकमेपोटी जाबदेणार यांनी दिलेल्या पावत्या व कराराची प्रत दाखल केलेली आहे. या कागदपत्रांवरुन तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये रो-हाऊस खरेदी विक्रीचा करार झाला होता व तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 4,20,000/- दिले होते, हे स्पष्ट होते. या प्रकरणात जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रो-हाऊस दिले नाही, त्याचप्रमाणे त्यांनी जमा केलेली रक्कमही परत केली नाही. म्हणून जाबदेणार यांनी निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदर रकमेवर व्याज मागितले आहे त्याचप्रमाणे रु.2,00,000/- नुकसानभरपाई व तक्रारदीचा खर्च मागितला आहे. तक्रारीचे स्वरुप विचारात घेतले असता, जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून घेतलेल्या रकमेखेरीज रुपये 65,000/- शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
वर उल्लेख केलेल्या विवेचनावरुन मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रो-हाऊस न देऊन त्याचप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून रो-हाऊस खरेदीपोटी घेतलेली रक्कम परत न करुन निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे असे जाहिर करण्यात येते.
3. जाबदेणार क्र. 1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिक रित्या तक्रारदार यांना रक्कम रुपये 4,20,000/-[ रुपये चार लाख वीस हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
4. जाबदेणार क्र. 1 ते 5 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 65,000/- [रुपये पासष्ठ हजार फक्त ] तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रुपये 1000/- [ रुपये एक हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. वर नमूद आदेशाची पूर्तता विहीत कालावधीत न केल्यास संपूर्ण रकमेवर रक्कम दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यन्त द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे.
6. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
7. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 15/डिसेंबर/2017
सही सही सही
(क्षितीजा कलकर्णी) (ओंकार जी. पाटील) (व्ही. पी. उत्पात)
सदस्य सदस्य अध्यक्ष
mag