निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/11/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 07/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 30/10/2012 कालावधी 10 महिने, 23 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
प्रतिभा भ्र.नारायण काळबांडे. अर्जदार
वय 24 वर्षे.धंदा.घरकाम. अड.एम.टी.पारवे.
रा.बरबडी.ता.पूर्णा जि.परभणी.
विरुध्द
1 व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.
11 रिलायन्स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड, मुंबई – 400 028.
2 व्यवस्थापक.
कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
विभागीय कार्यालय भास्करायन,
एच.डी.एफ.सी.होम बिल्डींग.
प्लॉट नं.7,सेक्टर इ.1 टाऊन सेंटर सिडको,औरंगाबाद.
3 मा.तहसिलदार साहेब,
तहसिल कार्यालय,पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.रेखा कापडिया.प्र.अध्यक्षा.)
अर्जदाराचे पती शेतकरी असून त्यांचे अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेल्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती शेतकरी होते. दिनांक 22/05/2009 रोजी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले.या अपघाताची नोंद संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आलेली आहे. वैद्यकिय अहवाल तसेच मृत्यू प्रमाणपत्र देखील त्यांना मिळाले आहे. दिनांक 06/06/2009 रोजी त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव दाखल केला. सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे 11/06/2009 रोजी पाठविला. अर्जदाराने सतत पाठपुरावा केल्यानंतरही विमा रक्कम न मिळाल्यामुळे दिनांक 12/10/2011 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीची व नोटीसची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम व नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत विमा प्रस्ताव, पोलीस पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 चा उतारा इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल केलेल्या जबाबानुसार अर्जदार किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे कोणतीही विमा पॉलिसी नसल्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत येत नाही, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरची आहे. अर्जदाराने पाठविलेल्या प्रस्तावा सोबत योग्य ती कागदपत्रे जोडली नाहीत. दिनांक 23/06/2010 रोजी त्यांनी अर्जदारास संबंधित कागदपत्रे दाखल करण्याबाबत कळविले, परंतु अर्जदाराने ती न पाठविल्यामुळे दिनांक 24/11/2010 रोजी त्यांचा विमा प्रस्ताव रद्द करण्यात आला.अर्जदाराने मंचात दाखल केलेली तक्रार मुदतबाह्य असल्याचे सांगून तक्रारी खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जबाबानुसार महाराष्ट्र शासनाने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या योजने अंतर्गत आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन संबंधित विमा कंपनीकडे पाठविण्याचे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. सदरील प्रस्तावात 7/12, फेरफार, पोलीस पंचनामा इत्यादी कागदपत्रे सोबत जोडली नव्हती. त्यांनी 23/06/2010 रोजी अर्जदारास कागदपत्रे पाठविण्या विषयी कळविले व सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पाठविला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी 24/11/2010 रोजी विमा प्रस्ताव रद्द केल्याचे पत्राव्दारे कळविले.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही मंचात उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे पती नारायण बाबूराव काळबांडे हे शेतकरी होते व त्यांच्या नावे मौजे बरबडी शिवार, गट क्रमांक 164 येथे शेतजमिन आहे. दिनांक 22/05/2009 रोजी वसमत जवळ त्याच्या मोटर सायकलला ट्रकने धडक दिल्यामुळे अपघातात त्यांचे निधन झाले. सदरील अपघाताची नोंद वसमत पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेली दिसून येते.पोस्टमार्टम अहवाल व मृत्यू प्रमाणपत्र अर्जदाराने मंचात दाखल केलेले आहे.
अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत दिनांक 06/06/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केला. सदरील प्रस्तावा सोबत त्यांनी फेरफारची नक्कल, सातबाराचा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडली असल्याचे दिसून येते.अर्जदाराने विमा रक्कम न मिळाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना दिनांक 12/10/2011 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविल्याचे दिसून येते, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी या नोटीसचा जबाब दिलेला दिसून येत नाही.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा प्रस्तावासोबत 7/12, पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला नसल्यामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारला असल्याचे जबाबात म्हंटले आहे.
अर्जदाराने मंचात आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरील विमा योजनेचा कालावधी 15/08/2008 ते 14/08/2009 असा असून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू 22/5/2009 रोजी झाला आहे व अर्जदाराने विमा प्रस्तावही 06/06/2009 रोजी पाठविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेतील कलम 12(3) मध्ये विमा प्रस्ताव विमा कालावधीत कधीही प्राप्त झाल्यास तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील असे म्हंटले आहे. अज्ञानामुळे किंवा परिस्थितीमुळे जर कागदपत्रे दाखल करण्यास उशीर झाला तर संबंधित व्यक्ती विमा रकमेपासून वंचित राहू नये हा या मागचा शासनाचा उद्देश आहे.
अर्जदाराने आवश्यक ती सर्व कागदपत्रे मंचात दाखल केलेली आहेत. त्यामुळे अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे.
आ दे श
1 गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास 1,00,000/- रुपये 30 दिवसात द्यावे.
2 खर्चाबद्दल आदेश नाही.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.