(घोषित दि. 10.09.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून वाहन कर्ज घेतले आहे. या कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर देखील गैरअर्जदार यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही अर्जदाराने या बाबत गैरअर्जदार यांच्याकडे अनेक वेळेस मागणी करुनही गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून 1,50,000/- रुपयाचे वाहन कर्ज घेतले आहे. या कर्जाचा बोजा वाहनाच्या नोंदणी पत्रात (Registration Book) दाखविण्यात आलेला आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी कर्जाची परतफेड गैरअर्जदार यांच्या जालना येथील कार्यालयात नियमितपणे केली आहे. गैरअर्जदार यांची जालना येथील शाखा बंद करण्यात आल्यामुळे कर्जाची उर्वरीत रक्कम डिमांड ड्राप्टद्वारे गैरअर्जदार यांच्याकडे जमा केली. गैरअर्जदार यांनी आर.सी (R.C) बुक परत करताना कर्जबोजा काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे वाहन विक्री करता येऊ शकत नाही. गैरअर्जदार यांना वकीला मार्फत नोटीस पाठवून देखील त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने ना हरकत प्रमाणपत्र व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वकीला मार्फत पाठविलेली नोटीस, वाहनाचे नोंदणी पत्र, पोस्टाची पावती, कर्ज फेड केल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी नियुक्त केले आहे व अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या मार्फत कर्ज पुरवठा केलेला आहे. अर्जदाराने नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे जालना येथील कार्यालय बंद करण्यात आलेले नाही, तसेच अर्जदार हे ग्राहक नसल्यामुळे त्यांनी दाखल केलेली तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे.
गैरअर्जदार यांनी त्यांच्या जवाबासोबत अर्जदाराचा खाते उतारा मंचात दाखल केला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,
- अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दिनांक 04.02.2009 रोजी 1,50,000/- रुपयाचे वाहन कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड दिनांक 05.02.2012 पर्यंत 6,867/- रुपये प्रतिमहिना या प्रमाणे करावयाची होती. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरील कर्ज हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या मार्फत दिले असल्याचे आपल्या जवाबात मान्य केले आहे.
- अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे कर्ज फेडीचा हप्ता भरल्याच्या पावत्या मंचात दाखल केल्या आहेत. या पावत्यांचे निरीक्षण केल्यावर अर्जदाराने खालील प्रमाणे रक्कम भरली असल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे भरणा केलेल्या रकमेचा तपशील.
अ.क्रं. | दिनांक | पावती क्रमांक | रक्कम |
1. | 26.03.2009 | 260 | 7166 |
2. | 27.04.2009 | 370 | 7166 |
3. | 25.05.2009 | 341 | 7166 |
4. | 28.07.2009 | 541 | 7186 |
5. | 21.09.2009 | 657 | 7196 |
6. | 07.11.2009 | 755 | 7196 |
7. | 12.11.2010 | डी.डी.क्रं.715430, देना बँक | 1,01,000 |
एकूण | | | 1,44,076 |
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे भरणा केलेल्या रकमेचा तपशील.
अ.क्रं. | दिनांक | पावती क्रमांक | रक्कम |
1. | 19.05.2010 | 1588881 | 20,500 |
2. | 13.08.2010 | 7874491 | 6,800 |
एकूण | | | 27,300 |
वरील रकमे व्यतिरिक्त अर्जदाराने 78,313/- रुपयाचा डिमांड ड्राफ्ट गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे काढल्याची प्रत सोबत जोडली आहे.
- वरील तपशीलावरुन अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे कर्ज फेडी पोटी एकूण 1,71,376/- रुपये जमा केले असल्याचे दिसून येते. अर्जदाराने या रकमेच्या पावत्या मंचात दाखल केलेल्या आहेत.
- अर्जदाराने या रकमे व्यतिरिक्त गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे 78,313/- रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढल्याची प्रत सोबत जोडली आहे. परंतू हा डिमांड ड्राफ्ट त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 किंवा 2 यांच्याकडे दिल्याचा कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही किंवा ही रक्कम गैरअर्जदार यांच्या खात्यात जमा झाली असल्याचे संबंधित बँकेचे पत्र देखील पुरवा म्हणून मंचात दाखल केलेले नाही.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या मध्ये कर्ज फेडीच्या रकमेचा ताळेबंद दिसत नसला तरी अर्जदाराने एकूण 1,71,376/- रुपये भरले असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या पावत्या व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या खाते उता-यावरुन स्पष्ट दिसून येते.
- सुनावणी दरम्यान गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी ना हरकत प्रमाणपत्र मंचामध्ये जमा केले आहे. त्यामुळे 78,313/- रुपयाचा डिमांड ड्राफ्ट गैरअर्जदार यांना मिळाला असावा.
वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराने कर्ज रकमेचा भरणा करुनही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. गैरअर्जदार यांची ही कृती निश्चितच अनुचित आहे. अर्जदार मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.