Maharashtra

Additional DCF, Pune

CC/10/187

Mr. Arvind Chandrakant Bankar & Others1,R/at.B-7,Murya Garden, S.No. 82/26-A, Kothrud, Pune-411 038. - Complainant(s)

Versus

1) The Perless General Finance & Investment Company Ltd.Pune Branch, Arora Tower, 9, Moledina Road, - Opp.Party(s)

G.B. Shivalkar

22 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/187
 
1. Mr. Arvind Chandrakant Bankar & Others1,R/at.B-7,Murya Garden, S.No. 82/26-A, Kothrud, Pune-411 038.
...........Complainant(s)
Versus
1. 1) The Perless General Finance & Investment Company Ltd.Pune Branch, Arora Tower, 9, Moledina Road, Pune-411 001.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा: मा.अध्‍यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत

                         

    //  नि का ल प त्र  //

 

(1)               प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांनी योजनेमध्‍ये कबुल केल्‍याप्रमाणे आपल्‍याला  रक्‍कम दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे.   या बाबत  थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार क्र 1 श्री. अरविंद बनकर यांनी  जाबदार क्र 1  दि पीअरलेस जनरल फायनान्‍स अण्‍ड इनव्‍हेस्‍टमेंट लि कंपनी  ( ज्‍याचा उल्‍लेख यापुढे पीअरलेस कंपनी असा केला जाईल.)   यांचे कडून त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या नावांने  दिनांक 21/10/2003 रोजी  दोन प्रमाणपत्र विकत घेतली होती. या प्रमाणपत्रामध्‍ये नमुद केलेल्‍या अटी व शर्ती प्रमाणे प्रमाणपत्रांची मुदत संपेपर्यन्‍त सात वर्षांच्‍या कालावधी पर्यन्‍त नैसर्गिक अथवा अपघाती मृत्‍यू  झाल्‍यास लाभांश देण्‍याची अट त्‍यामध्‍ये अंतर्भूत करण्‍यात आली होती.  दिनांक 21/01/2009 रोजी दुर्देवाने तक्रारदारांच्‍या पत्‍नीचे नैसर्गिकरित्‍या निधन झाले. या प्रमाणपत्रामध्‍ये नमुद केलेल्‍या अटी व शर्तीप्रमाणे अशा प्रकारे मृत्‍यू झाल्‍यास जाबदार क्र 2 दि अलायन्‍झ बजाज इन्‍शुरन्‍स कंपनी लि( ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे बजाज अलायन्‍झ असा केला जाईल.) यांनी   महिन्‍याला जमा केलेल्‍या रकमेच्‍या पन्‍नास पट रक्‍कम देण्‍याचे कबुल केले होते.  तक्रारदारांच्‍या पत्‍नीच्‍या मृत्‍यू नंतर  जमा केलेली रक्‍कम रु 4,200/- च्‍या पन्‍नास पट रक्‍कम  रु 2,10,000/- आपल्‍याला मिळणे आवश्‍यक आहे असे तक्रारदारांनी नमुद केले आहे.  या प्रमाणे रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदारांनी  पीअरलेस कंपनीच्‍या अधिका-यांशी संपर्क साधला.  मात्र पीअरलेस कंपनीने आपल्‍याला रक्‍कम रु 5,075/- चे दोन चेक्स् मुळ व बोनस रक्‍कम म्‍हणून पाठवून दिली अशी तक्रारदारांची तक्रार आहे.  या नंतर कबुल केल्‍याप्रमाणे रक्‍कम दयावी म्‍हणून तक्रारदारांनी पीअरलेस कंपनीशी प्रत्‍यक्ष व पत्राद्वारे संपर्क साधला.  दिनांक 22/07/2009 रोजी तक्रारदारांना जाबदार क्र 3 दि न्‍यु इंडिया अश्‍युरन्‍स कंपनी लि ( ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे न्‍यु इंडिया कंपनी असा केला जाईल) यांचेकडून काही कागदपत्रे मागणारे पत्र प्राप्‍त झाले.   आपला सर्व व्‍यवहार बजाज अलायन्‍झशी सुरु असताना  अचानक न्‍यु इंडिया कंपनी कडून  आलेल्‍या पत्रामुळे तक्रारदार संभ्रमात पडले.  त्‍यातूनही न्‍यु इंडिया कंपनीने अपघाताशी संबंधीत कागदपत्रांची मागणी केली होती तर तक्रारदारांच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू नैसर्गिकपणे झाला होता.  ही सर्व वस्‍तुस्थिती तक्रारदारांनी पीअरलेस कंपनीला कळवली असता त्‍यांनी योग्‍य ती कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन दिले.  यानंतर पीअरलेस कंपनीशी वारंवार संपर्क साधल्‍या नंतर त्‍यांनी दिनांक 06/05/2010 रोजी तक्रारदारांना एक पत्र पाठविले.   तक्रारदारांच्‍या पत्‍नीला  तक्‍ता क्र 49 प्रमाणे पॉलिसी देण्‍यात आलेली असून या पॉलिसी प्रमाणे नैसर्गिक मृत्‍यूसाठी कोणतीही नुकसानभरपाई देय होत नाही असे  पीअरलेस कंपनीने तक्रारदारांना कळविले.   अशा प्रकारे पॉलिसीच्‍या मागे छापलेल्‍या अटी व शर्ती तक्रारदारांना कल्‍पना न देता  परस्‍पर एकतर्फा बदलण्‍याची पीअरलेस कंपनीची कृती अयोग्‍य ठरते  असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. या प्रकरणामध्‍ये   ज्‍या प्रकारची सदोष सेवा आपल्‍याला देण्‍यात आली आहे याचा विचार करिता पॉलिसी प्रमाणे देय होणारी रक्‍कम रु 4,20,000/- मात्र आपल्‍याला व्‍याज व इतर अनुषंगीक रकमांसह देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 7 अन्‍वये एकुण 11 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.

           

(2)               प्रस्‍तुत प्रकरणातील पीअरलेस कंपनीने त्‍यांचे विरुध्‍द झालेला नो से आदेश रद्य करुन घेऊन त्‍यांनी आपले म्‍हणणे मंचापुढे दाखल केले.   आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये  पीअरलेस कंपनीने तक्रारदारांच्‍या सर्व तक्रारी नाकारलेल्‍या असून तक्रारदारांना दिलेली दोन्‍ही प्रमाणपत्र तक्‍ता क्र 49 अन्‍वये देण्‍यात आली होती  असे नमुद केले आहे.  या तक्‍त्‍याच्‍या अटी व शर्तींप्रमाणे जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्‍यू झाला तर न्‍यु इंडिया कंपनीने या अपघाती मृत्‍यूची नुकसानभरपाई देण्‍याचे कबुल केलेले होते.  तक्रारदारांच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू नैसर्गिकरित्‍या झालेला असल्‍यामुळे त्‍यांना अशा प्रकारे नुकसानभरपाई मिळण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असे पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे आहे.   तक्रारदाराला देण्‍यात आलेले प्रमाणपत्र हे रीकरींग कम फिक्‍स डिपॉझीट स्‍वरुपाचे असून हा विम्‍याचा करार नाही याचा विचार करीता  तक्रारअर्ज नामंजूर होण्‍यास पात्र ठरतो असे पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे आहे.   तक्रारदारांच्‍या पत्‍नीच्‍या नावे दिल्‍या गेलेल्‍या पॉलिसी प्रमाणे देय होणारी रक्‍कम तक्रारदारांनी  संपूर्ण अंतिम रक्‍कम म्‍हणून स्विकारलेली असल्‍यामुळे त्‍यांना आपल्‍या विरुध्‍द तक्रार करण्‍याचा अधिकार नाही असे पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे आहे.   तक्रारदारांना दिल्‍या गेलेल्‍या सर्टिफिकीटशी बजाज अलायन्‍झचा संबंध नसून त्‍यांचे नाव या प्रमाणपत्रामध्‍ये  अनावधानाने छापण्‍यात आलेले आहे असे पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे आहे  तसेच तक्‍ता क्र. 59 चा मजकूर व नैसर्गिक  हा शब्‍द या  प्रमाणपत्रावर नजरचुकीने छापण्‍यात आले आहे असेही  पीअरलेस  कंपनीचे म्‍हणणे आहे. तक्रारदारांनी ज्‍या स्‍वरुपाची पॉलिसी घेतली होती त्‍याचा विचार करता त्‍यांना  फक्‍त अपघाती मृत्‍यू झाल्‍यासच नुकसानभरपाईची रक्‍कम देय होणार होती.  तक्रारदारांच्‍या पत्‍नीचा नैसर्गिक मृत्‍यू झालेला असताना सुध्‍दा कोणत्‍याही ठोस आधारशिवाय तक्रारदारा  दाखल केलेला खोटा व खोडसाळ अर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी पीअरलेस कंपनीने विनंती केली आहे.  पीअरलेस कंपनीने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ प्राधिकृत अधिका-याचे प्रतिज्ञापत्र व काही कागदपत्रे दाखल केली आहेत.

(3)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र 2 बजाज अलायन्‍झ यांचे वरती मंचाच्‍या नोटिसीची बजावणी झाले नंतर  त्‍यांनी विधिज्ञां मार्फत आपले म्‍हणणे दाखल केले.  तक्रारदारांनी ज्‍या प्रमाणपत्राच्‍या आधारे मंचाकडे मागणी केलेली आहे त्‍या प्रमाणपत्राशी आपला काहीही संबंध नसून  आपल्‍याला अनावश्‍यकरित्‍या या प्रकरणामध्‍ये पक्षकार म्‍हणून सामिल  करण्‍यात आले आहे असे बजाज अलायन्‍झचे म्‍हणणे आहे.  तक्‍ता क्र 49 अन्‍वये फक्‍त अपघाती मृत्‍यूसाठी  रक्‍कम देय होत असून तक्रारदारांच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू नैसर्गिकरित्‍या झालेला आहे याचा विचार करिता तक्रारदारांना वर नमुद तक्‍त्‍याप्रमाणेच कोणतीही रक्‍कम देय होत नाही असे बजाज अलायन्‍झचे म्‍हणणे आहे.  वर नमुद तक्‍ता क्र 49 अन्‍वये  बजाज अलायन्‍झने कोणतीही जबाबदारी स्विकारलेली नसल्‍याने आपला तक्रारदारांच्‍या सर्टिफिकीटशी कोणताही संबंध नसून  सदरहू प्रकरण आपल्‍या विरुध्‍द अनावश्‍यकरित्‍या दाखल करण्‍यात आलेले आहे.   सबब सदरहू अर्ज आपले विरुध्‍द खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी बजाज अलायन्‍झने विनंती केली आहे. बजाज अलायन्‍झने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ प्राधिकृत अधिका-याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

 

(4)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र 3 न्‍यु इंडिया कंपनी यांचेवरती मंचाच्‍या नोटिसीची बजावणी झाले नंतर त्‍यांनी विधिज्ञां मार्फत आपले म्‍हणणे दाखल केले.  आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये न्‍यु इंडिया कंपनीने तक्रारदारांच्‍या सर्व तक्रारी नाकारल्‍या असून तक्रारदार ज्‍या प्रमाणपत्रावर विसंबून मंचाकडे दाद मागत आहेत त्‍या प्रमाणपत्रावरती फक्‍त बजाज अलायन्‍झ यांचे नांव नमुद असून आपला या प्रमाणपत्राशी संबंध नाही असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  न्‍यु इंडिया कंपनी ही  जिवीतांचा विमा उतरवित नसून नैसर्गिक मृत्‍यू झाल्‍यास नुकसानभपाई देण्‍याचा त्‍यांचा व्‍यवसाय नाही असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.   दिनांक 27/04/1987 रोजी झालेल्‍या कराराप्रमाणे न्‍यु इंडिया कंपनीने  पीअरलेस कंपनीच्‍या  प्रमाणपत्रधारकांचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास  नुकसानभरपाई देण्‍याचे कबुल केले होते.   मात्र या प्रकरणामध्‍ये तक्रारदारांच्‍या पत्‍नीचा नैसर्गिकरित्‍या मृत्‍यू झाला आहे याचा विचार करिता त्‍यांना कोणतीही रक्‍कम देण्‍याचे बंधन आपल्‍यावर नाही असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.   तक्रारदारांच्‍या तक्रारीच्‍या स्‍वरुपावरुन त्‍यांची तक्रार फक्‍त पीअरलेस कंपनी विरुध्‍द असल्‍याचे लक्षात येत असल्‍यामुळे तसेच नुकसानभरपाई देण्‍याचे कोणतेही आश्‍वासन आपण तक्रारदारांना दिलेले नसल्‍याने सदरहू तक्रारअर्ज आपले विरुध्‍द नामंजूर करण्‍यात यावा अशी  न्‍यु इंडिया कंपनीने विनंती केली आहे.  न्‍यु इंडिया कंपनीने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ प्राधिकृत अधिका-यांचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 27  अन्‍वये करार दाखल केला आहे.

(5)         प्रस्‍तुत प्रकरणातील  सर्व जाबदारांचे म्‍हणणे दाखल झाले नंतर तक्रारदारांनी निशाणी 35 व 36 अन्‍वये आपले पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले.  तसेच निशाणी 37 अन्‍वये बजाज अलायन्‍झ, निशाणी 39 अन्‍वये न्‍यु इंडिया कंपनी व निशाणी 40 अन्‍वये  तक्रारदारांनी आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला.  तसेच  पीअरलेस कंपनीने विलंबाने म्‍हणणे दाखल केल्‍यामुळे त्‍यांच्‍या  म्‍हणण्‍यास अनुसरुन तक्रारदारांनी आपले पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र  निशाणी 46 व 47 अन्‍वये  मंचापुढे दाखल केले.   यानंतर नेमल्‍या तारखेला पीअरलेस कंपनी तर्फे  मुळ कागदपत्रे मंचापुढे दाखल करण्‍यात आले.   तसेच तक्रारदारां तर्फे अड श्री शिवलकर, पीअरलेस कंपनी तर्फे अड श्री नानेकर, बजाज अलायन्‍झ तर्फे अड श्री गानू व न्‍यु इंडिया तर्फे अड श्री शेनॉय यांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्‍यात आले.

 

(6)         प्रस्‍तुत प्रकरणातील म्‍हणणे, दाखल कागदपत्रे व सर्व पक्षकारांचा युक्तिवाद याचे साकल्‍याने अवलोकन केले असता पुढील मुद्ये मंचाच्‍या विचारार्थ उपस्थित होतात -

           मंचाचे मुद्ये व त्‍यांची उत्‍तरे पुढील प्रमाणे -

       मुद्ये                                            उत्‍तरे

1)                  जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली ही बाब        : होय

      सिध्‍द होते का  ?                                                                 :

2)                  तक्रारअर्ज मंजुर होण्‍यास पात्र होतो का ? कोणा विरुध्‍द ?    :  होय, जाबदार

                                                        : क्रमांक 1 विरुध्‍द

   3)       काय आदेश                                                                      : अंतिम आदेशाप्रमाणे

वि‍वेचन:

 

मुद्या क्रमांक 1 व 2:   हे दोन्‍ही मुद्दे एकमेकांशी संलग्‍न असल्‍यामुळे त्‍यांचे एकत्रित विवेचन करण्‍यात येत आहे.  प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारअर्ज व सर्व जाबदारांचे म्‍हणणे यांचे एकत्रित अवलोकन केले असता  ही एक rareunique case आहे हे लक्षात येते.   तक्रारअर्ज, सर्व जाबदारांचे म्‍हणणे व दाखल पुरावे यांचे एकत्रित अवलोकन केले असता पुढील प्रमाणे वस्‍तुस्थिती असल्‍याचे लक्षात येते. हया प्रकरणामध्‍ये तक्रारदारांच्‍या पत्‍नीच्‍या नावे असलेल्‍या प्रमाणपत्रावरती बजाज अलायन्‍झ यांचे नांव  छापलेले असून  या प्रमाणपत्रावरील अटी व शर्तींमध्‍ये  प्रमाणपत्रधारकाचा  प्रमाणपत्राच्‍या कालावधीच्‍या दरम्‍यान नैसर्गिक अथवा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास काही विशिष्‍ठ रक्‍कम बजाज अलायन्‍झ कंपनीकडून देण्‍यात येईल असा उल्‍लेख या प्रमाणपत्रावर आढळतो ( emphasis sapplied).    

      वर नमूद या उल्‍लेखाच्‍या अनुषंगे पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे पाहीले असता  त्‍यांच्‍या कंपनीच्‍या गुंतवणूकधारकांसाठी त्‍यांनी तक्‍ता क्र 59 साठी बजाज अलायन्‍झ व तक्‍ताक्र 49साठी   

 

साठी न्‍यु इंडिया अश्‍युरन्‍स कंपनीशी  करार केला आहे असे लक्षात येते.  या दोन्‍ही तक्‍त्‍याअंतर्गत ज्‍या गुंतवणूकधारकांनी रक्‍कम गुंतवली असेल त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास बजाज अलायन्‍झ व न्‍यु इंडिया कंपनीने काही विशिष्‍ठ रक्‍कम देण्‍याचे कबुल केलेले आहे  तक्रारदार ज्‍या प्रमाणपत्रावर विसंबून  रक्‍कमेची मागणी करत आहेत त्‍याचे अवलोकन केले असता या प्रमाणपत्राच्‍या प्रोव्‍हीजो मधील कलम 3 मध्‍ये 

Limit of indemnity :- While the Insurance Policy is in force, if depositor dies from natural /  accidental death as detailed in Master Group Life Insurance Policy then Allianz Bajaj Life Insurance Co.Ltd. will pay benefit to the extent of 15,20,3,40 50  times of initial monthly deposit during 1st 2nd 3rd 4th and 5th year respectively subject to maximum Rs.3 lakhs on any single life shown overleaf” 

 

 असा उल्‍लेख आढळतो.  हे प्रमाणपत्र तक्रारदारांच्‍या पत्‍नीला पीअरलेस कंपनीकडून देण्‍यात आले होते.    बजाज अलायन्‍झचे नांव आपण चुकीने छापले आहे  तसेच  तक्रारदारांच्‍या पत्‍नीने  तक्‍ता क्र  49 अन्‍वये रक्‍कम गुंतवलेली असल्‍यामुळे  फक्‍त अपघाती मृत्‍यू झाला तरच नुकसानभरपाई देय होते असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  तसेच अपघाती मृत्‍यू बरोबर नैसर्गिंक मृत्‍यू हा शब्‍द आपण चुकूनछापला असेही पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे आहे.  पीअरलेस कंपनीच्‍या या म्‍हणण्‍याच्‍या अनुषंगे  संबंधीत प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये तक्‍ता क्र 49  मध्‍ये नेमक्‍या काय अटी व शर्ती नमुद आहेत याचा उल्‍लेख आढळत नाही.   मात्र तक्रारदारांच्‍या पत्‍नीला जे प्रमाणपत्र देण्‍यात आले होते  त्‍याच्‍यामध्‍ये नैसर्गिक अथवा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास रक्‍कम देय होईल असा स्‍पष्‍ट उल्‍लेख त्‍यामध्‍ये आढळतो.   प्रमाणपत्राच्‍या मागे छापलेल्‍या अटी व शर्ती हा कराराचाच एक भाग असून करारातील अटी व शर्तींच्‍या पलीकडे जावून घेतलेली भूमिका बेकायदेशिर ठरते ही सर्वमान्‍य कायदेशिर वस्‍तुस्थिती आहे.   पीअरलेस कंपनीने स्‍वत:च्‍या म्‍हणण्‍यामध्‍येच सन्‍मा.  राष्ट्रिय आयोगाच्‍या मे शक्‍ती पेपर प्रोडक्‍टस् वि.  दि चेअरमन कम मॅनेजींग डायरेक्‍टर, नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि अण्‍ड अदर्स ( संदर्भ: 2009 (2) सी पी आर 429 (नॅशनल कमिशन) या ऑथॉरिटीचा आधार घेऊन पॉलिसीच्‍या अटी व शर्ती हया  उभयपक्षकारां वरती बंधनकारक असतात असे नमुद केले आहे.    अर्थातच   या ऑथॉरिटी वरुन सुध्‍दा प्रमाणपत्राच्‍या मागे लिहीलेल्‍या मजकुराच्‍या विरुध्‍द भूमिका पीअरलेस कंपनीला घेता येणार नाही ही बाब स्‍पष्‍ट होते.  

 

      आपण या पॉलिसीच्‍या मागे  जी अट नमुद केलेली आहे त्‍याच्‍यामध्‍ये नैसर्गिक मृत्‍यू हा शब्‍द चुकून छापलेला आहे असे पीअरलेस कंपनीचे म्‍हणणे आहे.  पीअरलेस कंपनीच्‍या भूमिकेच्‍या अनुषंगे नोंद घेण्‍याजोगी बाब म्‍हणजे त्‍यांच्‍याकडून छपाईची झालेली ही चुक त्‍यांनी कधीही तक्रारदारांच्‍या किंवा त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या लक्षात आणून दिलेली नाही. जेव्‍हा तक्रारदारांनी  नुकसानभरपाईच्‍या रक्‍कमेची त्‍यांच्‍याकडे मागणी केली तेव्‍हा पीअरलेस कंपनीच्‍या निदर्शनास ही चुक आली.  यानंतर तक्रारदारांनी ही चुक  यापूर्वीच निदर्शनास आणली नाही म्‍हणून पीअरलेस कंपनीने मंचापुढील दाखल म्‍हणण्‍यामध्‍ये आक्षेप घेतला.  पीअरलेस कंपनीची ही भूमिका संपूर्णत: अयोग्‍य व असमर्थनीय आहे असा मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे.  वादग्रस्‍त प्रमाणपत्र हे पीअरलेस कंपनीने छापलेले असून या प्रमाणपत्रावरील अटी व शर्तींचे गांभीर्य पाहता हे छापताना पराकोटीची  दक्षता ( extreme precaution)   त्‍यांनी घेणे आवश्‍यक होते.  प्रमाणपत्राच्‍या मागे नमुद केलेल्‍या अटी व शर्तींच्‍या पलीकडे जावून जर एखादया गुंतवणूकदाराने मागणी केली  तर अटी व शर्ती च्‍या पलीकडे जावून मागणी करता येणार नाही अशीच भूमिका सर्वसाधारणपणे  घेतली जाते.  अशा परिस्थित तक्रारदार जेव्‍हा अटी व शर्तींच्‍या अधीन राहून मागणी करित आहेत  तेंव्‍हा ही अट आपण चुकून व अनवधानाने छापली अशी भूमिका पीअरलेस कंपनीला घेता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.  अशा प्रकारे प्रमाणपत्राच्‍या मागिल अटी व शर्तीचा उपयोग सर्व परिस्थितीमध्‍ये फक्‍त स्‍वत:च्‍या फायदयासाठी करण्‍याची परवानगी देणे अयोग्‍य ठरेल असेही मंचाचे मत आहे.  त्‍यातूनही अशा प्रकारे ही चुक झाल्‍या नंतर  जर विहीत मुदतीमध्‍ये ती लक्षात येवून  पीअरलेस कंपनीने ही चुक तक्रारदार अथवा त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या लक्षात आणून दिली असती व त्‍याप्रमाणे त्‍यांनी दुरुस्‍ती केली असती तर कदाचीत वस्‍तुस्थिती वेगळी ठरली असती.  मात्र तक्रारदारांनी नुकसानभरपाईची मागणी करेपर्यन्‍त पीअरलेस कंपनीने या संदर्भांत काहीही पुर्तता केली नाही व त्‍यानंतर ही छपाईची चुक आहे अशी भूमिका त्‍यांनी घेतली.  पीअरलेस कंपनीची ही भूमिका निश्चितच अयोग्‍य व असमर्थनीय ठरते असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. प्रमाणपत्रांच्‍या मागे छापलेल्‍या अटी व शर्तीं वरुन  नैसर्गिक मृत्‍यू झाला तरी सुध्‍दा रक्‍कम अदा करण्‍याचे पीअरलेस कंपनीने कबुल केलेले आढळते.  अशा परिस्थिती रक्‍कम नाकरण्‍याची पीअरलेस कंपनीची कृती त्‍यांच्‍या सेवेत त्रूटी उत्‍पन्‍न  करते असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.  प्रस्‍तुत प्रकरणातील  तक्रारदारांना आपण पाठवून दिलेली रक्‍कम त्‍यांनी  संपूर्ण व अंतिम रक्‍कम म्‍हणून स्विकारलेली असल्‍यामुळे त्‍यांना हा तक्रारअर्ज दाखल करण्‍याचा अधिकार नाही असा एक  बचावाचा मुद्दा  पीअरलेस कंपनीने उपस्थित  केला आहे.  मात्र तक्रारदारांनी  ही बाब नाकारली आहे तर आपल्‍या वर  नमूद मुद्दयांच्‍या  पुष्‍टयर्थ पीअरलेस कंपनीने  पुरावा दाखल केलेला नाही.  सबब  जाबदारांचा हा बचावाचा मुद्दा  योग्‍य पुराव्‍याअभावी फेटाळण्‍यात येत आहे.

 

            प्रमाणपत्राच्‍या मागे छापलेल्‍या अटी व शर्ती हया कराराचाच एक भाग असून प्रमाणपत्र  जेव्‍हा दिले गेले तेव्‍हा या करारातील सर्व अटी व शर्ती    उभयक्षकारांना मान्‍य आहेत असा निष्‍कर्ष निघतो.   पीअरलेस कंपनीने हे प्रमाणपत्र 2003 साली दिलेले आहे.  या प्रमाणपत्रातील अटी व शर्तींपैकी काही विशिष्‍ट अट अपण अनवधानाने छापली व त्‍यामुळे ती आपल्‍याला मान्‍य नाही अशी भूमिका पीअरलेस   कंपनीने मंचापुढे म्‍हणणे दाखल करताना  सन 2011 मध्‍ये सर्वांत प्रथम घेतली. अशा प्रकारे एका पुर्णत्‍वास गेलेल्‍या कराराच्‍या ( concluded contract)  अटी व शर्ती आपल्‍याला मान्‍य नाहीत अशी भूमिका पीअरलेस कंपनीला घेता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.  विशेषत: तक्‍ता क्र 49 च्‍या अटी व शर्तींचा मजकुर या प्रमाणपत्रावरती नमुद नसताना   स्‍पष्‍टपणे ( expressly) नमुद केलेली अट  आपल्‍याला मान्‍य नाही ही पीअरलेस कंपनीची भूमिका मुलता: बेकायदेशिर ठरते व त्‍यामुळे ती मान्‍य करणे शक्‍य नाही असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब प्रमाणपत्रामध्‍ये कबुल केल्‍याप्रमाणे रक्‍कम अदा करण्‍याचे पीअरलेस कंपनीला निर्देश देण्‍यात येत आहेत.

 

            या प्रकरणामध्‍ये प्रमाणपत्राच्‍या मागे  छापलेल्‍या ज्‍या अटींच्‍या आधारे तक्रारदार रक्‍कमेची मागणी करित आहेत त्‍यामध्‍ये बजाज अलायन्‍झ ही रक्‍कम अदा करेल असे नमुद केलेले आढळते.   मात्र बजाज अलायन्‍झचे नांव आपण चुकून छापलेले असून   अनवधानाने तक्‍ता क्र 59 चा  मजकुर येथे छापण्‍यात आला आहे असे पीअरलेस कंपनीने नमुद केले आहे.  आपण पीअरलेस कंपनीशी केलेल्‍या करारा प्रमाणे फक्‍त अपघाती मृत्‍यू झाल्‍यास नुकसानभरपाई देण्‍याचे कबुल केलेले असल्‍यामुळे नैसर्गिक मृत्‍यूसाठी नुकसानभरपाई देण्‍याचे उत्‍तरदायित्‍व आपल्‍यावर नाही असे बजाज अलायन्‍झचे म्‍हणणे आहे.  पीअरलेस कंपनी व बजाज अलायन्‍झ यांचे दरम्‍यान झालेल्‍या करारा नुसार जर फक्‍त अपघाती मृत्‍यूसाठी बजाज अलायन्‍झ ने जबाबदारी स्विकारली असले व त्‍यांचे नाव आपण चुकून छापले असे पीअरलेस कंपनीचे ही म्‍हणणे असेल तर बजाज अलायन्‍झ विरुध्‍द आदेश करणे अयोग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे.  सबब बजाज अलायन्‍झ विरुध्‍द कोणतेही आदेश करण्‍यात आलेले नाहीत.  तक्रारदारांना न्‍यु इंडिया कंपनी कडून  काही  कागदपत्रे मागवणारे पत्र आल्‍यामुळे त्‍यांनी न्‍यु इंडिया कंपनीलाही या कामी जाबदार म्‍हणून सामील केले आहे.  तक्रारदारांच्‍या दृष्टिने त्‍यांची ही कृती योग्‍य असली तरीही या संपूर्ण व्‍यवहारामध्‍ये न्‍यु इंडिया कंपनीचा सहभाग कागदोपत्री पुराव्‍याच्‍या आधारे सिध्‍द होत नसल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दही अंतिम आदेश करणे योग्‍य  ठरणार नाही असे मंचाचे मत आहे. 

 

             पीअरलेस कंपनीने  बजाज अलायन्‍झ व न्‍यु इंडिया कंपनी यांचे बरोबर स्‍वतंत्र करार केलेले आहेत.  या कराराशी  तक्रारदारांचा संबंध नाही.  तक्रारदार ज्‍या करारावर विसंबून  मंचाकडे दाद मागत आहेत तो करार तक्रारदार व पीअरलेस कंपनीच्‍या दरम्‍यान झालेला असून या करारा अन्‍वये पीअरलेस कंपनीने जबाबदारी स्विकारलेली आहे याचा विचार करिता अंतिम आदेश फक्‍त पीअरलेस कंपनी विरुध्‍द करण्‍यात येत आहेत. वादग्रस्‍त प्रमाणपत्रावरती छापलेल्‍या अटी व शर्ती नुसार  प्रमाणपत्राच्‍या तारखे पासून पाचव्‍या वर्षी मृत्‍यू झाल्‍यास मासीक हप्‍त्‍याच्‍या 50 पटीत रक्‍कम देण्‍याचे  पीअरलेस कंपनीने कबुल केलेले आढळते.  तक्रारदारांनी प्रत्‍येक पॉलिसी अंतर्गत रक्‍कम रु 4,200/- भरलेले असून पॉलिसी काढले पासून त्‍यांचे पत्‍नीचे पाचव्‍या वर्षी निधन झाले आहे याचा विचार करिता रक्‍कम रु 4,200/- X 50 = 2,10,000/- मात्र प्रत्‍येक पॉलिसीअंतर्गत तक्रारदारांना देय होते  सबब दोन्‍ही पॉलिसीचे मिळून रक्‍कम रु 4,20,000/- तक्रारदारांना 9 %  व्‍याजासह अदा करण्‍यात येत आहेत. पीअरलेस कंपनीने रक्‍कम नाकरल्‍याचे पत्र पाठविले पासून म्‍हणजे दिनांक 16/11/2009 पासून तक्रारदारांना व्‍याज देय होईल.  मात्र देय रकमेवर व्‍याज मंजुर केलेले असल्‍यामुळे  तक्रारदारांना स्‍वतंत्रपणे शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मंजुर न करता सदरहू तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून फक्‍त रु 5,000/- मात्र मंजूर करण्‍यात येत आहेत.

 

            वर नमुद विविचनावरुन पीअरलेस कंपनीने तक्रारदारांना सदोष सेवा दिली व सदरहू तक्रारअर्ज फक्‍त पीअरलेस कंपनी  विरुध्‍द मंजुर होणेस पात्र ठरतो ही बाब सिध्‍द होते.  सबब त्‍याप्रमाणे मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर देण्‍यात आले आहे. 

 

मुद्या क्रमांक 3:  वर नमूद सर्व निष्‍कर्ष व विवेचनाच्‍या आधारे प्रस्‍तुत प्रकरणात पुढील

प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.

सबब आदेश की,

                        //  आदेश //

  (1)       तक्रारअर्ज मंजुर करण्‍यात येत आहे.

  (2)       यातील जाबदार क्र 1 पीअरलेस कंपनीने तक्रारदारांना

            रक्‍कम रु  4,20,000/- ( रु चार लाख विस हजार)मात्र

        दिनांक 16/11/2009 पासून  संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त होई

        पर्यन्‍त 9 % व्‍याजासह अदा करावी.

(3)                       यातील जाबदार क्र 1 पीअरलेस कंपनीने तक्रारदारांना सदरहू

           तअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु 5,000/- ( रु पाच हजार)

           मात्र अदा करावेत.

(4)    वर नमुद आदेशाची अंमलबजावणी जाबदार क्र 1 पीअरलेस कंपनीने

         निकालपत्राची प्रत मिळाले  पासून 30 दिवसाचे आत न केल्‍यास

         तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द ग्राहक संरक्षण  कायदयाच्‍या तरतूदी

         अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.

 

(5)     निकालपत्राची प्रत सर्व पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.