(घोषित दि. 13.08.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी विमा रक्कम गैरअर्जदार यांनी न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीनुसार अर्जदाराचे पती शेतकरी असून त्यांची जवखेडा ठोंबरे, तालुका भोकरदन जि.जालना येथे शेत जमिन आहे. दिनांक 24.05.2012 रोजी अर्जदाराचे पती गणेश निवृत्ती ठोंबरे हे मोटार सायकलवरुन भोकरदन येथे जात असताना एका ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात होवून त्यांचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद घेण्यात आली असून घटनास्थळ पंचनामा, शव-विच्छेदन करण्यात आले आहे. अर्जदाराचे पती शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिका-याकडे विमा प्रस्ताव दाखल केला. सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे पाठविला. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अद्यापही विमा रक्कम मंजूर केलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन व्याजासह विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म, 7/12 चा उतारा, फेरफार, एफ.आय.आर, पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 डेक्कन इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.यांनी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार त्यांचे काम केवळ मध्यस्थाचे आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाडा विभागातील सल्लागार म्हणून त्या संस्थेची नेमणूक झालेली आहे. कृषी अधिका-याकडून आलेल्या दाव्यांची छाननी करुन संबंधित विमा कंपनीला सादर करणे व सदर छाननीमध्ये काही त्रुटी आढळल्यास तो दावा परत पाठवून त्रुटींची पूर्तता करवून दावा कंपनीकडे पाठविणे एवढे मर्यादीत काम त्यांचे आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीने जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार अर्जदाराने नियमानुसार विहीत मुदतीत क्लेम फॉर्म दाखल केलेला नाही. तसेच अपघात झाला त्यावेळी अर्जदाराच्या पतीकडे वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना नव्हता. या दोनही कारणामुळे अर्जदारास विमा रक्कम देता येत नसल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मंचामध्ये लेखी पत्र सादर केले आहे. त्या पत्रामध्ये अर्जदाराने विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केल्याचे म्हटले आहे व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने सदरील प्रस्ताव डेक्कन इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. औरंगाबाद यांना दिनांक 07.09.2012 रोजी पाठविला असल्याचे म्हटले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1, 2, 3 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे पती गणेश निवृत्ती ठोंबरे हे शेतकरी असून त्यांची ठोंबरी तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे शेतजमिन असल्याचे सातबाराच्या उता-यावरुन दिसून येते.
दिनांक 24.05.2012 रोजी अर्जदाराचे पती गणेश ठोंबरे मोटर सायकल वरुन (क्रमांक एम.एच.19 - 9767) भोकरदन येथे जात असताना एपी – 16 – 2772 क्रमांकाच्या ट्रकशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आल्याचे एफ.आय.आर वरुन दिसून येते. पोस्टमार्टम अहवालात देखील डोक्याला मार लागल्यामुळे गणेश ठोंबरे यांचे निधन झाले असल्याचे नमूद केलेले दिसून येते. एफ आय आर मध्ये गणेश ठोंबरे यास ट्रक चालकाने निष्काळजीपणाने भरधाव वेगाने ट्रक चालवून ठोंबरे यास जबर मार लागून मरणास कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. वरील सर्व कागदपत्रांवरुन अर्जदाराच्या पतीचा ट्रकशी अपघात होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते.
अर्जदाराने पतीच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाच्या शेतक-यांसाठी असलेल्या योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल केला व सदरील क्लेम फॉर्म गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 डेक्कन इन्शुरन्स ब्रोकींग कंपनी यांच्याकडे पाठविल्याचे गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या पत्रावरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणजे विमा कंपनीकडे पाठविला. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरील प्रस्ताव नाकारलेला नाही व मंजूरही केला नाही. परंतू मंचात त्यांनी दाखल केलेल्या जवाबामध्ये अर्जदाराकडे वाहन चाविण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे म्हटले आहे व त्यामुळे अर्जदारास विमा रक्कम मिळू शकत नसल्याचे म्हटले आहे.
अर्जदाराने मयत गणेश ठोंबरे यांचा वाहन चालविण्याचा शिकावू परवाना सोबत जोडला आहे. या परवान्याची मुदत दिनांक 27.03.2012 ते 26.09.2012 अशी आहे. यावरुन अपघात झाला त्यावेळेस त्यांच्याकडे शिकाऊ परवाना होता हे स्पष्ट होते. अर्जदाराच्या पतीचा अपघात हा समोरुन ट्रकने धडक दिल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे जरी गणेश ठोंबरे यांच्याकडे शिकाऊ परवाना असला तरी अपघाताचे कारण हे ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे असल्याचे पोलीस रिपोर्ट मध्ये नमूद केलेले असल्यामुळे अर्जदारास विमा रक्कम नाकारणे चुकीचे आहे. शेतकरी अपघात विमा योजना ही शेतक-यांच्या कुटूंबासाठी राबविली असल्यामुळे तांत्रिक कारणावरुन विमा रक्कम नाकारणे चुकीचे आहे.
गैरअर्जदार यांनी सदरील प्रस्ताव मुदतबाहय असल्याचे म्हटले आहे. परंतू गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी हा प्रस्ताव मुदतीत दिनांक 07.09.2012 रोजी पाठविला असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सदरील प्रस्ताव विहीत मुदतीत दाखल झाला असल्याचे स्पष्ट होते.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव मंजूर करुन त्यांना विमा रक्कम अदा करावी, असे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास 30 दिवसात विमा रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) 30 दिवसात द्यावे.
- खर्चाबद्दल आदेश नाही.