निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/10/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 30/10/2012
तक्रार निकाल दिनांकः- 10 /09/2013
कालावधी 10 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बबन पिता कनीराम राठोड. अर्जदार
वय 38 वर्षे. धंदा.शेती. अॅड.अरुण.डी.खापरे
रा.मालेगांव तांडा ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय, जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक.
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजाराच्या पाठीमागे.
आकाशवाणी चौक औरंगाबाद.
3 विभागीय व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय क्र.153400,
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाउस रोड.पुणे 422005. ______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा मौजे मालेगांव तांडा ता. जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्याच्या आईचा नामे चावलाबाई भ्र.कनीराम राठोड दिनांक 19/05/2011 रोजी शेतामध्ये काम करत असतांना अचानक पाऊस चालू झाला व आखाडयावरील सुबाभळीचे झाड तीच्या आईच्या अंगावर पडून मृत्यू झाला.त्यानंतर अर्जदाराच्या आईस जिंतूर येथे आणले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन जिंतूर येथे दिली त्यानंतर संबंधीत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व संबंधीत साक्षीदाराचे जबाब नोंदविले. व पोस्टमार्टेम सिव्हील हॉस्पीटल जिंतूर येथे करण्यात आले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने विहीत मुदतीत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 21/06/2011 रोजी सर्व कागदपत्रां सहीत विमादावा सादर केला, त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला नंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे चौकशी केली असता तुमचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 कडे मंजुरीसाठी पाठवला आहे, असे उत्तर दिले. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे अर्जदारास 17/10/2011 रोजी पत्र आले त्यामध्ये काही कागदपत्रांची मागणी केली व मागणी केलेली कागदपत्रे अर्जदाराने त्याची पुर्तता गैरअर्जदार क्रमांक 3 कडे केली, परंतु नंतर गैरअर्जदार क्रमांक 3 ने तांत्रीक कारण देवुन रेशनकार्ड प्रमाणे विमा धारकाचे वय 05/03/2000 रोजी 65 साल होते पॉलिसी दिनांक 15/08/2010 रोजी लागू झाली व त्यावेळेस विमा धारकाचे वय 75 वर्षे पेक्षा जास्त असल्या कारणाने अर्जदाराचा विमा दावा नाकारण्यात येत आहे. असे अर्जदारास पत्र दिले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 ने बेकायदेशिररीत्या नियमावर बोट ठेवुन जिम्मेदारीतून मुक्त होण्यासाठी केवळ तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा विमादावा नाकारला आहे. वास्तविक आईच्या मृत्यूच्या वेळी तीचे वय 65 वर्षेच होते व त्यावेळेस ती शेतात काम करीत होती. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश व्हावा की, अर्जदाराला रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावे व तसेच गैरअर्जदारांना असा आदेश देण्यात यावा की, त्यांनी अर्जदारास मानसिक व शारीरिकत्रास दिल्या बद्दल रु. 25,000/- देण्याचा आदेश व्हावा, व गैरअर्जदारांना असा आदेश व्हावा की, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी अर्जदारास रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर खालील प्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये अर्जदाराचा दिनांक 03/06/2011 रोजी कृषी अधिकारी जिंतूर यांना लिहिलेले अर्ज, क्लेमफॉर्म भाग 3, क्लेमफॉर्म भाग 1, क्लेमफॉर्म भाग 1 चे सहपत्र, होल्डींग प्रमाणपत्र, 7/12 उतरा, तलाठयाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञा पत्र, वारस प्रमाणपत्र, चावलाबाई कनिराम राठोड हिचे मृत्यू प्रमाणपत्र, वैद्कीय अधिकारी यांनी पोलिस स्टेशन जिंतूर यास लिहिलेले पत्र, आकस्मात मृत्यू पहिली खबर रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार जिंतूर यांना 20/05/2011 चे लिहिलेले पत्र, पंचनाम्याची प्रत, पासबुक, फेरफार नोंदवहीची प्रत, रेशनकार्डाची प्रत, अर्जदाराचे ओळख पत्र, गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास दिनांक 17/10/2011 रोजी वयाच्या पुराव्या बाबतचे मागणी केलेले पत्र, गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास त्याचा विमादावा नाकारल्याचे पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 मंचाची नोटीस तामिल होवुनही गैरहजर, त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 5 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्याचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व तसेच आशिलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशिल यांच्यात मध्यस्त म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते, तसेच सदरचे ट्रायपार्टी अॅग्रीमेंट असल्यामुळे शेतकरी अर्जदारास आमच्या विरुध्द दावा दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही फक्त विमादावा व त्यास आवश्यक असलेल्या दस्तऐवज शासनाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून गोळा करणे व तसेच प्राप्त कागदांची छाननी करुन विमा कंपनीस सादर करणे व दाव्याचा निर्णय होई पर्यंत विमा कंपनीकडे पाठपुरावा करणे व दावा निर्णया संबंधी दस्तऐवज अपूर्ण असल्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास कळविणे विमा दावेदार व विमा कंपनी यांच्या मध्ये मध्यस्त म्हणून काम करणे एवढेच आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 दावेदारास कोणत्याही प्रकारचा आर्थीक लाभ सानुदन देण्यास जबाबदार नाही, म्हणून सदरच्या प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्याचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व तसेच अर्जदार हा आमच्या गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक नाही व तसेच त्यांने हप्त्यापोटी 1 रुपया देखील आमच्याकडे जमा केलेला नाही म्हणून सदरची तक्रार ही ग्राहक या नात्याने सी.पी. अॅक्ट 1986 अंतर्गत सदरच्या मंचास चालवण्याचा अधिकार नाही व तसेच त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, ट्रायपार्टी अॅग्रीमेंट प्रमाणे शेतकरी गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द कोणत्याही प्रकारे दावा दाखल करु शकत नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, मयत चावलाबाई कनिराम राठोड यांचे मृत्यू समयी वय 75 वर्षा पेक्षा जास्त होते, व याबाबतचा मयताचा दाखला त्याने दाखल केलेल्या रेशनकार्ड वरुन सिध्द झालेले आहे व तसेच सदरचे कारण दाखवून गैरअर्जदार क्रमांक 3 ने 16/12/2011 रोजी नियमा प्रमाणे विमा लाभ फक्त 10 वर्ष ते 75 वर्षांच्या आतील व्यक्तीसच घेता येत असल्यामुळे व अर्जदाराच्या आईचे वय मृत्यू वेळी 75 वर्षां पेक्षा जास्त असल्याने अर्जदाराचा विमादावा नाकारला आहे. त्यामुळे विमा कंपनीने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचा विमादावा नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराच्या आईचे दिनांक 19/05/2011 रोजी शेतात झाड पडून अपघाती मृत्यू झाले ही बाब नि.क्रमांक 4 वरील दाखल केलेल्या एफ.आय.आर.च्या प्रत वरुन ज्याचा क्राईम नंबर 36/2011 व तसेच दाखल केलेल्या पोस्ट मार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत 2 कडे अपघात विमा दावा दाखल केला होता ही बाब देखील नि.क्रमांक 4 मधील दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग 3, क्लेमफॉर्म भाग 1 व क्लेमफॉर्मभाग 1 च्या सहपत्रावरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराची मयत आई हिच्या नांवे मौजे मालेगांव ता.जिंतूर जि.परभणी येथे गट क्रमांक 117 मध्ये तीच्या नावे शेती होती व गैरअर्जदार क्रमांक 3 ची विमा धारक आहे ही बाब देखील नि.क्रमांक 4 मधील दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचा विमादावा अर्जदाराच्या मयत आईचे वय अपघाता वेळी 75 वर्षां पेक्षा जास्त होते कारण दाखवुन विमा दावा नाकारला ही बाब देखील नि.क्रमांक 4 मधील दाखल केलेल्या गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास दिलेल्या पत्रावरुन सिध्द होते. वास्तविक अर्जदाराच्या आईचे दिनांक 19/05/2011 रोजी मृत्यू समयी वय 65 वर्षे होते ही बाब नि.क्रमांक 4 मधील दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरुन सिध्द होते व सदरचे वय हे संबंधीत डॉक्टरांनी लिहिलेले आहे याचाच अर्थ अर्जदाराच्या आईचे मृत्यू समयी वय 75 वर्षां पेक्षा जास्त नव्हते, 75 वर्षांच्या आतच होते हे सिध्द होते. तसेच वया बाबतचा पुरावा अर्जदाराने नि.क्रमांक 4 मध्ये दाखल केलेल्या महाराष्ट्र पोलीस कुटूंब आरोग्य योजना अंतर्गत दिलेल्या ओळख पत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराच्या मयत आईचे जन्म तारीख 06/04/1942 म्हणजेच मृत्यू समयी त्यांच्या आईचे वय 70 वर्षांच्या आतच होते हे सिध्द होते म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा अर्जदाराच्या आईचे मृत्यू समयी वय 75 वर्षां पेक्षा जास्त होते असे दाखवून अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे असे मंचास वाटते.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
रु.1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) शेतकरी अपघात विमा पोटी
द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत मानसिक
त्रासापोटी रु.2,000/- फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी रु. 2,000/- फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त) द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.