निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 09/02/2012 तक्रार निकाल दिनांकः- 08/05/2014
कालावधी 02वर्ष.02महिने.29दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
शोभा भ्र.बाबाराव सोळंके, अर्जदार
वय 27 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.ए.डी.खापरे.
रा.बोरी ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 तालूका कृषी अधिकारी, गैरअर्जदार. जिंतुर ता. जिंतुर जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक, स्वतः
कबाल इन्शुरन्स ब्राकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन, एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं. 7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर.
सिडको, औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इंन्शुरन्स कंपनी.लिमिटेड,
दयावान कॉम्प्लेक्स,परभणी.
4 युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
मंडळ कार्यालय क. 2 अंबिका हाउस शंकर
नगर चौक, नागपूर 440010.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा मंजूर करण्याचे प्रलंबीत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराची सासु नामे कलावंतीबाई देवराव सोळंके हया मौजे बोरी ता.जिंतूर येथील शेत गट नं. 163 मधील शेतीच्या मालक व कब्जेदार होत्या, याबद्दल त्यांचे नांव 7/12, 8 अ, 6 ड, 6 क, या प्रमाणपत्रावर आलेले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 16/01/2010 रोजी अर्जदाराची सासू पाणी पिण्यास गेली असता विहीरीत पडून मृत्यू झाला. याबाबत अकस्मात नोंद मृत्यू क्रमांक 08/10 पोलीस स्टेशन बोरी ता.जिंतूर येथे आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराची मयत सासू शेतकरी जनता अपघात विमा योजनेची लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 03/06/2010 रोजी मयत सासूचा विमादावा दाखल केला व विम्या दाव्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जदाराने जोडली होती. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरचा विमादावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडे दाखल केला व त्यांनी तो विमादावा गैरअर्जदार कमांक 3 कडे पाठविला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या विम्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता, त्यांनी असे सांगीतले की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कागदपत्राची मागणी केली आहे. त्याची पुर्तता करा. त्याप्रमाणे अर्जदाराने सर्व कागदपत्राची पुर्तता केली.
अर्जदाराचे म्हणणे की, परत त्यांनी विम्यादाव्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यास चौकशी केली असता, तुमच्या विम्यादाव्या बाबत अजून काही आलेले नाही असे सांगीतले.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदारांनी अर्जदाराचा विमादावा मंजूर करण्याचे प्रलंबीत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरच्या तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 1 लाख रु. मृत्यू तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- रु. तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावेत.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 24 कागदपत्राच्या यादीसह 24 कागदपत्राच्या प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये जि.अ.कृ.अ. यांचे पत्र, गैरअर्जदार क्रमांक 2 चे पत्र, जि.अ.कृ.अ.चे पत्र, तालुका कृषी अधिका-याचे पत्र, क्लेमफॉर्म भाग -1, भाग 1 चे सहपत्र, 7/12, होल्डींग प्रमाणपत्र, 6 क, 6 ड, क्लेमफॉर्म भाग -2, प्रतिज्ञापत्र, मयताचे ओळखपत्र, मृत्यूचा दाखला, मृत्यूचा दाखला, अकस्मात मृत्यू रिपोर्ट, जबाब, जबाब, घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा, शव फॉर्म, प्रोव्हीजनल मृत्यू प्रमाणपत्र, पी.एम. करणे बाबत पत्र, पी.एम. रिपोर्ट, इ. कागदपत्रे दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या आशीलास विमा सेवा पुरवीणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते. सदर कामाच्या नेमणुकीसाठी आमच्या संस्थेने शासनाकडून कोणत्याही प्रकारची फी, अथवा आर्थिक मदत मागीतलेली नाही. म्हणून अर्जदार आमचा ग्राहक होत नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, आम्हांस कलावंती देवराव सोळंके मौजे बोरी ता.जिंतूर अपघात दिनांक 16/01/2010 चा विमादावा प्राप्त झाला. व तसेच मागणी केलेले कागदपत्राची पुर्तता अर्जदाराने आमच्याकडे केल्यानंतर सदरचा विमादावा मंजुरीसाठी नागपूर येथील विमा कंपनीकडे 10/11/2010 रोजी पाठविला. सदरचा विमादावा विमा कंपनीने दिनांक 31/12/2010 च्या पत्राव्दारे नामंजूर केला होता, व नामंजूर करण्याचे कारण मयत कलावंतीचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला होता. असे दर्शविले होते. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून सदरची तक्रार अर्जदारास 2000/- रु. खर्च आकारुन आम्हांस प्रकरणातून मुक्त करावे.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. अर्जदार हा आमचा ग्राहक नाही. वा त्याने आमच्याकडे हप्त्यापोटी रक्कम देखील भरलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याने मंचासमोर चालू शकत नाही. वा मंचास सदरचे प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. व ती खारीज होणे योग्य आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, त्रिपक्षीय करारा प्रमाणे शेतक-यास विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, पॉलिसीच्या नियम व अटी प्रमाणे जर
शेतक-याचा आत्महत्येमुळे मृत्यू झाल्यास, त्याला विमा योजनेचा लाभ घेता येत नाही. व प्रस्तुत प्रकरणात पोलीस पेपर व इतर कागदपत्राची पहाणी केली असता, विमा कंपनीस असे निदर्शनास आले की, अर्जदाराच्या मयत सासुने आत्महत्या केली होती, त्यामुळे अर्जदाराचा विमादावा पॉलिसीच्या नियम व अटी प्रमाणेच विमा कंपनीने दिनांक 31/12/2010 च्या पत्राव्दारे नामंजूर केला आहे व ते योग्यच आहे.
तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराचे सासुने दिनांक 16/01/2010 रोजी आत्महत्या केली व अर्जदाराने प्रस्तुतचे प्रकरण इ.स. 2012 मध्ये दाखल केले आहे. व ते मुदतबाहय आहे. या कारणास्तव सदरची तक्रार खारीज करणे योग्य आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून विमा कंपनीने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ विमा कंपनीने नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 20 वर दोन कागदपत्राच्या यादीसह दोन कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये पॉलिसीची प्रत व पॉलिसीच्या अटीची प्रत दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 विमा कंपनीने शेतकरी
अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत सासुचा
विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराची सासु नामे कलावंतीबाई देवराव सोळंके यांना मौजे बोरी ता.जिंतूर जि.परभणी येथील तलाठी सज्जा चांदज येथे गट नं. 163 मध्ये 81 गुंठे शेतजमीन होती व सदर जमीनीची अर्जदाराची सासु मालक व कब्जेदार होती. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/7 वरील 7/12 उता-यावरुन, नि.क्रमांक 4/8 वरील होल्डींग प्रमाणपत्रावरुन व तसेच नि.क्रमांक 4/9 वरील फेरफारच्या नकलेवरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराची सासु शेतकरी अपघात विमा योजनेची लाभार्थी होती. ही बाब देखील सदर रेव्हेन्यु रेकॉर्ड वरुन सिध्द होते.
अर्जदार ही मयत कलावंतीबाई देवराव सोळंके याची वारस आहे ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/10 वरील गाव नमुना नं. 6 क च्या प्रतीवरुन सिध्द होते व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/11 वर दाखल केलेल्या तलाठयाच्या प्रमाणपत्रावरुनही सिध्द होते.
अर्जदाराची सासु नामे कलावंतीबाई देवराव सोळंके यांचा दिनांक 16/01/2010 रोजी पदमाकर उत्तमराव यांच्या पडीत विहीरीत पडून बुडून अपघाती मृत्यू झाला होता, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/19 वरील बोरी पोलीस स्टेशनच्या क्राईम नं. 1/2010 च्या घटनास्थळ पंचनाम्याच्या प्रतीवरुन, नि.क्रमांक 4/20 वर दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनामाच्या प्रतीवरुन, व तसेच नि.क्रमांक 4/24 वर दाखल केलेल्या पी.एम. रिपोर्ट वरुन सिध्द होते.
वरील कागदपत्रावरुन एक निश्चित की, अर्जदाराच्या मयत सासुच्या विहीरीत पडून अपघाती मृत्यू झाला होता. असे मंचाचे मत आहे.
अर्जदाराने सासुच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून मयत सासुचा विमादावा सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला होता. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/4 वरील क्लेमफॉर्म भाग -3, तसेच नि.क्रमांक 4/5 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -1 च्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराचा सदरचा विमादावा विमा कंपनीने दिनांक 31/12/2010 रोजीच्या पत्राव्दारे नामंजूर केला होता, व विमादावा नामंजूर करण्याचे कारण कलावंती सोळंकेनी आत्महत्या केलेमुळे दावा पॉलिसीच्या अटी नुसार नुकसान भरपाई देवु शकत नाहीत, असे दर्शविले होते. ही बाब गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या नि.क्रमांक 8 वरील Repudiation Letter वरुन सिध्द होते.
विमा कंपनीचे सदरचे दावा नाकारण्याचे कारण मंचास योग्य वाटत नाही. कारण विमा कंपनीने याबाबत कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. व तसेच अर्जदाराच्या सासुने आत्महत्या केली, असा सांगणारा कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. केवळ पोलीस कागदपत्रावरुन विमादावा नाकारल्याचे दिसून येते, ते योग्य नाही.
याबाबत मा.राज्य आयोग केरळ यांनी 2013 (1) CPR ( Ker ) Appeal No. 761/11 United India Insurance Co. V/s Mary & Others या प्रकरणात म्हंटले आहे की, Death Claim cannot be repudiated only on basis of false police report. सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो.
राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे अर्जदारास सेवा त्रूटी केली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या
(Jointly & Severally ) आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत सासुच्या विमादाव्या
पोटी रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) अर्जदारास
द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.