निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 09/05/2013
कालावधी 01 वर्ष 02 महिना 08 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
1 कुशावर्ता भ्र.बापुराव फड. अर्जदार
वय 26 वर्षे. धंदा.घरकाम. अड.डि.व्हि.दाभाडे.
रा.पारधवाडी ता.सोनपेठ जि.परभणी.
2 वैष्णवी पिता बापुराव फड,
वय 2 वर्षे अज्ञान अ.पाक.
तिची सख्खी आई कुशवर्ता भ्र.बापुराव फड म्हणजे
अर्जदार क्रमांक 1 रा.वरील प्रमाणे.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय,सोनपेठ जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर,बिग बाजाराच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडिया इन्शुरंस कं.लि.
अड.शर्मा यांचा वरचा मजला नानलपेठ परभणी.ता.जि.परभणी
4 विभागीय व्यवस्थापक,
न्यु इंडिया अशुरन्स कं.लि. विभागीय कार्यालय क्रं. 153400,
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉग्रेस हाऊस रोड पुणे 422 005
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाई मयत शेतक-यांच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रुटीची सेवा दिली. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रारी अशी आहे की.
अर्जदार ही मौजे पारधवाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे व अर्जदार क्रमांक 2 ही अर्जदार क्रमांक एकची मुलगी असून तीचे पालन अर्जदार क्रमांक 1 हिच करते,महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-याचा गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता व त्या पॉलिसीचा अर्जदाराचे मयत पती बापुराव फड हा देखील लाभार्थी होता दिनांक 12/03/2011 रोजी त्याचा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाला. सदर घटनेची खबर पोलिस स्टेशन सोनपेठ येथे दिली व त्याचा गुन्हा र.नं. 09/2011 असा नोंदविण्यात आला आहे, नंतर मयताचे सोनपेठ येथील सरकारी दवाखान्यात पी.एम. करण्यात आले.व या प्रकारणी पोलिसांनी F.I.R., स्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा तसेच साक्षीदारांचे जबाब घेतले, अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 29/04/2011 रोजी कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर गैरर्जदार क्रमांक 1 यांनी तो जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला, त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह अर्जदाराचा विमा प्रस्ताव सादर केला, व त्यानंतर विमा प्रस्तावा बद्दल विचारणा केली असता तुमचा विमा दावा आम्ही मंजुरीसाठी पाठविला आहे व मंजूर झाल्यावर आम्ही कळवु असे अर्जदारास सांगीतले. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराला तोंडी कळविले की, तुमचे काही कागदपत्रांची पुर्तता झालेली नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंजुरीस्तव त्रुटीची पुर्तता करुन पाठविला या नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांना वेळोवेळी संपर्क साधला असता, वरुन काही उत्तर आले नसल्यामुळे काही सांगु शकत नाही असे उडवाउडवीची उत्तरे दिली.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या शेतकरी अपघात विमा अंतर्गत क्लेमची नुकसान भरपाई अर्जदारास जाणुन बुजून मंजूर करुन दिली नाही व त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे पत्र आले व त्या नुसार कागदपत्रांची पुर्तता देखील अर्जदाराने केलेली आहे, परंतु दाव्याची परिस्थिती माहित असून सुध्दा गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाला याबाबत मौन बाळगुन विनाकारण प्रकरण प्रलंबीत ठेवले.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेवून गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे म्हणून सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांच्याकडून पतीचा अपघाती विमा दावा मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावे की, अर्जदारास रु. 1,00,000/- 18 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात यावे,व तसेच शारिरीक व मानसिकत्रासापोटी गैरअर्जदाराकडून रु.25,000/- देण्याचा आदेश व्हावा. अशी मंचास विनंती केली आहे.
अर्जदाराने त्याच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे,तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 5 वर 17 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह कागदपत्रे दाखल केलेले आहेत.ज्यामध्ये 5/1 वर एफ.आय.आर.ची नक्कल, 5/2 वर पी.एम. रिपोर्ट, 5/4 वर कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे तालुका कृषी अधिका-यांनी लिहिलेले पत्र इत्यादी.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 हे हजर होवुन नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला आहे, त्यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारची अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली नाही.व अर्जदाराचा विमा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही तात्काळ तो प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविला व त्यानंतर 23/02/2012 रोजी अर्जदाराचा विमा प्रस्ताव विमा कंपनीने नाकारल्या बाबत अर्जदारास कळविले म्हणून आम्ही सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही व तक्रार खारीज करण्यात यावी, अशी मंचास विनंती केली आहे.
नि.क्रमांक 10 वर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपला लेखी जबाब सादर केला आहे व त्याच्यात त्यांचे असे म्हणणे आहे की,आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही आम्ही फक्त महाराष्ट्र राज्य शासनाने नियुक्त केल्या प्रमाणे आम्ही फक्त विमा प्रस्ताव स्विकारतो व कागदपत्राची छाननी करुन तो सदरचा प्रस्ताव इंन्शुरंस कंपनीकडे पाठवितो व त्यानुसार कागदपत्रांची पुर्तता करावी असे अर्जदारास आम्ही कळविले होते व त्यानुसार अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता केली नसल्यामुळे विमा कंपनीने तो प्रस्ताव नाकारला व त्यामध्ये आमची कसल्याही प्रकारची त्रुटी नाही म्हणून आमच्या विरुध्द सदरची तक्रार फेटाळण्यात यावी म्हणून मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे सदरचे शपथपत्र सक्षम अधिका-यां समोर व्हेरिफीकेशन न केलेलाच दाखल केलेला आहे.
तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी आपल्या वकिला मार्फत हजर होवुन नि.क्रमांक 15 वर आपले लेखी जबाब सादर केले आहे.त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा त्यांच्या विमा कंपनीचा ग्राहक होवु शकत नाही व विमा कंपनीने अर्जदाराकडून हप्त्याच्या स्वरुपात कोणत्याही प्रकारची रक्कम स्वीकारलेली नाही म्हणून सदरच्या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही व खारीज करण्यात यावी असे म्हंटले आहे तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, Tri- partite Agreement नुसार शेतकरी विमा कंपनी विरुध्द सदरची तक्रार दाखल करु शकत नाही व त्यामुळे इन्शुरंस कंपनीने कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सदर घटने बद्दल विस्तृत चौकशीसाठी तपास अधिकारी नेमला होता. तपास अधिका-यांने सखोल चौकशी करुन आपला अहवाल दिलेला आहे व त्या अहवाला प्रमाणे अर्जदाराचे पती मयत बापुराव तुकाराम फड हे दिनांक 12/03/2011 रोजी त्याच्या मित्रांसोंबत पार्टी करायला गेले होते व तो पार्टीत येथ्थेच जेवण व मर्यादे बाहेर देशीदारु पिले असल्यामुळे व रात्रीच्या 10 – 11 च्या सुमारास परत येत असताना रेल्वेलाईन गंगाखेड ट्रॅकवर रेल्वेची धडक लागुन मृत्यू पावले.गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांचे असे ही म्हणणे आहे की, पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील Exclusion Clause 11 प्रमाणे एखाद्या वैयक्तिचा अपघात दारु पिलेल्या अवस्थेत होत असेलतर त्याला पॉलिसीची रक्कम मिळणार नाही, म्हणून खर्चासह तक्रार फेटाळण्यात यावी,अशी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी नि.क्रमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
तिन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने अर्जदाराच्या
मयत पतीच्या शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई
बेकायदेशिररित्या नामंजूर करुन सेवेत त्रुटी केली
आहे काय ? होय.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराच्या मयत पती बापुराव फड हा शेतकरी अपघात विमा पॉलिसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/16 या कागदपत्रांवरुन सिध्द होते व अर्जदाराचे मयत पती शेतकरी होते हे अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/7 वर दाखल केलेल्या नि.क्रमांक 7/12 व नि.क्रमांक 5/10 वर 8 – अ चा उतारा यावरुन सिध्द होते. अर्जदाराने तीच्या पतीचा मृत्यू दिनांक 12/03/2011 रोजी रेल्वे अपघाताने झाला हे अर्जदाराने दाखल केलेल्या एफ.आय.आर. ची कॉपी नि.क्रमांक 5/1 व गुन्हा पंचनामा नि.क्रमांक 5/2 व पी.एम. रीपोर्ट नि.क्रमांक 5/3 यावरुन सिध्द होते व पी.एम. रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूचे कारण अपघातामुळे जखमी होवुन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे ह्दय बंद पडून झालेले आहे, हे अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/3 वर पी.एम.रिपोर्ट वरुन सिध्द होते याउलट गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांचे म्हणणे अर्जदाराचे पती हे दारुच्या नशेत होते व त्या दारुच्या नशेत त्यांनी रेल्वे खाली आत्महत्या केली हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, त्याचे कारण गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी त्यांनी नियुक्त केलेले चौकशी अधिका-यांनी दाखल केलेला अहवाल हा गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी सिध्द केलेला नाही व तसेच संबंधीत तपास अधिका-याचे शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नसल्यामुळे त्याच्या अहवालास कायद्यान्वये महत्व राहत नाही व तसेच तपास अधिका-याच्या रिपोर्टामध्ये देखील इन्क्वेस्ट पंचनाम्याचा उल्लेख केलेला आहे.व असे म्हंटले आहे की, पंचांच्या म्हणणे नुसार अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा रेल्वे अपघाताने झाला व तसेच संबंधीत तपास अधिका-यांने नि.क्रमांक 20/2 वर दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तो अंगठा कोणाचा आहे हे देखील प्रमाणित करुन घेतलेले नाही.त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांचे म्हणणे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दारुमुळे झाला हे म्हणणे योग्य वाटत नाही. कारण दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन एफ.आय.आर. ची कॉपी घटनास्थळ पंचनामा, पोस्टमार्टेम रिपोर्ट, या कागदपत्रांवरुन कोठूनही सिध्द होत नाही की, अर्जदाराच्या पतीचा मृत्य हे दारुमुळे झाले. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी त्यांचे म्हणणे सिध्द केले नाही, व म्हणून अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे. असा यातून निष्कर्ष निघतो.अर्जदाराचा क्लेम चुकीच्या पध्दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्याचे स्पष्ट दिसते.गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने मयत बापुराव फड याचा डेथक्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवलेले आहे.सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार नं 4 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई
रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अर्जदार क्रमांक 1 यांस द्यावी.
3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष