निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/05/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 08/05/2012
तक्रार निकाल दिनांकः- 15/04/2013
कालावधी 11 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सुग्रीव मुरलीधर नागरगोजे. अर्जदार
वय 32 वर्षे. धंदा.शेती. अड.ए.एम.राउत.
रा.शेंडगा ता.गंगाखेड.जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय,सोनपेठ,
ता.सोनपेठ जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक, स्वतः
डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर,
बिग बाजारच्या पाठीमागे आकाशवाणी चौक,
औरंगाबाद 431003.
3 विभागीय व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अशुरन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय, क्रं, 153400
सावरकर भवन शिवाजी नगर,
कॉंग्रेस हाउस रोड, पुणे 422 005
4 शाखा व्यवस्थापक,
न्यु इंडीया अशुरन्स कं.लि.
अड,शर्मा यांचा वरचा मजला
नानलपेठ,परभणी 431401.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन सेवेत त्रुटी दिल्यामुळे अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मयत अनुसयाबाई मुरलीधर नागरगोजे हिचा मुलगा आहे.तो मौजे शेंडगा ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता, त्या पॉलिसीची मयत अनुसयाबाई नागरगोजे लाभधारक होती,सदर योजने अंतर्गत विमा हप्त्याची रक्कम प्रत्येकी रु.6/- प्रमाणे (2010-2011) एक वर्षासाठी संबंधीत विमा कंपनीस शासनाने शेतक-याच्या वतीने एक रक्कमी अदा केली होती.
मयत अनुसयाबाईच्या नावे मौजे मरगळवाडी,तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे गट क्रमांक 156 (1) मध्ये क्षेत्र 0 हेक्टर 55 गुंठे शेती आहे.अर्जदाराची आई दिनांक 29/04/2011 रोजी आपल्या पतीचे दुपारचे जेवण नेहमी प्रमाणे घेवुन जात असतांना भुईमुगाच्या पिकाच्या भोवती असलेल्या तारेच्या काटेरी कुंपनावर विद्युत वितरण कंपनीची जाणारी तार तुटून पडल्यामुळे व विद्युत प्रवाह सदर कुंपनात उतरल्यामुळे व या बाबतची मयत अर्जदाराच्या मयत आईस कल्पना नव्हती व सदर कुंपनास अर्जदाराच्या आईचा स्पर्श होवुन मृत्यू झाला.
घटनेची खबर संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 29/04/2011 रोजी सोनपेठ पोलिस स्टेशनला देवुन ज्या एफ.आय.आर.क्रमांक 17/11 प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. अर्जदाराने त्यानंतर संपूर्ण क्लेमफॉर्मसह व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे दाखल केला व सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 ने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविला, परत अर्जदार सदरच्या विमा प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे गेला असता तुम्हाला सदरील विम्याचा लाभ मिळू शकत नाही तुमचा अर्ज नामंजूर करण्यात आला. असे म्हणुन विमा कंपनीने रक्कम देण्यास नाकारले तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने दिनांक 19/03/2012 रोजी चुकीचा एफ.आय.आर. फाडल्याचा आधार घेवुन विमा प्रस्ताव नामंजूर झाला असे म्हणून अर्जदारास कळविले व विमा रक्कम देण्यास टाळले, तसेच अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मयताच्या पतीने दिनांक 13/07/2009 रोजी विहिरी वरती मोटार बसविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा कडून व योग्य त्या कायद्याचे पालन करुन रितसर कनेक्शन घेतले होते.
हे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी कोणतेही ठोस कारण नसतांना अर्जदारास विमा प्रस्ताव देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे म्हणून ग्राहक मंचास प्रस्तूत तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह मिळावे व तसेच मानसिकत्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्र. 2 वर दाखल केला आहे.व पुराव्यातील कागदपत्रात नि.क्र. 4 वर 19 कागदपत्रांसह छायाप्रती दाखल केल्या आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्या नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी मंचाची नोटीस स्वीकारुन आपला जबाब दाखल केला आहे.नि.क्र.8 वर दिनांक 11/06/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपला लेखी जबाब सादर केला आहे त्याचे असे म्हणणे आहे की, प्रस्ताव संबंधीत शेतक-याकडून कागदपत्रे पुर्तता करुन वरिष्ठास पाठविले.व त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी परभणी येथे संबंधीत कार्यालयास पाठविले हे काम विमा कंपनीस सदरचा क्लेम कागदपत्रांची छाननी करुन देते त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे 23/02/2012 रोजी संबंधीताचा क्लेम विमा कंपनीने मंजूर केल्या बाबत कळविले, परंतु चेक क्रमांक व रक्कम दिलेली नाही, म्हणून सदरच्या प्रकरणात आम्ही जबाबदार नाही असे म्हंटले आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्टाव्दारे दिनांक 09/07/2012 आपला लेखी जबाब नि.क्रं. 9 वर सादर केला, 10 वर आपले शपथपत्र दाखल केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदारास आम्ही विमा क्लेम देण्यास जबाबदार नाहीत,आम्ही मध्यस्तीचे काम करतो म्हणून सदरची तक्रार त्यांचे विरुध्द खारीज करण्यात यावी, असे लेखी जबाबात दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने नि.क्र. 12 वर आपला लेखी जबाब व नि.क्र.13 वर आपले शपथपत्र सादर केले आहे.लेखी जबाबात असे म्हंटले आहे की, अर्जदार हा त्याचा ग्राहक नाही तसेच सदरच्या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही संपूर्ण तक्रार खोटी व बनावट आहे म्हणून खारीज करण्यात यावी असे जबाबात लिहिले आहे व त्याचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही व मयत अनुसयाबाई नागरगोजे हीचा मृत्यू हा तीने घेतलेल्या बेकायदेशिर विद्युत कनेक्शनामुळे झाला म्हणून आम्ही विमा रक्कम देण्यास बांधील नाहीत, तसेच त्यांनी हे देखील मान्य केले आहे की, अनुसयाबाईचा मृत्यू हा अपघातामुळे झाला म्हणून सदरची तक्रार नाकारण्यात यावी अशी मंचास विनंती केली आहे. व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांचे असे म्हणणे आहे की, बेकायदेशिररित्या विद्युत प्रवाह घेवुन अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदार नसते म्हणून सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे त्याचे वकिल व गैरअर्जदारातर्फे त्याचे वकिलांचा युक्तिवाद ऐकला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराच्या मयत आईच्या
शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई बेकायदेशिररित्या
नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराची मयत आई नामे अनुसयाबाई मुरलीधर नागरगोजे ही शेतकरी अपघात विमा पॉलिसीची लाभार्थी होती हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.क्रं.5 वरील 5/2 वर शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या यादी मध्ये 775 वरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने नि.क्र. 5/4 वर विमा प्रस्ताव दाखल केल्या बाबतचा पुरावा दाखल केला आहे. तसेच नि.क्र. 5/9 वर अनुसयाबाईच्या नावे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा व 8-अ चा उतारा दाखल केलेला आहे. व यावरुन अनुसयाबाई ही अपघात विमा योजनेची लाभार्थी होती हे सिध्द होते तसेच अर्जदाराने अनुसयाबाईचा अपघाती मृत्यू झाला या बाबत नि.क्र. 5/11 वर एफ.आय.आर. ची नक्कल व तसेच 5/21 वर मृत्यू प्रमाणपत्र दाखल केले आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने नि.क्रमांक 5/1 वर अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारला आहे. नाकारण्याचे कारण गैरअर्जदार क्रमांक 3 ने असे दिलेले आहे की,अनुसयाबाई नागरगोजे हिने जनावरे शेतात जाऊ नये म्हणून शेता भोवती विद्युतच्या तारेचे कुंपन बसविले होते व त्यांनी अनधिकृत विज प्रवाह सोडला होता व अनधिकृत विज प्रवाहाचे संपर्कात आल्यामुळे ते स्वतःचे मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे आम्ही रक्कम देवु शकत नाही व तसेच पॉलिसी प्रमाणे अनधिकृत विज जोडणी घेणा-या विमा धारकाला दावा रक्कम देय होत नाही, असे म्हणून अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी नाकारला. या उलट अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, अर्जदाराच्या वडीलाने सदरील शेतामध्ये विहिरी वरील विद्युत मोटार बसविण्या करीता रितसर कोटेशन भरुन कनेक्शन घेतले होते हे अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्र. 5/26, 5/27, 5/28, 5/29, या कागदपत्रारुन सिध्द होते अर्जदाराने विमा क्लेम आवश्यकत्या कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे पॉलिसीच्या नियम व अटी प्रमाणे सादर केलेला होता हे स्पष्ट दिसते तसेच अर्जदाराच्या वडीलांने कायदेशिर बाबींचे पालन करुन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून कनेक्शन घेतले असल्यामुळे ते बेकायदेशिर विद्युत कनेक्शन घेतले असे गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही व त्या कारणास्तव गैरअर्जदार क्रमांक 3 ने विमा प्रस्ताव नाकारल्याचे कारण मुळीच ग्राह्य धरता येत नाही.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेले शेतकरी विमा पॉलिसीचा खर्चा लाभार्थी शेतक-याचा आकस्मात मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटूंबाला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवु नये या उदात्त हेतूने शेतकरी अपघात विम्याची कल्याणकारी योजना असे असतांना विमा कंपनीने म्हणजेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराच्या वडीलाने बेकायदेशिर कनेक्शन घेवुन अर्जदाराच्या आई वडीलांच्या मृत्यूस ते स्वतः जबाबादार आहेत या कारणास्तव विमा रक्कम देता येत नाही हे तांत्रिक कारण दाखवुन अर्जदाराचा विमा क्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन निश्चितपणे सेवात्रुटी केली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो.गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनी यांनी मयताच्या मृत्यू बद्दल “ Charter House ” Detective यांचेकडून स्वतंत्र चौकशी करुन त्याचा अहवाल मंचासमोर दाखल केलेला आहे जे की, नि.क्रमांक 17/2 वर आहे.त्यांच्या अहवाला मध्ये त्यांनी असे म्हणले आहे की, रानडुकरे येवु नये म्हणून शेती भोवती तारेचे कुंपन करुन त्यात विद्युत प्रवाह सोडला होता व त्याचा शॉक बसून स्वतःच्या चुकीने मेला जरी असे असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, मयताने आत्महत्या करण्यासाठी असे केले नव्हते.जरी त्याने रानडुकरासांठी कुंपनात विज प्रवाह सोडला होता त्या Trap मध्ये स्वतः आडकला व मेला हा एक अपघात व योगायोग असु शकते,त्यामुळे Policy त दिलेल्या Exclusion Clause मध्ये कुठलाही मुद्दा त्यात लागु होतो असे मंचास वाटत नाही. मयत अनुसयाबाई नागरगोजे हिचा डेथक्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व अर्जदारास मानसिकत्रास देवुन नुकसान भरपाई मिळण्या पासून वंचित ठेवले आहे,सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदाराच्या मयत आईचा डेथक्लेमची नुकसान भरपाई
रु.1,00,000/- (अक्षरी रु.एकलाख फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या
आत अर्जदारास द्यावी.
3 या खेरीज मानसिकत्रास व सेवेतील त्रुटी बद्दल नुकसान भरपाई म्हणून
रु.2,000/- (अक्षरी रु.दोनहजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून
रु.1,500/- (अक्षरी रु.एकहजार पाचशे फक्त) आदेश मुदतीत द्यावे.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
मा.आर.एच.बिलोलीकर. मा.पी.पी.निटूरकर
सदस्य अध्यक्ष