(घोषित दि. 17.11.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराच्या वडीलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी विमा रक्कम न मिळाल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराचे वडील मयत रामलाल मन्साराम अहिले हे बदनापूर येथील रहिवासी होते व तेथे त्यांची शेत जमीन आहे. दिनांक 04.07.2012 रोजी रामलाल अहिले बदनापूर येथे रस्त्याने जात असताना मोटार सायकल स्वाराने धडक दिल्यामुळे गंभीर दुखापत होऊन दिनांक 30.07.2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याचा पंचनामा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला असून ड्रायव्हर विरुध्द कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अर्जदार हा त्यांचा मुलगा असून शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे विमा प्रस्ताव दिनांक 23.06.2014 रोजी दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी यांनी कागदपत्रे अर्धवट असून मुदतही संपली असल्याचे सांगून या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे सांगितले. अर्जदार वकीलामार्फत संपूर्ण कागदपत्रे दिनांक 17.07.2014 रोजी दाखल करावयास गेले असता गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरील प्रस्ताव मुदतबाह्य असल्याचे पत्र देऊन कागदपत्रे परत केली. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत, प्रतिवादी क्रमांक 2 यांनी दिलेले पत्र, विहीत नमुन्यातील अर्ज, 7/12, पी.एम.रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी यांना नोटीस प्राप्त होवूनही ते मंचात हजर झाले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 जिल्हा कृषी अधिकारी यांनी पत्र दाखल केले आहे. त्यांच्या जबाबानुसार अर्जदाराचे वडील रामलाल मन्साराम अहिले यांचा दिनांक 30.07.2012 रोजी मृत्यू झाला व त्यांचे वारस चैनलाल रामलाल अहिले यांनी दिनांक 17.07.2014 रोजी विमा प्रस्ताव दाखल केला. प्रस्ताव घटना घडल्या पासून 90 दिवसात दाखल करणे आवश्यक आहे मात्र सदरील प्रस्ताव 1 वर्षे 11 महिन्याच्या विलंबाने प्राप्त झाल्यामुळे शासन निर्णयाच्या आधारे वारसास परत करण्यात आला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार सदरील प्रस्ताव त्यांना मान्य नाही. सदरील प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1, 2 यांना विलंबाने प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो नियमानुसार स्विकारता येऊ शकत नाही. विहीत मुदतीत प्रस्ताव आला तरच तो स्विकारता येतो. सदरील तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की,
- अर्जदार हा मयत रामलाल अहिले यांचा मुलगा असून त्यांनी वारस प्रमाणपत्र दाखल केले आहे व इतर वारसांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
- अर्जदाराचे वडील मयत रामलाल मन्सालाल अहिले हे शेतकरी असून त्यांची ढोकसाळ तालुका बदनापूर जि.जालना येथे शेजजमीन असल्याचे 7/12 च्या उता-यावरुन दिसून येते.
- अर्जदाराचे वडील दिनांक 24.07.2012 रोजी बदनापूर येथे रस्त्यावरुन जात असताना मोटार सायकल स्वाराने धडक दिली व या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना बदनापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व दिनांक 30.07.2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराने मरणोत्तर पंचनामा, एफ.आय.आर, बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये केलेली फिर्याद इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केलेली आहेत.
- शासनाने जाहिर केलेल्या शेतकरी जनता व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने दिनांक 14.07.2014 रोजी तालुका कृषी अधिका-याकडे विमा प्रस्ताव दाखल केला. परंतू हा प्रस्ताव एक वर्ष दोन महिने विलंबाने दाखल केल्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी तो अर्जदारास परत केल्याचे दिनांक 17.07.2014 रोजी जिल्हा कृषी अधिकारी, जालना यांच्या पत्रावरुन दिसून येते.
- सदरील प्रस्ताव हा कृषी अधिका-या मार्फत विमा सल्लागार कंपनीकडे जाऊन छाननी होऊन नंतर संबंधित विमा कंपनीकडे पाठविण्यात येतो. परंतू तालुका कृषी अधिक्षक जालना यांनी एक वर्ष दोन महिने विलंब झाल्याचे सांगून सदरील प्रस्ताव स्विकारला नाही. त्यामुळे तो विमा कंपनी, गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या पर्यंत गेला नाही.
- मा.राष्ट्रीय आयोगाने लक्ष्मीबाई व इतर /वि/ डेप्युटी डायरेक्टर (रिव्हीजन अर्ज क्रमांक 3118-3144/2010) या अर्जात मा.राष्ट्रीय आयोगाने दोन वर्षाची मुदत ग्राहय धरली आहे. त्यामुळे सदरील प्रस्ताव मुदतबाहय असल्याचे म्हणणे मंच ग्राहय मानत नाही.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच असा आदेश देते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी यांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह 30 दिवसात विमा प्रस्ताव द्यावा व गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सदरील प्रस्ताव प्राप्त झाल्यावर 30 दिवसात गुणवत्तेवर निकाली काढावा.
मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे 30 दिवसात आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल करावा.
- गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी प्रस्ताव प्राप्त झाल्यावर 30 दिवसात गुणवत्तेवर निकाली काढावा.
- खर्चा बद्दल आदेश नाही.