निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 09/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 12/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 23/04/2013
कालावधी 01वर्ष.03 महिने.11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पदमीनबाई भ्र.तुकाराम सोनटक्के. अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.घरकाम. अड.ए.डी.खापरे.
रा.पिंपरण ता.पूर्णा जि.परभणी.
विरुध्द
1 तहसिलदार, गैरअर्जदार.
तहसिल कार्यालय,पूर्णा.
ता.पूर्णा.जि.परभणी.
2 तालुका कृषी अधिकारी.
तालुका कृषी कार्यालय,पूर्णा.ता.पूर्णा जि.परभणी.
3 विभागीय व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायण एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग प्लॉट नं.7,
सेक्टर इ 1, टाऊन सेन्टर, सिडको,औरंगाबाद.
4 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.
570,रेक्टेफायर हाउस,इंदोरी जिन,
इलेक्ट्रीक लि.नायगम क्रॉस रोड, नेक्सट टु रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट,
वडाळा,वेस्ट,मुंबई.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदार श्रीमती पदमीनबाई भ्र.तुकाराम सोनटक्के याची तक्रार विमा कंपनी विरुध्द आहे. श्रीमती पदमीनबाई यांच्या पतीचा विमादावा विमा कंपनीने नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दल विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्या संबंधीची तक्रार आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.अर्जदाराचा पती तुकाराम रंगनाथ सोनटक्के हा शेत गट नं. 78 मौजे पिंपरण तलाठी सज्जा आलेगाव (सौ) ता.पूर्णा जि.परभणी येथील शेतीचे मालक होते दिनांक 29/08/2008 रोजी अर्जदार यांचे पतीचा मृत्यू गोदावरी नदीच्या पात्रात बुडून अपघाताने मृत्यू झाला. त्या बद्दल अकस्मात मृत्यू म्हणून सोनखेड पोलिस स्टेशन येथे नोंद झाली होती. व त्यानंतर मयताचे पी.एम. घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा इत्यांदी करण्यात आले.
सोनखेड पोलिसांना पुर्णा पोलिसांनी पत्र पाठवल्यानंतर सर्व कागदपत्रे पुर्णा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर अर्जदारास मानसिकत्रास झाला तसेच शासकीय कामासाठी कोणीही मदत केली नाही अर्जदाराने तलाठी यांस विनंती करुन सर्व कागदपत्रे जमा केली,तसेच पोलिस पेपर्स जमा करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्या त्यामुळे मानसिक व शारिरीकत्रास सहन करावा लागला.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने तीच्या मयत पतीचा विमादावा विहित मुदतीत संबंधीत कागदपत्रासंह गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सादर केला, त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरचा दावा गैरअर्जदार कमांक 3 यांच्याकडे पाठविला त्याचा जावक क्रमांक 2008 / नै.आ./ शे.अ.वि.यो./तहसिल कार्यालय,पुर्णा दिनांक 15/12/2008 असा आहे.त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे पत्र अर्जदारास आले व त्यांत त्यानी काही कागदपत्रांची मागणी केली होती त्याप्रमाणे अर्जदार यांनी त्या कागदपत्राची पुर्तता केली नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पुर्तता केलेल्या कागदपत्रांसह पुढील कार्यवाहीस्तव उपविभागीय कृषी अधिकारी परभणी यांना सर्व कागदपत्रांसहीत पाठवली नंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी तुमचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे पाठविला असे नेहमीचे उत्तर दिले गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास पुन्हा पत्र पाठवुन पुन्हा कागदपत्रांची पुर्तता करा असे सांगुन अर्जदाराकडून कागदपत्रे मागवुन घेतली ती कागदपत्रे त्यांनी दिनांक 14/07/2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना सादर केली व त्याच प्रमाणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिनांक 15/07/2010 रोजी त्रुटीच्या कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे मंजुरीस्तव पाठविले.
अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांना विमादावा मिळालेला आहे, परंतु त्यांनी तो रखडत ठेवला आहे अर्जदाराने माहितीच्या अधीकारांत अर्ज देवुन विचारणा केली असता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्याचे उत्तर दिनांक 11/07/2011 रोजी देवुन त्यामध्ये त्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळवले आहे की, जी की, अर्जदाराचा विमा दावा अद्यापही प्रलंबित आहे, त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या विमा दाव्या बद्दल मंजूर अथवा नामंजूर बाबत पत्र दिले नाही म्हणून अर्जदाराने मंचाकडे तक्रार दाखल केलेली आहे व मंचास अशी विनंती केली आहे की, विमा कंपनीला अर्जदाराचा विमा दावा मिळालेला असून देखील त्यांनी त्यावर कसलीही कार्यवाही केली नाही त्यामुळे अर्जदारास मृत्यू तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह 1,00,000/- रुपये विमा कंपनीकडून देण्याची आदेशीत करावे तसेच मानसिक व शारिरीकत्रासापोटी रु.25,000/- व खर्चापोटी रु.5,000/- देण्याची आदेशीत करावे.
अर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 4 वर कागदपत्रांच्या यादी प्रमाणे झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार यांना मंचातर्फे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीसा पाठवण्यांत आले.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे,जे की, नि.क्रमांक 13 वर आहे.त्याचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, दिनांक 29/08/2008 रोजी अर्जदार पद्मीनबाई तुकाराम सोनटक्के रा.पिंपरण यांचे पती तुकाराम रंगनाथ सोनटक्के रा पिंपरण ता.पुर्णा यांचे नदीच्या पात्रांत बुडून 29/08/2008 रोजी मृत्यू झालेला आहे व तसा अर्ज मा.तहसिलदार पुर्णा यांचे कार्यालयास 15/12/2008 रोजी सादर केलेला आहे मा.तहसिलदार पुर्णा ( गैरअर्जदार क्रमांक 1 ) यांनी त्यांच्या अर्जा प्रमाणे त्यांचे सर्व कागदपत्रासह मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांना त्याचे पत्र जा.क्रमांक 2008/नै आ/ शे.अ.वि.यो./ का.वि.दिनांक 15/12/2008 अन्वये सादर केलेले आहेत व त्यानंतर 07/11/2009 रोजी प्रस्तावातील पुर्तता करुन मा.उपविभागीय कृषि अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविले आहे व मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांनी त्याचे पत्र जा.क्र. 2737/ दिनांक 15/07/2010 अन्वये अर्जदाराचा प्रस्ताव परिपूर्ण करुन कबाल इन्शुरंस ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि. औरंगाबाद यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविला आहे त्यांचे असेही म्हणणे आहे की, त्यांच्याकडे दिलेली कामगिरी ते चोखपणे पार पाडलेली आहे त्यामुळे त्यांना दोषी धरणे योगय नाही गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपले शपथपत्र नि.14 वर दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे जे की, नि.क्रमांक 10 वर आहे त्यांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 3 यांचा ग्राहक नाही, त्यांचे काम एवढेच आहे की, तहसिलदार / तालुका कृषी अधिकारी ई. संबंधीत अधिका-यांकडून संबंधीत कागदपत्रे घेणे व विमादावा कंपनीकडे पाठवणे तसेच संबंधीत कागदपत्राची पाहणी करुन कांही दोष आढळल्यास संबंधीताकडून पुर्तता करुन घेवुन इन्शुरन्स कंपनीकडे पाठवणे त्यासाठी ते महाराष्ट्र शासन अथवा शेतकरी यांचेकडून काही Fee/ Commission घेत नाहीत.
त्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांना Tukaram Rangnath Sontakke R/o Pimparan Tq Purna Dist Pabhani यांचे विमा दावा 22/12/2008 रोजी मिळाला व त्याने तो Reliance General Insurance Co. Mumbai यांचेकडे Settlement साठी पाठवला व त्याचे असेही म्हणणे आहे की, कित्येक स्मरणपत्रे पाठवुन देखील आता पर्यंत काही सेटल झालेले नाही.गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपले शपथपत्र नि.क्रमांक 11 वर दाखल केलेले आहे.
सदरचे शपथपत्र गैरअर्जदार क्रमांक 3 ने संबंधीत अधिका-यां समोर व्हेरीफाय केलेले नाही त्यामुळे सदरच्या शपथपत्रास कायद्याने काही एक अर्थ नाही,म्हणून सदरचे शपथपत्र ग्राह्य धरता येणार नाही.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांने त्याचे लेखी म्हणणे सादर केलेले आहे ज्याचा नि.क्रमांक (17) आहे.त्याचे थोडक्यांत असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार खोटी, तथ्यहीन, आणि ग्राहक संरक्षण कायद्या विरोधात आहे.त्यामुळे ती नाकारण्यात यावी, गैरअर्जार क्रमांक 4 यांनी कोठल्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही,त्यांचे असेही म्हणणे आहे की, विमा दावा Policy Period च्या नंतर 90 दिवसाच्या आत कंपनीकडे आला पाहिजे पण सदर केस मध्ये कंपनीकडे दावा देखील आला नाही तसेच त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, मृत्यू दिनांक 29/08/2008 रोजी झाला आहे व तक्रार 2012 मध्ये दाखल झालेली आहे जी की, C. P. Act 1986 च्या तरतुदी प्रमाणे कालबाह्य आहे म्हणून प्रस्तुतची तक्रार बेकायदेशिर आहे तसेच त्याचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 याने त्याच्याकडे संबंधीत विमा दावा पाठवलेला नाही व तशी पोचपावती पण दाखल केलेली नाही, म्हणून गैरअर्जदार क्रमांक 4 यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा दावा खर्चासह फेटाळण्यात यावा.त्याचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 हि एक खाजगी संस्था आहे व ती कमिशन घेवुन महाराष्ट्र शासनास सेवा देते.
तक्रारीच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तिवाद ऐकला.
अर्जदार व गैरअर्जदारांच्या कैफीयतीवरुन तक्रारीच्या निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी अर्जदाराचा
विमादावा देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
शेतकरी अपघात विमा योजना हि महाराष्ट्र शासनाने शेतक-यासाठी दिलेली एक वरदानच आहे अत्यंत उदात्त हेतुने हे महाराष्ट्र शासनाने हि योजना अंमलात आणण्याचे ठरवले व विमा कंपन्यांही या योजनेचा उदात्त हेतू व आपली Corporate Social Responsibility लक्षांत घेवुन नफा अगर तोटा याचा विचार न करता त्यास प्रतीसाद दिला व त्यासाठी ट्रायपार्टी अग्रीमेन्ट केले त्यांत 1) महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या वतीने विमेची रक्कम भरावयाची. 2) कांही अपघात झाल्यास Cabal Insurance Broking Services Pvt. Ltd. यांनी विमा दाव्याची कागदपत्रे तपासून त्यांत कांही त्रुटी असल्यास ती पुर्ण करवुन घेवुन विमा रक्कमेसाठी संबंधीत विमा कंपनीकडे पाठवावेत जेणे करुन विम्याची रक्कम शेतक-यास मिळण्यास मदत होईल व विमा कंपनीस विमादावा मंजूर करुन विमा रक्कम अदा करण्यास मदत होईल. 3) विमा कंपनीनी विमा दाव्याची रक्कम अदा करावयाचे असे ठरवलेले आहे.
अपघात झाल्यास विमा दाव्यासाठी शेतक-यांने संबंधीत कागदपत्रांसह विमादावा तहसिलदार / तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत ज्या तारखेस विमा दावा वरील अधिका-याकडे शेतकरी दाखल करेल त्याच तारखेस विमा कंपनीस सुचना मिळाली असे गृहीत धरण्याचे ठरले आहे.
शेतकरी विमा योजनेची काही संबंधीत ठळक वैशिष्ट्ये.
(Clauses in policy Terms & Condition relevant to the case )
Definition.
1) Accident : An accident is an event which is wholly unexpected. Not
intended or designed.
IV Procedure to be followed by the insurance Companies:
2) After receiving the completed insurance claim, the insurance companies will decide within 60 days regarding the payment or otherwise of the claim. If the necessary action is not taken within 60 days then interest at the rate of 9 % p.a. will be payable for the delay up to 90 days from the date of receipt and thereafter, interest @ 15% p.a. will be payable in case of delay beyond 90 days.
6) It has also been agreed by the Insurance Companies that the date of
receipt of the claim documents by the Taluka Agriculture Officer will
be taken as the date of intimation of the claim.
सदरील प्रकरणात अर्जदाराच्या म्हणणे नुसार 29/08/2008 रोजी मयत शेतकरी श्री.तुकाराम रंगनाथ सोनटक्के यांचा नदीत बुडून मृत्यू झाला त्यासंबंधी अर्जदाराने जी कागदपत्रे दाखल केली ती योग्य आहेत व संबंधीत कागदपत्रे उदाः पोस्टमार्टेम रिपोर्ट, इनक्वेस्ट पंचनामा, प्राव्हिजनल आणि डेथ सर्टीफिकेट ई. ह्यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघातानेच झाला मयत हा शेतकरी होता हे देखील अर्जदाराने दाखल केलेले 7/12, होल्डींग, 8 अ चा उतारा, 6-क चा उतारा, तलाठ्याचे प्रमाणपत्र या वरुन सिध्द होते.तसेच जिल्हा अधिक्षक परभणी यांनी विमा उतरवलेला कालावधीची माहिती देवुन संबंधीत विमा कंपनीकडे दावा पाठवण्यासाठी Cabal Insurance Broking Services Pvt. Ltd.यांच्याकडे त्यांच्यापत्रासह दिनांक 15/07/2010 रोजी पाठवले.ते पत्र Self Explanatory असून नि.क्रमांक 4/30 वर दाखल केलेले आहे.तसेच तहसिलदार पुर्णा यांनी Cabal Insurance Broking Services Pvt. Ltd. यांना दिनांक 22/12/2008 रोजीचे पत्र जे की, नि.क्रमांक 4 वर आहे ते देखील Self Explanatory आहे.त्यावरुन असे सिध्द होते की, मयत शेतक-याचा मृत्यू विमा कालावधीत झालेला आहे व संबंधीत कपंनीकडे विमा उतरवलेला आहे व विमादावा वेळेत दाखल झालेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांने त्याच्या म्हणण्यात असे कबुल केले आहे की, त्याला संबंधीत विमादावा मिळाला आणि तो त्यानी Reliance General Insurance Co. Mumbai यांच्याकडे Settlement साठी पाठवला व त्याने असेही म्हंटले आहे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक 4 यास वारंवार स्मरणपत्रे देखील पाठवलेत तरीपण विमा कंपनीने दावा Settle करण्याचे तो पण वाट पाहात आहे.गैरअर्जदार क्रमांक 3 याने आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ कोठलेही कागदपत्रे / पुरावा दाखल केला नाही.तसेच मंचाची नोटीस मिळाल्यानंतर देखील त्याने विमा कंपनीकडे संबंधीत दाव्यासाठी कांही पाठपुरावा केला असे देखील निदर्शनास आणले नाही, Cabal Insurance Broking Services Pvt. Ltd. हि Tri party Agreement मधील एक जबाबदार पार्टी आहे.C.P.Act.1986 चे Sec 2 (g) पुढील प्रमाणे आहे.
(g) “ deficiency ” means any fault, imperfection, shortcoming or inadequacy in the quality nature and manner of performance which is required to be maintained by or under any law for the time being in force or has been undertaken to be perormed by a person in pursuance of a contract or otherwise in relation to any service: म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी देखील सेवेत त्रुटी दिली आहे.अर्जदाराला झालेल्या मानसिकत्रासास कारणीभुत ठरला आहे. त्याला आपली जबाबदारी टाळता येणार नाही,आणि म्हणून सदर अर्जदाराचा विमादावा निकाली काढण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी काळजी घेतल्याचे मंचासमोर दाखल झालेल्या पुराव्यांत आलेले नाही उलटपक्षी दिनांक 15/07/2010 पासून ते मंचात तक्रार दाखल होई पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी निष्काळजीपणाने वागुन निश्चितपणे सेवेत त्रुटी दिलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 4 याने आपल्या म्हणण्यांत प्रामुख्याने 3 मुद्दे मांडले आहेत 1) पहिला मुद्या मध्ये अर्जदार हा त्याचा ग्राहक कसा नाही हे सिध्द करण्याचा प्रयत्न 2) दुस-या मुद्यात त्यांनी दावा निकाली न निघण्याचे कारण म्हणजे गैरअर्जदार क्रमांक 3 यांने त्याच्याकडे दावा ( पाठवलेला ) दाखल केलेला नाही व तसा पुरावाही गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दाखल केलेला नाही, असा मांडला आहे. 3) तिसरा मुद्दा म्हणजे जेव्हा गैरअर्जदार क्रमांक 4 यांस दावा मिळालाच नाही त्या परिस्थितीत तो दावा कसा Settle करेल असे म्हंटले आहे.
वरील पहिला मुद्दा मंचास योग्य वाटत नाही कारण अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन हे सिध्द झालेले आहे की, तो गैरअर्जदार क्रमांक 4 याचा ग्राहक होता गैरअर्जदार क्रमांक 4 याचे म्हणणे की, अर्जदाराने त्यांच्याकडे विमा हप्ता भरलेला नसल्या कारणाने तो त्यांचा ग्राहक नाही हे देखील मंचास योग्य वाटत नाही, कारण की, Indian Contract Act प्रमाणे “ Consideration may move from the promisee or any other
person ”
Sec 2 (d) of Indian Contract Act मध्ये Consideration ची definition दिलेली आहे
Sec 2 (d) defines Consideration as follows “ when at the desire of the promissor, the promise or any other person has done or abstained from doing, or does or abstains from doing, or promises to do an or abstain from doing, something, such act or abstinence or promise is called consideration ”
प्रस्तुत प्रकरणांत महाराष्ट्र शासन any other person च्या भुमिकेत आहे. शासनाने शेतक-यांसाठी हप्ते भरले आहेत. तसेच वरील बाब गैरअर्जदार क्रमांक 3 यांना पण संदर्भ बदलुन लागु होते.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांचे म्हणणे की, त्याला विमादावा मिळाला नाही,म्हणुन त्यांने तो Settle करण्याचा प्रश्नच नाही हे देखील या मंचास योग्य वाटत नाही, त्याचे कारण असे की, त्याला दावा मिळाला नाही म्हणून त्यांने गैरअर्जदार कमांक 1, 2, 3 अथवा अर्जदाराला तसे कळवल्याचे कोठेही निदर्शनास आणुन दिले नाही. मंचात तक्रार दाखल झाल्यानंतर देखील त्याने तसे केलेले आहे हे देखील मंचाच्या निदर्शनास आणुन दिलेले नाही, व म्हणून गैरअर्जदार क्रमांक 4 याचे दावा मिळाला नाही हे त्याचे म्हणणे मंचास केवळ निष्काळजीपणा वाटते. वरील दिलेल्या कारणास्तव मंचास असे वाटते की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी काळजीपुर्वक व जबाबदारीने हे प्रकरण हाताळले आहे आणि गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी बेजबाबदारपणाने वागुन एका ग्रामिण भागातींल महिलेस तिच्या नव-याच्या मृत्यू बद्दल मिळणारी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवुन निष्काळजीपणा दाखवला आहे, आणि निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे.
तसेच मंचास असे वाटते की, अर्जदाराने विमादाव्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे.गैरअर्जदार कमांक 1, 2, व 3 यांनी पण त्यांच्या जबाबात तसेच म्हंटलेले आहे.ह्यावरुन हे सिध्द होते की, अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे.
म्हणून वरील निर्णयासाठी उपस्थित केलेल्या मुद्दा क्रमांक 1 याचे होकारार्थी उत्तर देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी अर्जदारास निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आंत
रु. 1,00,000/- ( अक्षरी रुपये एकलाख फक्त) द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास मानसिक व शारिरीकत्रास झाल्या बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- (अक्षरी रु.पाचहजार फक्त) निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत द्यावेत.
4 गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी अर्जदारास दाव्याचा खर्चापोटी रु.2,500/- (अक्षरी रु.दोनहजार पाचशे फक्त ) निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावे.
5 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष